ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अनामिक भीती मनी दाटून गेली
तो दिवस मी विसरूच शकत नाही
एकमेकांकडे चोरून टाकलेले कटाक्ष
मोहक नेत्रविभ्रम
दु:खाचे कवडसे

ओ दु:खाचे कुठे कवडसे असतात? आशेचे वगैरे असतात. दु:खाचं मळभ वगैरे असू शकतं.

पाऊस कधी पडणार? नुसतंच मळभ येऊन जातंय Sad

संदेश कुलकर्णीला सांग!!!>> Happy गुड वन!

पाऊस कधी पडणार? नुसतंच मळभ येऊन जातंय अरेरे>> मग केश्वे तुझ्या मनावरही आठवणींचं मळभ दाटून आलं की नाही??? Proud Light 1

मग केश्वे तुझ्या मनावरही आठवणींचं मळभ दाटून आलं की नाही??? फिदीफिदी दिवा घ्या >>> हो. पाऊस म्हटला की आठवणींचं मळभ, हुरहुर वगैरे येतंच दाटून बिटून. पण मी त्यावर मनाच्या निग्रहाने मात करते आणि वास्तवाचे कवडसे पाडून दूर सारते. बघ पौ, मी पण त्याच भाषेत लिहिलं Proud

मनाच्या निग्रहाने मात करते आणि वास्तवाचे कवडसे पाडून दूर सारते.>> Lol मनाचा निग्रह आणि वास्तवाचे कवडसे यांनाही काही काळ बंदी घालायला हवी आता! Wink

फुटके नशीब
वास्तवाचे चटके
विशाल हृदय
पहाडासारख्या माणसाचं लोण्याहूनही मऊ असलेलं काळीज! ही तर हाईट आहे!!

तिचे बाहुपाश त्याच्या गळ्याभोवती पडतात तो लोण्यासारखा वितळला. त्याच्या डोळ्यांतील अंगाराची जागा अमृताच्या वर्षावाने घेतली Biggrin

मी तर एका कादंबरीत 'त्याच्या तलावारकट मिशा त्याच्या बुद्धीमत्तेची साक्ष देत होत्या' असे वाक्य वाचलेले, आईशप्पत!!!

Rofl महान आहे हे फारेंड

मंदार- भारी गोष्ट. खाली पडले ऑलमोस्ट ती वाचून.

माझ्याकडुन
फुल न फुलाची पाकळी (उगाच आपली नासधूस)
मनी काहुर
संसारवेलीवर फुल
मनावर मळभ (आख्खी ष्टोरी मळभ.. मळभ.. वैताग)
फुलासारखे अलगद उचलले/टिपले (मराठी नायिका कधीपासून येवढ्या वजनी लाईट ?)
जीवनसरोवरात किंवा सागरात (जीवन- आत्यंतिक चीड आणणारा शब्द)
अध्यात्मिक ओढ

टण्या तू जास्त शायनिंग करु नको हाँ काय.
माठावरचा कोळी बरा चालतो तुला. आँ ? त्यात 'जीवनाचे' सार दिसते काय ? Wink

रॉहूड- बरंय. या वयात तरी जिवणी कशाला म्हणतात ते तुम्हांस नीट गद्यात समजले. नायतर असे प्रश्न पन्नासेक वर्ष कुणाला म्हणून विचारायची सोय नव्हती. ती मायबोली ने केली. Wink

जिज्ञासा, तळहातावरचा फोड जपायचा असतो कारण तो फुटल्यावर चिघळून वाईट अवस्था होते. त्यावरून तो वाक्प्रचार आला असावा.

जीवन हा शब्दं अत्यंत चीड आणणारा आहे.
+१००

त्यापेक्षाही कानडीत त्याला साहित्यिक 'बदुकु' म्हणतात ते जास्तं चीड आणतं.
मला लगेच आयुष्याचे बदक पॅक पॅक करत फेंगाडं चाललंय असं डोळ्यासमोर दिसतं.
Happy

मलाही पुढील उपमा विशेषणे बाद व्हावीशी वाटतात.....
ज्येष्ठ, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते(?), समाजवादी, ह.भ.प., सावित्रीच्यालेकी, वगैरे अनेक ...

>>>> मी तर एका कादंबरीत 'त्याच्या तलावारकट मिशा त्याच्या बुद्धीमत्तेची साक्ष देत होत्या' असे वाक्य वाचलेले, आईशप्पत!!! <<<< कादम्बरी नसेल, रहस्यकथा असेल अर्नाळकर वा अशाच कुणा प्रभुतींची.
अन मी म्हणतो त्या वाक्यात चूक काये?
की अस म्हणायला पाहिजे होत? " त्याचा तुळतुळीत गोटा/ चकाकते टक्कल त्याच्या बुद्धिमत्तेची साक्ष देत होते...." Proud

लिंबू , तुम्ही जपानी सिरीयल/ कार्टून असं काही पहात असाल तर समजेल की एखादा माणूस ज्ञानी वैगेरे दाखवायचा असेल तर त्याला ट्क्कल दाखवितात.
Happy

>>>> पहाडासारख्या माणसाचं लोण्याहूनही मऊ असलेलं काळीज! ही तर हाईट आहे!! <<<<<
हाईट? भयन्कर आहे हे.....
खरोखरचे लोणी खाताना नेमके हे वाक्य आठवले तर मळमळायला लागते मला....
तसाच तो फणसही, म्हणे वरुन काटेरी अन आतून रसाळ.... वगैरे, एकदा बरका फणस कापायला बसा म्हणाव, मग चिकाने हात बरबटले की कळेल रसाळ की मधाळ की काय ते.... ...........

तसंच ते.. कोकणची माणसं साधीभोळी.. काळजात त्यांच्या भरली शहाळी.. ऐकलं की छाताडावर चिलखतासारखी दोन शहाळी लावलेल्या कोकणी माणसाचे व्यंगचित्र दिसते!

गावरान मेवा(?), गावरान भाजी, यातिल गावरानावर तर तत्काळ बन्दी आणली पाहिजे..........>>
अगदी अगदी, गाव आणि रान दोन्हीही गोष्टी इतिहास जमा झाल्या आहेत जवळ जवळ.

आगाऊ,

>> मी तर एका कादंबरीत 'त्याच्या तलावारकट मिशा त्याच्या बुद्धीमत्तेची साक्ष देत होत्या' असे वाक्य वाचलेले,

ते अॅगाथा ख्रिस्तीच्या हर्क्युल पॉयरोवर बेतलेलं पात्र दिसतंय! साली इथे पण कॉपी मारलीये! Lol

हा तो हर्क्युल पॉयरो :

1736915-68786_hercule_poirot[1].gif

आ.न.,
-गा.पै.

Pages