ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

>> ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे
Lol

मग काय हिरवा टीशर्ट घालून सजली होती म्हणायचं?! Proud

वाचकांची अ‍ॅडिशन :
१. कथानायकाच्या किंवा नायिकेच्या किंवा कुठल्याही पात्राच्या हातात चहा/कॉफीचा 'वाफाळता' कप देण्यावर बंदी घालण्यात यावी.
२. गझलेत 'मी' विरुद्ध 'ते' अशी मॅच खेळायला 'ते' म्हणजे कोण हे नावानिशी सांगितल्याशिवाय मनाई करण्यात यावी.

हल्ली परिक्षेत पहिला नंबर येणारच हे आधीपासूनच माहीत असलेली आई मुलगा/गी घरी यायच्या आधीच गाजर का हलवा वगैरे करून ठेवते का?

Lol
शब्दखुणांमधे शेती??? Rofl

आमची अ‍ॅडीशनः

तो अन ती दोघंच घरात असताना 'कडकड धड्डाम' असा आवाज करुन वीज पडली अन त्या क्षणी घरातील वीज गेली तर 'त्या' गोष्टीखेरीज इतरही गोष्टी घडू शकतात, जसे की:
- अंधारात ठेचकाळणे
- मेणबत्ती/रिचार्जेबल इमर्जन्सी लाईट लावणे
- "या घरात दिवसा मेणबत्ती सापडायची मारामार, अन आता येवढ्या अंधारात कुठली आलीय सापडायला!!!" असा तिरकस शेरा मारणे

Lol मला तर मराठीत बहुसंख्य रोमान्स ची वर्णने वाचवत नाहीत. त्यात पण ते "बाहुपाश" " चुंबन" वगैरे शब्द फार आउटडेटेड वाटतात. त्यावर पण बंदी घाला Happy उगीच ५०शीचे वयस्कर लोक लाडात येताना डोळ्यासमोर येतात.

हात्तिच्या
मला वाट्लं की फारेण्डाला मी नेहेमी देतो ती उपमा फारच ठराविक अन ठोकळेबाज झालिये की काय!
त्यावर अक्खा लेख पाडण्यासारखं काय असेल बुवा म्हणत धागा उघडला वाचायला Wink

ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे
<<
आमचा माळी.
'लॉन कापली का नाही?' या प्रश्नाचं उत्तर.
'सर अजून तर हिरवा शालू तयार होतो आहे. मग नंतर त्याची एम्ब्राय्ड्री करू'

मंदार, Lol त्याच नोटवर-
तसंच पावसाळ्याच्या दिवसांत प्रियकर- प्रेयसी बाहेर फिरायला जात असतील त. कपड्यांचा एक जास्तीच जोड जवळ ठेवावा. कारण गाडी वगैरे बिघडून डाक बंगल्यात रात्र काढायची झाल्यास गोधडी, शेकोटीचं सामान मिळू शकतं पण त्याने पुढे फार कॉम्ल्पिकेशन्सही निर्माण होतात.

डाक बंगल्यात रात्र >>

ही भानगडही समजली नाहीये. डाकबंगला कुठे असतो? ऐन वेळेला कोणीही तिथे रात्र काढू शकतो का तो फक्त पोस्टील कर्मचार्‍यांसाठी असतो?

कोणी डाक बंगल्यात रात्र काढलीय का? (नुसती तरी?) Wink

३. "'आलेच हं' म्हणून ती आत पळाली" हे वाक्य हिंदी सिनेमातल्या "ड्राइवर, गाडी रोको'इतकंच कॉमन झालं असावं बहुधा. तेव्हा ते टाळण्यात यावं.

मला उपमा म्हटले की त्या बांडगुळ की निवडुंग मधलं गाणं आठवतं - तू हिरवी कच्ची तू पिवळी मिरची....
त्या गाण्यातल्या सगळ्या भाज्या, फळे, उपमे, कांदापोहे यांच्यावर बंदी घाला नी त्याला सांगा नीट काय ते तोंडान बोल....
Happy

डाक बंगला म्हणजे तोच जिथे हिरो, हिरॉईनला आयत्या वेळी रात्र काढायला मिळते. एकदम सुनसान, शहरा/गावाबहेर असतो. एरवी ओसाड असला तरी त्यात एक मिणमिणता दिवा, शेकोटीचं सामान, कपडे वाळत घालायला दोरी आणि एक जाड रजई असतेच. Proud

थुईथुई मनमोर, अनाभिषिक्त सम्राज्ञी, पहिला पाऊस,
आधी भांडण मग प्रेम. अमुकतमुक मनात रेंगाळणे,
मातृहृदय, बाबा काटेरी फणस, व्यसनी पण मनाचा राजा असा मित्रं/नातेवाईक, मनस्वी कलाकार

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानभर विनोदी चर्हाट लिहून शेवटच्या दोनचार वाक्यात टडोपा टची लिहून समारोप करणे.

'निसर्गाने आपलं काम चोख बजावलं' या वाक्यावरही बंदी घालण्यात यावी. निसर्गाला दुसरी काही कामंच नसतात असं वाटायला लागतं हे वाचून.

Biggrin

'तिने एकीकडे भाजी फोडणीला टाकून पोळ्या करायला घेतल्या' या वाक्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी. इतकं बोअरिंग वाक्य आहे ना हे!

माझे (दुसर्‍या सृष्टितले) चार आणे:

१. ऑपरेशन रूमच्या बाहेरचे लाल हिरवे पिवळे लाईट दाखवायला बंदी. (च्यामारी केवळ पिच्चरपायी बसवले होते पहिल्या ओटीवर)

२. ग्लोव्ह्ज, गाऊन इ. घालून बाहेर येणारा डॉक्टर, वरतून 'हमने पूरी कोशिश की' इतकं म्हणून निघून गेला की सगळं समजणारे पेशंटचे नातेवाईक

३. मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ.. म्हणायला बंदी. Wink (सोबत खान्दान की इज्जत, व ये शादी हर्गिज नहि हो सक्ती)

मामी, त्यात कारुण्य असतं हे तुला माहीत नाही का? Proud

इब्लिस आणि इतर, हे सिनेमाबद्दल नाही चाललेलं. फारएन्डाने लिहिलं असलं तरीही! Proud

हो की स्वाती. फा ने गद्य, पद्य लिहिलंय तरीही मी फा= सिनेमा असाच संदर्भ लावून वरचं लिहिलं. (हा ही ठोकळेबाजपणाच झाला)

ते एक 'ती झक्कपैकी लाजली' बोकाळत चाललंय हल्ली. Proud
(मला झक्क म्हटलं झक्की आठवतात आणि ते आणखीनच फनी वाटतं. :P)

एम्टीच्या रोमॅन्टिकपणाच्या पोस्टवरून आठवलं - गालावर टिचकी मारणं हा प्रकार मी मराठी कादंबर्‍यांतच वाचला आहे. मला प्रयत्न करकरूनही हा प्रकार कोणी रोमॅन्टिकपणे कसा करत असेल हे इम्याजिन करता येत नाही. Proud

छ्या ब्वा… ह्ये समदं पाळायचं म्हनलं तर ९९% लेखक लेखिकांच्या पोटावर पाय येनार… Wink
जाहिर णिशेध!!

Pages