मॅरेज Mystique ! ( भाग ११ )

Submitted by र. दि. रा. on 14 May, 2019 - 11:52

मागील भागांचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878
भाग ५ :- https://www.maayboli.com/node/69879
भाग ६ :- https://www.maayboli.com/node/69897
भाग ७ :- https://www.maayboli.com/node/69912
भाग ८ :- https://www.maayboli.com/node/69917
भाग ९ :- https://www.maayboli.com/node/69926
भाग १० :- https://www.maayboli.com/node/69940

भाग ११ :-

भाग ११
दुसरे दिवशी सकाळ पासूनच केदारने नोकरी संशोधन सुरु केले.त्याने पाचसहा पेपर आणून एम्प्लॉयमेंटच्या जाहिराती वाचून काढल्या.बायोडाटा तयार केला.किमान दहा ठिकाणी तरी त्याने अर्ज कुरियर ने पाठविले.ओळखीच्या लोकांना फोन करून आपल्यासाठी कोठे व्हॅकन्सी असल्यास लक्ष असुदे असे कळविले. इतके करूनही त्याचे समाधान झाले नाही.तो एमआयडीसीत गेला. त्याच्या माहितीतल्या कंपनीत जाऊन त्याने गाठीभेटी घेतल्या.कोणी अर्ज ठेऊन घेतला आणि कळवतो म्हणून आश्वासन दिले.कोणी अर्ज घ्यायलाही नकार दिला.बऱ्याच ठिकाणी एलेकट्रिशियन आणि वेल्डर पाहिजे होते.पण क्लार्क आणि सुपरवायझरसाठी मागणी नगण्य होती.प्रत्येक कंपनीत स्कूटर पार्क करून आणि स्टार्ट करून तो थकला. तो घरी परत आला तेंव्हा दुपारचे तीन वाजले होते.एका चहाच्या कपावर त्याने इतकी वणवण केली .
तो लवकर न आल्यामुळे मिनाक्षी काळजीत पडली . तो परत आल्यावर ती म्हणाली..
“नोकरी शोधायची अशी पद्धत असते का ?तुम्ही इतके अर्ज पाठवलेत ?मग थोडी वाट बघा ना? येतील तुम्हाला कॉल. आजच्या आज नोकरी नाही मिळाली तर आपण काय उपाशी राहणार आहोत का ?”
केदारला आजच्या आज नोकरी हवी होती .त्याला शिक्षण संस्थेतल्या लोकांना दाखवून द्यायचे होते की बघा तुम्ही मला काही कारण नसताना कमी केलेत पण मी एकही दिवस घरी बसलो नाही .मी आजच्या आज नोकरी मिळवली. अर्थात केदारची ही अपेक्षा पूर्ण झाली नाही.मात्र उपाशी पोटी वणवण करून स्व:तला शिक्षा करून घेतल्याचे समाधान मिळाले.
---------------------------------------------------------------
रेवतीच्या भद्रावती भेटीनंतर मिनाक्षी आणि केदार यांच्या नात्याला तडा गेला होता. रमाकांतने रदबदली केल्यानंतर तिचे तुटक वागणे किंवा टोचून बोलणे कमी आले होते . नंतर ते सगळे मल्हारपेठला गेले तेंव्हा तिचे वडील त्याला बरेच बोलले तरी केदार नरमाईने वागला होता . आणि आता नोकरी गेल्यामुळे तर तो खचूनच गेला होता , त्यामुळे मीनाक्षीच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती तरी निर्माण झाली होती.ती त्याच्याशी सौजन्याने वागत होती.पण तिच्या मनातला दुरावा कमी झाला नाही हे केदारला जाणवत होते. एकदा सकाळी ती अंघोळीला गेली असताना शहा भाभीचा फोन आला .
त्याने फोन घेतला...

“हॅलो”

“मिनाक्षी आहे का ?”

“ती अंघोळीला गेली आहे”

“मला असे समजले की या वेळी तिला भिशी नको आहे .तर तिला फक्त विचारा की यावेळी मी भिशी घेतली तर चालेल का ?”

“मीना , शहा भाभी विचारतायत की त्यांना भिशी घेउ दे का?”

“ह,घ्या म्हणावे”

“हो.घ्या.काही हरकत नाही”

“मग तिला एवढेच विचारा की ती मदतीला येणार आहे का?येणार असेल तर मी रवा लाडू आणि चिवडा असा बेत करणार आहे.नाहीतर मला बाजारातून तयार काहीतरी आणावे लागेल”

“ तू मदतीला जाणार आहेस का ?”

“हो.येईन म्हणावे”

“हो.ती मदतीला येणार आहे”

“बर .मग आपल्या सोळा जणीसाठी काय काय साहित्य लागेल तेवढी यादी घ्याना तिच्या कडून”

“त्यांना सामानाची यादी हवीय ग .”

मिनाक्षी वैतागाने म्हणाली...
“आधी तुम्ही फोन बंद करा .मी नंतर तिला फोन करेन.”

“ती तुम्हाला नंतर फोन करणार आहे”

“अहो यांनी गाडी बाहेर काढली आहे आणि सारखा हॉर्न वाजवून गडबड करतायत .सांग ना म्हणाव यादी दोन मिनिटात.”

“त्यांना यादी लगेचच पाहिजे”

“दोन किलो रवा ,दोन किलो साखर ,एक किलो तूप ,पावकिलो बेसन ,दोन नारळ.एक किलो पातळ पोहे.आणि फरसाण वगैरे”.

“पण बेसन कशाला .आम्ही रव्याच्या लाडवात बेसन घालत नाही.”

“ए त्या विचारतायत बेसन कशाला”

“आधी तुम्ही फोन बंद करा.”

मिनाक्षी इतक्या मोठ्याने बोलली की कदाचित मिसेस शहाना ऐकू गेले असेल .पण चिकाटी न सोडता केदार फोन मध्ये म्हणाला...

“ बेसन आवश्यक आहे.ते बाईंडिंग मटेरीअल म्हणून काम करते .त्यामुळे लाडू मऊ होतो पण फुटत नाही.”

“हो का. मला नव्हते हो माहित.बर झाल तुम्ही सांगितलेत . तुम्हाला मी त्रास दिला ह ! ”

“फार काही नाही.” केदारने फोन ठेवला.

अंघोळ आटपून बाहेर आल्यावर मिनाक्षी म्हणाली...

“काय पोरकटपणा चालवलाय.मी अंघोळीला गेलेय म्हणून फोन बंद करायचा.कशाला लांबड लावत बसलाय.?”

“मी फोन कट करू शकलो असतो.पण आपल्यात अजूनही तणाव आहे. तो निवळावा म्हणून मी बोलत राहिलो.आपले आयुष्य पूर्वी सारखे होणारच नाही का ?”

“पूर्वीचे दिवस यावेत म्हणून तुम्ही काहीही गिमिक्स करू नका.माझ्या मनात काय कालवा कालव होतेय ते तुम्हाला माहित नाही. नाही तर तुम्ही असले प्रयोग करत बसला नसता.”

------------------------------------------------------------------------
केदारने नोकरीसाठी बऱ्याच लोकांना सांगून ठेवले होते. त्याचा कॉलेजातला एक मित्र मुंबईत होता,त्याचे नाव निकुंभ ,त्यालाही केदार नोकरी बद्दल बोलला होता.त्याचा फोन आला.तो म्हणाला त्याच्या मेव्हण्यानी कांदिवली एमआयडीसीमध्ये कोरोगेटेड बॉक्सची फॅक्टरी टाकली आहे आणि त्यांना फूल टाइम मॅनेजरची आवश्यकता आहे . त्याने पत्ता फोन नंबर दिला आणि समक्ष भेटायलाही हरकत नाही असे सांगितले. केदार खूष झाला कारण ही ऑफर ओळखीतून आली असल्याने नोकरी मिळण्याची शक्यता होती. त्याने मीनाक्षीला ही खूष खबर दिली.पण मिनाक्षी खूष झाली नाही ती म्हणाली...

“कांदिवली म्हणजे मुंबईच ना ?”

“हो”

“नको आपल्याला ही नोकरी”

“अग,मुंबई काय वाईट आहे.नाहीतरी इथे मी बदनाम झालो आहे. त्यापेक्षा गाव सोडून गेलेले बरे.नव्याने सुरुवात करू”

“नको.तुम्ही इथेच नोकरी बघा”

केदारला कळेना इतकी चांगली नोकरी ही का नको म्हणतेय.? खूप विचार केल्यावर तिचे कारण त्याच्या लक्षात आले. तो म्हणाला...
“रेवती मुंबईत असते ,म्हणून तू मुंबईतली नोकरी नको म्हणतेस का ?”

“हो”

“अग,मुंबई इतकी मोठी आहे .तिथे कोण कोणाला ठरवून सुद्धा भेटत नाही. बांद्रा आणि कांदिवली यामध्ये तर पन्नास किलोमीटरचे अंतर असेल. रेवतीची आणि माझी भेट सुद्धा होणार नाही.”

मिनाक्षी काहीच बोलली नाही.
केदार म्हणाला...

“आता माझ्या मित्राने एवढा शब्द टाकलाय तर निदान त्यांना भेटून तरी येतो. जॉईन करायचे की नाही ते आपण नंतर ठरवू.”

मीनाक्षीने उत्तर दिले नाही.
--------------------------------------------------------------------------.
केदार असाच सचिंत मूड मध्ये बसला होता.त्याने रीमाइंडर स्वरुपात एकदोन फोन केले.पण कळवतो हेच गुळगुळीत उत्तर मिळाले.तेवढ्यात दारात पोस्टमन येऊन उभा राहिला.केदार अधीरपणे दारात गेला.त्याला वाटले आपण एवढे अर्ज पाठविले आहेत तर एखाद्या कंपनीचे इंटरव्हयू साठी बोलावणे असेल . पोस्टमन म्हणाला...

“ केदार अनिरुद्ध रानडे.”

“हो मीच”

पोस्टमनने त्याची सही घेऊन एक रजिस्टर पाकीट त्याला दिले.अस्थिर मनाने त्याने पाकीट फोडले.

मुंबईच्या अॅडव्होकेट केळकरांनी त्याला नोटीस पाठवली होती.नोटीसीत म्हटलं होत की --------

||||| आमची अशील रेवती विश्वास कर्णिक बरोबर दि.२४ फेब्रुवारी रोजी तुमचा विवाह झाला आहे.परंतु दि २५ फेब्रुवारीपासून तुम्ही काही न
सांगता निघून गेला आहात.तेव्हा पासून आज तागायत तुम्ही आमचे अशिलाला नांदवीण्यास नेलेली नाही.आमची अशील दि.२१ सप्टेंबर
रोजी तुमच्या भद्रावती येथील घरी आली असता तुम्ही तिला नांदविण्यास नकार दिला व तिला घरातून हाकलून दिले. ------- |||||

नोटीस वाचून केदार हबकला.आता काय करायचे ते सुचेना. त्याने रमाकान्तला फोन लावला. सगळे ऐकल्यावर रमाकांत म्हणाला...

“ही लीगल नोटीस आहे.तिला उत्तर द्यावे लागते. तू ताबडतोब वकीलाकडे जा.ते उत्तर तयार करून देतील.”

“कोणाकडे जाऊ ? .तुझ्या माहितीचे कोणी आहेत का ?”

“आमच्या कंपनीचे लीगल अॅडव्हाझर देशमुख तुला उत्तम गाईडन्स देतील. मी त्यांना फोन करतो.तू लगेच त्यांच्या कडे जा.”

केदारचे फोनवरचे संभाषण तुटक तुटक मीनाक्षीच्या कानावर पडले. ती बाहेर येऊन म्हणाली...

“काय झाले ?. वकील कशाला.?”

केदारने तिच्या हातात नोटीस ठेवली.नोटीस वाचताच ती संतापली...

“काय खोटारडी बाई आहे हो ही. तुम्ही आताच्या आत्ता वकीलाकडे जावा. त्यांना म्हणाव असे खरमरीत उत्तर लिहून द्या, तिच्या नाकाला चांगल्या मिरच्या झोंबल्या पाहिजेत.तिचा सगळा खोटेपणा उघडा पाडा.थांबा ”.

ती रूममध्ये गेली.ती परत आली तेंव्हा तिच्या हातात बऱ्याच नोटा होत्या.त्या केदारला देत ती म्हणाली “कितीही खर्च येउदे. आता तिचा नक्षा उतरवूनच ठेवते.”

--------------------------------------------------------------------------------

नोटीस वाचून वकील म्हणाले...
“ बोला. काय करायचे “

“ नोटिशीला उत्तर पाठवा.दुसरे काय ”

वकील म्हणाले...

“आता त्यांनी नोटीस पाठविली आहे.याचा अर्थ पुढे जाऊन कोर्ट केस होणार. ही केस मुंबईला भोईवाडा कोर्टात चालेल .ही केस मी चालवायची असेल तर प्रत्येक तारखेला जाण्यायेण्यासाठी पेट्रोलचा खर्च, जेवणाखाण्याचा खर्च, मुक्काम करायची पाळी आली तर तो खर्च हे तुम्हाला फार महाग पडणार. म्हणजे तुम्ही मुंबईतला वकील दिलेला बरा .आता नोटिशीला मी उत्तर दिले आणि ते मुंबईच्या वकिलाला पटले नाही,तर. तो म्हणणार तुमच्या गावाकडच्या वकिलाने चुकीचा stand घेतला .केस बिघडवून ठेवली.त्यापेक्षा तुम्ही आत्ताच मुंबईचा वकील दिलेला बरा.”
“साहेब,ते केस करणार म्हणजे त्यांना काय पाहिजे ?.मी रेवतीला नांदवायचे म्हणजे ती काय इथे येऊन राहणार आहे का ? मला तर काही समजेनासे झाले आहे”

“हे केळकर साहेब आहेत ना,ते फार बिलंदर वकील आहेत.त्यांनी ही अर्धीच नोटीस दिली आहे ,अजून अर्धी नोटीस बाकी आहे .ही नोटीस म्हणजे फक्त एक trap आहे.समजा तुम्ही या नोटीसला उत्तर दिले की मी रेवतीला नांदवायला तयार आहे .ती इथे येऊन राहू दे .तर ते म्हणणार तुम्ही घरात एक बाई आणून ठेवली आहे आहे तिला बाहेर काढा, मग मी येते.असे तुम्ही अडकत अडकत जाणार.”

“पण का ? मी त्यांचे काय वाकडे केलेय.”

“जर आपण या पूर्ण घटनेचा अन्वय लावला तर असे दिसतेय की तुमचे लग्न झाले त्यावेळी रेवती दोन महिन्याची गरोदर असावी.रेवतीला दिवस जाण्याला जी असामी जबाबदार आहे ,ती अर्थातच एखादा बडा निर्माता ,प्रसिध्द नट किंवा दिग्दर्शक असे कोणीतरी मात्तबर धेंड असणार.तो पितृत्व स्विकारायला तयार नाही.रेवती abortion ला तयार नाही .बिचाऱ्या बापाने लेकीचे लग्न लाऊन देण्याची आईडिया लढविली. पण त्या असामीला ही कल्पना पटली नाही.कारण तुम्ही जरी त्या बाळाचे पितृत्व स्वीकारायला तयार झाला असलात तरी रेवतीचा नवरा एक सामान्य नोकरदार, गावाकडचा माणूस हे लोकांना खरे वाटणार नाही .तशातच गुप्त हेराने माहिती दिली की तुम्ही विवाहित आहात. म्हणून त्या असामीने रेवतीला गर्भपात करायला भाग पडले असणार.अण्णासाहेबांचा प्लॅन फेल गेल्यामुळे ते चिडले असावेत.म्हणून तुम्हाला धडा शिकवण्यासाठी ही केस ते करणार असतील .आत्ता त्यांनी नांदवत नाही असा स्टँड घेतला आहे .यांवर तुम्ही काय बचाव करताय ते पाहून फायनली व्दिभार्या प्रतिबंधक कायद्याखाली केस करणार.”

“काय भयंकर आहे हे सगळे”.

“अगदी असेच असेल असे नाही.पण साधारण अशा स्वरूपाचे काहीतरी आहे”.

“वकीलसाहेब,मी आता काय करू हो”.

“मला वाटते तूर्त तुम्ही अगदी गप्प राहावे.अजून केळकर साहेबांनी त्यांची सगळी कार्ड्स ओपन केलेली नाहीत.तेंव्हा त्यांची पुढची स्टेप काय आहे ते पाहून नंतर आपण आपला डिफेन्स ठरवावा.”

“थॅंक यू .सर,आपली फी किती सर ?”

“कन्सल्टिंगचे मी काही घेत नाही. केस मी चालवायची असे ठरले तर पाहू”

“आभारी आहे.सर”.

---------------------------------------------------------------------------------

वकीलाचा सल्ला मीनाक्षी आणि केदार दोघानाही अजिबात पटला नाही पण दोघांची करणे वेगवेगळी होती मीनाक्षीला वाटत होते की देशमुख वकील काहीतरी खरमरीत उत्तर तयार करून देतील . आपण रेवतीचे काहीही बिघडवू शकत नाही हे तिला माहित होते पण निदान चार शिव्या तरी देऊन घेऊ असा तिचा फंडा होता. केदारला देशमुख वकिलांची थिअरी अजिबात पटली नाही .त्याच्या मते रेवती अशी नव्हती .कोणत्याही कारणासाठी ती अनैतिक वागणार नाही .केदारला दुसरी संयुक्तिक थिअरी सुचत नव्हती .पण ती या प्रकरणात निर्दोष आहे असे त्याला वाटत होते. या नोटीशीमुळे तो पुरा हतबल होऊन गेला.गेल्या दोन महिन्यात त्याने खूप आघात झेलले होते.त्यात हा वार त्याला वर्मी लागला . नोकरी शोधण्यातला उत्साह आता मावळला होता.सगळे वातावरण गढूळ झाले होते. केळकरांच्या दुसऱ्या खेळीची वाट पाहत तो बसून असे ..त्याला फार दिवस वाट पहावी लागली नाही.लवकरच त्याला कोर्टाचे समन्स आले.
त्याने मुंबईला जाण्याची तयारी सुरु केली. .
मीनाक्षीने विचारले...

“देशमुख वकिलांना तारखेची कल्पना दिली का ?”

“नाही .मी त्यांना घेऊन जाणार नाही.”

“का”

“त्यांना घेऊन जायचे तर प्रत्येक तारखेला १५ ते २० हजार रुपये खर्च येइल.केस दोन वर्ष चालली तरी पाच सहा लाख रुपयांचा चुराडा होईल”

“मग काय करणार ?”

“जग्गू किंवा अण्णासाहेब भेटले तर त्यांची माफी मागतो .केस परत घ्यायला सांगून बघतो.”

“सांभाळून ह ! घातकी माणस आहेत ती.”
--------------------------------------------------------------------------------

समन्समध्ये ११ ची वेळ दिली होती. तरी केदार १० .३० वाजता कोर्ट आवारात पोहोचला. कोर्टाचे आवार माणसांनी फुलले होते.ठिकठिकाणी लोक गटागटाने रेवतीच्या लग्नाची चर्चा करत होते. गर्दीतला एकजण म्हणाला...
“रेवतीचे लग्न झालय होय ? आम्हाला माहितच नव्हते ”

दुसरा :-“सहा सात महिन्यापूर्वीच झालय.आमच्या कामवालीचा नवरा रेवतीच्या बंगल्यावर माळी कामाला जातो.त्यामुळे आम्हाला तेंव्हाच कळले होते”.

तिसरा :- “सात महिन्यापूर्वी लग्न झाले आणि लगेच घटस्पोट.”

पहिला :- “घटस्पोटाची केस नाही हो.नवरा नांदवत नाही म्हणून केस लावली आहे”.

दुसरा :- “रेवतीला नांदवायला तयार नाही ? कोण आहे हा गब्रू ?बघायला पाहिजे.”

त्या गर्दीतून वाट काढत, केदार कोर्ट हॉल कडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. एकाने त्याला हटकले....

“अहो,वर सगळ फूल आहे.थांबा इथेच”

केदार परत फिरला आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाकडे गेला.त्याने समन्स दाखवल्यावर पोलिसाने त्याला कोर्ट हॉलमध्ये नेऊन बसविले.केदारने इकडे तिकडे पहिले पण जग्गू ,रेवती,अण्णासाहेब कोणीही दिसले नाहीत.दहा मिनिटांनी पाचसहा वकीलाचा घोळका आला आणि त्यांच्या राखीव जागेत सामावला.कोर्टाच्या रिवाजाप्रमाणे बेलीफ आला ,त्याने शीळ वाजवून न्यायमूर्ती येत असल्याची वर्दी दिली.न्यायमूर्तीनी केळकर वकिलाकडे पाहून म्हटलं “तुमची केस आहे ना ?प्रोसिड”
केळकर वकील उठून उभे राहिले.त्यांनी सुरुवात केली...

“युवर ऑनर , ही केस आहे रेवती विश्वास कर्णिक विरूध्द केदार अनिरुद्ध रानडे यांची.माझी अशील रेवती कर्णिक ही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आहे.एक वर्षापूर्वी तिची ओळख केदार रानडे या तरुणाशी झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि .२४ फेब्रुवारी रोजी वधूच्या राहत्या घरी दोघाचा विवाह संपन्न झाला. विवाहाचे फोटो एक्झीबिट क्रमांक एक पान क्रमांक ६ वर लावले आहेत कृपया अवलोकन व्हावे. न्यायमूर्तीनी फोटो पाहून ते पुरावा म्हणून दाखल केल्याची नोंद केली.बाकी फाइल चाळून विचारले...

“मॅरेज सर्टीफिकेट” नाही का ?

“युवर ऑनर,लग्न झाल्याच्या दुसरे दिवशी केदार रानडे अचानक निघून गेले.त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट घेता आले नाही.परंतु साक्षीदारांच्या माध्यमातून आम्ही ते सिद्ध करू.”

“त्याला अजून अवकाश आहे, प्रतीवादी अॅडमीट करत असतील प्रश्नच नाही.वादी हजार आहेत का ?”

वकिलांच्या घोळक्यात काळा गाऊन पांघरुन रेवती बसली होती. तिने गाऊन काढून टाकला आणि ती उभी राहिली .तिने न्यायमूर्तीना नमस्कार केला.प्रेक्षकानी “स्स” असा उद्गार काढून आनंद व्यक्त केला.

न्यायमूर्ती म्हणाले “प्रतिवादी हजार आहेत का ?”
केदार उठून उभा राहिला ,न्यायमूर्तीना नमस्कार केला.

“नाव काय ?”

“केदार अनिरुद्ध रानडे “

न्यायमूर्तीनी प्रतिवादी हजर झाल्याची नोंद केली.

“तुमचे वकील कोण आहेत ?”

“मी वकील दिलेले नाहीत”

“का? तुमची केस कोण चालवणार?”

केदारवर अचानक मोठे दडपण आले.वकील ,न्यायाधीश ,रेवती प्रेक्षक सगळे एका बाजूला झालेत आणि आपण एकटे पडलो आहोत अशा एका विचित्र भावनेने त्याला घेरले . त्याचा स्व:तवरचा ताबा सुटला. तो म्हणाला...

“युवर ऑनर .ही केस चालवायला माझ्याकडे ताकद नाही.गेले दोन महिने मी फार तणावाखाली काढले आहेत.माझी बायको दुरावली .माझी नोकरी गेली .एकेका संकटाचा सामना करून आता मी थकून गेलोय.मला ही केस चालवायची नाही. माझे एक लग्न झाले असताना मी पुन्हा लग्न केले ही मोठी चूक झाली.चूक नव्हे हा गुन्हा आहे आणि तो मला कबूल आहे.त्याची जी काही शिक्षा असेल ती आजच सुनवा. मी शिक्षा भोगल्यावरच माझे निर्दोषत्व सिद्ध होईल.”

न्यायमूर्ती एकदम भडकले. म्हणाले..

“ stop it . बंद करा तुमचा मेलोड्रामा.कोर्टाचे कामकाज असे चालते का ?तुम्ही खूप सिनेमा पाहता का ? सिनेमाचा तुमच्यावर बराच परिणाम झालेला दिसतोय.तुम्हाला शिक्षा करा असे कोणी म्हटले का ?त्यांची केस काय आहे ते तरी समजून घ्या.मि.केळकर,तुमचे ओपनिंग स्टेटमेन्ट पूर्ण करा.”

“युवर ऑनर, प्रतिवादी केदार रानडे यांनी माझी अशील रेवती कर्णिक हिच्या बरोबर राजी खुषीने वैदिक पद्धतीने लग्न केले आहे. जग रहाटीनुसार त्यांनी तिला नांदवावी अशी आमची मागणी आहे.दॅटस ऑल. युवर ऑनर.”

न्यायमूर्ती म्हणाले...
“केस लक्षात आली का ? यावर तुमचा डब्ल्यूएस पुढच्या तारखेला द्या.आणि एक गोष्ट लक्षात ठेवा .या कोर्टाचे काम प्रोसिजरप्रमाणे चालेल.शक्यतो वकील द्या.म्हणजे त्यांना प्रोसिजर माहित असते . एक महिन्याची मुदत देतो .त्यावेळी तुमचे म्हणणे मांडा ?”

क्लार्क कॅलेंडर घेऊन बसला होता तो म्हणाला...

“दिवाळीची सुटी येते आहे.”

“ठीक आहे.दिवाळी नंतरची तारीख घ्या.”

“बुधवार १३ नोव्हेंबर रिकामी आहे”
न्यायमूर्तीनी पुनरोच्चार केला “पुढची तारीख बुधवार १३ नोव्हेंबर”

केळकर वकील म्हणाले...
“युवर ऑनर मेडीयाला रेवतीची पत्रकार परिषद हवी आहे.लायब्ररीत घेतली तर चालेल का ?”

न्यामूर्ती स्तब्धच झाले .ते म्हणाले...

“कोणी ओब्जेक्शन घेतली तर प्रोब्लेम होइल”

केळकर म्हणाले...

“ओब्जेक्शनचा काही प्रश्नच नाही.सर्वांनाच रेवतीचे म्हणणे ऐकायचे आहे “.

मिनिटभर विचार करून न्यायमूर्ती म्हणाले...

“अपवादात्मक परिस्थिती म्हणून मी परवानगी देतो .पण काहीही केऑस व्हायला नको.तुम्ही स्व:त थांबून सगळे व्यवस्थित पार पडेल असे पहा”

“थॅंक्यू, युवर ऑनर”

आपण पत्रकारांच्या हाती सापडलो तर ते आपल्याला हैराण करतील म्हणून केदार गर्दीत मिसळून बाहेर पडायच्या प्रयत्नाला लागला.तरीही एका पत्रकाराने त्याला गाठले.

”अहो थांबा थांबा.तुम्ही रानडे ना ?” “नाही. मी व्यंकटेश पिलाई .मी इथे कॅन्टीनमध्ये कॅशियर आहे”.

“सॉरी ,सॉरी.माझे काहीतरी कन्फ्यूजन झाले .”

केदार शिताफीने बाहेर सटकला.

----------------------------------------------------------------------------------

रेवतीची पत्रकार परिषद सुरु झाली.तिला पहिला प्रश्न विचारण्यात आला तो हा...

“तुझे प्रेम जमले.तुझे लग्न झाले .आणि मेडीयाला पत्ताही लागला नाही . एवढी गुप्तता का पाळण्यात आली.?”

“मुद्दाम गुप्तता पाळली असे काही नाही.लग्न साधेपणाने करायचे आणि नंतर मोठे रिसेप्शन करायचे असे ठरले होते.पण लग्न झाल्यानंतर केदार डिस्टर्ब झाला.त्यामुळे मला लग्न डिक्लेअर करता येइना”.

“याचा अर्थ मिस्टर रानडे विवाहित आहेत हे तुला लाग्नापूर्वी माहित नव्हते’”

“हो.माहित नव्हतेच ”.

“म्हणजे त्यांनी तुला फसवले.?”

“नाही. फसवले असे नाही.तो सगळा समजुतीचा घोटाळा झाला.त्याने सांगितले. पण मला समजले नाही असेच काहीसे .”
“साधारणपणे सिनेतारका जोडीदार निवडताना सिनेमा क्षेत्रातला निवडतात किंवा एखादा उद्योगपती निवडतात.तू साधा नोकरदार नवरा निवडलास, हे कसे काय.?”

“केदारचा आणि माझा प्रेमविवाह असल्याने त्याचा स्टेट्स बघायचा प्रश्नच आला नाही”.
“रेवती एक गोष्ट समजत नाही की रानड्यांनी तुझ्याशी लग्न केले . पण आता ते तुझ्या बरोबर रहायला तयार नाहीत.हे काय गौडबंगाल आहे”

“प्रेमाचा एक कैफ असतो. त्या नादात या लग्नानंतर आपल्या पहिल्या बायकोचे काय होणार ? हा विचार त्याने केला नाही.आणि आता लग्न झाल्यावर त्याला जबाबदारीची आठवण झाली.”
“मिस्टर रानडे पत्रकार परिषदेला का नाही आले.आम्ही त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो.”

“आपल्या व्यक्तिगत बाबीची जाहीर चर्चा करावी हे त्याला मान्य नाही.अर्थात त्याच्या मताशी मी सहमत नाही.माझ्या खाजगी बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार माझ्या चाहत्यांना मी दिला आहे.”
“जो प्रश्न तुम्ही तिघे एकत्र बसून सोडवू शकता तो प्रश्न कोर्टात का नेला ?”.

“आम्ही आपापसात हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर कोणा एकाचे दुसऱ्यावर दडपण येणार.आणि कोणाला तरी मनात नसूनही मनाचा मोठेपणा दाखवावा लागणार .त्यापेक्षा जे काय असेल ते कायदेशीर होउदे”.
“त्यांचे पहिले लग्न झाले आहे. त्यामुळे दुसरे लग्न बेकायदेशीर ठरणार हे उघड आहे.”

“कोर्टाला त्यांचे काम करू दे.तुम्ही पत्रकाराचे काम केलेत तरी पुरे.”
“तुला कोर्टाकडून कोणत्या निर्णयाची अपेक्षा आहे.?”

“ते मीनाक्षीच्या साक्षीवर अवलंबून आहे”.

“मिनाक्षी कोण ?”

“माझी सवत”.[ हशा ]

“म्हणजे पुढची तारीख सुद्धा सनसनाटी होणार”.

“मला कसलीही सनसनाटी नकोय.मला फक्त माझा हक्क हवाय,तोही इतर कोणावर अन्याय न होता,”

शलाका चित्रवाणीचे संपादक नार्वेकर उठून उभे राहिले .ते म्हणाले...

“भरपूर प्रश्नोत्तरे झाली.आपल्यावर वेळेचे बंधन आहे.विवाहित पुरुषाशी लग्न करणारी रेवती काही एकमेव अभिनेत्री नाही.परंतु रेवतीने जो समंजसपण दाखवला तो कौतुकास्पद आहे. रेवतीला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.तसेच केळकर साहेबांनी ही पत्रकार परिषद घेण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद”.
--------------------------------------------------------------------
केदारला घरी पोहोचायला रात्री १० वाजले.त्याने बेल वाजविली . पण मिनाक्षीने दार उघडले नाही.त्याने बॅगेतून लॅच की काढून दार उघडले.अश्विन झोपला होता पण मिनाक्षी जागीच होती.कोर्टात काय घडले ते केदारने सांगायला सुरुवात केली.पण तिचे लक्ष नव्हते.केदार म्हणाला...

“काही प्रॉब्लेम झालाय का ?”

“तिने कुठला प्रॉब्लेम शिल्लक ठेवलाय का ?”

“काय झालय मला कळू दे तरी”

“ही बाई काय वाटेल ते बोलत सुटली आहे.काय तर म्हणे तुमचे तिच्यावर प्रेम होते.आणि प्रेमाच्या भरात तुम्हाला बायका पोरांचा विसर पडला.”

“तुला फोन आला होता?”

“मला कशाला फोन करेल.?टीव्हीवर सांगत सुटली आहे.दिवसातून चार वेळा तेच दाखवतायत”

“बर झालं.ती खोटे बोलतेय हे तुला कळल”

“त्या बाबतीत मात्र तुम्ही दोघे एकमेकाला अनुरूप आहात.निखालस खोटे कसे बोलावे हे तुमच्या कडून शिकावे.आणि माहिती आहे का ती माझी साक्ष काढणार आहे:”

“तुझी साक्ष ? तुझी कसली साक्ष ?”

“माझ्यावर दबाव आणून तुमच्या लग्नाला परवानगी घ्यायची असा डाव असेल?तुम्ही देशमुख वकिलांना का नाही घेऊन गेलात ?”

“ते काय करणार होते ?”
“त्यांनी तिला टीव्हीवर मुलखात द्यायला मनाई केली असती.प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना मुलखात द्यायला परवानगी नसते ना ?”
“ते राहूदे बाजूला.मला जेवायला वाढ.सकाळ पासून काही खाल्ल नाही.”

“का?तुमच्या आवडतीने जेवायला वाढले नाही का ? जेवा जावा”
असे म्हणून ती झोपायला गेली.केदार किचनमध्ये गेला.टेबलावर ताट मांडून ठेवले होते ते घेऊन जेवू लागला.

------------------------------------------------------------

( क्रमशः )

भाग १२ चा धागा -
https://www.maayboli.com/node/69952

Group content visibility: 
Use group defaults

पण ती या प्रकरणात निर्दोष आहे असे त्याला वाटत होते. >> अजूनही तिचा पुळका आहेच...
मग भोग म्हणा कर्माची फळं Lol

छान सुरू आहे कथा..

छान लिहीत आहात. या भागात कथा मस्त पुढे सरकली.
शेवटी सगळे धागे कसे एकत्र येतील, याची उत्सुकता आहे...
पुभाप्र!!
Happy