निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला इथे यायला खूप उशीर झाला. तोवर सगळी उत्तरे देऊन झाली! Sad
सी पोईझन झाड आहे ते... कुणीतरी आधीच सांगून झालय म्हणा... Sad
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Sea%20Poison%20Tree.html

कदंब लहानपणी फक्त पुस्तकात वाचलेले. चित्र कधीच पाहिले नव्हते. २ वर्षापूर्वी चर्चगेटला ह्या दिवसात गेलेले तेव्हा एका झाडावर छोटे गोंडे अचानक दिसलेले. मी आणि माझी मैत्रीण दोघीनी एकदमच बघितले आणि जाम खुश झालेलो. मग तिनेच कुठूनशी माहिती आणली की ते कदंब आहे म्हणून. आता ह्या दिवसात कुठेही जाताना शोधात असते कदंब दिसतो का ते...

गेले ते दिन गेले............अत्यंत आवडतं गाणं. यातला कदंब तरूचा उल्लेख खूप छान वाटतो

वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ! ते दिन गेले

कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले

हरीत बिलोरी वेलबुटीवरि, शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले, गेले ! ते दिन गेले

निर्मलभावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे
तू मी मिळुनी रोज पाहिले, गेले ! ते दिन गेले

आणि सायली...जसं वय वाढत जाईल तश्या लहानपणीच्या आठवणी अगदी एखादे चित्र/फोटो पाहिल्यासारखं डोळ्यापुढे येतात बरं का!
तुझी चिमुकली हळदुली बाभळीची फुलं पाहिल्यावर मला माझं जुनं घर आठवलं. ३ मजल घर, विथ माझघर , सोपा, बाळंतिणीची खोली, मोठ्ठं देवघर मागे पुढे अंगण... कित्ती तरी खोल्या आणि इथे सांगायचं कारण म्हणजे ...दुसर्‍या मजल्यावरची गच्ची आणि त्यात झुकलेली बाभळीची फांदी याच पिवळ्या फुलांसकट आणि गचीत पडलेला पिवळा सडा हे डोळ्यापुढे आलं. हे झाड घरापलिकडे असलेल्या खाडिलकरांच्या परड्यात होतं पण फुलं आमच्या गच्चीत.
एक जुनं गाणं आठवलं............बहरला पारिजात दारी ,,, फुले का पडती शेजारी.
इथे आपली बिचारी बाभूळ!

कदंबाची पानं एकदम शोभिवंत, दाट हिरवी, थोडी सोनचाफ्याच्या पानांसारखी असतात. फुलं नसताना देखिल एकदम देखणा वृक्ष.

ही रुद्राक्षाची फुले. अगदी नाजूक , बदामाच्या फुलापेक्षाही लहान

iPhone Pictures Sept 2013- part 2 143.JPG

From Maayboli

हे कसले झाड आहे? रात्रीच्या अंधारात थोड्या उंचावर सुकलेली पिवळी पाने कंदील लटकले असावेत असे वाटत होते.

कदंब! कृष्ण यमुनेत खेळताना गोपींची वस्त्रे लपवून याच झाडावर बासरी वाजवीत बसे.
शिवाय आणखी एक उल्लेख.
पैलतटी न कां तृण मी झाले, तुडविता तरी कधी |
पैलतटी न कां कदंब फुललें, करिता माळा कधी ||
कशी काळनागिणी, सखे ग वैरिण झाली नदी!

व्हीटी२२०... त्याला चाफ्यासारखीच फुले येतात. आजकालच जास्त दिसायला लागलेय हे झाड.

मानुषी ताई मस्तच ग, एकदम तुझ जुनं घर डोळ्यापुढे आल..
हिरा, मानुषी ताई कीत्ती छान ओळी सुचतात तुम्हाला..:)
रुद्राक्षाची फुल खुप गोड..

इथे येउन खूप मस्त वाटते.
सध्या आमच्याकडे साळुंक्या ,घरटे बांधण्यासाठी फार इरीला पेटल्या आहेत.पण बिचार्‍यांना योग्य जागा मिळत नाही.उद्या चिमण्यांसाठी मागवलेला बर्डबॉक्स लावून घेईन.चिमण्यांसाठी खूप उत्सुक आहे.माझ्या घराच्या ३ खिडक्यात भाताच्या वाळक्या लोंब्या लावून ठेवल्या आहेत.मस्त साफ करतात.

अरे केवढ्या मस्त गप्पा चालल्यात इकडे! कापूराचं झाड मी बघितलंय ओरिसामध्ये. हा त्याचा फोटो:

From Coffee Plantation

मागच्या वर्षी आईच्या घराजवळचा कदंब तोडला म्हणून मी हळहळत होते - तो या वर्षी परत एकदा भरभरून फुललाय!
संस़्कृतमध्ये कदंबाला नीप असं नाव आहे. त्यावरून "नीव" आलं असेल का?

व्हीटी२२० च्या प्रकाशचित्रातली ती पानं अडोनियमची आहेत ना?

नमस्कार लोकहो,

झाड कोणते म्हणून प्रचि टाकला, पण मधल्या वेळात इथे यायला जमलेच नाही. ते झाड कदंबाचे नव्हतेच.
बहुतेक "कळम" च असावे.

माहितीसाठी धन्यवाद!

साधना, लिंक साठी आभार.. माझे बाबा हे गाण खुप छान म्हण्तात..:)
गौरी कदंबाची पाने दाखवल्या बद्द्ल आभार.. माझा पण भ्रम दुर झाला..
म्हणजे मी पाहिलेल झाड देखिल कळ्मच होते तर... (कदंबाचा लहान भाऊ असेल कदाचित)

वर्षु दी, तु मागे उल्लेख केला होता मनडोलीया ती हीच वेल का?
फोटो सई नी काढले आहेत, खुप स्पष्ट नाहीये, फुलं लाव्हेंडर कलरची होती आलमंडा सारखी पण आलमंडा नक्कीच
नव्हती.. वेल पण नाजुक होता...
MD.jpgMD1.jpgMD2.jpg

कवठीचाफा कित्येक वर्षांनी पाहिला. चिपळूणला आजीकडे सगळे चाफे होते. पिकल्या फणसाचा वास असणारा हिरवा चाफाही होता.

व्वा जागु... काय मस्त प्र.ची.
हे झाड कुंडीत लागेल का? नव्हे कुलर च्या टाकीत..
नर्सरी वाला हो म्हणाला.. पुण्याहुन मागवुन देणार आहे पुढच्या आठवड्यात..:)

कळम हा काही कदम आडनावांच्या लोकांचा कुलवृक्ष असतो. पण तो तसा दुर्मिळ असल्याने लोक कदंबाचीच फांदी शुभकार्यात वापरतात. सुदैवाने कदंब मुंबईतही भरपूर आहे. कदंबाचे झाड कसे भरपूर वाढलेलेच शोभून दिसते.

कळमाचे झाड मुंबईला राणीच्या बागेत पाणघोड्याच्या पिंजर्‍याजवळ आहे. भरभरून फुलते ते.

धन्यवाद दिनेश, सायली. सध्या तरी त्या झाडावर फुले दिसली नाहीत. ऑस्ट्रेलियन चाफा म्हणून गुगाळून बघितले पण काही विशेष सापडले नाही. Sad
बर्यापैकी सरळसोट उंच वाढलेले झाड होते. जास्त पसारा नव्हता. कुंडीत लावलेले. गौरीच्या म्हणण्याप्रमाणे अडोनियम शोधले तर अडेनीयम आले. त्याच्या बुन्ध्यामुळे वाटले असावे. पण मी जितके अडेनीयम बघितलेत ते अगदी जास्तीत जास्त ३-४ फुट उंच बघितलेत. हा जवळपास ७-८ फुट तरी होते...
पुढल्यावेळेस जरा जास्त निरीक्षण करेन (हे करेन की करेण की करीन की उपयोगच चुकीचा आहे??? )

मधल्या काळातली इथली नवी चित्रे, गाणी, गप्पा मस्त!! Happy

कळम म्हणजेच कळंब असेल तर माझ्या माहेरच्या गावाचे 'कळंबुशी' हे नाव त्यावरूनच पडले आहे, पूर्वी कळंबाची झाडे खूप होती तिथे. मागे हे लिहिलं होतं मी इथेच बहुतेक (कुठल्यातरी भागात).

फोटो सुंदर सगळेच. कवठी चाफा आणि गुलाब गोडच.

आदिजो खर नाव सांगीतल्या बद्द्ल धन्यवाद. नागपूरला पण हल्ली याची झाड खुप दिसतायत.. इथे लोक याला ऑस्ट्रेलीयन चाफा म्हणतात.. दिसायला खुप छान आहेत फुल पण सुवास अजिबात नाहीये..

कळंब आणि अडनाव अजिबातच कल्पना नव्हती..

Pages