मॅरेज Mystique ! ( भाग ७ )

Submitted by र. दि. रा. on 10 May, 2019 - 12:26

मागील भागांचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879
भाग ६ :- https://www.maayboli.com/node/69897

भाग ७ :-

रेवती आणि केदार यांच्या लग्नाला सहा महिने उलटून गेले. या सहा महिन्यात रेवती , अण्णासाहेब, जग्गू कोणीही त्याच्याशी काहीही सम्पर्क ठेवला नाही .

केदार निराश होत गेला. त्याचा चिंताग्रस्त चेहेरा पाहून त्याचे सहकारी मित्र विचारत...
“सर,घरी काही प्रॉब्लेम आहे का ?”

मिनाक्षी विचारायची...
“ऑफिसात काही प्रॉब्लेम आहे का ?”

केदारची अवस्था 'सहन होइन आणि सांगता येईना' अशी झाली .

एके दिवशी सकाळी एसटी बसमधून गुप्तहेर गुंजाळ भद्रावती स्थानकावर उतरले. स्टॅन्डच्या बाहेर आल्यावर केदारचा फोटो एका माणसाला दाखऊन विचारले...
“यांना ओळखता का ?”
त्याने “नाही" - असे उत्तर दिले .

रस्त्यावरच्या आणखी दोघा तिघांना गुंजाळानी हाच प्रश्न विचारला.भद्रावती हे जिल्ह्याचे ठिकाण होते. एवढ्या मोठ्या गावात फोटो दाखवून एखाद्या माणसाचा पत्ता काढण्याची पद्धत फारच जुनी झाली.पण गुंजाळ जुन्या पठडीतच काम करीत असे.त्याने चिकाटीने आणखी एका माणसाला केदारचा फोटो दाखवला .

तो म्हणाला...
“समोर मॉल आहे तिथल्या सेल्समनला विचारा.तो बरोबर सांगेल”.

हा क्ल्यू गुंजालांच्या बरोबर उपयोगी पडला.सेल्समनने फोटो ओळखला
“हा रानडे साहेबांचा फोटो आहे.”

गुंजाळनी दुसरा प्रश्न केला...
“कुठे राहतात ? ”.

“माहित नाही “

“काय करतात?”

“बहुतेक कुठल्यातरी शाळेत नोकरीला आहेत.”

जवळच दुसरा सेल्समन होता तो म्हणाला...
“खालच्या चौकात एक लायब्ररी आहे.तिथे ते नेहमी येतात.लायब्ररीत चौकशी करा.”

हा ही सल्ला गुंजाळाना उपयुक्त ठरला.लायब्ररीयन निर्मलाताई पुस्तकाची देवाण घेवाण करण्यात कार्यरत होत्या .गुंजाळानी मध्येच घुसून विचारले...
“रानडेसाहेब इथे येतात का ?’”

“येतात पण फक्त सायंकाळी.”

“त्यांचा पत्ता देता ? त्यांना घरीच भेटतो.”

निर्मलताईनी पत्ता ,नोकरीचे ठिकाण वगैरे सर्व माहिती दिली. गुंजाळ केदारच्या ऑफिसात पोहोचले.

”नमस्कार साहेब “

“नमस्कार. बोला “

“केदार रानडे आपणच ना ?”

“हो. दारावर बोर्ड नाही पहिला का ? बर ! काय काम आहे “

“रानडे म्हणजे... तुम्ही? दापोलीचे का? ”

“हो पण माझा आता तिकडे काही संबंध नाही “

“अनंतराव गणपुलेना ओळखता का ?”

“नाही “

“ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही ला मेरीडन हॉटेल मुक्कामाला होता का ? ”

“ त्याचा काय संबंध ? ”

“अनंतराव तुम्हाला भेटण्यासाठी ला मेरीडन हॉटेलवर आले होते.पण तिथल्या लोकांनी त्यांना तुम्हाला भेटू दिले नाही “

“अस? मला काहीच कल्पना नाही “ “तेच ना.खर म्हणजे त्यांनी तुम्हाला अनंतराव आले असल्याची खबर द्यायला हवी होती .

“असो ! आता पुन्हा तुम्ही ला मेरीडनला केंव्हा येणार आहात ?”

“छे ,छे . मी काही प्रत्येक वेळी ला मेरीडनला उतरत नाही.त्यापेक्षा गणपुलेना इकडे यायला सांगा.”

“नाही हो s .ते इतक्या लांबचा प्रवास करू शकत नाहीत .पण तुम्ही मुम्बइला केंव्हा येणार आहात.”

”माझे तसे नक्की नसते.काही काम निघाले तरच जातो.”

गुंजाळनी डायरीतला फोटो पाहून पुन्हा त्याच्याकडे पहिले. खात्री पटल्यावर ते म्हणाले

“मग अवघडच आहे . बरा s य” - असे म्हणून ते पटकन निघून गेले .

केदारने रंगाला हाक मारली - “कोण होता रे तो ?”

“ तुम्हाला काही म्हणाला का तो ”.

“ तो काय म्हणत होता काहीच कळत नव्हते”

“ पण तो लबाड वाटत होता. ”

“हो ना ! मला जरा बर वाटत नाही .मी घरी जातो “

----------------------------------------------------------------------------

केदारला मनातून अस्वस्थ झाला .म्हणून तो लवकर घरी आला. मीनाक्षीने विचारले
“का हो ,लवकरसे आलात” .

“ काही नाही सहजच” .

“चहा ठेवते” असे म्हणून ती किचनमध्ये गेली.

निर्मलाबाईंचा फोन आला. “हा रानड्यांचा नंबर आहे ना ?”

“हो . मी रानडे बोलतोय.”

“अहो आज लायब्ररीत एक माणूस आला होता.तुमची माहिती विचारात होता.मी त्याला माहिती दिली.मी माहिती द्यायला नको होती का ?”

“नाही तसे काही बिघडले नाही.तो शाळेतही आला होता”

“तुमच्या हातून काही accident वगैरे झाला आहे का ?”

“नाही.तसे काहीच नाही “

“बर ! पण काळजी घ्या .ठेवते”

मीनाक्षीने विचारले “कोणाचा फोन आहे?”

“भद्रावतीत कोणीतरी माझी माहिती गोळा करत फिरतोय “

“अहो, खरच .सकाळी एकजण सोसायटीत आला होता.तो तुमच्या बद्दल माहिती विचारात होता.बी विंगमधल्या साळोखेनी मला सांगितले.कोण असेल हो तो.?”

“बहुतेक गुप्तहेर असेल.”

“पण तुमच्या मागावर कोणी गुप्तहेर का सोडावेत ? तुम्ही कोणाचे काय वाइट केलंय”.

दोघेही विचारात पडले थोड्यावेळाने मिनाक्षी म्हणाली
“तुम्ही तो डबीर सरकारांचा दावा त्यांच्यावर उलटवला ना.त्यामुळे ते चिडले असणार.त्यांनीच काहीतरी उपद्रव सुरु केला असणार? तुम्ही चेअरमनना सांगा,म्हणाव मला हे कोर्टाचे लचांड नको”.

”असे नाही म्हणता येत .माझे काम मला टाळता येणार नाही आणि मला काही इजा झालेली नाही, कुणी धमकी दिली नाही. मी तक्रार काय करणार. जर मला काही झाले तर चेअरमन नक्की बंदोबस्त करतील.”

मीनाक्षीचे समाधान झाले नाही पण तिला बोलायला काही मुद्दा राहिला नाही म्हणून ती गप्प बसली फक्त म्हणाली “चहा गार झाला असेल मी गरम करून आणते.”

------------------------------------------------------------------------

या घटने नंतर महिन्याभराचा काळ निवांत गेला.मिनाक्षी आणि केदार गप्पा मारत बसले असताना केदार म्हणाला
“तेंव्हा आपण उगीचच घाबरलो. अंधारात सावल्या हलल्या तरी भूत दिसल्यासारखे वाटावे असा प्रकार झाला."

मीनाक्षीने उत्तर दिले नाही पण ती मनाशी म्हणाली
“मग तो माणूस का आला होता ? उगीचच ? "

सप्टेंबर महिन्यातला तिसरा रविवार होता. नेहमीप्रमाणे केदारच्या ऑफिसात मासिक मिटिंग चालू होती.चार विषय झाले.चेअरमन साहेबांचे विरोधात सहसा कोणी बोलत नसे . त्यामुळे चारही विषय माफक चर्चेने पास झाले.चहा नाश्ता आल्यामुळे मिटिंग थोडी सैलावली. आणखी दोन विषय राहिले होते .

ते झाले की मिटिंग संपणार होती. एवढ्यात रंगराव शिपाई मिटिंग मध्ये आला म्हणाला
“आपल्याकडे रेवती देवी आल्यात”

तो काय म्हणतोय ते चेअरमनसाहेबांच्या एकदम लक्ष्यात आले नाही . त्यांनी विचारले
“कोण आलय म्हणालास ?”

“रेवतीदेवी हो s s .सिनेमा नटी”

ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले
“कुठे आहेत ?“ “तुमच्या चेंबरमध्ये बसवलंय “ ते व्हाईसचेअरमनना म्हणाले
“राहिलेले दोन विषय तुम्ही संपवा .मी त्यांचे काय काम आहे ते बघतो” .

बापूराव चौगुले म्हणजे प्रति झेले अण्णा. ते म्हणाले
“अहो,तिलाच बोलवा की इथे.आम्हालाही समजू दे तिचे तुमच्याकडे काय एवढे काम आहे?”.

चेअरमन म्हणाले
“चालतंय की. ए रंगा. ती कपबशी ,दोन पेले तसेच पडलेत .ते उचला. टेबलक्लॉथ झटकून घाला”.

केदार घाबरून गेला . ती बहुदा आपल्याबद्दल काहीतरी तक्रार करणार, या कल्पनेने तो अस्वस्थ झाला. बापूराव म्हणाले
“अहो तुम्ही का एवढे घाबरलाय.तुम्ही काय तिचे उसने पैसे बुडवून आलाय का?”

सगळे हसायला लागले. एका तरुण संचालकाला उद्देशून चेअरमन म्हणाले
“मनोहर ,तू मागच्या खुर्चीवर बसतोस ?म्हणजे रेवातीदेवी इथे बसतील.”

“बरोबर त्यांची बहीण पण आहे” रंगरावने जादा माहिती पुरवली.

बापुरावांनी पुन्हा चौकार ठोकला
“आयला, आपल्या शाळेत अॅडमिशन घेती काय?”

जोरदार हशा पिकला. चेअरमननी भाऊ पवारना मागे बसायला सांगितले.भाऊ पवार मोठ्या नाराजीने मागे गेले. रंगराव दोघींना घेऊन मिटिंग हॉलमध्ये आला. रेवतीने सगळ्याकडे आळीपाळीने पाहत “नमस्कार, नमस्कार.” म्हटले. तिचे ते प्रसिद्ध मिलियन डॉलर स्माइल पाहून सगळे हरखून गेले.प्रति नमस्कार करीत चेअरमन म्हणाले

“या,या. बसा”

दोघी बसल्यावर चेअरमन म्हणाले...
“ बोला ”

केदारकडे निर्देश करीत रेवती म्हणाली...
“माझे यांच्याकडे काम आहे”

केदार सुन्न बसला होता.ही परिस्थिती कशी हाताळायची ते त्याला समजेना.मोठ्या प्रयत्नाने त्याने शांत राहण्याचा आव आणला.तिचे केदारकडे काय काम असावे या बद्दलची उत्सुकता मिटिंग हॉलमध्ये दाटली.

ती केदारला उद्देशून म्हणाली...
“आपले लग्न झाले आणि दुसरे दिवशी तुम्ही काही न सांगताच निघून गेलात.आमच्या कडे तुमचा पत्ताही नव्हता .शेवटी आम्ही गुप्तहेर नेमून इथ पर्यंत पोहोचलो”

“रेवती ,आपण घरी जाऊन बोलूया का ?”
केदारचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच दोघी उठल्या आणि गाडीच्या दिशेने चालू लागल्या.

केदार म्हणाला...
“साहेब,मला जायला पाहिजे.” आणि परवानगीची वाट न पाहता तो बाहेर पडला.

रेवतीशी गप्पा गोष्टी करायला मिळणार म्हणून हरखलेले संचालक नाराज झाले . दोन मिनिटात काय घडले तेच त्यांना समजेना .

केदारने स्कुटर स्टार्ट केली आणि तो ड्रायव्हर जाऊन म्हणाला...
“माझ्या मागे मागे या”

स्कूटरवरून जाताना तो आरश्यात पहात होता की रेवतीची गाडी बरोबर येते आहे ना. क्षणभर त्याच्या मनात विचार आला की यांना गुंगारा देऊन पसार व्हावे. पण लगेच त्याने स्व:तला सावरले .परिस्थिती संयमाने हाताळायला पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. संचालक मंडळासमोर चर्चा नको म्हणून त्याने तिला घरी घेऊन जायचे ठरविले.

शिवाय घरी त्याच्या मदतीला मिनाक्षी होती.अनेकवेळा तो अडचणीत असताना मीनाक्षीने परिस्थिती समंजसपणे हाताळून त्याची सोडवणूक केली होती.आताही तसेच होईल अशी एक अशा होती. त्याने मनातल्या मनात देवाला नमस्कार केला.

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults