पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक अपडेट. सिव्हील कोर्ट स्टेशनचे नाव आता डिस्ट्रिक्ट कोर्ट / जिल्हा न्यायालय झाले आहे. काही गाड्यांना अजून जुनेच नाव वापरत आहेत आणि उद्घोषणा पण सिव्हील कोर्ट ह्या नावेच होते.

स्वारगेट स्टेशन रेडी. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भुयारी मार्ग २ आठवड्यांत चालू होणार.

स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोमार्गाला अंतिम मान्यता. लवकरच काम चालू होणार.

वाह
स्वारगेट चालू झाल्यावर मस्त होईल.
फेऱ्या पण वाढवल्या आहेत मेट्रो ने ,फ्रिक्वेन्सी 8.5 मिनिट ची 8 मिनिट करून.
असंच हिंजवडी पण लवकर चालू होउदे.

खडकवासला हडपसर व्हाया स्वारगेट, हडपसर कात्रज, हडपसर वाघोली , आंबेगाव हिंजवडी या मेट्रो सुरू झाल्या तरच जास्तीत जास्त पुणेकरांची सोय होऊ शकेल.

नक्कीच.
अर्थात या सर्व ट्रॅक्स ना अनेक हजार कोटी चं फंडिंग लागत असणार.
मोशी चिखली ते हिंजवडी चालू झाली तर अनेकांची सोय होईल.आता आयटी मध्ये 4-5 अनुभव वाले मोशीत, पुनावळे मध्ये, चिखलीत, गहूनजे मध्ये घरे घेत आहेत.

कात्रज To निगडी व्हाया वारजे, चांदणी चौक, बाणेर, वाकड हा रुट व्हायला हवा; खुप लोकांची सोय होईल!!
सेम फॉर कात्रज/कोथरुड to मगरपट्टा Happy

पुण्यात पटापट करताहेत कामं!
मुंबईत मराठी डेली सोप पेक्षा धीमा कारभार आहे. तीन वेळा देशात जाऊन आलो पण तीन हात नाक्याच्या पुढे दोन तीन स्टेशनं झाली असतील. तरी शिंद्यांच्या घरा जवळुन मेट्रो जाणारे. आधी मुमंपद जाईल मग मेट्रो!

आज येताना बसने घरी आलो. आधी पुण्यात बसचा बोर्‍या वाजलेला होता.
अधून मधून प्रयत्न केला होता. पण बसने जाण्यायेणात चार ते पाच तास जायचे. नंतर खूप वर्षे बसने जायचा प्रसंग आला नाही.
आज मात्र बघितलं कि आता आमच्या भागात सुद्धा छान बस सर्विस आहे. पूर्वी तीन तीन बस लागायच्या आता दोन बस मधे काम झाले.
दोन्ही वेळा बसायला जागा मिळाली. नाहीतर नंतरच्या स्टॉपला बस खचाखच भरली. त्या गर्दीत जमले नसते.
ज्या रस्त्यावर मेट्रो , फ्लायओव्हरची कामे, ट्रॅफिक जाम आणि बेशिस्तीमुळे कार सुद्धा नको वाटते , त्या रस्त्याने इतक्या उंचावर बसून, स्वतः ताण न घेता गंमत बघत जाणे म्हणजे सुखाचा परमावधी वाटला.

बसची संख्या वाढली तर उभे राहणार्‍यांचा त्रास कमी होईल. हा त्रास नसेल तर खूप जण वाहन आणायचं बंद करतील.
पुण्यात मेट्रोचं जाळं पसरायला अजून तीस वर्षे सहज लागतील. पुढच्या पिढीला कदाचित होईल उपयोग.

बघता बघता मेट्रो प्रवासाची दोन वर्षे पूर्ण झाली. माझ्याकडून इतक्या सलगपणे आणि न चुकता प्रवास मेट्रोआधी कुठल्याच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा झाला नव्हता. ह्या दोन वर्षात अगदी बोटावर मोजण्या इतपत स्वतःच्या गाडीने ऑफिसला गेलो असेन. दर सात मिनिटांनी मेट्रो, ह्यामुळे कधीच वाट बघत थांबावे लागत नाही. खूप गर्दी असेल अशा वेळी एक दोन मेट्रो सोडून देण्याची चंगळ करता येऊ शकते. मेट्रोची स्वच्छता अगदी वाखाणण्याजोगी आहे. पावसाळ्यात तर अगदीच सुसह्य प्रवास. महत्त्वाच्या स्टेशन वर खाण्याचे स्टॉल पण सुरू झालेत. पालखी, इतर कुठल्या जयंती, पुण्यतिथी, मिरवणुका ह्यामुळे रस्त्यावर अडकायला होत नाही. अजून एक म्हणजे फिडर बस सेवा पण सुरू झाली आहे बरेच ठिकाणी. पण ह्या बसेस अगदी रिकाम्या धावतात, म्हणजे बरेचदा त्यात एकही प्रवासी नसतो. Happy
काही उणिवा म्हणजे सध्याची गर्दी पाहता ( खास करून जून २०२५ नंतरची जेव्हा पी एम टी ने जवळ जवळ दुप्पट भाडेवाढ केली) दर पाच मिनिटांनी मेट्रो हवी. गर्दीच्या वेळी आत शिरायला सुद्धा जागा नसते. बरेच वेळा लिफ्ट ७/८ व्यक्ती नंतर ओव्हरलोडचे साईन दाखवते, जेव्हा की क्षमता १००० किलो किंवा १३ प्रवासी आहे. रिचार्ज करताना कार्ड पेमेंट ९०% वेळा बंद असते. गर्दीच्या वेळी एकच स्कॅनिंग बेल्ट चालू असतो. दिव्यांग लोकांना वेळेत व्हील चेअर उपलब्ध करून देत नाहीत. परवा एक बाई त्यांच्या दहा बारा वर्षाच्या दिव्यांग मुलाला कडेवर घेऊन फिरत होत्या कारण त्यांना ती सेवा मिळाली नाही. मागे पण एकदा हीच तक्रार केली होती एकाने. एकदा चक्क शिवाजीनगर स्टेशनला मेट्रो थांबली आणि दरवाजे उघडले नाहीत तर प्रवासी न उतरवता आणि न घेता मेट्रो पुढल्या स्टेशनला गेली. स्टेशनची नावे सारखी बदलत असतात. मंगळवार पेठ स्टेशन चे नाव rto ऑफिस पुणे असे केले आता उद्घोषणा होताना त्यात पुढे ' स्टेशन ' हे लागते त्यामुळे rto ऑफिस पुणे स्टेशन म्हणजेच पुणे स्टेशन का ? असा लोकांचा गोंधळ उडू लागला. मग ह्या स्टेशन करता मॅन्युअल घोषणा होऊ लागली. मग ते बंद करून परत मंगळवार पेठ अशी ओरिजनल टेप बरेचदा लावतात. पुन्हा पार्किंग ही समस्या आहेच, त्यासाठी अजून काहीच उपाय योजना दिसत नाही.
आपल्याकडे सिव्हिक सेन्स अगदीच कमी आहे हे तर पावलो पावली जाणवते. लिफ्ट बाहेर रांग लागली असेल तर सरळ मागून येऊन दारापाशी जाऊन उभे राहतात ( ह्यात स्कार्फ धारी महिला अग्रेसर) . मेट्रो येताना पण तेच रांग न पाळता डायरेक्ट मधेच घुसतात. चिप्स, बिस्कीट पुड्यांची आवरणे, मेट्रो तिकीट तशीच खाली टाकून देतात. खाऊचे पदार्थ बंदी असताना लिफ्ट मध्ये, किंवा मेट्रो मध्ये खात बसतात.मेट्रो दारात उभे राहतात. तिकीट स्कॅन करताना स्कॅनिंग मशीन जवळ गेल्यावर मोबाईल चालू करून तिकीट शोधत बसतात.
असे बरेच पेट पिव्हज आहेत. तर ते असो, ते कमी व्हायला पुढची पन्नास वर्षे सुद्धा लागतील. एकूण मेट्रो प्रवास सुखकरच आहे. पुणे मेट्रोची प्रगती होत राहो आणि नवीन मार्ग त्यात जोडले जावोत आणि जास्तीत जास्त लोकांची सोय होवो हीच सदिच्छा आणि पुणे मेट्रोला खूप शुभेच्छा.

जानेवारी महिन्यात पहिल्यांदा पुणे मेट्रोने प्रवास केला. पिंपरी चिंचवड पासून पुण्या पर्यंत. सकाळी दहा / साडे दहाच्या सुमारास गेलेलो. कॉलेजवयीन मंडळी भरपूर होती. पण चढता / उतरताना धक्का बुक्की वगैरे काही झालं नाही.

मेट्रोमधले अनाउंसमेंट मजेशीर आहेत - बोपोडी, दापोडी असे न म्हणता बो पोडी , दा पोडी असे पहिल्या अक्षरावर एम्फसिस देऊन ( Córdoba चा स्पॅनिश उच्चार असतो तसे) म्हणतात. चिल्लर पार्टीला कोरड्य चटण्यांना पोडी म्हणून सवय आहे . त्यांनी 'व्हॉट पोडी इस धिस ' आणि ' व्हाय इज मेट्रो स्टॉप नेम्ड आफ्टर पोडी' विचारलेच Happy

लंपन +१,
मी किंवा फॅमिली रिचार्ज करत नाही , प्रत्येक वेळी ब्रिज PCMC चढताना किंवा स्टेशन जवळ अ‍ॅपमध्ये UPI ने तिकिट काढतो आणि कधीच त्रास झाला नाही. कालच फॅमिलीने प्रवास केला.
लिफ्ट चा वापर हा फक्त दिंव्याग / सिनियर / गरोदर बायकासाठी राखिव पाहिजे. कचरा टाकणे आणि मेट्रो मध्ये खाणे/पिणे , दरवाज्या समोर उभे राहाणे ह्या बद्दल लोक कधी सुधारणार हे माहित नाही.

लंपन - धन्यवाद डिटेल अपडेटबद्दल. एखाद्या नवीन सोयीचे असे वर्णन फार क्वचित वाचायला मिळते. आणि नवीन उपक्रम यशस्वी झालेत, असेही. ज्यांचा रोजचा प्रवास हा मेट्रोच्याच वाटेवर आहे त्यांचा प्रवास खूप सुसह्य झाला आहे असे काहीजणांकडून ऐकले आहे.

इतक्या मोठ्या संख्येने लोकांना वापरायला लिफ्ट कमीच पडेल. इतर ठिकाणी सरकते जिने असतात. तसे आपल्याकडे फार केलेले नाहीत का? मी एकदा वापरून पाहिली आहे पुणे मेट्रो पण सरकता जिना होता का ते लक्षात नाही. बंगलोरलाही नव्हता बहुतेक. सरकत्या जिन्यांमुळे "फूट ट्रॅफिक" वाहत राहते. लिफ्टकरता थांबावे लागते.

फा >> सरकते जिने आहेत पण सगळीकडे नाहीत बहुतेक.

लंपन>> फिडर बस सुरू झाल्यात ते चांगले आहे पण जर त्या रिकाम्या धावत असतील तर कुठे तरी disconnect वाटतो आहे.

सगळी कडे सरकते जिने नाहीत. PCMC ला बाहेर आल्यावर सरकते जिने नाहीत फक्त लिफ्ट आहे.

मंडई किंवा सिव्हिल कोर्ट ला स्टेशन खुप खाली असल्याने ३ -४ वेळा सरकते जिने घ्यावे लागतात त्यामुळे पण लोक लिफ्ट वापरतात.

फारेंड सरकते जिने आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट इंटरचेंज स्टेशनला पण ते तीन मजले आहेत. त्यामुळे लिफ्ट वापरणे सोयीचे पडते. पीसीएमसीला सरकते जिने नाहीत.
धनी फिडर बस फ्लॉप जाणार असे सध्या तरी वाटत आहे. फिडर बस वापरावा तेवढा अवेअरनेस आणि वेळ दोन्ही नाही. ती बस सगळी कडे फिरून स्टेशन ला जाते.. कामगार वर्गाला सकाळी सकाळी पूर्ण गाव दर्शन करून स्टेशनला पोचणे व्यवहार्य नाही.
पिंची निगडी मेट्रो काम सुरू आहे सध्या जोरात. खरे तर ज्यांनी आधी ह्या मार्गाला नकार दिला त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे.
आज सकाळ ला बातमी आहे की हिंजवडी मध्ये डबल डेकर सुरू होणार आहे.

समजले. पण गर्दीच्या वेळेस एकाच वेळेस किमान १०० लोक वरखाली करत असतील. इतक्या लोकांकरता सरकते जिने हाच घाउक उपाय असावा. लिफ्ट लौकर जात असली तरी तेथे थांबायला लागलेला वेळ धरून तितकाच वेळ लागत असेल. कदाचित जास्तच.

लंडनमधे सरकते जिनेच प्रामुख्याने वापरले जातात. आणि तेथे अंडरग्राउंडला तुफान गर्दी असते. अटलांटा सारख्या विमानतळांवरच्या टर्मिनल्स मधून इकडे तिकडे जाणारे लोकही असेच जिने वापरतात. लिफ्ट केवळ जे लोक सरकत्या जिन्यांवरून जाऊ शकत नाहीत असेच लोक वापरतात.

लंडनमधे झुंडीच्या झुंडी विविध दारांमधून स्टेशनमधे शिरणे आणि सरकत्या जिन्यांकडे जाताना ती गर्दी आपोआप "सिंगल फाइल" सारखी एका रांगेत बदलणे, व त्यातही जिन्याच्या एका बाजूला उभे राहून दुसरी बाजू त्यातूनही घाई असणार्‍यांना पळत चढा-उतरायला मोकळी ठेवणे हे तेथील शिस्तीचे फार मस्त उदाहरण अनेकदा पाहिले आहे.

त्यातही जिन्याच्या एका बाजूला उभे राहून दुसरी बाजू त्यातूनही घाई असणार्‍यांना पळत चढा-उतरायला मोकळी ठेवणे हे तेथील शिस्तीचे फार मस्त उदाहरण अनेकदा पाहिले आहे.
Submitted by फारएण्ड on 6 August, 2025 - 03:19

हे जास्त महत्वाचे आहे. आपल्याकडे रेल्वे स्थानक, मेट्रो स्टेशन अशा घाई-गडबडीच्या ठिकाणी escalator ची उजवी बाजू अडवून ठेवणाऱ्यांना जबर आर्थिक दंड आणि / किंवा त्यांनाच स्थानकात किमान ४-५ तास थांबवून ठेवणे (जेणेकरून त्यांना दुसऱ्याच्या वेळेची किंमत कळेल!) अशा जबरी शिक्षा करण्याची गरज आहे!

चुकीच्या बाजूला उभे राहणे हा दंडनीय अपराध अजून केलेला नाही. केस क्लोज्ड!
मलाही पटापट चढून जायला मोकळी बाजू आवडते, पण माझ्या सोयीसाठी त्या लोकांची माझ्या दृष्टीने चुकीच्या बाजूला उभे रहायच्या आवडीचे मी काही करू शकत नाही.

आपल्याकडे रेल्वे स्थानक, मेट्रो स्टेशन अशा घाई-गडबडीच्या ठिकाणी escalator ची उजवी बाजू अडवून ठेवणाऱ्यांना जबर आर्थिक दंड आणि / किंवा त्यांनाच स्थानकात किमान ४-५ तास थांबवून ठेवणे (जेणेकरून त्यांना दुसऱ्याच्या वेळेची किंमत कळेल!) अशा जबरी शिक्षा करण्याची गरज आहे! >>> खेडोपाडी एस्केलेटर्सचा एव्हढा सुकाळ असतानाही शहरात आल्यावर लोक असे का करत असतील ? आपल्या गावात,गल्लीत सराईतपणे एस्केलेटर्स वापरत असतानाही शहरातल्या पब्लिक प्लेसेस मधे एस्केलेटरवर उभे रहायला भीत असल्यासारखा अभिनय करतात लोक. मुद्दामून करत असणार हे ते सर्व. मनपाचा कर भरताना एस्केलेटरवरचं वर्तन पाहून जबरी दंड बसवला पाहीजे सर्वांना.

Pages