ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमड नासि फडकेंच्या पुस्तकात ठायी ठायी गाल आरक्त होतात आणि नायिका अंगठ्याने जमीनी उकरतात. खड्डा कसा पडत नाही कुणास ठाउक.

एवढे सगळे नियम पाळून प्रेमकथा लिहीली तर कशी होईलः

हापिसातली ४ ची वेळ.
तो: चल जरा चहा पिउ.
ती: चल.
दिवस संपत आल्यामुळे कपडे पार चुरगाळले होते. थकल्यामुळे मुरगाळलेले पाय ओढावेत तसे ते दोघे किचनमधे गेले.
चहा कोमट होता, अर्धा पिउन होइपर्यंत गारढोण झाला.
किचन इनडोअर असल्यामुळे धुंद वगैरे हवा नसून कोंदट वातावरण बनलेले होते.
बाहेर वीज कडाडली, ती न घाबरता तिकडे तुच्छतेने पहात राहीली.
"आय लव्ह यू" तो तेवढ्यात खेकसला.
"ठीक आहे", ती म्हणाली.

दोघे डेस्क वर परतले!

रमड टाईल्सचे लक्षातच आले नाही. Proud वात्सल्याने थबथलेल्या घरच्या गाईने हंबरून धरतीवर टाकलेल्या शेणाने सारवलेली जमीन असेल असेच वाटले. Proud
पदराशी चाळा, मान वेळावणे,धुंद हासणे, वेणीचा शेपटा हे सगळे त्या जोडीला आहेच. Proud
मंदार Lol

१००

मंदार, Rofl

शेवटची ओळ वाढवतोय : दोघे डेस्क वर परतले आणि घोडा फळफळावा तसा पाऊस कोसळू लागला!

आ.न.,
-गा.पै.

>> वात्सल्याने थबथलेल्या घरच्या गाईने हंबरून धरतीवर टाकलेल्या शेणाने

Rofl

वात्सल्याने थबथबून शेण??? Lol

मंदारची लव्हस्टोरी .. Lol

आख्खी स्वामी कादंब्री बाद करावी लागेल.

मुदपाकखान्यात सुवासिक पक्वान्नांना आपल्या सुगरणीच्या हाताने कोंदण चढवणार्‍या निरागस रमाच्या कोवळ्या चेहर्‍यावरील शुभ्र अभ्रांच्याप्रमाणे पसरलेले विभ्रम पाहताना राऊंच्या पोटातील रखरखीत दुष्काळात सापडलेल्या मुक्या जनावरांप्रमाणे उसळलेला भुकेचा आगडोंब निरभ्र आकाशातून ढग निघून जावेत तसा विरुन गेला.

टण्या Proud हे verbatim आहे का?

आणि एक क्षण भूक नक्की कसली ते कळलंच नाही मला .. Wink Lol

मंदारची स्टोरी पुढे.....
दोघे डेस्कवर परतले.
पाउस आला. बॉसने बोलावले. बॉस ओरडला.(परंतु मागे ढगांचा गडगडाट नव्हता) पाऊस असून सुद्धा तिचे अश्रु वाहिले नाहीत. सिगारेटही शिलगावली नाही. धुराची वलयं त्यामुळ निघाली नाही.((कंपनी हेल्थ फिटनेस आहे. स्मोकिंग न केल्यांना सवलत देते.) कागदावर तिने काहीतरी खरडून बोळे टाकायचे ठरविले. परंतु कंपनी सेव्ह ग्रीन असल्याने कागद नव्हतेच. सो तिने त्याला फोन केला. राग काढला. तोही ओरडला. मग आय लव्ह यु परत खेकसला. दोघे बसने निघाले.चीखल नव्हता. पाउस थांबला. घरी आले. घरात काळ कुत्रं वाट पहात होत. ते भुंकल.

<<<नंदिनी | 26 June, 2014 - 13:44
फारेण्डा, हाहा

चुंबन हा शब्दच इतका किळसवाणा आहे, यक्क!!!! त्या शब्दांवर बॅन आणायलाच हवाय.
>>>>

हायला… चुंबन शब्द किळसवाणा???…
आता चुंबनालापण पर्यायी शब्द शोधावा लागणार.
"ओष्ठमिलन" कसा वाटतो? Proud

चांगला उपक्रम फारेण्ड. सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या नाहीयेत पण मला झटक्यात आठवली ती उपमा म्हणजे "सावली"

तो सावलीसारखा त्याच्या मागे हे वाचून पकलो बुवा.म्हंजे सावलीला काही ऑपशन आहे का? ती म्हणू शकते का आज तुला नाही तुझ्या भावाला कंपनी देते. तिला आपलं ज्या माणसाची तिच्याच राज्यात राहायची शिक्षा. ती भोगायला आणखी एक सावलीसारखा...आवरा त्याला Wink
आणि दुपारच्या उन्हासाठीची सावली वगैरे असा अर्थ असेल तर त्यांना सहा महिने हिवाळा असलेल्या प्रदेशात राहायला पाठवा. नाही सावलीला दुपार आठवली तर Proud

सावली वरून आठवलं त्या प्रेमाची गोष्ट पिक्चरमधलं जे गाणं आहे

ओल्या सांजवेळी उन्हें सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा

ह्यातल्या "उन्हें सावलीस बिलगावी" ह्या पार्ट ला काही सायंटिफिक लॉजिक आहे का त्याचा उपमा म्हणून वापर करायला?

सीमाची स्टोरी पुढे ...

तिने सांगितलं 'चहा वगैरे काही करणार नाही. मला बोअर झालंय'. ती टीव्ही लावून पहात बसली. मग त्याने पाणचट्ट चहा केला. चहातून वाफा वगैरे निघाल्या नाहीत. मगातून न देता त्याने कपबशीतून चहा दिला. मग दोघांनी मॅच बघता बघता तो फुर्र्क फुर्रक आवाज करत प्यायला. ढग गडगडले नाहीत. पाणीकपात असल्याने पाऊसही पडला नाही. चहा पिऊन झाल्यावर ती खेकसली 'आय लव्ह यू'. तो म्हणाला 'ते चिखलाचे ठसे उठलेत सोफ्यापर्यंत ते पूस आधी'. काळं कुत्रं नुसतंच स्वतःची शेपटी पकडत गोल गोल फिरत राहीलं.

<<<<<<
rmd | 26 June, 2014 - 18:28 नवीन
सीमाची स्टोरी पुढे ...

तिने सांगितलं 'चहा वगैरे काही करणार नाही. मला बोअर झालंय'. ती टीव्ही लावून पहात बसली. मग त्याने पाणचट्ट चहा केला. चहातून वाफा वगैरे निघाल्या नाहीत. मगातून न देता त्याने कपबशीतून चहा दिला. मग दोघांनी मॅच बघता बघता तो फुर्र्क फुर्रक आवाज करत प्यायला. ढग गडगडले नाहीत. पाणीकपात असल्याने पाऊसही पडला नाही.
>>>>>>

चीटिंग. पाणीकपात कुठे? कपात तर चहा होता असं तुम्हीच्च म्हटलंय

थोडक्यात कथा अशी लिहायची:
..... ...... ........ ....... ...
कारण बाकी सगळे शब्द क्लिशे!

त्यापेक्षा वाचणेच बंद करा ना!!

>>सबब त्याने झिरझिरीत पेक्षा तिने झिरझिरीत ठीक असत
>>>>>घोडा फळफळावा तसा पाऊस कोसळू लागला

Lol

शब्दखुणांमध्ये 'बास्करबर्का' द्यायचं राहिलं असावं !

..

Lol भारीच आहे!!!

तो म्हणाला 'ते चिखलाचे ठसे उठलेत सोफ्यापर्यंत ते पूस आधी'. काळं कुत्रं नुसतंच स्वतःची शेपटी पकडत गोल गोल फिरत राहीलं.<<<< आता पुढे...

तिने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला... त्याने मान फिरवली....तिचे डोळे आता रागाने लालबुंद झाले होते.. तो म्हणला "हा रुसवा सोड आणि दोन ग्लास काढ..." तिने कपाटातून दोन ग्लास काढले.. त्याने ठेवणीतली मद्याची बाटली काढली... चिअर्स!!! दारूचा जळजळीत घोट घशाखाली उतरताच तिचे आणि त्याचे मन फुलपाखरासारखे हलके झाले... त्याने तिच्याकडे तिरप्या नजरेने बघितले... तिचे गुलाबकळीसारखे गुलाबी ओठ विलग झाले.. दूर कुठेतरी ढोल वाजत होते... काळे कुत्रे आवाजाने कोकलायला लागले... तो खेकसला (कुत्र्यावर)... तुझी हौस म्हणून हे अभद्र कुत्र आणले... तिने परत एक जळका कटाक्ष टाकला... त्याची नजर आता मेली होती... ती एकटीच पलंगावर पडुन मुसमुसत रडायला लागली...दूर सनईचे सूर तिचे काळीज चिरत गेले...उसवलेले हृदय... फसलेले प्रेम... हाय रे दैवा...

हुश्श....

Pages