ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच प्रतिसाद Rofl

साती तुमच्याकडे आज (नेहमीप्रमाणे) काहीतरी पेसल बनवलंय असं दिसतंय ;).मराठीचा जास्तीत जास्त अभ्यास केलेला आय्डी असा किताब द्यायला हवा तुला;) Proud

नाही , आज फक्तं साजूक तूप आणि वरणभात.
Wink

खरं तर मटारची उसळ आणि केळ्याचं शिकरण करायचं होतं पण हे लोक मग परत ओरडणार हे बॅन करा हे बॅन करा.
Happy

>>>ह्या लॉजिक नी मी तिथे ढुंकून पाहिले नाही ह्या वाक्याला आता नवीन अर्थ प्राप्त झाला म्हणायचा.
बुवा, Lol
ह्याला समानार्थी एखाद्या गोष्टी कडे पाठ फिरवणे असं म्हणता येईल का? Proud

धन्स वगैरे डोक्यात जातं जाम Angry

विचार करून डोक्याचा भुगा, विचाराचा भुंगा, निराशेची खोल खोल गर्ता, अंधःकारमय जीवन, नैराश्याची खाई -- सगळं बंद करा.....

पाठमोरी "ती", अचानक सामोरा येणारा तो पण बंद करा. तिचा कमनीय बांधा, त्याचा रांगडा देह पण प्लीजच बंद करा......

मी तिला म्हणालो, लाईन देतेस का? पण तिने मात्र ........................................ मला हसून नकार दिला Proud

देवाss आयुष्यात भेटलेल्या एकाही मुलीने मला आजवर हसून तरी नकार दिला नाहीये. Angry

निसर्गाने आपलं काम चोख बजावलं' या वाक्यावरही बंदी घालण्यात यावी. निसर्गाला दुसरी काही कामंच नसतात असं वाटायला लागतं हे वाचून. >> Rofl

>>>>> सारे म्हातारे झाले आहात, इतकाच काय तो निष्कर्ष. <<<<<<
वविला याला कोपच्यात घ्यारे सगळ्यान्नी मिळून...... Lol

मला हा धागा म्हणजे कम्युनिस्टान्चा भाषासन्स्कृतीवरील छुपा हल्ला वाटतोय......! Proud

या लिंबूरामाच्या शब्दकोषातून कम्युनिस्ट अन अंनिस हे दोन शब्द कायमचे बाद करावे, असे मी या माध्यमातून सांगू इच्छितो!

सगळे प्रतिसाद वाचले नाहीत त्यामुळे डुप्लिकसी असेल तर क्षमस्व

कवितेत/गझलेत सरण, चिता आणणार्‍यास खोटा खोटा का होईना चितेचा फील देण्यात यावा, दोन चार चटके योग्य जागी बसेपर्यंत.

"अरे, हाय" वापरणार्‍यास हाय खाईपर्यंत फटके. अतिवापराने हे शब्द च, वै, तु, हि सारखे भरीच्या कॅटेगरीत जायच्या मार्गावर आहेत

सायंकाळी कातरता दाटून येते असे म्हणणार्‍याचे डोके भरलेल्या पिंपात बुडवावे. ग्रेसांचे ठीक आहे पण बाकीना कसली कातरता तिच्यामारी? बहुसंख्याना संध्याकाळी कातर वाटते ते आज ड्राय डे वगैरे नसेल ना ह्या भीतीने, क्षितिजापलीकडे काय चालले आहे या हुरहुरीने नव्हे.

'अनामिक भीती" वाटण्याला बंदी असावी. साधी भीती आणि हीत काय फरक आहे कळलेले नाही.

फा एकाच वेळी छु.सं_ष्ट आणि छु.क__श्ट. सुद्धा आहेत. मानलं बुवा.

>>
घि आणि म्युनि हे शब्द सांडले की काय? ताकाला जाऊन गाडगे कशाले लपिवता भरतभौ ?

आता या बीबीने विनोद, विडम्बन, आणि उपहासाचे अंगद्सोडून हास्यास्पदते चे रूप धारण केले आहे....

साजिर्‍याची पोस्ट पटली.
मुळात आता हे सगळे लिहिते कोण आणि ही वरील वाक्ये कोणत्या माध्यमात छापली जातात अथवा प्रकाशित होतात? २५ वर्षांपूर्वीचे हे सगळे संदर्भ आहेत हे सगळे !
मुळात मराठी ललित लेखन मृतप्राय होत चालले आहे पुस्तके भरमसाठ प्रसिद्ध होत आहेत ती युटिलिटीबाबत अथवा प्रचारी. हे असले बाळबोध लेखन कोणीच करत नाही . ते आपल्याच मरणाने मेले आहे त्यामुळे यातला विनोद आता पिळून झाला आहे राहिला आहे फक्त चोथा !

तो ढग -- ही काही उपमा नाही. वास्तविक दर्शन आहे, हे स्पष्ट करण्यासाठी, 'ढगच आहे तो', असे म्हणता येईल.

xxx हा खरा तर मराठी शब्द नाहीच, पण सर्रास वापरला जायचा आधीच्या कादंबरयांमध्ये, आता तरी बंद करूयात -in retrospect. अर्थ कळाला आहे आता- खुणा खुणा खुणा असे वाचता येत नाही त्यामुळे

हुडा Happy आपापल्या मरणाने तशा सार्‍याच गोष्टी मरतातच यथावकाश. जीवन-कलावाल्यांशिवाय आणि त्यांच्या साहित्याशिवाय आपल्या साहित्याचं कसं होईल अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली होती, त्यालाही आता किती दशके लोटली. आता त्या जीवनकला प्रकार कुणाला माहिती असेल नि त्या साहित्याला किती लोक वाचत असतील कुणास ठाऊक. वास्तववादवाल्यांसारखेही किती वादवालेही आले नि जुने झाले, क्वचित हास्यास्पदही झाले. कालबाह्य होण्याचे ठपकेही बसले. ते काहीही असलं, तरी लोकांना वाचायची सवय नि आवड लावण्याचं काम या सार्‍यांनी आलटून पालटून केलं- हे त्यातलं मोठं फलित. यात बरा खप असलेली आणि घिसंपिटं बाळबोध साच्यातलं ठोकळेबाज साहित्य छापणारी मराठी मासिकं आणि दिवाळी अंकही आलेच.

या जगात चिरायू असलेली एकच गोष्ट. ती म्हणजे 'अमर सायकल मार्ट'. Proud

असो. हुडाच्या पोस्टवरून लिहिलं इतकंच. बाकी इथं चालू असलेल्या मजेत खोडा घालायचा हेतू नाही.. Happy

रॉहू , प्रिंट मिडियात कदाचित या गोष्टी कमी झाल्या असतील पण तुम्ही मराठी सोशल मिडीया वाचा, मराठी संस्थळे, ब्लॉग्ज आणि फेसबुक - तोच तोच उपमा सगळीकडे खायला लागेल आणि ठोकळा चघळावा लागेल.
Happy

अजूनही खास स्त्रियांसाठी असलेली मासिके वाचा (वाचू शकलात तर अर्थात) त्यात असा गोग्गोड उपमा भरभरून मिळेल किंवा दिवाळी अंकातही.

हूड आणी साजिर्‍याला अनुमोदन. आशा बगे, भारत सासणे, सानिया, राजन खान ई ई नवे लेखक यातले काहीही मटेरियल वापरत नसतील.

लहान मुलींच्या भातुकलीला नावे ठेवताना एकेकाळी आपणही अशीच भातुकली खेळत होतो हे विसरू नये. इथल्या प्रत्येक महिलेने कॉलेजात असताना (आठवा ते रंगिबेरंगी दिवस) Calculus / Physiology च्या पुस्तकात लपवून फडके वाचताना आपल्यालाही असाच निळा स्वेटर घालणारा, वक्तृत्व, टेनिस, आणी कवितालेखन यात पहिला नंबर पटकावणारा, फाईव स्टार हॉटेलात रुबाबात ऑर्डर देणारा, वहीतून 'चुकुन' मोरपीस देणारा, 'आज एक माणूस रागावलं आहे माझ्यावर' असे म्हणाणारा राजकुमार मिळावा अशी स्वप्ने पाहिली नव्हती? इथल्या प्रत्येक गृहस्थाने सावळ्या पण तरतरीत, लांब केसाची एकच वेणी घालाणार्‍या, ओठाचा चंबू करणार्‍या, चहाचा कप हातात देताना बोटांचा ओझरता स्पर्श झाल्यावर गालावरचा रक्तिमा लपवीत आत पळणार्‍या नायिकेची स्वप्ने पाहिली नव्हती?

बाकी चालुद्या (आता यालाही बंदी घालाल ) Happy

इयु! विकु, अशी स्वप्न फक्त त्या कथा-कादंबर्‍यांमधल्या नायिकाच बघत असाव्यात. हातातल्या पुस्तकात लक्ष न घालता स्वप्नरंजन केलेच असेल तर ते स्वतः यश मिळवण्याचे. कोण कुठला अंजान मनुष्य, त्याला पैला नंबर मिळो नाही तर ढिस्साड.

Pages