ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न ऐरणीवर आणणे पण सोडा कसे! सगळे प्रश्न आणि मुद्दे नेमके तिथेच कसे येतात?>>> ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिण्गी वाहू दे, मधला हा ऐरणीवर आहे का?

प्रश्न ऐरणीवर आणणे पण सोडा कसे!
<<<<< ऐरणीवर प्रश्न आला की हातोड्याचा टोलाच घातला पाहिजे. मग टोल्याच्या भीतीने हळूहळू यायचे थांबतील.

'ठरावीक (ठराविक नोहे! ध. कृ.) उपमा' वाचताच अटेंड केलेल्या लग्नांतले सकाळचे नाश्ते आठवले. ठरावीक उपमा नायतर इडल्या! हे बॅन (कसं रेबॅनशी र्‍हाइम होतंय कनी?) केलंच पाहिजे. प्याटीस का नाय ठेवत?

आता नीट विचार करून उपासाच्या दिवशी लग्न ठेवणारी विचारी जोडपी राहिलीत कुठे? असो. (या 'असो'लाही ब्यान करा.) लै अवांतर झाले.

धमाल चालू आहे इथे! स्ट्रेसबस्टर धागा.. Lol

इवली पाखरे, चिमणे जीव, कोंदटलेला श्वास, घायाळ नजर, जीवाचे पाडस, लाजणारी चंद्रकोर, अर्धस्फुट किंकाळी, आतुर मन, कळवळणारा जीव, नजरेचे इशारे, बेभान वारा, काळवंडणारा चेहरा, खाली घातलेली मान, थरथरणारे हात, गिळलेला आवंढा, मंद स्मित, काळी रात्र, वेदनांचे काहूर, विचारांचे कवडसे / आवर्त / वादळ / तरंग .... वगैरे वगैरे.

अर्धोन्मिलीत नेत्र (असलेली मेंगळट वाटत नाही का?),मादक सुगंध,मोहक हालचाल,पापण्याची उघडमीट, कमनीय बांधा, छोटेसेच पण नीटनेटके घर, आणि मुख्य म्हणजे "दिवस कसे गेले कळलंच नाही!" प्लीज, मेजर बंदी पाहिजे यावर.

"दिवस कसे गेले कळलंच नाही!">>
दुसर्‍या एका बाफवर "पाव भारी" वाचलं आणि नंतर हे वाचलं, कैच्या कैच अर्थ निघाला Uhoh

सारे म्हातारे झाले आहात, इतकाच काय तो निष्कर्ष. Proud

षोडशवर्षीय होतात, अडनिड्या-हळव्या-कातर-अलवार वयाचे होतात तेव्हाच्या स्वतःलाच आठवा बघू.
खर्र खर्र सांगा- तिच्या किंवा त्याच्या जादूई आवाजाने काळजावर कधी नक्षी गोंदली गेली नाही? उभार, वळणे, संभार, बळकट बाहू इत्यादींनी कधी घायाळ नाही झालात, हृदयं धडधडली नाहीत? विरहाग्नीत जळताना आणि नभांगण मेघांनी भरून काळंभोर झालेलं असताना ती आकाशीची दामिनी झेप घेऊन धरतीवर कडाडून कोसळली तेव्हा काळजात धस्स झालं नाही? दु:ख, दैन्य, दारिद्र्य, शोषण, दैवगती इ ची उदाहरणं बघताना तुमच्या काळजाला चरे-ओरखडे नाही कधी उठले? प्रेमाच्या माणसांनी मायेची पाखर घातली तेव्हा काळीज सूपभर नाही कधी झालं? मोरपिशी आठवणींतल्या त्या काळाजांना असे कसे कचाकचा चावत सुटलात? म्हातारे झालात रे, म्हातारे झालात! Proud

तुम्ही कितीही म्हातारे झालात तरी मराठी वाचकाची रसिकता अमर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ या पृथ्वीचं वायूत रूपांतर झालं किंवा सूर्याचा गोळा थंड होऊन निष्प्राण झाला तरी हे अमर रसिक मार्ट तसंच वगैरे राहणार हेही लक्षात ठेवा!

गोबर्‍या गालाची गुणी मुले,
काळी आई
पाषाण हृदय
अंधक्कार मय भवितव्य ,उज्वल भविष्य, जाज्वल्ल्य अभिमान,
आजारपण , ब्ल्ड क्यन्सर्/किडनी फेल ह्यापेक्षा वेगळ कैतरी सुचवा (साती, इब्लीस) इतर बर्‍याच रोगानी मरतात लोक.
तसच सोज्वळ ह्या शब्दाला ब्यान करा.
तसच कथेत प्रसंगानुरुप येणारे बॅग्राउंड स्कोअर्स पण आता बदला (पंकज उदासच्या गझला ऐकत , सनईचे मंद सुर, मारवा),

म्हातारे म्हणे! Lol अरे त्याच त्याच शब्दांच्या सुंभाने बांधलेल्या या साहित्याचा पीळ जात नाही म्हणून काळीज जळतंय. नवसाहित्याची आस लागलेले चातक इथे बसलेले असताना ही अशुभाची चाहुल का लागतीये? भिंतीव पाल चुकचुकली आणि कोकण किनारपट्टीवर टिटवी कर्कश किंकाळली. खिडकीतला कावळा कावकावून शिव्या देत होता. पाहुणे तडमडण्याची शंका येताच तिने पिशवी भरायला घेतली. कबुतर बेरकीपणे तिच्यावर नजर ठेवून होते सासूची कमी भरून काढत. Proud

अरे हो हे रहिलच!
'पडत्या फळाची आज्ञा!!" हे फक्त बॅनच नका करु तर लिखाणात वापरणार्‍याला चाबकाने फोडा!

Happy
_//\\_

जबरी फारेंड!!!!

आयटी कंपनीतल्या लवस्टोरी बाद.. (हिंदीमध्ये मुघले आजम आणि मराठीमध्ये बनवाबनवीतली अशोक सराफ/अश्विनी भावेची लवस्टोरी ह्या त्रिकालाबाधित मापदंड आहेत, त्यापुढे आणि त्यामागे काही लिहायचे नाही)

कादंबरीत/सिनेमात भाईलोक वापरतात तसली भाषा मराठी कलाकारांना वायरायला बंदी. सगळे एकदम पुचाट वाटतात.

'श्री दिलीप कुळकर्णी ईथेच राहतात का', 'तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा मागतो'
असले 'सकाळी साताला ऊठल्यावर लोण्यापासून तूप बनवतांनाचा घरभर भरून राहिलेला वास यावा' असले साजूक प्रश्न कुठल्याही पात्राच्य तोंडी येऊ नयेत.

नेमाडे प्रेमींना ही किळस दशकांपूर्वीच बाधली आहे. तुम्हालाही ऊतारा हवा असल्यास नेमाडे साहित्याचा वसा घ्या!

Lol

काळीज जळतंय. >>> काळीज जळणं पण बॅन हवं. Wink जळतय म्हणजे काय? आग लागल्ये की जळजळतय? आग असेल तर पाणी ओता जळजळत असेल तर जेलूसील घ्या. Proud

Lol दंगा करुन र्हायलय पबलिक!
आता वाचताना अगदी प्रकर्षानी जाणवलं की खरच काही शब्द किती डोक्यात जातात. माझ्या कचकावून लाथ घालून मराठी शब्दकोषातून बाहेर घालवून देण्यालायकीच्या शब्दांच्या यादी मध्ये वेडाबाई एक नंबर वर!

तरी यात मुक्तपीठीय वाक्प्रचार आलेले नाहीत.

१. तो/ती नि़ळ्या निळ्या डोळ्यांतून / डोळे मिचकावत हसला/हसली
२. मनात आलं, आया/आज्या कुठल्याही देशातल्या असोत, अशाच!
३. माझं भारतीय मन स्वस्थ बसू देईना.
४. शेवटी आपला गावच बरा

(टु बी कन्टिन्यूड... :P)

Pages