मागील भागांचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879
भाग ६ :- https://www.maayboli.com/node/69897
भाग ७ :- https://www.maayboli.com/node/69912
भाग ८ :
रेवती आणि शर्मिष्ठा यांना घेऊन केदार घरी आला. मीनाक्षीने हसून त्यांचे स्वागत केले “ याss ! ” असे म्हणून त्यांना आत घेतले. केदारने ओळख करून दिली…
“ ही माझी पत्नी मिनाक्षी .मला एक सात वर्षाचा मुलगा आहे . खेळायला गेला असेल.आणि ही रेवती. ही तिची बहिण शर्मिष्ठा ”.
केदार जेंव्हा त्या दोघींना घेऊन आला तेंव्हा मिनाक्षीला प्रश्न पडला या दोघी कोण? चेहेरातर अगदी ओळखीचा वाटतोय पण नाव आठवत नाही, अशी समभ्रमावस्था झाली. पण केदारने ही रेवती अशी ओळख करून दिल्यावर सगळा उलगडा झाला. मिनाक्षीने रेवतीचे हात हातात घेतले ती म्हणाली…
“ तुमची रेवतीशी कशी काय ओळख ? रेवतीशी ओळख असल्याचे कधी बोलला नाहीत? ”
“ बोललो नाही. मोठीच चूक झाली ”
मिनाक्षी म्हणाली…
“सांगायचे राहून गेले असेल. त्यात काय एवढे ”
उत्सुकतेपोटी ती पण त्यांच्या बरोबर बसली.पण कोणीच काही बोलेना. रेवतीला जी वाक्ये बोलायची होती ती मिनाक्षी समोर बोलायचा तिला धीर होइना .
केदारने विचारले…
“ तुम्ही काय घेणार चहा की कॉफी. ”
रेवती म्हणाली…
“ चहा अगदी हवाssय. आम्ही सकाळी थोडेसे खाऊन निघालो ते डायरेक्ट इथेच थांबलो. ”
नाईलाज होऊन चहा बनविण्यासाठी मिनाक्षी किचनमध्ये गेली. रेवती वॉश घ्यायला बाथरूम मध्ये गेली. पाठोपाठ शर्मिष्ठाही बाथरुमला जाऊन आली.
रेवती म्हणाली…
“ त्या दिवशी आपले लग्न झाले आणि दुसरेच दिवशी तुम्ही अचानक निघून गेलात. ”
“अचानक नाही.ओसवालनीच मला सूचित केले की मी निघून जावे.ते स्पष्टच म्हणाले यू आर फ्री टू गो ”.
“म्हणजे त्यांना म्हणायचे होते की तुम्ही फिरायला वगैरे जाऊ शकता. ”
“पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेंव्हा आमचे बोलणे झाले तेंव्हाही लग्नाचे फक्त विधी करायचे आहेत आणि लग्नानंतर मी निघून जायचे असेच ठरले होते ”.
“लग्नानंतर सहजीवन हे स्वाभाविकपणे असते.त्यात काही ठरवण्याचा प्रश्नच येत नाही ”
“पण मला ते शक्य नाही ,कारण माझे लग्न झालेले आहे ”
“हे तुम्ही अण्णांना सांगायला पाहिजे होते. त्यांनी काहीतरी मार्ग काढला असता. ”
“लग्नाच्या दिवशी मी बंगल्यावर खूप लवकर आलो होतो.त्यावेळी मी विवाहित आहे हे सांगणार होतो. पण अण्णासाहेबाना माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्यांनी मला नाव गाव सुद्धा विचारले नाही . त्यामुळे मी काही सांगू शकलो नाही ”
“अण्णांना वाटले असेल की तुमचे आणि जग्गुचे सविस्तर बोलणे झाले आहे . मग पुन्हा तेच कशाला उगाळायचे.म्हणून ते बोलले नसतील. ”
किचन मध्ये चहा बनवत असताना हे बोलणे मीनाक्षीच्या कानावर पडत होते.
तिला लक्षात येइन की रेवतीच्या लग्नाशी केदारचा काय संबंध ? पण हळू हळू तिला एकेक, लिंक लागायला लागली.केदारच्या बॅगेत सापडलेला सूट आणि मुकटा {पुजेचे वेळी नेसावयाचे रेशमी धोतर } , सुटावर मारलेला परफ्युम आणि आत्ता रेवतीच्या कपड्याना येणारा सुगंध यातले साधर्म्य ,केदारचा माग काढत आलेला गुप्तहेर. केदारचे एकट्याने बडबडणे .या सगळ्याचा अर्थ केदारने रेवतीशी चोरून लग्न केले आहे हे तिच्या लक्षात आले आणि केदार तिच्यात गुंतला आहे हेही तिला जाणवले.. तिला रेवतीचे बोलणे ऐकवेना . तिने चहा बिस्किटांचा ट्रे कसाबसा टीपॉयवर ठेवला आणि ती बेडरूम मध्ये गेली.तिने बेडवर अंग झोकून दिले आणि ती मुसमुसून रडायला लागली. रेवतीला अवघडल्यासारखे झाले.पण प्रवासाचा शिण घालवण्यासाठी त्यांनी चहा बिस्किटे घेतली.समारोप करावा तसे रेवतीने विचारले “मग काय ठरवलंय तुम्ही ? ”
“मी काय ठरवणार.? पहिले लग्न झाले असताना मी दुसरे लग्न केले. माझी मोठी चूक झाली.मी हे कसे निस्तरणार.?सगळ फार जड जाणार ”
“असे काही नाही.तुम्ही मुंबईला या .अण्णा नक्की मार्ग काढतील ”
केदारकडे बोलण्यासारखे काही नव्हते.शर्मिष्ठा चोरट्या आवाजात रेवतीला म्हणाली …
“ चल ”
रेवती म्हणाली…
“ चलतो आम्ही. तुम्ही मुंबईला या. अण्णाशी बोला. ”
केदार रेवतीला पोहोचविण्यासाठी पार्किंग पर्यंत गेला.तेथे ड्रायव्हरला पाहून तो म्हणाला…
“ तुम्हाला चहाला वर बोलवायचे लक्षात आले नाही.आता पुन्हा याल तेव्हा सरळ घरी यायचे ”
ड्रायव्हर म्हणाला “आमचा काय प्रश्न नसतोय हो.आम्ही कुठे बी धाब्यावर थांबून चहापाणी करू शकतो. पण या उतरू शकत नाहीत ना. ”
“ ह ! . ”
केदारची पाठ वळताच पिलरमागे लपलेला गुंजाळ बाहेर आला. तो गाडीत बसताच गाडी मुंबईला रवाना झाली.
--------------------------------------------------------
घरात परत येताच केदार बेडरूम मध्ये गेला.मघाच्या तुलनेत मिनाक्षी सावरली होती. निदान ती रडत तरी नव्हती.केदार तिच्या जवळ बसला. तो म्हणाला…
“मीना मी काय सांगतो ते शांतपणे ऐक .माझे आणि रेवतीचे लग्न झालय हे खरे आहे.पण ते लग्न म्हणजे नाममात्र लग्न होते.रेवती आणि अण्णासाहेब यांना काहीतरी पिडा होती आणि ती दूर व्हावी म्हणून तिच्यावर लग्नाचे विधी मात्र केले.पण आता असे दिसतंय की ते कारण खोटे होते . आणि खर कारस्थान काही वेगळेच आहे. ”
“मी आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.तुम्ही जितके जास्त बोलाल तितका माझा पारा चढत जातोय. ”
केदार काही न बोलता तिच्या शेजारी बसून राहिला. तीही आत्ममग्न स्थितीत बसून होती. थोड्या वेळाने केदारने आपली बाजू मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला
“मीना मी तुला खर सांगतो,मी केवळ रेवतीला मदत करायची या भावनेने यांच्या खेळात सामील झालो.आधी जग्गू म्हणाला तुमचे आणि कर्णिकांचे घरोब्याचे संबंध प्रस्थापित होतील म्हणून मी लग्नाला तयार झालो.पण नंतर त्या लोकांनी मला अतिशय तुच्छतेची वागणूक दिली.त्यामुळे मी तुला काही सांगितले नाही.जर खरच रेवातीशी चांगले संबंध आले असते तर मी तुला सगळ सांगणार होतो. ”
“तुम्ही काही खुलासा केला नाहीत तर बरे होइल.तुम्ही काही बोलायला लागलात की माझा त्रास वाढत जातोय. ”
निरुपायाने केदार तिथून उठला आणि दुसऱ्या खोलीत गेला.तिथे आश्विन चोरासारखा बसला होता.केदार म्हणाला…
“अरे असा का बसलायस.ये s , माझ्याजवळ ये ”
“ न-को ” असे म्हणून तो बेड वरून उतरून पळत आईजवळ गेला. तो मीनाक्षीला म्हणाला…
“आता रेवामावशी आपल्याकडे रहायला येणार? ”
“ मला तरी काय माहित? त्यांचे काय ठरले असेल त्याप्रमाणे करेल. ”
“ ती माझा छळ करेल? ”
“ ती इथे आली तर आपण कशाला इथे राहायचे ? आपण मल्हारपेठला जाऊ. तुझ्या मामाला दोन माणसे जड नाहीत ”
केदार बसल्या जागेवरून म्हणाला…
“आश्विन माझ्या जवळ ये. आईला त्रास देवू नको. ”
“मी गप्प बसतो.आईला त्रास देत नाही. ”
दारला थकल्यासारखे वाटू लागले.तो बेडवर पडून राहिला.दुसऱ्या खोलीत मिनाक्षीही विमनस्कपणे बसून होती.मधूनच अश्विन काहीतरी विचारात होता ,ती तुटक उत्तर देत होती.बऱ्याच वेळाने अंधार झाल्यावर केदारने दिवे लावले.तो मीनाक्षीच्या खोलीत गेला आणि म्हणाला…
“ चल, जेवून घेऊ. ”
मीनाक्षीने उत्तर दिले नाही. केदारच पुढे म्हणाला…
“ मलाही भूक नाहीय.पण आपण दोन खास खाल्ले तर या मूड मधून बाहेर येऊ. ”
मीनाक्षीने उत्तर दिले नाहीच .केदार म्हणाला…
“अश्विनला तरी जेवायला पाठव.मी वाढतो . ”
मिनाक्षी म्हणाली…
“त्याला,भूक लागल्यावर तो येईल ” .
अश्विन म्हणाला…
“ मला भूक नाहीय ”
केदार म्हणाला…
“ मग दूध तरी पी.गरम करू का? ”
“ नको., मला खरच भूक नाही ”.
बऱ्याच वेळाने अश्वीनला झोप लागली. केदारने उसासे टाकत रात्र घालवली, आणि मिनाक्षी कूस बदलून बदलून थकली.
----------------------------------------------------------------------
रात्रभर झोप लागली नाही .पण सकाळ झाली म्हणून केदार उठला. तोंड धुण्यासाठी तो बाथरूम मध्ये गेला . थोड्या वेळाने मिनाक्षी आली . अनवधानाने बाथरुममध्ये गेली तेथे केदारला पाहून “ सॉsरी !! ,सॉssरी ! ” म्हणत मागे फिरली.पूर्वीही तो बाथरूम मध्ये असताना मीनाक्षीने बाथरूममध्ये जाण्याचा प्रसंग अनेकदा आला होता,त्यावेळी तिने त्याला दंडाला धरून बाहेर काढले होते , ती म्हणाली होती…
“ अहो तुम्ही ड्राय बाल्कनीत तोंड धुवा ना ,माझी सगळी कामे पडलीत. ”
आज मात्र ती सॉरी म्हणून परत फिरली आणि खुर्चीवर तिष्ठत बसून राहिली . केदारने घाई गडबडीने उरकले आणि तो बाथरूममधून बाहेर आला.
“ झाल माझ. जा तू ! ”
ती काहीही “ न ” बोलता बाथरूम मध्ये गेली आणि तिने धाडकन दार बंद करून घेतले.
केदार फुटकळ कामात मन रमवू लागला.त्याने जुने पेपर गोळा करून रॅकवर ठेवले, कुशन झटकून नीट घातले , डस्टबिन बाहेर नेऊन ठेवले.अर्थात याचा मिनाक्षीवर काहीच परिणाम झाला नाही.आपण ही कामे केली तरी मिनाक्षी इम्प्रेस होत नाही म्हटल्यावर तो पेपर वाचत बसला. बऱ्याच वेळाने तिने चहा आणून टेबलावर ठेवला.त्याने चहाचा घोट घेतला ,चहा फारसा बरा झाला नव्हता त्याने कसा बसा चहा संपवला आणि तो कप ठेवायला सिंकवर गेला. तो म्हणाला…
“तुझा मूड अजूनही खराब दिसतोय.चहा चांगला झाला नव्हता ”
“मुडचा काय प्रश्न आहे?कालचा चहा उरला होता.वाया कशाला घालवू .तोच गरम करून दिला.”
केदारला बरे वाटले.निदान तेवढे तरी बोलली. अश्विन डोळे चोळत किचन मध्ये आला . केदार म्हणाला
“ चल मी तुझे दात घासून देतो ”
आश्विन म्हणाला…
“ नको,मला आपले आपले घासता येतात. ” तो पळत पळत बाथरूम मध्ये गेला.
केदार हॉल मध्ये येऊन विचार करत बसला.त्याला वाटले आज ऑफिसला जाऊच नये. सगळेजण रेवती बद्दल विचारणार.म्हणून त्याने रजेचा अर्ज लिहीला. आता अर्ज कोणाबरोबर पाठवावा याबद्दल तो विचार करत होता,तेवढ्यात मीनाक्षीने त्याचा डबा आणून त्याच्या पुढ्यात ठेवला.
केदार म्हणाला…
“एवढ्यात डबा झाला ? ”
“रात्रीचे जेवण शिल्लक होते तेच दिलय ”
“मला चालेल . पण तुमच्यासाठी तरी ताजे बनवा. ”
मीनाक्षीने उत्तर दिले नाही.
तो उठून अंघोळीला गेला.
------------------------------------------------------------------------------
केदार नेहमीपेक्षा एक तास लवकर ऑफिसला पोहोचला . वेळ घालवायचा म्हणून तो कॅन्टीनकडे गेला . तो स्कूटर पार्क करून वळला तेवढ्यात त्याला तीन जणांनी घेरले . एकजण म्हणाला…
“नमस्कार मी आनंद सगरे. भद्रवार्ताचा न्यूज एडिटर ”.
“ बोला ”
“काल तुमच्या संचालक मंडळाची मिटिंग होती.काय, काय झाले मिटिंग मध्ये ? ”
“नेहमीची मासिक मिटिंग होती.विशेष असे काही नव्हते. ”
“ काल मिटींगमध्ये रेवती कर्णिक आली होती हे विशेष नाही का? ”
“ कोण आली होती म्हणालात.? ”
“ रेवती. सुप्रसिध्द फिल्म स्टार रेवती कर्णिक.आठवले का? ”
“ काल मिटींगमध्ये जी मुलगी आली होती तिचे नाव रेवती कार्तिक.ती सिनेमात किडूक मिडूक काम करते. पण सुप्रसिध्द वगैरे नाहीय. ”
“ अहो रानडे,काहीतरी बनवाबनवी करू नका.आमची पक्की बातमी आहे की काल रेवती कर्णिक आली होती आणि तिने तुमच्याशी लग्न केल्याचा दावा केला. ”
“ कसे शक्य आहे ? रेवती कर्णिकशी माझी ओळख तरी कशी असेल. आणि ती माझ्या सारख्या सामान्य नोकरदाराशी लग्न कशाला करेल ? मी तर रेवती कर्णिकशी कधी फोनवरही बोललो नाही. काल जिने माझ्याशी लग्न झाल्याचा दावा केला ती रेवती कार्तिक होती. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमची मैत्री होती. ”
“तिच्याशी तुमचे लग्न झाले होते का ? ”
“छे !, छे !! .मी तिच्याबरोबर नाटकात काम केली होती. कॉलेजच्या ट्रीप मध्येही आम्ही एकत्र होतो. तेवढ्या भांडवलावर तिने आमचे लग्न झाल्याचा कांगावा केला. ”
“असे होते तर तुम्ही तिला तिथल्या तिथे फटकारायला पाहिजे होते. तुम्ही तिला घेऊन घरी का गेला ? ”
“मिटिंग मध्ये तू,तू मै,मै करण्यापेक्षा माझ्या बायको समक्ष तिला समज दिल्याने तिची गोची झाली ”
.
“ तुम्ही काहीतरी धूळफेक करताय.कारण आम्हाला एका जबाबदार व्यक्तीने रेवती कर्णिक आली होती अशी माहिती दिली आहे? ”
“ठीक आहे तुम्ही ही बातमी छापा.माझी करमणूकच होणार आहे,पण तुम्ही खातरजमा न करता बातमी छापली तर तुमचेच हसे होणार आहे. ”
पत्रकाराचा आत्मविश्वास डळमळीत झाला
“ ठीक आहे .आता आम्ही जातो .पण आम्ही लगेचच खात्रीलायक पुरावा घेऊन येऊ .तेंव्हा आम्ही तुमचे पितळ उघडे पाडू”.
पत्रकारांना पिटाळण्यात केदार यशस्वी झाला. दुपारी सहकारी मित्राशी सामना होता.
------------------------------------------------------------------------
लंच अवरमध्ये आपले सहकारी शिक्षक आपल्याला गाठतील असा केदारचा अंदाज होता. त्याप्रमाणे झाले.त्याच्याशी मैत्रीचे संबंध असणारे पाच सहा शिक्षक त्याच्या केबिनमध्ये घुसले.
“ सर,काल अचानक रेवती कर्णिक मिटिंग मध्ये आली.काय काय झाल , सांगा तरी सर ”
“तुम्ही पण चकलात का ? अहो काल माझी जुनी मैत्रीण रेवती कार्तिक आली होती. नाम साधर्म्यामुळे कुणीतरी चुकून रेवती कर्णिक आल्याची बातमी पसरवली. ”
“पण ती तर म्हणत होती की तुम्ही तिच्याशी लग्न केलंय ? तुम्ही तिच्याशी लग्न केल होते का ? ”
“छे .छे.लग्न कशाला करतोय ? आम्ही नाटकात काम करत होतो.सिनेमा, हॉटेलिंग, पिकनिक वगैरे चालू असयाचे.आता तिने आमचे लग्न झाले होते असे उठवून मला ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न सुरु केलाय. ”
“ सर, कार्तिक असे आडनाव असते तरी का? ”
“ती मुळची इंदूर कडची आहे.तिचे पूर्ण नाव रेवती कार्तिकेय झुत्शी असे आहे. तिला सिरीयल मध्ये काम मिळाले तेंव्हा तिने स्व:तचे नाव रेवती कार्तिक असे सुटसुटीत करून घेतले. ”
केदारच्या थापेबाजीचा सहकारी शिक्षकांना वैताग आला.काहीजण नाराज होवून निघून चालले.त्यांना बाहेर अण्णा केंद्रे भेटले.त्यांनी केंद्रेना विचारले..
“अण्णा ,काल रेवती कर्णिक आली होती का दुसरी कोण आली होती . ”
“रेवती कर्णिक आली होती.सिनेमा नटी हो s ”
“हो ना. मग हे रानडे आता का नाही म्हणतायत . ते म्हणतायत रेवती कार्तिक नावाची त्याची बाल मैत्रीण आली होती. ”
“कुणाल ठाऊक काय लोच्या आहे ? तुम्ही जावा आपापल्या वर्गावर.त्यांचे ते निस्तरतील ”
बाकी काही शिक्षक आणि केदार यांच्यात आणखी थोडा वेळ प्रश्नोत्तरे झाली पण केदारने माझी आणि रेवतीची ओळख सुध्दा नाही मग लग्न तर दूरची गोष्ट ही टॅग लाईन कायम ठेवली.कंटाळून शिक्षक बाहेर पडले . केबिनच्या बाहेर स्टूलावर रंगा बसला होता.एका शिक्षकानी त्याला विचारले…
“का रे रंगा काल आलेली रेवती कर्णिकच होती ना ? ”
तो म्हणाला…
“ काय म्हाईत ”
“काय माहित म्हणजे?तू तिथेच होतास ना? ”
“ मी कपबश्या धुवायला गेलो होतो. ”
दुसरे शिक्षक म्हणाले…
“ तो नाही सांगणार.तो रानडे सरांचा खास माणूस आहे. ”
निदान त्या दिवसापुरती तरी केदारने स्व:तची सुटका करून घेतली.
------------------------------------------------------------------------------
न्यूज एडिटर सगरे यांनी फोनवरून त्यांच्या मुंबई ऑफिसला सम्पर्क केला .मिळालेल्या बातमीची शहानिशा करण्यासाठी मुंबईतला रिपोर्टर रेवतीचे शुटींग सुरु होते त्या लोकेशनवर पोहोचला. त्याने रेवतीला डायरेक्ट विचारले…
“ रेवती , तुझ्याबद्दल आमच्याकडे एक खबर आहे… ”
“सांग तरी. मलाही कळू दे ”
“तू काल भद्रावतीला गेली होतीस. तिथे तू एका शिक्षण संस्थेत जाऊन रानडे नावाच्या तरुणाशी तुझे लग्न झाल्याचा दावा केलास. खरे ना ? ”
“ वा: , बातमी नक्कीच सनसनाटी आहे.प्रॉब्लेम एकच आहे की भद्रावती हे गाव मी नकाशातही पाहिलेले नाही. ”
“ म्हणजे तू काल भद्रावतीला गेली नव्हतीस ? ”
“ नक्कीच नाही. ”
“बर ! तू काल दिवसभर कुठे होतीस? ”
“ दर रविवारी माझे मसाज ,स्पा, हेअर ट्रिमिंग हे उपक्रम असतात. कालही तेच केले ”
“पण भद्रावती परीसरात या बातमीने धुमाकूळ घातलाय. ”
“ असेल पण तुझ्याकडून ही बातमी ऐकून मलाच शॉक बसला.फोटोशॉपमुळे अशा बातम्या तयार करणे कॉमन झाले आहे.नेटवर जुने फोटो शोधून काढायचे,तोडमोड करायची, सनसनाटी पसरवायची.त्यामुळे इतरांना त्रास झाला तरी यांना काही
सोयर सुतक नाही ”.
“ तुला काय वाटत ? कोणी केला असेल हा उपद्व्याप ”
“ मला काहीच कल्पना नाही.फक्त हे इथेच थांबावे एवढीच विनंती आहे. ”
“ओके . सॉरी फॉर द इनकन्व्हीनियंस. ”
त्याने लगेचच सगरेना फोन केला…
“ अहो सगरे,कसल्या भंकस स्टोरी पाठवता. रेवतीसारखी फिल्मस्टार कधी शाळामास्तरशी लग्न करेल का ? बातम्यासाठी सोशल मेडीयावर विसंबून राहू नका.इथे आमचे संबंध बिघडतात ”
----------------------------------------------------------------
दुसरे दिवशी सकाळी अण्णासाहेब आणि रेवती नाश्ता करत बसले होते . अण्णासाहेबांनी विचारले…
“ मग काय.जाऊन आलात का सासरी ”
“ हो ”
“ नव्या सुनेचे स्वागत कसे झाले? ”
“अवघड आहे. ”
“अवघड ! म्हणजे ? ”
“ आमचे बोलणे ऐकून त्यांची बायको खूप संतापली ? मला तर भीतीच वाटायला लागली. म्हटलं आता काय होतंय आणि काय नाही. ”
“ ती काय म्हणाली ? ”
“ नाही. बोलली काही नाही. पण चहा बिस्किटाचा ट्रे आमच्या समोर आदळला आणि फणकाऱ्याने निघून गेली. ”
“ केदार काय म्हणाले ? ”
“ ते म्हणाले लग्न झाल्यावर निघून जायचे असे जग्गुने सांगितले होते. त्याप्रमाणे ते निघून गेले. त्यांचे आधी एक लग्न झालय हे त्यांनी आधी सांगितले नाही ही चूक झाली म्हणाले आणि एकत्र रहाणे शक्य नाही म्हणाले. ”
“आणखी काय बोलणे झाले ? ”
“ कशाचे बोलणे ? कशीबशी दोन बिस्किटे खाल्ली ,चहा प्यायलो आणि सटकलो ”
“ ठीक आहे. म्हणजे पुढची स्टेप घ्यायला हरकत नाही. एकदा संपवून टाकू या सगळे . मला अगदी कंटाळा आलाय. ”
-----------------------------------------------------------------------------
( क्रमशः )
हा भाग बराच मोठा होता... पु
हा भाग बराच मोठा होता... पु भा प्र
> दारला थकल्यासारखे वाटू
> दारला थकल्यासारखे वाटू लागले. > के राहिला.
हाही चांगला जमलाय.
हाही चांगला जमलाय.