ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसंही जुन्या काळी आजची मिडीया असती तर शाहिस्तेखानाची बोटं कापून आल्यावर महाराजांना 'कसं वाटतंय तुम्हाला'? >>> एकवेळ महाराजांना विचारलं तरी ठीक आहे. आजची मिडिया शाहिस्तेखानाला विचारेल की 'बोटं कापल्यावर कसं वाटतंय तुम्हाला'

खळबळजनक, बीडमध्ये ‘या’ कारणामुळे संतप्त माकडांच्या टोळीकडून तब्बल २५० कुत्र्यांची हत्या, वाचा सविस्तर…

लोकसत्तामधील बातमी. माकडांनी कुत्र्यांचा खून केला आणि क्लिकबेट माणसाला

हो, पण ती बातमी भीतीदायक आहे! मीपण काल वाचली. मग आधी वाचलेली अजून एक बातमी आठवली.
https://www.loksatta.com/trending/viral-monkey-travels-22-km-to-take-rev...

अर्थात हे इथे अवांतर आहे.

>> तसंही जुन्या काळी आजची मिडीया असती तर शाहिस्तेखानाची बोटं कापून आल्यावर महाराजांना 'कसं वाटतंय तुम्हाला'? >>> एकवेळ महाराजांना विचारलं तरी ठीक आहे. आजची मिडिया शाहिस्तेखानाला विचारेल की 'बोटं कापल्यावर कसं वाटतंय तुम्हाला'

Lol
आणि आधी वार्तांकन केले असते, "आज या ठिकाणी आपण पाहत आहोत की महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे त्याठिकाणी कापलेली आहेत"

याठिकाणी त्याठिकाणी या शब्दांवर सुद्धा याठिकाणी बंदी आणायला हवी काही वर्षे.

अगदी!! ते या ठिकाणी इतक्या डोक्यात जातं ना.आता एखाद्याला क्लेरोव्हॉयन्स (की अस्ट्रल प्रोजेक्शन?)ची सिद्धी प्राप्त असल्याव्यतिरिक्त सर्व गोष्टी 'या ठिकाणी' च होणार ना?की आता 'या ठिकाणी, मग अजून 10 सेकंदाने शेजारच्या राज्यात असं होईल? Happy

Lol
टीव्हीवर कोणी या ठिकाणी म्हटलं की त्या ठिकाणी कुठेतरी अजित पवार असतीलच असे वाटते.

टीव्हीवर कोणी या ठिकाणी म्हटलं की त्या ठिकाणी कुठेतरी अजित पवार असतीलच असे वाटते. >>>> मी शोधायलाच लागले होते Lol Lol

कॉटनकिंगच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ मला काल Whatsapp वर आला >>>
ठोकळेबाजपणा असू दे, पण मला स्मिता जयकरचा सलवार कमीज आवडला. उन्हाळ्यासाठी सुदींग वाटतो आहे. कॉटन किंगवाले वूमन ऍपेरलमध्ये पण आहेत का? आणि तो श्रीच आहे ना? त्याचा शर्ट मळखाऊ आहे. आपले मुख्य उत्पादन बोरिंग दाखवायची ही कसली स्ट्रॅटेजी? 'जो बीबी से करे प्यार, कॉटन किंग से कैसे करे इन्कार' असे तरी म्हणा मग.

ते वाफाळत्या कॉफीचे मग आले आहेत वर लिस्टीत पण, पण पण ...

गरमागरम वाफाळत्या चहाचा मनमुराद आस्वाद वगैरे नीड टू बी रिप्लेसड मिलॉर्ड !

अरे सध्या चहाला एवढे वजनदार शब्द तर मग बासुंदी वाढली तर काय लिहिणार तुम्ही Proud

स्ट्रेस बस्टर धागा आहे हा, मूड खराब असला की पुन्हा पुन्हा वाचतो.

Pages