निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या भागाची प्रस्तावना मानुषीच लिहिणार याची कल्पना आलीच होती..
काय असणार त्यात हे आत्ता कळल मात्र.. छान प्रस्तावना मानुषी..
वाट बघत होती भाग २६ ची.. दिसल्यावर छानच छान वाटलं .. अभिनंदन .
चला पटापट नवनविन आणि विविधरंगी प्रचि येऊ द्या आता Happy ..

सगळ्या नि.ग. करांचे अभिनंदन नविन धाग्याबद्दल. छान छान नविन माहीती येउद्या.

मानुषी प्रस्तावना व फोटो सुंदर.

व्वा मानुषीतै, छान मनोगत.. तो पहिला फोटो तर आमच्या गावचाच वाटतोय.. Happy
<<सगळ्या नि.ग. करांचे अभिनंदन नविन धाग्याबद्दल. छान छान नविन माहीती येउद्या.>> +१

नविन भाग कासवाच्या गतीने चालला तरी चाले पण भरलेल्या तलावाप्रमाणे माहितीपुर्ण बनुद्या. Happy

सुरेख मनोगत आहे, मानुषी ...... Happy

नविन भाग कासवाच्या गतीने चालला तरी चाले पण भरलेल्या तलावाप्रमाणे माहितीपुर्ण बनुद्या. >>>> क्या बात है जागू ... Happy

व्वा सुंदर प्रस्तावना मानुषी ताई...
२६ व्या भागाबद्द्ल सगळ्यांचे अभिनंदन...
सध्या आमच्याकडे पिवळी लीली अशी नटलेली आहे...
IMG_20150617_092007(2).jpg

अरे वा! सर्व फोटो मस्त आहेत.खेकड्याचा फोटो एकदम डेंजर.
मानुषी, मनोगत खूप छान आहे.

लगेच खेकडा ही आला नव्या भागाचं अभिनंदन करायला. >>> वर्षु, एक नंबर ग

सायली, पिवळी लिली काय क्यूट दिसतेय ग . मला तर डॅफोडिल्सच वाटली. वाचल तेव्हा झाला उलगडा.

जागू, कासवाने मस्त पो़ज दिलीय तुला.

नवीन भागाबद्दल हे माझ्याकडुन जागु साठी खास.
अर्ध्या भागात नांगरणी चालु आहे आणि अर्ध्या भागात पेरणी करुन झाली आहे.

From mayboli

आणि ही आहे आमची डोंगर उतारावरची पायर्‍या पायर्‍यांची शेती.

From mayboli

नवीन भागाबद्दल हे मझ्याकडुन जागु साठी खास.
अर्ध्या भागात नांगरणी चालु आहे आणि अर्ध्या भागात पेरणी करुन झाली आहे. साॅरी डबल पोस्ट.

From mayboli

आणि ही आहे आमची डोंगर उतारावरची पायर्‍या पायर्‍यांची शेती.

From mayboli

अभिनंदन.

वा मानुषीताई क्या बात है, खुपच सुंदर मनोगत.

सर्वच फोटो मस्त. कासव क्युट.

हेमाताई, मी गावाला गेले की तुमचं शेत बघायला जाईन. पायऱ्या पायऱ्यांची शेती मस्त आहे तुमची.

आमची शेती नाहीये. खूप वर्षापूर्वी थोडी होती आमच्या खालच्या मळ्यात, पण तिथे समुद्राचं खारं पाणी आलं म्हणून आता नाही होत. लहानपणी हे सगळं माहेरी बघितलंय.

मस्त शेती आहे ममो !!!
मला बरेच वेळा वाटते की नोकरी सोडून द्यावी आणि शेती करायला घ्यावी पण आजुन तरी शेती चे दर अवाक्यात बसत नाहीयेत

नव्या भागाबद्दल अभिनंदन!!
निगवरचे फोटो नि माहिती वाचायला मज्जा येते Happy

रेड्यांची नांगरणी... Happy आमच्या गावीही रेडेच लागतात शेतकामाला. इथल्या गुडगाभर चिखलात बैल चालत नाहीत. बैल फक्त मळणी आणि बैलगाडीसाठी वापरतात.

शेती मस्त दिसतेय. बरेच दिवसांनी इथे आले.

खुप दिवसांपासुन लिहायचे होते की यावर्षी कावळ्यांनी लवकर आणि भरपुर घरटी बांधली आहेत. पाऊस जास्त पडेल का? अर्थात याचे उत्तर पावसाळ्यानंतरच मिळेल म्हणा.

मधे अशी बातमी वाचली होती की बदलापूर भागात जी मोठी टपोरी, रसाळ जांभळं मिळतात त्यांची झाडे कमी होत चालली आहेत. नविन बिल्डर्स ही झाडे सर्रास तोडत आहेत. मला असे सुचवायचे होते की अजुनही बाजारात जांभळं मिळत आहेत. ती घेऊन त्यांच्या बिया रुजवुन रोपे तयार करुयात. मी जुन पहिल्या आठवड्यात एक बी पेरली होती तर ती रुजली आहे. अजुन काही बिया पेरुन रोपे तयार करणार आहे. तुम्हाला जमलं तर तुम्हीही करा. एक वर्षाने म्हणजे साधारण पुढच्या पावसात किंवा त्याच्या पुढच्या पावसात जमिनीत एखाद्या ठिकाणी लावु शकतो.

निसर्गमय झालेल्या सर्व सदस्यांचे २६व्या भागासाठी अभिनंदन!

अरे वा! सर्व फोटो मस्त आहेत.खेकड्याचा फोटो एकदम डेंजर.
मानुषी, मनोगत खूप छान आहे.

Hematai ahaha sheticha sugandh ala. Thanks.

Indra pakadun thev tyala. hahaha....

Sayali mala kadhi milel hi lily??????? mi chaukashi karate aataa nursary madhe pan mi ithe kadhi pahili nahi.

जागू, या लिलीच्या बिया माझ्याकडे आहेत. त्या बियांनी पण रोपे येतात. तुला हवी असेल तर मी देऊ शकते.

Pages