ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> कुणीच येणार नव्हतं तरी तिने/त्याने वाट बघितलेली नको. (त्यांना मायबोलीवर आयडी काढून द्या. कुणी येणारं असेल तरी विसर पडेल)

Lol

नायकाने सराईतपणे फाइव्ह स्टार हाटेलात वावरलेलं, आर्डरी दिलेल्या, गाडी चालवलेली नको. त्याचा तो डोंबलाचा सराईतपणा पाहून इम्प्रेस झालेली नायिका नको. कोण कशाची कशी कुठं ऑर्डर देतंय बघून प्रेमात पडतात होय?

नायचाचं/नायिकेचं आवडतं झाड/फुल/त्याचा कचरा काहीच नक्को.

'तुला आठवतं का रे?' 'तुला अजून लक्षात आहे?' 'विसरलास तू !/?' 'विस्मरणात जातं ना त्याची आठवण येते' हे असे डायलॉग नकोत.

विनोदि लेखांमधे 'मी' ऐवजी 'आम्ही' वापरून लिहिण्याला बंदी घालावी. >>> बँग ऑन! आणि "अस्मादिक" वर पण!

नातिचरामीचा खरानायक (महानायकासारखे) हा इस्त्रीवालाच आहे ह्यावर मी 'शब्दफुलांचे सडे' ह्या नावाने ब्लॉग काढून लिहिणार आहे.

>>नायकाने सराईतपणे फाइव्ह स्टार हाटेलात वावरलेलं, आर्डरी दिलेल्या, गाडी चालवलेली नको.>> तो सुशिंचा मंदार पटवर्धन.

विनोदि लेखांमधे 'मी' ऐवजी 'आम्ही' वापरून लिहिण्याला बंदी घालावी. >>> बँग ऑन! आणि "अस्मादिक" वर पण! >>>> +१०००

>> नातिचरामीचा खरानायक (महानायकासारखे) हा इस्त्रीवालाच आहे ह्यावर मी 'शब्दफुलांचे सडे' ह्या नावाने ब्लॉग काढून लिहिणार आहे.

Lol

सुशिंचा मंदार >>>
मग 'स्वतःशीच हसणे' पण बंद करावं लागेल. Proud

गालातल्या गालात हसणे पण नको. गालावरची गोड खळी अजिबातच नको.

Lol

सगळे प्रतिसादही Lol

पण ".. हे देवाघरचे देणे" ही उपमा नसून रुपक अलंकार आहे ना? (?) टेक्निकॅलिटीज् वरून वाद घालण्याला बंदी नाहीये ना अजून? Wink

फा सिरीयली भन्नाट अाहे हे. पावसाळ्यात अाकाश जसं काळ्या मेघांनी भरुन जावं,
तसं मन अाठवणींनी अापलं उपमांनी भरुन गेलंय.

अायुष्य म्हणजे उन-पावसाचा खेळ नको
मनाचे पाखरु नको
मनात घर करणे नको
भूतकाळ डोळ्यासमोरुन अगदी झरकन जायला(च) हवा असे नाही
परिचयाची परिणती प्रेमात होणे नको
संसारवेलीवर फुले उमलली नको
जसे वाफाळता चहा/कॅाफी नको तसेच गरम गरम घोट घशाखाली उतरुन अालेली तरतरी नको
अाता उरल्या अाहेत फक्त अाठवणी नको तशाच
त्या अाठवणी मोरपिसासारख्या जपणे नको
प्रीतीच्या/भावनेच्या हिंदोळ्यावर झुलणे नको
नात्याचा गुंता नको
ते अनामिक समाधान नको
मनावर मणमणांचे ओझं नको
अचानक पाऊस अाल्यामुळे होणारी तिची धांदल नको
कुणाला कशाचं सार/ नवा अर्थ गवसणं नको
तिची तिला किंवा त्याची त्याला किंवा कोणाची तरी कोणाला नव्यानी ओळख पटली नको
......

फारएण्डाच्या मनातल्या भूमिकेचा चातक आसुसून मायबोलीवर आला आणि अनुडॉनच्या काळजातल्या उपमांचा मेघ बरसला! Proud

काहीतरी गडगडलं...

अचानक वीज कडाडल्यावर घाबरून तिने त्याला बिलगायला नको Happy
अंगावर हलकीच शिरशिरी उमटायला नको
वातावरण धुंद व्हायला नको

'ती खुदकन् / खट्याळपणे हसली' हे अगदी भंगार वाटलं तरी 'ती कवळी सांडेपर्यंत हसली' किती जेन्न्युइन वाटतं! पुढे मग याच जेन्न्युइन्नेसच्या चालीवर 'तिच्या हास्यातून मोती सांडले..'ला एक्स्ट्रापोलेट करता येईल!

सावळाच पण तरतरित चेहरा .पण तिचे काळेभोर हरणासारखे डोळे. कुणालाही प्रेमात पाडण्यासारखे.
गाडी सुरु झाली आणि त्याचे मन धावू लागले.
गाल आरक्त झाले
तिच्या आर्स्पानी मनावर पावसाचे थेंब उमटले.
मनाचा मोर थुई थुई नाचू लागला
ढगांनी गर्दी केली
लालीमा चढला
तलम अदृश्य पडदा
पुर्वेला मेघांनी गर्दी केली
पक्षी मधुर घंटेसारखा नाद करु लागले.
पाश्चिमात्यांची पिझ्झा संस्कृती, नंगा नाच

Pages