ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख प्रतिसाद सारेच बरेच Lol

फारेण्ड स्पेशल धागा Lol

मला तर आता धाग्यात काय भर टाकू हे ही सुचेनासे झालेय Proud

माझ्या कचकावून लाथ घालून मराठी शब्दकोषातून बाहेर घालवून देण्यालायकीच्या शब्दांच्या यादी मध्ये वेडाबाई एक नंबर वर>> Lol

पब्लिकच्या सुचना भारी आहेत. चक्क कथा लेखक्/लेखिकांनादेखील काही शब्दांचा/वाक्प्रचारांचा कंटाळा येतो, तिडीक जाते वगैरे पाहून मला अतिशयच आनंद झालाय. चला, आता नव्या प्रकारचं काहीतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुन मी माझे दिडदमडीचे २ शब्द संपवते.

अमुक/तमुक अगदी फाइव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाच्या तोंडात मारेल इतकं भारी होतं>> अजब लॉजिक आहे हे.
एका खाद्यपदार्थाला चांगलं म्हणताना दुसर्‍याला वाईट म्हणायची काय गरज? बरं हे लेखक /लेखिका जणु नेहमी फाइव्ह स्टार मध्येच जेवतात. Proud पहिले "हॉटेल" ही काही जेवायची जागा नव्हे, हे कोण सांगणार यांना?

बरं हे याच्या उलटं म्हटलेलं मात्र कधी वाचलं/ऐकलं नाही. उदा. " ताजमधलं डिनर अगदी वाडेश्वर/वैशालीच्या दोशाच्या तोंडात मारेल इतकं भारी होतं!" Proud

अजून एक - "फाइव्ह स्टार हॉटेलातलं जेवण म्हणजे अगदी अळणी/बेचव". मला टिपिकल मराठी मध्यमवर्गीय दांभिकतेचं प्रतिक वाटतं हे वाक्य. उगाच आपलं मध्यमवर्गीय्पणा कुरवाळत बसायचं.

>>च्यायला या जिवणी शब्दाचा अर्थ मला अजून कळालेला नाही .र्हा शब्द फक्त पुस्तकातच सापडतो. कोणाच्याही डे टु डे बोलण्यात हा शब्द ऐकलेला नाही. मी बरेच दिवस त्याचा अर्थ जीभ समजत असे पण रेफरन्स जुळत नाहीत. बहुधा हनुवटी असा अर्थ म्या काडलेला हय ? ब्याटरी मारावी प्लीजच...:

गचकल्यावर फायनली ज्यातून जीव जातो ती जिवणी. फुंकणीतून कशी फुंक जाते, तसंच!

.

गचकल्यावर फायनली ज्यातून जीव जातो ती जिवणी. फुंकणीतून कशी फुंक जाते, तसंच!>>>>> Lol जबरी लॉजिक आक्का!
ह्या लॉजिक नी मी तिथे ढुंकून पाहिले नाही ह्या वाक्याला आता नवीन अर्थ प्राप्त झाला म्हणायचा.

<<<<<<<<<<साजिरा | 27 June, 2014 - 05:44
सारे म्हातारे झाले आहात, इतकाच काय तो निष्कर्ष. Proud

षोडशवर्षीय होतात, अडनिड्या-हळव्या-कातर-अलवार वयाचे होतात तेव्हाच्या स्वतःलाच आठवा बघू.
खर्र खर्र सांगा- तिच्या किंवा त्याच्या जादूई आवाजाने काळजावर कधी नक्षी गोंदली गेली नाही?
>>>>>

अग्दी अग्दी. साजिरा ,खरंच सारे म्हातारे झाले आहेत. तुमच्या म्हनन्याला अग्दी अनुमोदन की मोदक का काय म्हनतात ते …
चुंबनाला माझा तरी जाहीर पाठींबा.
याउप्परही तो शब्द पसंत नसंल तर चुंबनाऐवजी ओष्ठ्मिलन वापराच्च…. कसलं नादमधुर वाटतंय. नुस्तं उच्चारतानासुद्धा कृतीचा आभास… Proud

तरीबी चालनार नसंल तर आस्मादिकांना, साती म्याडमनी सुचिवलेलं लव्हचिंगम किंवा बासकराचार्यांचं अधरपान बी चालंल…

पण ते मनात शंकेची पाल चुकचुकणे अजिबात नको.>> हे नको ते नको!!! हव तरी काय मग? ठीक आहे - मनात शंकेच्या डायनासोरने हंबरडा फोडला अस लिहू या Happy

maitreyee यांच्या वरच्या चित्रातले संवाद -
पोलिस - बाई बोर्ड वाचा. इथे चुंबनाला मनाई आहे
तरुणी(गालावर रक्तिमा पसरलेल्या अवस्थेत) - इश्श्य… चुंबन नाइ काई. इम्पोर्टेड kiss घेतोय तो माझा, नुकताच फ्रांस वरून शिकुन आला आहे तो. Wink
पोलिस - अच्छा असं आहे होय. इम्पोर्टेड आहे म्हणजे चांगलंच असणार. ठीकाय. चालु द्या.

ऊन ऊन भात
रस्त्या वरील दिव्याखाली अभ्यास
हलाखीची परिस्थिती ( वडलांची)
आईचे काबाड कष्ट
चिमुकल्या जीवाला जबाबदारीची जाणीव
तुटपुंजा पगार
माऊलीचे हृदय द्रवले
टाहो फोडला
कोंड्याचा मांडा

मै... Lol

वसंत ऋतू प्राप्त होताच कोकिळेला कंठ फुटावा तशीच संधी प्राप्त होताच मै च्या जादूई बोटातून चित्रकला पाझरु लागते.

मायबोलीच्या वाचकवर्गाचा वयोगट अधिकृतरित्या २५ते३५ असा दिसतो. तो ४५+ असा अँक्चुली आहे, असा संशय घ्यायला जागा आहे, हे मघाशी सांगायचे राहिले. Proud (तुम्हाला सांगायचेच म्हणले तर उदाहरणार् थ इतकेच. आपण सगळे वगैरे काही सांगत बसणार नाही)

साजीरा, ४५ नंतर उलट निवांत वेळ मिळतो म्हणे असले सगळे चोचले करायला. त्यामुळ तुमचा संशय चुकीचा आहे. Proud

मै Lol जबरी आहेस तु.

चुंबना बरोबर अजुन मराठी शब्द बॅन झाले पाहिजेत .. रोमान्स -सेक्स रोलिटेड जवळपास सगळेच मराठी शब्द फारच भंपक , यक्स !
मादक , सुबक ठेंगणी , डाळींबी ओठ , उभारी , उफाड्याची , लिंगपिसाट इ.शब्द बाद करा .
बायकांची वर्णनं त्यात सुबक ठेंगणी हा बांधाच बन्द करा , गालावरची बट , वेणीचा शेपटा , सैल वेणी , मानेवर अंबाडा या हेअरस्टाइल्स बाद करा !
मराठी लेखकांची ( आणि लेखिकांचीही) फॅशन , हेअरस्टाइल्स सगळी माहिती आउटडेटेड आहे .
लेखिकाही काही फार वेगळ्या नसतात कधीकधी ! 'पोनीटेल न बांधता ' मोकळे सोडलेले केस' असं वर्णन केलं म्हणजे यांच्या फॅशन ची हाइट झाली !
लेअर कट , पिक्सी कट , मश्रुम कट , सॉफ्ट कर्ल्स , हायलाइट्स वगैरे कॉमन शब्दही माहित तरी नसतात किंवा ' गृहस्थ' - महिलामंडळ कॅटॅगरीतल्या लेखकलेखिकांना त्यात इंटरेस्ट ही नसतो !

कथानायक जमिन्दार , पाटील ,बलुतेदार , सरपंच ( ही आडनावे या अर्थाने नव्हे ) यान्चा कितीही सद्गुणी , शिकलेला कर्तबगार मुलगा असला तरी त्याच्या घरी काम करणारी मुलगी सु.न्दर नसावी .
किंवा त्याच्या वाड्यातल्या म्हातार्या स्वयपाकीण बाई नाहीतर मुख्य सेविका आजारी पडल्यावर बदली म्हणून नेमकी त्यान्ची देखणी नात ( जी कर्म्सन्धयोगाने नेमकी कुठून तरी त्यांच्या घरी रहायला आलेली असते ) न येता त्या नातीची आइ , मावशी , आत्या , काकी ( वय वर्श ५० च्या पुढे) असावी.

मै Lol लै भारी!

अजून काही बंदीयोग्य वाक्यं -

पावसाने नुसता उच्छाद मांडला होता
तिने हलकेच मान वर करून पाहीलं

Pages