ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच निळा स्वेटर घालणारा<<<<
स्वेटर घालणारा राजकुमार? सतत स्वेटर घालत असेल तर तो नक्कीच उतारवयातला ढेरपोट्या ऋषी कपूर. यक!! (हायला, म्हणूनच दुनियादारी सिनेमात सतत स्वेटर घालून फिरणार्‍या स्वप्नील जोशीला जितेंद्र जोशी 'ऐ रिषी पकूर' म्हणत असतो.)

असो. पुन्हा अवांतर झाले.

विकु, कुठल्या काळातल्या कॉलेजात होता ?? Happy

आमच्या काळातल्या कॉलेजमध्ये स्वप्नांचे राजकुमार आणी राजकुमार्‍या आजूबाजूला एकाच बेंचवर बसलेले असायचे...

इथल्या प्रत्येक महिलेने कॉलेजात असताना (आठवा ते रंगिबेरंगी दिवस) Calculus / Physiology च्या पुस्तकात लपवून फडके वाचताना आपल्यालाही असाच निळा स्वेटर घालणारा, वक्तृत्व, टेनिस, आणी कवितालेखन यात पहिला नंबर पटकावणारा, फाईव स्टार हॉटेलात रुबाबात ऑर्डर देणारा, वहीतून 'चुकुन' मोरपीस देणारा, 'आज एक माणूस रागावलं आहे माझ्यावर' असे म्हणाणारा राजकुमार मिळावा अशी स्वप्ने पाहिली नव्हती? >>>>

अय्यो! Lol नशिब, मी अशी कैच्याकै स्वप्नाळू कधीच नव्हते. अभ्यासाच्या पुस्तकात दुसरं काही ठेवून वाचायचं कधी सुचलंच नाही. पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतसुद्धा खेळाच्या नादात परिक्षेचा अभ्यास कधी पुर्णच व्हायचा नाही त्यामुळे अस्लं करणं परवडणारंही नव्हतं. सिनेमातला एखाद दुसरा हिरो आवडायचा कधीतरी पण तेवढ्या त्या सिनेमापुरताच किंवा एखाद्या गाण्यापुरताच. त्याच्यावरुन स्वप्नाळूपणा वगैरे नाहीच. जुन्या सिनेमातला "तू कहॉं..ये बता..." म्हणणारा देव आनंद आवडायचा (अजूनही आवडतो) तितकाच 'कयामत से कयामत तक' मधला आमिर खानही आवडला होता Proud

वास्तव आयुष्यात नो स्वप्नाळूपणा. प्रेम, राग.....जे काय असेल ते रोखठोक आणि खरं....नो पकावगिरी Wink कादंबरी टाइप रुसवाफुगवा काढण्यात नो टाईम वेस्टिंग. आत्ता भांडण झालं तर पुढच्या क्षणाला जसं काही झालंच नाही असं रुटिन मनापासून चालू (जरा खालून दूध घेऊन ये, जरा चहा टाक, जरा इस्त्रीचे कपडे लावून टाक, चल जरा आज तलावपाळीवर चक्कर टाकून येऊया वगैरे....). जर कुठल्याही नात्यात एकाला दुसर्‍याची आर्जवं करायची वेळ वारंवार येत असेल तर त्या नात्यातला बॅलन्स कुठेतरी ढळत असल्याचं ते लक्षण असतं. मग आपोआप कागदावर न उतरलेली एक कादंबरी तयार होते.

त्यामुळे पुस्तकांमधली भाषा वास्तववादी असेल तरच मी पुस्तकाला चिकटू शकते. वर टण्याने लिहिल्याप्रमाणे असलं की मी पुढे वाचूच शकत नाही.

विकु, तुम्ही नक्की कधी कॉलेजात होतात? Wink

<< निळा स्वेटर घालणारा, वक्तृत्व, टेनिस, आणी कवितालेखन यात पहिला नंबर पटकावणारा, फाईव स्टार हॉटेलात रुबाबात ऑर्डर देणारा, वहीतून 'चुकुन' मोरपीस देणारा, 'आज एक माणूस रागावलं आहे माझ्यावर' असे म्हणाणारा राजकुमार मिळावा>> Rofl

जबरी लोकहो! मजा आली. बरेचसे प्रतिसाद मी सुरूवातीला दिलेल्या मुद्द्यांपेक्षाही धमाल आहेत Happy

यातील काही वक्तव्ये कालबाह्य झाली आहेत असे वरती वाचले - मला अजूनही असंख्य कथांमधे, कवितांमधे ती दिसली आहेत.

फा, मस्तच.

बाहुपाशात मिठीत नायिकेचं गुदमरणं... नजरचुकीने सुटलं असावं.

लेखिकेच्या कथेत नायिकेने भान हरपून स्वाहा होणं आणि नायकाला दोष देत शेवटी नरेंद्र मोदींचे आवेशपूर्ण भाषण वाचून दाखवल्यासारखे ताडताड बोलणे आणि नायकाने (का बोलतीय ही बया स्वतःपण चंमतग करून, म्हणून ) अवाक होऊन / स्तब्ध होऊन ऐकत राहणे याला देखील काही काळ बंदी असावी.

कॉलेजचे दिवस रंगीबेरंगी फुलपाखरासारखे उडून गेले... याच्यावर बंदी घातली तर अनर्थ होईल. वास्तवाची जोड देणारे लेखक उदयास आलेले असून या वाक्याअभावी निर्माण झालेली पोकळी ते " कॉलेजचे दिवस रंगीबेरंगी कंडोमच्या फुग्यांसारखे उडून गेले" अशा वास्तववादी उपमांनी भरून काढण्याची शक्यता आहे.

<<<ब्रह्मांड आठवले | 29 June, 2014 - 01:06
कॉलेजचे दिवस रंगीबेरंगी फुलपाखरासारखे उडून गेले... याच्यावर बंदी घातली तर अनर्थ होईल. वास्तवाची जोड देणारे लेखक उदयास आलेले असून या वाक्याअभावी निर्माण झालेली पोकळी ते " कॉलेजचे दिवस रंगीबेरंगी कंडोमच्या फुग्यांसारखे उडून गेले" अशा वास्तववादी उपमांनी भरून काढण्याची शक्यता आहे.
>>>.>

अरे बाप्रे… वरची उपमा वाचून मला तर अगदी ब्रह्मांड आठवले Wink

इथल्या प्रत्येक महिलेने कॉलेजात असताना (आठवा ते रंगिबेरंगी दिवस) Calculus / Physiology च्या पुस्तकात लपवून फडके वाचताना आपल्यालाही असाच निळा स्वेटर घालणारा, वक्तृत्व, टेनिस, आणी कवितालेखन यात पहिला नंबर पटकावणारा, फाईव स्टार हॉटेलात रुबाबात ऑर्डर देणारा, वहीतून 'चुकुन' मोरपीस देणारा, 'आज एक माणूस रागावलं आहे माझ्यावर' असे म्हणाणारा राजकुमार मिळावा अशी स्वप्ने पाहिली नव्हती? <<
विकु अशी स्वप्ने वगैरे बघणारी पिढी आता टिनेजरची आजी/ पणजी मोडमधे असेल...
आणि पुस्तकात लपवून वाचायचं काय तर फडके? यक्क...

हो ना!! Proud
आणि ती ऑर्डर त्या पुचाट हीरोने कशाला द्यायला हवीये? आपल्यालाच जास्त टेचात देता येईल की. Wink

पण काही म्हणा - एकाच सटक्यात वक्तृत्व, कवितालेखन आणि टेनिस हे महानच कर्तृत्व आहे हां!!

पण काही म्हणा - एकाच सटक्यात वक्तृत्व, कवितालेखन आणि टेनिस हे महानच कर्तृत्व आहे हां!!>>>>
ते खरं टेनिस(नच्या कविता वाचणे) असं असणार. आणि त्या सगळ्या बैठ्या/कमीत कमी हालचाल लागणार्‍या गोष्टींचा परिपाक म्हणजे सतत स्वेटर! (ऋषी कपूरसारखा!)

ंमी विकुन्शी सहमत Happy
भाषा बदलेल, व्याख्येचे शब्द बदलतते, पण भावना/ अर्थ तेच ते रहातील ना?
आजही, मृत्युच्या दाढेतुन सुटका झाल्याचा अनुभव आला तरी हातापायाला कम्पच येतो, म्हातारपण आले तरीही तो कम्पच अस्तो, अन तरुणपणात आवडीची/क्रश असलेल्या व्यक्तिबरोबर समोरासमोर नुस्ती नजरभेट जरी झाली तरी तो "रोमान्च" नावाचा कम्पच अस्तो....... अहो तुम्ही लोक हा शब्द रद्द्द करायला लावुन बन्दी घालाल, पण "रोमान्च/कम्पावर" कशी काय बन्दी घालणार?
अन शब्दाच माहिती नसल्यासारखे तो शम्मीकपुर आमच्याही काळी कैतरि याहू असे किन्चाळायचा तसे किन्चाळणे अपेक्षित आहे का?
तसे असेल तर मग सगळ्ञा नव लेखकान्च्या कथा अन कविता असल्या किन्काळ्या अन आरोळ्या नि चित्कारान्निच भरुन जातील........

पुस्तकात फडकं का ठेवतात? अन ते वाचतात कसं?>>
इब्लिसराव बहुतेक डोळे पुसायला ठेवत असावेत ते फडकं (रुमाल ह्या शब्दावर बंदी असावी) Wink
रच्याकने ऑन सिरियस मोड, हु इज दिस मिस्टर फडके, कोणत्या शतकात होते हे? (लोकहो घोर अज्ञानाबद्द्ल मोठ्या 'मणा'ने क्षमा करा)

limbutimbu,

मला वाटतं की कोणालाही शब्दावर बंदी अपेक्षित नसून शब्दाच्या विशिष्ट अर्थीच्या वापरावर बंदी अभिप्रेत आहे. Happy

बाकी धागा सुस्साट!

आ.न.,
-गा.पै.

वर्दातै, लिंबू त्याहून प्राचीन आहे... तुझ्या संशोधनात उपयोगी होईल इतका प्राचीन कदाचित.... आहेस कुठं? Proud

लिंबू Light 1

Pages