ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आउबर्न केस >> तेही मराठी नायिकेचे??!! तिच्या आउसाहेब रागाने बर्न होतील अशी कुठलीही हेयरस्टाईल मराठी नायिका करीत नाही. तिला स्टेप कट किंवा बॉब कट फार तर माहित असतो आणि तो भुरभुरतो.

लोक्स अजून टिपीकल गोडगोङ मध्यमवर्गिय लेखनाच्या पुढे गेलेले दिसत नाहीत.
Wink

अजून ग्रामिण साहित्यात दारूडा बाप नको, बेरकी पाटील नको, मळ्यातला वाडा नको, पायातले पैंजण नकॉ,
भरदार छाती (यूनिसेक्स शब्द) नको.
आईच्या वर्णनात चंदनासारखे झिजणे, समईसारखे तेवणे नको.

मच्छिमारीची बोट चालेल. त्यात परत मत्स्यगंधा वगैरे रेफरन्सेस नकोत. पात्रांना स्वतःच्या कहाण्या स्वतः बनवू दे. Happy

आउसाहेब बर्न >> Lol

तारुण्याने मुसमुसलेली तरुणी/काया
अल्लड काहीही
पुष्ट नितंब
भरघोस मिश्या
पाणीदार डोळे
रेखीव नाक
नाजूक जिवणी
चुणचूणीत मुले
होतकरु विद्यार्थी

पापण्यांचे शिंपले
थरथरणार्‍या ओठांवर अलगद ओठे ठेवले
केळीच्या गाभ्यासारख्या पोटर्‍या
क्षितिजावरचे केशराचे सडे
कपाळावर आलेली बटांची महिरप
अथांग डोहासारखे डोळे

गझलेत काय काय नको याची लिस्ट करूया का? >>> ह्यापेक्षा 'आमच्या आयुष्यात गझल नको' हा ठरावदेखील वरील ठरावाबरोबर पारित केला जावा, अशी विनंती मी फारएण्ड ह्यांना करतो.

भरघोस मिश्या> Lol

पर्सनल यॉट असलेला/ली नायक/नायिका चालेल. >>मच्छिमारीची बोट चालेल का?
>> च्यालेल की. म्हणजे कसं. श्रीमन्त नायिका असेल तर कार गिरामीन असेल तर बैलगाडी तसे याट च्या ऐवजी ऐपतीप्रमाणे मच्छीमारीच्या बोटीस परवानगी देण्यात येत आहे... Happy

भन्नाट.... Rofl सगळेजण नुस्ते सुटलेत

फा - जुग जुग जियो

टण्या - ऐतिहासिक चूक दाखवायचा मोह आवरत नाहीय्ये रे. तू स्वामी म्हणून जे नमुना वाक्य दिलं आहेस त्यात 'राऊ' आलेत. थोरले माधवराव हवेत नाही का? तिथे राऊ दिसले असते तर समस्त पात्रवृंद बेशुद्ध नसता का पडला? Wink

च्यायला या जिवणी शब्दाचा अर्थ मला अजून कळालेला नाही .र्हा शब्द फक्त पुस्तकातच सापडतो. कोणाच्याही डे टु डे बोलण्यात हा शब्द ऐकलेला नाही. मी बरेच दिवस त्याचा अर्थ जीभ समजत असे पण रेफरन्स जुळत नाहीत. बहुधा हनुवटी असा अर्थ म्या काडलेला हय ? ब्याटरी मारावी प्लीजच...::फिदी:

वरदा, पहिल्या पानावरची नोट वाचली नाही का, कादंबरी काल्पनिक असून रंजकतेसाठी साहित्यिक स्वातंत्र्य घेण्यात आले आहे.
Happy

पावसातल्या गरमा गरम भज्यांच कौतुक लेखात करण्यावर पण बंदी असावी.
च्यामारी दुसरं काही चांगलं लागतच नाही का?

रॉबिनहूड, जिवणी म्हणजे दोन्ही ओठ मिळून जो काही अवयव बनतो त्याची लांबी

रुंद जिवणी = मोठ्या लांबीचे ओठ
अरुंद जिवणी = इवल्याश्या लांबीचे ओठ

श्याआआ... विनोदी बाफवरही हे असलं काही एक्स्प्लेन करायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं Lol

ह्यावर मी 'शब्दफुलांचे सडे' ह्या नावाने ब्लॉग काढून लिहिणार आहे

<<<
मी तुसड़े शब्दफूल आशा आय डी ने येउन प्रतिसाद लिहिन.

प्रीटी झींटा एकदम नवीन होती तेव्हा, वर्गामध्ये एका मुलीने "तिची जिवणी किती लहान आहे" अशी कमेंट केली होती, तेव्हा जिवणी या अवयवाचा सोयिस्कर अर्थ लावून बरेच जण कन्फ्युज झाले होते!!!!

गझलेत काय काय नको याची लिस्ट करूया का?>>
फक्त प्रोफेसर नकोत. मग बास. Proud

हुडा जिवणी म्हणले की प्रिया बापट किंवा ती सोफी आठव. मग कळेल जिवणी काय असते. Proud

Pages