पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती फुलराणी
(पेशवेबागेत मोठी राईड आहे)

छान लेख

पुण्यातील मेट्रो "परत या" आजोबांनी फेमस केलीय Happy

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. >>>>>>>>>>>>>
पुण्यात राहणाऱ्या किंवा कामानिमित्त दररोज येणाऱ्याला
बी आर टी राबवण्याबद्दल जरी विचारले असते तरी त्याने विचारणार्याला दोन ठणकावून बी आर टी व्यवहार्य नाही म्हणून सांगितले असते .
किंबहुना भारतातील एक हि शहर बी आर टी च्या लायकीचे नव्हते , पण केंद्रातून जे एन यु अंतर्गत मिळणारा 10 , 12 हजार कोटींची मलिदा कशाला कोण सोडेल ?
निव्वळ माठ डोक्याच्या लोकांनी जबरस्तीने राबवलेली कल्पना म्हणजे बी आर टी होय !
भारतातील 10 /12 पैकी एकाही शहरात बी आर टी यशस्वी झाली नाही .
जास्तीत जास्त 40 फूट असणाऱ्या रस्त्यावर बी आर टी ला मध्यभागी 15 फुट सोडल्यावर उरलेल्या 20 फूट ( फुटपाथ 5 फूट ) मध्ये यांच्या आजोबांनी गाड्या चालवायच्या होत्या का ते ही टू वे ?
शिवाय गर्दी आणि गाड्यांचा महापूर असताना ?
एक तर यांचे कल्पना दारिद्र्य वर पैशाचे वाटोळे कसे करायचे ते राजकारण्याकडून शिकण्या सारखे आहे .
त्या वेळी पुण्यातील सामान्य माणसे विरोध करत असताना दोन्ही काँग्रेस नी बी आर टी जबरदस्तीने राबवला . शेवटी कॉर्पोरेशन च्या पुढील निवडणूक मध्ये ज्या ज्या रस्त्यावर बी आर टी राबवली तेथील दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक दणकून आपटले , पण तो पर्यंत सर्वांचे खिसे भरले होते .
बी आर टी ला अर्धा रस्ता गेल्यावर उरलेल्या भागातील वाहतूक अक्षरशः मेटाकुटीला येत होती , लोक वैतागून बी आर टी मार्गात घुसायचे आणि अपघात होऊन मारायचे ! पण गेंड्याची कातडीवाल्याना फरक पडत नव्हता .
हडपसर बी वर टी मार्गातील अपघातात महापौर सिंग चा पोरगा का नातू मृत्युमुखी पडला , त्या वेळी त्या महापौर ने देखील आंदोलन केल्याचे स्मरते !
एकंदरीत , आज डांबरीकरण केलेला रस्ता उद्या ड्रेनेज लाईन साठी खोदण्याची परंपरा असलेल्या बाबूशाही ला काय फरक पडणार आहे ?
मग सत्तेत कोणीही असो !

पण मेट्रोचे पिलर रस्ता न अडवता दुभाजकांचे काम करत असल्यामुळे इतर वाहनचालकांना त्रास होत नाही , त्यामुळे मेट्रोचे स्वागत .....

आज डांबरीकरण केलेला रस्ता उद्या ड्रेनेज लाईन साठी खोदण्याची परंपरा असलेल्या बाबूशाही ला काय फरक पडणार आहे ?/
कॉंन्क्रीटीकरण केलेले रस्ते सुद्धा फोडून काढतात
परवा आमच्या इथे ह्या उद्योगात MNGL ची पाइप फुटली,गोंधळ नुसता, 5-6 तास स्वयंपाकाला सुट्टी!

परत या
नव्हे, 'या,परत.'
{सवडीने ?}

आणि मटा ची बातमी
//
पुणे मेट्रोच्या प्रतिक्रिया याआजोबांनी दिली ही प्रतिक्रिया - विडिओ वाइरल.
//
बातमी उघडल्यावर
"काय आजोबा कशी आहे मेट्रो?"
"आत्ता आलात, . . .
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मटा लॉगिन करा.
//

तर हे यूट्यूबवर शोधल्यावर तो १५ सेकंदांचा विडिओ दिसला. "या,परत" एवढंच पुढचं वाक्य. आणि तब्बल 215 views?!!
मटा पोहोचला घरोघरी.

एका मेट्रो विरोधी काकांनी हे फॉरवर्ड पाठविले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मेट्रोच्या निम्मे पैसे जरी बसला दिले असते तरी नागरिकांना चांगली सेवा मिळाली असती

https://www.google.com/amp/s/www.nationalheraldindia.com/amp/story/india...

In Nagpur, Metro coaches are let out to host birthday parties: little more than joyrides

In a city where two-wheelers cover distances in double quick time, there is little incentive to use the Metro as coaches are being used for hosting birthday parties

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/pune-news/...

नागपूर येथील मेट्रो प्रकल्प तोट्यात आहे. तेथे मेट्रो रेल्वेमध्ये दोन ते तीनच प्रवासी बसलेले दिसतात.
नागपूर येथील मेट्रो प्रकल्प तोट्यात असल्याची टीका करताना जलसंपदा मंत्री पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खिल्ली उडविली. ते म्हणाले, 'राजकारणी हे काही तरी केल्याचे दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतात. नागपूर येथील मेट्रो रेल्वे ही निवडणुकीच्या आधी सुरू झाली, तर बरे होईल, असे गडकरींना वाटले. त्यामुळे त्यांनी मेट्रो सुरू केली; पण ही मेट्रो तोट्यात आहे. येथील नागरिकांना दुचाकी वापरण्याची सवय आहे. स्वतः गडकरीदेखील स्कूटरवरून फिरत असतात.'
पुण्यातील बीआरटी प्रकल्प फसला आहे,' असेही पाटील म्हणाले.

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/mumbai-new...

मोनोरेल विकणे आहे?; एमएमआरडीएच्या हालचाली

खर्च आवाक्याबाहेर वाढल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल प्रकल्प खासगी कंपनीकडे सोपविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

तोट्यात चालणारी मोनोरेल का कुणी विकत घेईल? आधी विचार करायचा ना.

https://www.loksatta.com/sampadkiya/visheshlekh/prithviraj-chavan-articl...

बुलेट ट्रेनचा पांढरा हत्ती कोणासाठी?

आर्थिक स्तरातील प्रवासी बुलेट ट्रेनने प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी त्याच किमतीत आणि कमी वेळात विमानसेवा उपलब्ध आहेच.

दहा पंधरा मिनीटे चालायचा एवढा कंटाळा आहे लोकांना की मेट्रो स्टेशनपर्यंत जाणेही टाळतात.
नागपुरसारख्या ऐसपैस पसरलेल्या शहरांत ही अंतरे आणखीनच वाढतात.

तसे नाही होत

घर , ऑफिस दोन्ही स्टेशनजवळ असेल तर लोक मेट्रो मोनो प्रेफर करतात.

तिथवर जायला दोन्हीकडे रिक्षा लागत असेल तर लोक पूर्ण रिक्षा करणे प्रेफर करतात.

मी एकदा गम्मत म्हणून चेंबूर ते नायर हॉस्पिटल मोनो रेलने गेलो
चेंबूर नाका ते गाडगेबुवा चौक मोनोरेल , पण इकडे स्टेशनला जायला रिक्षा अन तिकडे स्टेशन ते नायर टॅक्सी

मोनोचा प्रवास अद्भुत , रम्य, मनोहर सगळे आहे , पण एकंदरच वेळ अन पैसा जास्त गेला

<<मेट्रोपर्यंत टू व्हीलरने जाऊन मग पुढे मेट्रोने जाता येईल की!
>> ट्राफिक मधुन वेळ वाचणे, लांब जायचे असल्याने स्वतः तेवढे चालवत जाण्यापेक्षा आरामात बसून, वाचत / सोमीवर वेळ घालवत /डुलकी घेऊन जाणे असे काही आकर्षण असेल तर करतील लोक.
हैद्राबादला आम्ही रहातो त्या भागात मेट्रो नाही अद्याप (पुढे येईल तेव्हा सर्वात जवळचे स्टेशन चार किमीवर असेल). हायटेक सिटीला जाणारे लोक, दुचाकीवरून १० किमीवर असणाऱ्या मेट्रो स्टेशनला जाऊन तिथे पार्क करून पुढे मेट्रोने जातात. तिथुन हायटेक सिटी २५ किमी, पण पीक ट्राफिक मध्ये दोन तास तरी लागतात. तेव्हा मेट्रो फार सोयीची होते.

मुंबईचा वेसावे - घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग हा लोकांना खूपच सोयीचा, म्हणून गर्दीचा ठरला आहे. तिकीट चाळीस रुपये हे अंधेरी वेसावे अथवा अंधेरी घाटकोपर इतक्या प्रवासासाठी रिकशाच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. एक दोन स्टेशनांपुरताच प्रवास असेल तर कदाचित स्वस्त की महाग हे लागणाऱ्या वेळावरून ठरवावे लागेल.

मुंबई दिल्ली हि खरोखरच मेट्रो शहरे आहेत. लोकसंख्या चार कोटी. लांब अंतरे. फक्त ५ टक्के लोकांनी वापरले तरी पैसा वसुली होते.
नागपूर, पुणे हि प्रसिद्ध शहरे आहेत पण मेट्रो नाहीत. माझा एक सहकारी मुळचा आग्रा इथला आहे. तिथे पण मेट्रो बांधकाम सुरू आहे. तो म्हणाला लोकल लोकांना तिकीट परवडणारे नाही. तिथे कुठलाही इंडस्ट्रीज येणार नाहीत. टुरिस्ट स्वतच्या गाडीत, बसमधून येतात. कारण ते जास्त सेफ असते. मेट्रो नक्की कुणासाठी बांधत आहेत त्यांनाच माहीत.

पुण्यात कोथरूड मध्ये आम्ही काही महिने राहिलो आहे.
कोथरूड डेपो ते डेक्कन, मनपा, स्वारगेट दर दोन मिनिटांत बस असते. फक्त 5 ते 15 रूपये तिकीट. तरीही दुचाकी वाहने वापरणारे बस वापरत नाहीत

हिंजवडीला जायला पण पब्लिक वापरणार नाही का? वाकडचा ट्रॅफिक वाचणार असेल तरीही?
बसचा वेग आणि मेट्रोचा वेग यात खूप फरक पडतो. बसपेक्षा दुचाकी नक्कीच चांगली वाटते. परत नियम पाळावे लागत नाही, फुटपाथ वरून चालवता येते.

एकूण काय विरोधच अधिक.
मुंबईत डबलडेकरचा प्रवास आम्हाला लहानपणी आवडायचा. वरती जाऊन बसायचे. पण बाकिचे बरेच प्रवासी आणि महिला वर जायला टाळणार. मेट्रो स्टेशनला सरकते जिने सतत चालू ठेवलेले दोन्ही बाजूस तो खर्च वाढतो. रेल्वेचे जिने चढून मात्र कित्येक वर्ष प्रवासी जात होते. आता जिने काय, लिफ्टस काय चंगळ आहे.
मेट्रोही ठेवायची,रस्तेही ठेवायचे, सिग्नल ठेवायचे,बस,रिक्षाही ठेवायच्या म्हणजे आवाज व धूर रग्गड.

जयसिंग यांना पूर्ण अनुमोदन...
BRT ची बिनडोक उधळपट्टी पाहून खूप चिडचिड होते. रस्ता ओलांडून बस थांब्यावर पोहोचणे हे प्रचंड धोकादायक आहे.

विरोध नकोच.
खडकवासला किंवा धायरी येथे राहणार्‍या इसमाने त्याला आळंदीला जायचे असल्यास सायकलवर वनाझला जायचे. तिथून वर जिन्याने चढून गरवारे ब्रिजला मेट्रोने जायचे. खाली त्याने दुचाकी पार्क करून ठेवलेली असेलच. त्यावर आळंदीला जायचे. येताना पुन्हा गरवारे ब्रिजला दुचाकी पार्क करायची. वनाजपर्यंत मेट्रोने जायचे. खाली उतरून सायकलवर खडकाला धडक देऊन आ वासला करावा. खूपच सोपं झालंय सगळं.

गरवारे ब्रिजच्या खाली जेमतेम एक लेन जाणार्‍या वाहनांना उपलब्ध आहे. तिथे कधी कधी रिक्षेवाले उभे असतात. कुणी पोलीस नसतात त्यांना हटकायला. ज्यांना लांबून वारज्याला जायचे आहे त्यांना या फुलराणीचा सध्या तरी उपयोग नाही, पुढेही तिचा रूट पाहिला तर जवळच्या रेल्वेस्टेशनला पार्किंगची सुविधा देणार आहेत का ? किमान प्रत्येक महत्वाच्या मेट्रो स्टेशनपासून सार्वजनिक वाहतूक सुविधा जी आजूबाजूच्या परीसरात सोडेल. मोठ्या बसची आवश्यकता नाही. या सर्व सूचना प्रा. विकास मठकरी , गिरीश बापट, सुरेश कलमाडी यांच्याकडे दिल्या होत्या. त्यांनी वाचल्या सुद्धा नसाव्यात.

दिल्लीच्या मेट्रोचे काम सुरू असताना पाहीले आहे. जिथे मोठ मोठे रस्ते आहेत त्यातले एक दोन ट्रॅक भूमिगत ट्रेनसाठी वापरले. काम चालू असताना थोडी अडचण झाली. पण आधीच अरुंद असलेल्या कर्वे रस्त्यावर जी कोंडी झाली तितकीशी झाली नाही. आता मेट्रो सुरू झाल्याने वरचे रस्ते पूर्ववत झाले आहेत. हा मुद्दा या सर्वांना कळवलेला होता.

मेट्रोपर्यंत यायच्या जायच्या सोयी केल्या नाहीत तर तिचा वापर होणार नाही. शिवाय ज्या भागात मेट्रोचे नियोजनच नाही त्यांनी तिचा वापर न केलेलाच बरा. गाडी काय तिकीट तपासनीसाच्या डोक्यावर ठेवून जायचे का ?
मोलेदिना हॉल इथे पुणे स्टेशनचे बसस्थानक झाले तेव्हां बाजूला सायकल स्टँड आणि वाहनतळ यांचे नियोजन केले होते. रेल्वे स्टेशनच्या बाहेरही सायकल, कार आणि दुचाकी स्टँड आहे. या बेसिक सोयी असायला हव्यात.

Pages