मॅरेज Mystique ! ( भाग ५ )

Submitted by र. दि. रा. on 8 May, 2019 - 21:50

मागील भागाचे धागे :
भाग १ :- https://www.maayboli.com/node/69844
भाग २ :- https://www.maayboli.com/node/69853
भाग ३ :- https://www.maayboli.com/node/69865
भाग ४ :- https://www.maayboli.com/node/69878

भाग ५ :-

काळी लोगन गाडी पोर्चमध्ये थांबली. गाडीतून उतरत ड्रायव्हर म्हणाला “शिवराम पाहुणे आलेत रे”

शिवराम नावाच्या नोकराने केदारचे स्वागत केले “या ,साहेब”

केदारने हॉलमध्ये प्रवेश केला.मोठा प्रशस्त हॉल होता.तीन ठिकाणी सिटींग अरेंजमेन्ट केलेली होती. एका वेळी तीन वेगवेगळे ग्रुप एकमेकांना डिस्टर्ब न करता गप्पा मारत बसू शकतील इतका भव्य हॉल होता
आत्ता मात्र हॉलमध्ये कोणीही नव्हते.रिकामा हॉल पाहून त्याचा विरस झाला.तो एका सोफ्यावर बसला.टीपॉयवरचे वर्तमानपत्र घेऊन ते वाचायचा प्रयत्न करू लागला .इथे दहा वाजता लग्न आहे आणि काही धामधूम नाही ? काही मांडामांड नाही ? .फार सुनेसुने वाटत होते.
केदारने शिवरामला विचारले “अण्णासाहेब आहेत का?”
तो म्हणाला “आहेत ना”.

“त्यांना मी आलोय म्हणून सांगा”

“त्यांना माहिती आहे.”
शिवराम असे मोजके बोलल्याने संभाषण संपले.तो तसाच मासिके चाळत बसून राहिला . अर्ध्या तासाने जिना उतरून अण्णासाहेब हॉलमध्ये आले.उठून उभा राहत केदार म्हणाला “नमस्कार अण्णासाहेब “
“नमस्कार .बसा .जग्गू आला नाही वाटत अजून “

“ते परस्पर इकडे येतो म्हणाले होते “

“हा.येइल तो .त्याचे जरा आरामशीर काम असते . बघू” असे म्हणून अण्णासाहेबांनी पेपर मागून घेतला. आणि ते पेपरात मग्न झाले.केदारला फारच कानकोंडे झाले .आपण यात उगीच अडकलो . तो मनातल्या मनात पस्तावा करू लागला. मध्ये अण्णासाहेबाना फोन आला .फोन झाल्यावर तरी ते आपल्याशी काहीतरी बोलतील म्हणून तो अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होता . पण फोन झाल्यावर ते पुन्हा पेपर वाचण्यात रमले.

थोड्या वेळाने गुरुजी आले .बरोबर त्यांचा सहाय्यक होता . गुरुजी एका नोकराला म्हणाले “अरे रिक्षातून होमाचे सामान आणि बोहोले उतरवून घ्या”

नंतर ते अण्णासाहेबाना म्हणाले “कुठे मांडायचे ?”

“इथे . हॉलमध्येच”

“कुठल्या पद्धतीने करायचे”

“वैदिक पद्धतीने करा.”

“मग हे सोफे टीपॉय सगळे हलवावे लागेल.”
नोकर मंडळी ऐकत उभी होतीच .त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली आणि दहा मिनिटात हॉलच्या मधोमध हमचौक जागा तयार करून दिली.गुरुजींनी साहित्याची मांडणी सुरु केली.
त्यानंतर पंधरावीस मिनिटांनी जग्गू आला.त्याने बरोबर आणलेल्या कॅरीबॅग दाखवत, तो म्हणाला सूट तो मैने कलहि खरीदा था . लेकीन ये रेशमकी धोती ढूढते ढूढते लेट हो गया.

अण्णासाहेब म्हणाले “अरे वा ! आणलास का मुकटा .बर झालं”
जग्गू केदारला म्हणाला “चाय बाय पिया की नाही .?”
केदारने उत्तर दिले नाही.
जग्गू म्हणाला “उसमे क्या .मांग के पिनेका ना | शिवराम दो कप चाय लाना.”

जग्गू आल्यावर केदारचे अवघडलेपण कमी झाले आणि चहा प्यायल्यावर तर तो खूपच सावरला. गुरुजी म्हणाले “जावईबापू चला, सोवळे नेसून या.”
केदार तेथल्याच एका रिकाम्या खोलीत गेला.

अण्णासाहेबांचे पार्टनर संजय गावडे आले.अण्णासाहेब त्यांना घेऊन कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसले.त्यांची व्यावसायिक चर्चा चालू झाली.

केदार येऊन पाटावर बसताच गुरुजींनी सुरुवात केली “आचम्य ,ॐ केशवायनम: ॐ नारायणायनम: - - - - - - - - - - -
गुरुजींनी केदारच्या हातात विडा दक्षणा दिली ते म्हणाले “देवाला कार्याचे निमंत्रण देऊन या.वडील मंडळीना नमस्कार करा.”

केदार अंदाजाने देवघराकडे गेला.देवघरात वहिनीसाहेब पूजा करीत होत्या,केदारला पाहून त्या मागे सरकल्या .केदारने विडा दक्षणा ठेऊन नमस्कार केला आणि वाहिनीसाहेबाना नमस्कार करायला तो वाकला.वहिनीसाहेब म्हणाल्या “नको नको .मला नमस्कार करू नका”
केदारचा विरस झाला . तो नाईलाजाने परत फिरला हॉलमध्ये येऊन अण्णासाहेबांचे दिशेने निघाला.अण्णासाहेबांनी तेथूनच आशीर्वाद दिल्यासारखा हात करून “असू दे” असे म्हणून त्याला परत पाठवले.

केदारला तेही खूप खटकले.तो येऊन पाटावर बसल्यावर गुरुजींनी पुढचे विधी सुरु केले.वराकडचे विधी झाल्यावर ते एका नोकराला म्हणाले “जा रे रेवतीला बोलाव”.

रेवती लगेचच आली.तिने तिचे प्रसिध्द मिलियन डॉलर स्माईल केदारला बहाल केले.केदारच्या अंगावर रोमांच आले.तो आधीचे मानहानीचे प्रसंग विसरला. बदामी रंगाच्या कांजीवरम साडीत रेवती बेहद सुंदर दिसत होती . पण तिने दागिने, बांगड्या असे काहीच घातले नव्हते.

गुरुजी त्यांच्या सहाय्यकाला म्हणाले “‘तू हिच्याकडून गौरीहराचे पूजन करून घे.तोवर मी पूर्णाहुतीची तयारी करतो”
तेवढ्यात रेवतीची बहिण शर्मिष्ठा बाहेरून आली.अण्णासाहेब म्हणाले “शमा किती उशीर ?”

”अण्णा रिहर्सल्स चालू आहेत ना.मध्येच सोडून येता येत नाही”
“बर असू दे .कपडे बदलून लगेच ये.”
गुरुजींनी एकेक करून बहुतेक विधी संपवले.आता फक्त मंगलाष्टके म्हणून अक्षता टाकण्याचा कार्यक्रम बाकी होता.तास दीड तास मंत्र म्हणून त्यांना दम लागला होता.त्यांनी पंधरा मिनिटाची सुटी जाहीर केली

ते म्हणाले “अरे शिवराम काहीतरी चहा कॉफी आण .जावई बापू तुम्ही सोवळे सोडून सूट घालुन या .तुही पैठणी नेसणार असलीस तर नेसून ये.तोवर मी अक्षतेची तयारी करतो .”

रेवती आणि केदार आपापल्या रूम मध्ये गेले . रेवतीने मोबाइलमध्ये टायमरवर पंधरा मिनिटांची वेळ सेट केली आणि ती बेडवर झोपून गेली . केदार हातपाय धुवून सूट घालण्यात गुंतला .तो कपडे करून हॉलमध्ये आला तेंव्हा नोकर मंडळी सगळ्यांना कॉफी बिस्किटे आणि वेफ़र्स देण्यात गुंतले होते.रेवती आणि शर्मिष्ठा डायनिंग टेबलावर कॉफी घेत बसलेल्या दिसल्या तोही त्यांना जॉईन झाला.पण दोघी काही बोलत नव्हत्या.
केदारने शर्मिष्ठाला विचारले “तू कुठल्या कॉलेजात आहेस”.

“एमसीसी कॉलेज माहीम.यंदा मी बी कॉम फायनलला आहे”.

“हो का.पुढे काय विचार आहे?”

“विचार तर सि ए करायचा आहे .पण झेपलं पाहिजे”

“न झेपायला काय झालं”

“कारण मी सगळच करायला जाते.डान्स प्रक्टीसला जाते.एल आर पण मीच आहे.”

“तुमच्या रिहर्सल्स कसल्या चालू आहेत?गॅदरींग अजून झालं नाही?”

“यंदा आमच्या कॉलेजला पन्नास वर्ष पूर्ण होतायत.म्हणून अमृत महोत्सव होणार आहे”
सगळ्यांचे कॉफीपण झाले . गुरुजींनी आवाज दिला “वधू वर गप्पा पुरे.मंडपात या.अजून अक्षत व्हायची आहे.”
सगळेजण हॉलच्या मध्यात गोळा झाले . बोहोल्यासमोर वधू वर उभे राहिले.त्याच्या एका बाजूला अण्णासाहेब, जग्गू, आणि गावडे ही घरची मंडळी आणि दुसऱ्या बाजूला नोकर मंडळी अशी सहजच दोन गटात विभागणी झाली.

गुरुजींनी मंगलाष्टके सुरु केली.शर्मिष्ठा तिच्या हँडीकॅमने फोटो काढू लागली .तिने चारपाच फोटो काढले तोवर अण्णासाहेबांनी तिला दटावले “शमा ,काय चाललय तुझे.”

शमाने जीभ चावत कॅमेरा बंद केला.मंगलाष्टकं संपली.वधूवरांनी एकमेकाना हार घातले.विवाह सोहळा संपन्न झाला.

सगळेजण सोफ्यावर विसावले.गुरुजींनी साहित्य आवरायला सुरुवात केली .नोकरांनी हॉल झाडून काढला.लगेच केटरर मुलांनी बुफे पार्टीची मांडामांड केली.अण्णासाहेबांनी एक डीश तयार करून पार्टनरना दिली.नंतर क्रमाक्रमाने प्रत्येकाने आपापली डिश स्व:त घेऊन जेवायला सुरुवात केली.आपल्याला कोणीतरी डीश आणून देइल अशी केदारला अपेक्षा होती पण सगळे आपापल्या जेवणात मग्न होते.

केटरर मुलाने एक डिश तयार करून केदारला बोलावले “घ्या ना साहेब” केदारने उठून डिश घेतली आणि तो रेवती शेजारी जाऊन बसला.
अण्णासाहेब नोकरांना म्हणाले “तुम्हीपण घ्या रे”
जेवण छान होते.व्हेज पुलाव , पराठे, पनीर टिक्का मसाला आणि बेबी कोर्न या भाज्या , अननस पेरू यांची कोशिबीर आणि सोलकढी असा अनोखा मेनू होता .पण एकही गोड पदार्थ नव्हता.

त्याने रेवतीशी बोलणे सुरु केले “छान झाला कार्यक्रम.”

“पण फार उशीर झाला.व्हेरी हेक्टिक”

“मला असे मंगलमय वातावरण आवडते. होमहवन मंत्रोच्चार .किती छान वाटते.”

“मान्य आहे . पण लवकर संपायला हवे होते.”

“जेवण पण खूप भारी आहे.”

“ते आमच्या अण्णांचे काम. जे करायचे ते उत्तमच झाले पाहिजे.”

तुझ्या ताटात काहीच शिल्लक नाही.मी तुझ्या साठी काय आणू? पुलाव आणू का?”

“काही नको.जेवण झालय माझे”
ती अचानक उठली.बेसिनवर हात धुवून ती मागच्या दाराने बागेत गेली.
केदारला कळेना की ती आपल्याला टाळतेय का तिला काही बोलायचे आहे ? पण इथे सगळ्या समक्ष बोलता येणार नाही म्हणून ती मुद्दाम एकांत जागी गेली आहे.
त्याने दुसरा पर्याय स्विकारला आणि बागेत जाऊन तिच्याशी बोलायचे असे त्याने ठरविले.तो डिशमध्ये घेतलेले जेवण संपविण्याच्या मागे लागला.बहुतेकांचे जेवण झाले .

अण्णासाहेबांनी खिश्यातून दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल काढले त्यातून खूपशा नोटा मोजून गुरुजींची दक्षणा दिली.नंतर प्रत्येक नोकराला दोनदोन नोटा दिल्या.आणि कुठे वाच्यता करू नका असे बजावले.नोकरांनीही “छ्या छ्या ,आमी कशाला बोलू” अशी ग्वाही दिली.

केदार हळूच सटकला आणि बागेत गेला.रेवती झोपाळ्यावर बसून हलके झोके खात होती.
केदार म्हणाला “एकटीच बसलीस”
“कित्येक दिवसांनी असा निवांतपणा अनुभवतेय .“

“तुझ्याशी बोलायचे होते.”

“ह,बोला”

“नाही. म्हणजे एखाद्या विषयावर बोलायचे असे नाही.सहज घरगुती गप्पा “

“बसा” तिने एका बाजूला सरकून त्याला बसायला जागा दिली.

तो म्हणाला “किती स्वप्नवत वाटतेय हे सगळ.औट घटकेसाठी का असेना पण आपले लग्न झालेय .आणि मी तुझ्या शेजारी बसून गप्पागोष्टी करतोय.तू माझ्यासारख्या सामान्य माणसाची निवड कशी केलीस?”

“मी मोठी सेलिब्रेटी आणि इतर सगळे सामान्य लोक असा फरक मी कधीच करत नाही.प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मोठाच असतो.आपल्या व्यवसायात आपण यशस्वी व्हावे म्हणून प्रत्येकजण धडपड करत असतो पण सिनेमाच्या क्षेत्रात रिटर्नस जास्त मिळतात”.

“ तुझा अभिनय खूपच श्रेष्ठ आहे.तू जे कॅरॅक्टर साकारतेस त्याच्याशी समरस होऊन जातेस”

“ते तंत्र मला आत्ताआत्ता जमायला लागलेय.सुरुवातीला मीही गटांगळ्या खात होते.माझा अभिनय लाउड असतो, मी सवंग लोकप्रियतेच्या मागे असते अशी टीका पचवतच मी इथे स्थिरावले”

हे म्हणजे टीव्ही वरच्या मुलाखती सारखे चालले होते.केदारला अशा चर्चेत इंटरेस्ट नव्हता .त्याला काहीतरी पर्सनल बोलायचे होते.आपण विवाहित आहोत हे कबूल करून क्षमा मागायची होती.रेवतीने हे लग्न का केले त्याचे कारण जाणून घ्यायचे होते .
तो काहीतरी विचारणार होता एवढ्यात ती म्हणाली “तुम्ही माझा गिरवी पाहिलात की नाही”.
“नाही. मला तो पाहायला मिळाला नाही’’

“गिरवीची कथा इतकी जबरदस्त आहे ना.एक आदिवासी कुटुंब असते.आदिवासी तरुण ,त्याची बायको आणि आई .तिघेच.आई आजारी पडते.मुलगा तिला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो.पण ती तेथे दगावते.

आदिवासी तरुणावर कर्ज होते.तो पैसे कमावण्यासाठी मुम्बईला जातो.जाताना बायकोला म्हणजे मला डॉक्टरकडे ठेवतो.मी हॉस्पिटलमध्ये आयाचे काम करू लागते.नंतर डॉक्टरची बायको मरते.डॉक्टरला लहान मुलगा असतो .त्याला सांभाळायला मी डॉक्टरच्या घरी रहाते .डॉक्टर बरोबर माझा संबंध येतो.नंतर डॉक्टर माझ्याशी लग्न करतो.
तीन वर्षांनी आदिवासी तरुण परत येतो. डॉक्टरकडे आपल्या बायकोची मागणी करतो .
सौमित्र दादांनी याचे पिक्चरायझेशन इतके सुंदर केलंय”

केदारला फारच बोअर झाले .तो उठला आणि म्हणाला “चल घरात जाऊया.”
“नाही. मला एकटीला थोडा वेळ इथेच बसायचे आहे “ ‘

”एक विचारू का?”
“ह “

“आईसाहेब अक्षत टाकायला आल्या नाहीत ?”

“तिच्या दृष्टीने ते फारसे महत्वाचे नव्हते.”

“त्या जेवायलाही नव्हत्या”

“तिचा उपास असतो .संध्याकाळी जेवेल ती.” रेवतीचा राग तिच्या स्वरात स्पष्ट दिसत होता.हा प्रश्न विचारून आपण चूक केली हे केदारच्या लक्षात आले.

पण एकंदरीतच त्याचा अपेक्षाभंग झाला.त्याला वाटले होते जेवण झाल्यानंतर आपण सगळे एकत्र बसून गप्पा वगैरे होतील.आपण काहीही अपेक्षा न ठेवता सहकार्य केल्याबद्दल ते आभार मानतील.आज रात्री इथेच रहा असा आग्रह करतील.
पण प्रत्यक्षात त्याच्या वाट्याला उपहासच आला.

आता रात्री ते बंगल्यात रहा म्हणतात का निदान बाहेर काहीतरी सोय करतात हे अण्णासाहेबांना विचारावे म्हणून तो हॉलमध्ये परत आला.पण हॉलमध्ये सामसूम होती .सगळे नोकर ड्युटी संपवून घरी गेले होते.एकटा शिवराम काहीतरी दुष्काळी काम काढून बसला होता.

केदार म्हणाला “अण्णासाहेब कुठे आहेत ?मला त्यांच्याशी थोडे बोलायचे आहे.”

शिवराम म्हणाला “काही माहित नाही.बहुतेक बाहेर गेलेत वाटते”.

अण्णासाहेबांची वाट पाहत केदार सोफ्यावर बसून राहिला .त्याने मासिक चाळत अर्धा तास टाइमपास केला.पण कोणीही आले नाही.तेथून

शिवराम हळूच सटकला आणि माडीवर अण्णासाहेबांचे खोलीत गेला. त्याला पाहताच अण्णासाहेब म्हणाले “पाहुणे गेले का रे ”

“आहेत की”

“अजून बसलेत?.काय करतायत ?“

“मासिक वाचत बसलेत”

“त्यांना विचार ,म्हणाव काय पाहिजे ? आणि काही कारण नसेल तर जायला हरकत नाही म्हणाव” “

“मी कस विचारणार?.मी विचारायला आलोय चहा ठेवू का ?”

“हो,आणि माझा चहा इथे रुममध्ये आण.पाहुण्यांनाही दे”

शिवराम गेल्यावर त्यांनी जग्गुला फोन लावला.“ जग्गू ,तू कुठे आहेस?”

“कयो?क्या हुवा?”

“अरे,ते केदार भैया ,इथेच थांबलेत अजून.तू त्यांना काही पैसे कबूल केले होतेस का ?”

“अण्णासाब उसने गुडफेथमे हमारी मदद की है.वो पैसे का लालची नही है .”

“मग का थांबलेत ते ? जात का नाहीत ?’

“अण्णासाब ,मुझे पंधरा मीनट दिजीये. मै पुरी मालुमात करके आपको बता देता हुं .”

जग्गुने हॉटेलला फोन लावला “हॅलो रवी,अरे वो बंदा जिसके साथ मेरी फ्रायडेको मिटिंग हुवी थी उसने कुछ मेसेज छोडा है,वापस कब आयेगा वगैरा.”
रवीने कॉम्प्यूटर स्क्रीनवर चेक करून सांगितले “वो तो सबेरे चेक औट करके चला गया ?”’

“और उसके साथ दो नेताजी थे वो कहा है.?”

“वो तो उसी दिन चले गये”.

“किस लीये आये है ये लोग.”

“थर्सडेको उनकी ऍडव्होकेट चंद्रचूडके साथ मिटिंग हुवी .शायद कुछ कोर्टमॅटर चालू है.”

“ठीक है. थॅक्स्”

जग्गुने फोन कट करून बंगल्यावर फोन लावला.शिवरामने फोन उचलला आणि जग्गुने केदारला फोन द्यायला सांगितल्यावर फोन केदारला देऊन तो चहा करायला निघून गेला. केदारला कुणाचा फोन आहे काही कळले नाही .
तो म्हणाला “हॅलो”

“हा.केदार भैया,मैने शुक्रिया अदा करनेकेलीये फोन किया.तुमने हमारी बहुत मदद की.मेनी मेनी थॅंक्स. गाव वापीस कब जा रहे हो .”

“कल ग्यारा बजे मुझे कोर्टमे काम है, वो निपट्कर चला जाऊंगा.”

“अच्छा.रेवतीकी शादिकी जिम्मेदारी अण्णासाबने मुझपर सौपी थी .आज मै उस जिम्मेदारीसे फ्री हो गया.और अब आपभी फ्री हो गये, है ना .थँक्स
वन्स अगेन. बाय.”

जग्गुचा फोन जितक्या अनपेक्षितपणे आला तितक्या अचानकपणे त्याने कट केला. त्यामुळे ऐनवेळी काय बोलायचे ते केदार सुचले नाही..तो

नुसता हो हो म्हणत गेला .पण आता त्याच्या लक्षात आले की त्याने निघून जावे असे जग्गुने अडून अडून सुचीत केले.

काय करावे असा विचार करीत असताना शिवराम चहा घेऊन आला.ट्रे मधून चहाचा कप घेत केदारने विचारले “अण्णासाहेब अजून आले नाहीत का ? .मला त्यांच्याशी बोलायचे आहे”

शिवराम म्हणाला “बहुतेक साईटवर गेले असतील”

शिवराम अण्णासाहेबाना चहा घेऊन गेला तेंव्हा ते फोनवर जग्गुशी बोलत होते.जग्गुने त्यांना समजावून सांगितले की उद्या केदारला कोर्टात काम आहे ,त्यामुळे तो सकाळी जाईल.आता रात्रीपुरते त्याला घरी राहू दे.

केदार हॉलमध्ये बसल्याने अण्णासाहेब त्यांच्या खोलीत अडकून पडले . तशीच रेवती तिच्या खोलीत अडकून पडली.

तिने इंटरकॉमवरुन अण्णासाहेबांशी सम्पर्क साधला “अहो अण्णा,ते अजून घरातच थांबलेत का? ते जात का नाहीत?”

“माझे आणि जग्गुचे आत्ताच बोलणे झाले.केदारने परवा जग्गुला विचारले होते की त्याला या लग्नाचा काय उपयोग ? तेंव्हा जग्गू म्हणाला होता की

तुमचा कर्णिक परिवाराबरोबर संबंध जुळतील.रेवती तुमची मैत्रीण होईल वगैरे .त्यामुळे तो आपली वाट पाहत बसलाय ”.

“जग्गुला असला आगाऊपणा करायला कोणी सांगितले होते?”

“बोलण्याच्या ओघात अनवधानाने त्याच्याकडून शब्द गेला.पण तू आता खाली जाऊन गोडगोड बोलून त्याला कटव .“

“नाही ग बाई .मी कुठे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत बसू.इथे रुममध्ये चिवडा ,वेफर्स काहीतरी असेल तेवढ्यावर रात्र काढलेली परवडेल.” रेवतीने फोन कट केला.
संध्याकाळचे साडेसहा वाजले.रात्रपाळीचा नोकर रघु कामावर हजर झाला.त्यामुळे शिवरामची सुट्टी झाली.रघु अर्धा तास उशिरा आला म्हणून

शिवरामची आणि त्याची झकापकी झाली.रघु केदारला म्हणाला “मला उशीर झाला म्हणून डाफरतोय पण सकाळी मला सोडायला हा कधी वेळेवर अलाता.”

केदारने हसून त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली आणि तोच धागा पकडून त्याच्याशी संभाषण सुरु केले. तेवढीच एकटेपणाची भावना उणावली. तो रघुशी बोलत असतानाच शर्मिष्ठा जांभया लपवत हॉलमध्ये आली.केदारला पाहून ती छानसे हसली.केदार एकटाच बसलाय म्हणून अपराधी झाली.
त्याच्या शेजारी बसत म्हणाली “डान्सच्या रिहर्सल्समुळे दमायला होते हो.जेवल्यावर जी झोपले ते आत्ता उठले.रघु आमच्या साठी कॉफी करतोस.?”

केदार म्हणाला “ अण्णासाहेबांशी थोडे बोलून मी जाणार होतो.पण अण्णासाहेब आले नाहीत.आणि नंतर बघता बघता एकदम उशीरच झाला.”

“कुठे जायचं होत तुम्हाला”

“मला कुठे जायचे होते असे नाही.उद्या मला कोर्टात काम आहे.पण आता इतक्या रात्री मला हॉटेलात रूम मिळेल का नाही अशी धास्ती वाटायला लागली आहे”

“हॉटेलात कशाला जायचे.एवढे मोठे घर आहे की” .

“इथे राहिलो तर चालेल?”

“न चालायला काय झाले ? कितीतरी खोल्या रिकाम्या आहेत.रात्री जेवायला कढी खिचडी चालेल ना.?”

“जेवायला काही नको .मी रुममध्ये जातो .”

“अहो थांबा थांबा .रघू कॉफी आणतोय. ती तरी घ्या.”

( क्रमशः )

Group content visibility: 
Use group defaults

केदार इतका भोळा कसा कि काहीही पैसे ना घेता त्याने इतकी मोठी जोखीम घेतली. तेही लग्न झालेले असताना. बायकोला कळले तर काय होईल याचा विचार त्याने का केला नाही. किमान तिला विश्वासात तरी घ्यायचे. शर्मिष्ठा ने काही फोटो काढलेत लग्नाचे. कदाचित पुढे ते उपयोगी ठरतील जर तो यात अडकला तर. गूढकथेतली उत्सुकता वाढते आहे. पु. ले. शु.