निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस वाचत होते पण लिहायला नाही जमलं

सर्वच मस्त फोटो लिखाण आणि गप्पा ही !

मजा आली नवीन नवीन फोटो आणि मजकुर वाचून.

त्या पानकोंबड्या खरे तर कॅट वॉल्क करत आहेत शतपावली नाही Happy

पारंब्यावरुन आठवले. आज जेवायला जाताना एक झाड दिसले. ते झाड वडाचे नव्हते पण छान बारीक लांबलचक जमीपर्यंत टेकलेल्या पारंब्या होत्या. आणि एक दोन वेली मस्त त्या पारंब्याला गुंफत गुंफत वर चढत होत्या. मजा आली हे चित्र बघताना.

कृष्णकमळावरुन आठवले - काल माझे मित्र अरुणजी मला सांगत होते -

कृष्णावळ - अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही. कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात. कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

मजेशीर ना?!

कृष्णावळचा अर्थ वॉट्स अ‍ॅपवर फिरत होता तेव्हा वाचलेला आता परत वाचूनही छान वाटले.

पावसाच्या प्रतिक्षेत.

काल लोकसत्तात खडीवाले वैद्य यांच्या लेखात जोंधळा, ज्वारी आणि शाळूचा उल्लेख होता. जोंधळा, ज्वारी आणि शाळू यात काय फरक आहे? मी शोधलं, तर खरीप हंगामात घेतात तो जोंधळा तर रब्बी हंगामात घेतात तो शाळू असं कळलं. ज्वारी यापेक्शा वेगळी असते का? ज्वारीचे हे प्रकार वेगळे ओळखता येतात का?

जागू त्या वडाच्या कोवळ्या पारंब्यांपासून डोक्याला लावायचे तेल आई घरी तयार करायची केस लांब होण्यासाठी

आत्मधून - तो गार्लिक क्रीपर म्हणून मागील पानावर उल्लेख केलेला वेल आहे ना त्याच्या पानांना लसणीचा वास येतो का पहाणार का - जरा चुरगळून पाहिलेत एखादे पान तरी चालेल ... Happy धन्स ...

हो शशांक, अगदीच कडूढाण वास होता फुलांना. पानांनाही तस्साच पण थोडा कमी होता.
नंतर थोडावेळ नाकाने असहकार पुकारला Uhoh

Garlic creeperchya fulancha rang thoDa vegaLa asato. AaNi gichchhaachee ThebaNahee vegaLee asate.

पूर्वी निळवंती म्हणून एक वेल असायची. गडद निळ्या रंगांची फुलं यायची तिला. कुंपणावरच सोडलेली असे. कुसुमाग्रजांच्या एका कवितेतसुद्धा तिचा उल्लेख होता :
निळवंतीच्या फुलू लागल्या,कळ्या कुंपणावरी,
येऊनी रात्रीच्या प्रहरी,
परत जायचे विसरुनि गेल्या वनदेवी कोणी
झाला उषःकाल राणी.

हिरा, निळवंतीवरच्या ओळी सुंदरच.. पण जालावर निळवंती म्हणुन Cyanotis fasciculata हे फूल दिसत आहे. हे रानटी फूल आहे, कुंपणावर लावायचे फूल वाटत नाहिये. कुणी बघितली आहे का खरी निळवंती ?

बी,
नाही, यामध्ये दिसत नाहीय ती वेल. मला वाटते या लिंकचे शीर्षक निळवंती हे 'निळाई' या अर्थाने असावे. म्हणजे हिरवाई, तरुणाई तशी निळाई.

निळवंती शोधता शोधता मला निळावंती सापडली.. निळावंती म्हणजे पशु पक्षांची भाषा जाणण्याची कला! हि एक मिथक कथा आहे. मारुती चितमपल्लींनी यावर फार सुंदर, तरल लिखाण केलं आहे, निळावंती नावाच्याच पुस्तकात.

>> पूर्वी निळवंती म्हणून एक वेल असायची. >>
ही वेल गारवेल (मॉर्निंग ग्लोरी) असू शकेल. गारवेलीत निळ्या पासून जांभळ्या गुलाबीपर्यंंत कितीतरी छटा असतात, आणि गारवेलीची फुलं सकाळी फुलतात. हीराने दिलेल्या कवितेतही तसा उल्लेख आहे. हीरा, कविता छान आहे.

हिरा, ओळी मस्तच..

निळावंती म्हणजे पशु पक्षांची भाषा जाणण्याची कला! हि एक मिथक कथा आहे. मारुती चितमपल्लींनी यावर फार सुंदर, तरल लिखाण केलं आहे, निळावंती नावाच्याच पुस्तकात. >> आत्मधुन, वाचलयं मी हे पुस्तक.. संग्रही आहे माझ्या Happy

नवे फोटो, कविता, माहिती सगळेच छान!
जागू, मला फोटो बघतानाही भीती वाटली!
एक अंडे बहूधा फलीत झालेले नसावे. मी टाकून देण्यासाठी उचलले तर एकदम हलके होते. बदकाच्या पिल्लांना रस्ता ओलांडून जाणे हे कठीण काम होते. पाण्यात शिरल्यावर एकदम सुरक्षित!

Pages