मॅरेज Mystique !

Submitted by र. दि. रा. on 5 May, 2019 - 10:04

भाग १ :

सौमित्र सिन्हाच्या बंगल्यावर त्यांच्या नव्या सिनेमाच्या संदर्भात मिटिंग सुरु होती. कथेवर विस्तृत चर्चा झाली. पटकथा लेखक भूषण जठार यांनी सगळ्या कलाकाराना आणि सर्व तंत्रज्ञाना कथा समजावून सांगितली. सगळ्यांनी कथा नीट समजून घ्यावी म्हणजे शुटींगच्या दरम्यान पात्रांचे बेअरींग सांभाळायला सोपे जाते असा सौमित्रदादाचा आग्रह होता. या आधी सौमित्र दादांनी प्रदर्शित केलेला गिरवी हा सिनेमा समीक्षक आणि प्रेक्षक या दोन्ही पातळीवर गाजला होता. त्यामध्ये नायिकेचा रोल रेवती कर्णिकने तर नायकाचा रोल वैभव सूद याने सांभाळला होता. आणि ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. म्हणून याही वेळेस सौमित्रदादांनी या दोघांना पुन्हा एकत्र आणायचे ठरविले . आणि दादांच्या अपेक्षेप्रमाणे कथा ऐकल्यावर दोघांनी लगेच होकार दिला होता. नंतर दादांनी जाहीर केले की, या सिनेमाचे ज्यादातर शुटींग सिलीचुंग येथे होणार आहे.

एकाने विचारले - “ हे सिलीचुंग कुठे आहे ? ”

दादांनी माहिती पुरवली “ ये सिलीचुंग नामक देश उत्तरांचल और म्यानमारके बीचमे है. इस कहानी के लीये जिस तरह की पार्श्वभूमी चाहिये बिलकुल वही वातावरण वहा है.मै खुद जाके लोकेशन देखके आया हू. और वहाके भुवालने हमे शुटींगकी परमिशन दी है और पुरा सहयोग देनेका आश्वासन दिया है.”

“ ये भुवाल कौन है ? ” वैभवने विचारले .

“ भुवाल का मतलब है वहॅा के राजा. वहॅा आजभी राजाशाही है. और उन्होने खुद मुझे पुरा सहयोग देनेका वादा किया है. और वहाका माहोल इतना खूबसुरत है. आप खुष हो जायेंगे.”
रेवती तरी खूप खूष झाली.कारण तिचे पहिले दोन सिनेमे पडल्यामुळे ती निराश झाली होती. पण सौमित्रदादाचा गिरवी हिट झाल्यामुळे तिला खूप उमेद आली होती. आणि या सिनेमाची कथा ऐकून तिला हा रोल आपण छान निभावणार असा आत्मविश्वास वाटत होता.

--------------------------------
.
दुसरे दिवशी सकाळी रेवती,अण्णासाहेब आणि तिची छोटी बहिण शर्मिष्ठा एकत्र नाश्ता करीत बसले होते.स्वयंपाकीण शांताबाई गरम डोसे तयार करून देत होत्या ,रेवतीची आई आग्रह करून वाढत होत्या.फक्त सकाळची ही एकच वेळ सर्वांना एकत्र येण्याचे दृष्टीने सोयीची होती . अण्णासाहेबांचा छोटेखानी land developer आणि builder चा व्यवसाय होता. त्यामुळे ते खूप बिझी असत. रेवती सिनेकलावंत होती. त्यामुळे तिलाही तिच्या क्षेत्राला भरपूर वेळ द्यावा लागत असे.शर्मिष्ठा बीकॉम फायनलला होती. पण तिने आत्तापासून सिएचा क्लास लावला होता.आणि ती कॅालेजची एलार सुद्धा होती. एकूण काय दिवसभरात एकमेकांच्या गाठीभेटी होत नसत. म्हणून नाश्त्याला सगळे आवर्जून एकत्र बसत.आजतर काय रेवती,आपल्याला नवा सिनेमा मिळाला हे सांगणार होती .

थोडा अवसर मिळताच ती म्हणाली “अण्णा,सौमित्रदादानी काल नव्या सिनेमाची घोषणा केली”.

“ अरेss व्वा ! कास्टिंगचे फायनल झाले का? ”

“ हो, मी आणि वैभव दोघे आहोत. ”

“ छान! तुला चांगला ब्रेक मिळाला. आता काळजीच नको. ”

“ पुढच्या महिन्यात आम्हाला सिलीचुंगला जायचे आहे.पाचसहा महिने तरी आम्ही तिकडेच असू.”

“ का? इतके दिवस का लागणार ? ”

“ दादा म्हणाले तिथले लोकेशन फार स्यूटेबल आहे. इथे सेट उभारण्यापेक्षा स्वस्त पडेल.आणि वेळ पण खूप वाचेल. ”

“ ह! हरकत नाही ”
इतकावेळ वहिनीसाहेब त्यांच्या गप्पा शांतपणे ऐकत होत्या त्या म्हणाल्या

“ हे सिलीचुंग का काय ते गाव कुठे आहे ? ”

“ गाव नाही ग.तो एक वेगळा देश आहे. अरुणाचल आणि म्यानमार तिथे कुठेतरी आहे.”

वहिनीसाहेब म्हणाल्या - “हे बघ रेवा ,इतक्या परमुलुखात मी काही तुला जाऊ देणार नाही.”

“अग,आई ,असे म्हणून कसे चालेल?सिनेमा क्षेत्रात करीअर करायचे म्हणजे मुलीना थोडे स्वातंत्र्य दिले पाहिजे”

“आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहेच.पण त्याला काही मर्यादाही आहेत.त्या सांभाळून काय ते करायचे”

“पण आई शुटींग म्हटल्यावर ते परदेशातही असणार ना?मग मी परदेशात येणार नाही असे म्हणून कसे चालेल.”

“परदेशात जायला मी कुठे नको म्हणतेय.इंग्लंडमध्ये जा .फ्रान्सला जा. पण रोहिंग्याच्या देशात मी जाऊ देणार नाही?”

“मी काही एकटी असणार नाही.सगळे युनिटचे लोक बरोबर आहेत.”

“तुला कोणी रोहिंग्याने पळवून नेली ना तर ते कोणी आडवे जाणार नाहीत.पण सगळ्या घटनेचे शुटींग बरिक करून ठेवतील.”

अण्णासाहेब मध्ये पडले म्हणाले “ सुनंदा,असे एकदम अटीतटीला येऊ नकोस.मी सौमित्र सिन्हाना भेटतो. सगळी माहिती घेतो.मग आपण काय ते ठरवू. ”

रेवती मनातून खट्टू झाली.किती हौसेने तिने नव्या भूमिकेचे सुतोवाच केले होते.पण कौतुक तर राहिले बाजूला उलट वाहिनीसाहेबांनी मोडता घातला. एवढ्यात तिचा सेक्रेटरी जग्गू ओसवाल आला.त्याच्याशी चर्चा करण्यासाठी ती हॉलमध्ये गेली.अण्णासाहेबानीही काढता पाय घेत स्व:तची सुटका करून घेतली. रेवतीचा प्रश्न अनुत्तरीत राहिला.

--------------------------------

अण्णासाहेबाच्या व्यवसायाचे हेडऑफिस त्यांच्या बंगाल्यातच दुसऱ्या मजल्यावर होते.त्यांचे पार्टनर संजय गावडे कामाच्या गरजेनुसार बंगल्यावर येत.दोघे मिळून चर्चा करून कामाची आखणी करत.त्याप्रमाणे आजही गावडे बंगल्यावर आले.

कामाचे विषय झाल्यावर अण्णासाहेब म्हणाले
“आता रेवाबाईचा प्रॉब्लेम सॅाल्व्ह करायचा आहे” .

गावडेनी “काय प्रॉब्लेम झालाय?” असे विचारले.

सगळे ऐकून ते म्हणाले “अण्णासाहेब, सुरुवातीला तुम्ही दिदीबरोबर सिलीचुंगला जावा. तिथे त्यांची कशी व्यवस्था आहे. आसपासचे वातावरण कसे ते सगळे बघा. तिथे तुम्हाला मुंबईची एकादी सेटल झालेली फॅमिली भेटेलसुद्धा. त्याच्याशी दिदीची ओळख करून द्या आणि परत या.तोवर चारआठ दिवस मी इकडे सांभाळतो.”

“ पार्टनर. किती सुटसुटीत प्लान दिलात. माझी काळजीच मिटली. ”

पण अण्णासाहेबांनी ही गोष्ट स्व:तहून घरात कुणालाच सांगितली नाही.त्यामुळे रेवती हवालदिल झाली.आता विषय कसा काढावा म्हणजे आईची परवानगी मिळेल अशा विचारात रेवती होती तेवढ्यात वाहिनीसाहेब म्हणाल्या

“अहो मी काल गुगलवरुन सिलीचुंगची माहिती घेतली.तुमच्या त्या सिलीचुंगमध्ये अजून राजेशाही आहे.पण तिथल्या तरुणांना राजेशाही मान्य नाही. त्यांनी “ भुवाल अदे दिस ! ” नावाचे आंदोलन सुरु केलंय.तिथली परिस्थिती चिघळली आहे.आपण रेवतीला तिथे पाठवायला नको”.

रेवतीला काय बोलावे तेच सुचेना. सुनंदाबाईनी एवढी गुगलवरून माहिती काढली हे तिला खरेच वाटेना.पण आता आई आपल्याला जाऊ देणार नाही हे स्पष्ट झाले. इतका चांगला सिनेमा सोडवा लागणार या विचाराने ती कासावीस झाली.

अण्णासाहेब म्हणाले, -
“ सुनंदा अशी आंदोलने जगभर सुरूच असतात .पण ती त्यांची अंतर्गत बाब असते पर्यटकांना किंवा कामासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना त्याचा उपद्रव होवू नये याची काळजी तेथले सरकार घेतेच पण आंदोलकही घेतात.सौमित्र दादा स्व:त तेथे जावून भूवालाना भेटून आले आहेत. त्यासाहेबाना अर्थी परिस्थिती फारशी स्फोटक नसणार. ”

“ ते काही मला समजत नाही.पण अश्या परिस्थितीत मी रेवाला एकटीला जाऊ देणार नाही. ”

“ सुनंदा अशी हट्टाला पेटू नको.सौमित्र सिन्हा जबाबदार व्यक्ती आहे.मी त्याच्यावर रेवाची जबाबदारी टाकतो.म्हणजे ते तिची काळजी घेतील. ”

“ मी तिला जायला परवानगी देइन.पण तुम्ही तिच्याबरोबर जाणार असलात तरच ”

“ बर बाई मी जातो तिच्या सोबत.आता तरी सोडशील ? ”

“ रेवती एकदम अचंबित झाली “काय सांगता अण्णा.तुम्ही येणार माझ्या बरोबर ? ”

“ मग काय करू ही तुला सोडायला तयारच नाही.तुझे करीअरही महत्वाचे आहे.”

“ thank you अण्णा thank you very much ”

--------------------------------

सौमित्र सिन्हांनी दौऱ्याची तयारी सुरु केली. त्यांनी सिलीचुंगमध्ये एक पुरे हॉटेल सहा महिन्यासाठी बुक केले. सिलीचुंगला मुंबईतून विमान सर्विस नव्हती. म्हणून त्यांनी क्रू ,ज्युनिअर स्टाफ आणि सामान रेल्वेने पुढे पाठविले. नंतर चार्टर प्लेनने ते स्वत: , अण्णासाहेब, रेवती आणि वैभव रवाना झाले. अण्णासाहेब बरोबर येत आहेत म्हटल्यावर सौमित्र दादांना आनंदच झाला. काही जबाबदारीची कामे त्यांच्यावर टाकायची असे त्यांनी मनाशी ठरवले. भूवालानी युनिटचे चांगले स्वागत केले. आणि त्यांना भरपूर सहकार्यही केले. त्यामुळे वेळ वाया न घालवता दादांनी शुटींग वेगाने सुरु केले. अण्णासाहेबाना भरपूर रिकामा वेळ होता. त्यावेळात त्यांनी आजूबाजूला फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या लक्षात आले की सध्या आंदोलने फारशी तीव्र नव्हती. पण एकदा भूवालानी आंदोलाकावर छडीमार केला होता. तेंव्हा पासून भूवालाचे विरोधात वातावरण कलुषित झाले होते. आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता होती.

एकदा ते पॅलेसमध्ये गेले असताना त्यांची भेट भूवालांचा दुभाषा तथा खाजगी सचिव विरुपक्षे याच्याशी झाली. बोलण्याच्या ओघात अण्णासाहेब म्हणाले -
“आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करून उपयोग होत नाही. त्यामुळे आंदोलने चिघळतात. त्यापेक्षा तुम्ही आंदोलकांना पर्याय द्या की सुरुवातीला दहा पैकी पाच सिनेटरसाठी निवडणूक जाहीर करायला आम्ही तयार आहोत बाकी पाच सिनेटरची नेमणूक भूवाल करतील. आणि भूवाल हेच राष्ट्र प्रमुख राहतील. पहिला टप्पा म्हणून ही तडजोड आंदोलकांना मान्य झाली तर तुम्हाला चार पाच वर्षाचा कालावधी मिळेल. पण जगात सगळीकडे लोकशाही आहे. आज ना उद्या इथेही लोकशाही येणारच.”

हा विषय खाजगी सचिवाने भूवालापर्यंत पोहोचवला. दुसरे दिवशी अण्णासाहेबाना पॅलेसमधून शुकहाराचे निमंत्रण आले. अण्णासाहेब पॅलेसमध्ये पोहोचताच बारगिराने त्यांना आदराने डायनिंग हॉलमध्ये नेले. ब्रेकफास्टच्या टेबलावर अण्णासाहेब, भुवाल आणि युवराज असे तिघेच होते.दुभाषाची गरज नव्हती कारण युवराजांना इंग्रजी उत्तम येत होते. भूवालाना कामापुरते इंग्रजी येत होते. फारशी प्रस्तावना न करता अण्णा साहेबांनी त्यांना सांगितले की आता जगभर लोकशाही रुजली आहे.त्यामुळे तुम्ही लोकशाहीला विरोध करून उपयोग होणार नाही. तुम्ही स्टेप बाय स्टेप लोकशाही मान्य करा. लोकशाहीचा अवलंब करण्याची प्रोसेस लांबवत रहा. त्यामुळे तुम्हाला चारपाच वर्षाचा अवधी मिळेल. तुमची जी खाजगी संपत्ती असेल ती तुम्ही इतर कुठल्यातरी देशात गुंतवणूक करा. जेंव्हा इथली परिस्थिती हाताबाहेर जाइल तेंव्हा तुम्ही त्या देशात आसरा घ्या. युवराज प्रश्न विचारून अण्णासाहेबाकडून माहिती काढून घेत होते. भुवाल आपल्याला इंटरेस्ट नाही असे नाटक करत होते.शुकाहार संपल्यावर भुवाल म्हणाले हे इतर कोणापुढे बोलू नका. अण्णासाहेबाना सन्मानाने निरोप देण्यात आला. पण अण्णासाहेबांचा सिलिचुंगच्या राजकारणात शिरकाव झाला होता.

( क्रमशः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय.
पुढचा भाग लवकर येउद्या.

कथा पूर्ण वाचली नाही .
<ये सिलीचुंग नामक देश उत्तरांचल और म्यानमारके बीचमे है>
इथे अडकलो. उत्तरांचल = उत्तराखंडच्या सीमा तिबेट, नतिबेट, उत्तर प्रदेश आणि हिमा चल प्रदेशला लागून आहेत.
तर म्यानमार आपल्या ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश, मणिपूर इत्यादी राज्यांना लागून आहे.
सगळंच काल्पनिक म्हणून सोडून देता येईलही.

तुम्ही mistique हा शब्द mistake या शब्दाचा मराठी उच्चार म्हणुन वापरला असे तर ठीक नाहीतर त्याचे स्पेलिन्ग Mystique असे आहे.

वाचकांच्या अभिप्राया बद्दल सर्वांचे आभार !

Mystique - स्पेलिंग दुरुस्त केलेले आहे , हे सुचवल्या बद्दल धन्यवाद !

Interesting...
फक्त अण्णासाहेब युवराजांना इतका साधा सल्ला देतात ज्याचा त्याने कधी विचारच केलेला नसतो हे नाही पटले