पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज नळस्टॉप ते पिंपरी चिंचवड मनपा हा प्रवास केला.>> असा पण रूट आहे.? किसी को हमारा खयाल जरूर है. ते खोल खोल भुयारी स्टे शन कुठले हो? रील्स बघितली मी झोपेत. फार भारी आहेत.

भुयारी मध्ये अजून अपघात झाला नाही.सर्व काही नवीन आहे.
समजा भुयारी मेट्रो मध्ये अपघात झाला तर मदत कार्य करण्या इतके तंत्र भारतात नक्कीच नाही.>> नजर लावु नका कृपया धन्यवाद.

पुढची सर्व संकट ,अडचणी ह्याचा विचार करावाच लागतो.
नियोजन त्यालाच म्हणतात..
पुढच्या कमीत कमी पन्नास वर्षात काय अडचणी येतील त्याचा विचार करून नियोजन करणे

टायमिन्ग खलास होते. वेळेवर पोहोचले नाहीतर पे कट
<<
पेकाट मोडते असे लिहायचे असेल असे वाटले.
नंतर पे कट हे इंग्रजी शब्द आहेत हे ध्यानात आले..

काल पासपोर्ट ऑफिसला जाताना मेट्रोने रूबी हॉलला जावे आणि तिथून रिक्षा करावी हा बेत बायकोमुळे बारगळला. हा असा वळसा घालताना अपॉइण्टमेण्ट चुकली तर नवीन मिळायची नाही हा तिचा धोशा होता.
आज मात्र हट्टाने नळस्टॉप पासून रूबी हॉलला उतरलो. तिथून फीडर बसने गंतव्य स्थानाकडे कूच केले. हिला फीडर बस म्हटल्याने बहुधा मेट्रो स्थानकापासून सुटत असेल असा अंदाज होता. पण एका पायावर उभा राहून प्रवास करावा लागला.
आज मी प्रदूषण कमी केलं आणि पुण्याच्या वाहतुकीची कोंडी एकने कमी केली अशी रघूजींनी आचार्यांची समजूत घातली.

परत येताना मात्र एलेक्ट्रिक एसी बस मिळाली. तिच्यात एक सीट रिकामं होतं. चटकन बसल्यावर कंडक्टर रागाने बघतोय असा भास झाला.
शेजारच्या प्रवाशाने सांगितले की कंडक्टर बसला होता इथे...

रूबीला ऊतरून शांत उभा होतो. इतक्यात मागून एक बस आली. उतरलेला मनुष्य ववि फोटोतल्या हर्पेन या आयडी सारखा दिसत होता. मी हर्पेन (शक्यता आहे ना ?) कडे पाहून स्मित केले. पण त्यांचं लक्षच नव्हतं. निळा टी शर्ट, कॅप, निळीच पँट, पांढरी करडी दाढी एव्हढ्यावर खात्री पटली नसती. पण हा हर्प्नेन सदृश्य माणूस रनिंग करत मेट्रोकडे गेला. म्हटलं शंकाच नाही.

आता हर्पेनच्या मागून आलेल्या माणसाकडे लक्ष गेले. हा फारच रोखून बघत होता. हिंदीतलं घुरके असतं तसं.
बहुतेक याला मीच तो आयडी हे माहिती असावं आणी डूखधर्‍या आयडींचा हा हस्तक असावा किंवा एकंदरीतच त्याला मी आवडलेलो नसेन.
तो काही नजर वळवत नव्हता.
डोळे हे फिल्मी गडे
रोखून मज पाहू नका

अशी विनंती कराविशी वाटत होती. एकदाचा त्याला चुकवून मेट्रोत शिरलो.

सकाळपासून पाहिलेलं. मेट्रोत सायकली घेऊन शिरणारे सगळे काका लोक्स होते. टी शर्ट, हाफ ट्रॅक्स पँट म्हणजे हे नुसतेच शायनिंग मारत होते.
कामानिमित्त जायचे असेल तर बॅग, लंच बॉक्स आणि पेरूचा पापा घेऊन सायकल घेऊन जमेल का ?
उद्या मेट्रोला गर्दी व्हायला लागली तरी हे काका लोक ऐकणार का ?
परवानगी आहे असे उत्तर देतील.

पीएमसीला काही अंगाने सुटलेले लोक पेढे वाटत होते. चांद्रयान यशस्वी झाल्याने आम्ही पेढे वाटतोय असे म्हणाले.
बरंं वाटलं. अंग आंबून गेलं होतं. त्यांनी तिरंगा आणल्याने कुठल्या पक्षाचे हे समजले नाही.
पण वंदे मातरम अशा घोषणा दिल्या !

नळस्टॉपला उतरलो. एका काकांना बोलायला बकरा हवा होता.
चांद्रयान उतरलं. मी हसलो.
"नळस्टॉप ?"
मी पुन्हा स्मित केलं.
काकांची चिकाटी वाखाणण्यासारखी होती.
" इथे नळ कुठेय ? फक्त स्टॉप आहे"
आणि ते एकटेच हसले.
या वेळी मी न हसता म्हणालो
" होता"
"अ रेच्चा ! मग कुठेय आता "
" सनी देवल आला होता"
माझ्या उत्तरावर काका विचारात पडले. ते काही विचारणार तितक्यात मी सटकलो.
माझी एलेक्ट्रिक स्कूटर जशीच्या तशी होती. सीट उचकटून बॅटर्‍या चोरीला गेलेल्या नव्हत्या.
घरी आलो. एकून पाच तास गेले.
स्कूटर वर एक तास.
कारने दीड तास.

ते चांद्रयानचं रॉकेट उभ्याच्या ऐवजी आडवं केलं तर पुण्याच्या या टोकापासून त्या टोकाला स्वस्तात जाता येईल. मोदीजींनी अ‍ॅव्हरेज सांगितलाच आहे. स्टॉप आला कि लँडींग रॉकेट प्रज्वलित करायचे.

Proud आता माझ्याकडून काही अपडेट. मी चार दिवसांपासून मेट्रो कार्डधारक झालो Happy तिकीट रांगेत उभे राहण्याची कटकट मिटली. आणि रोजची वट्ट ६ रुपयांची बचत (कार्ड वर ५४ रुपये कट होतात, तिकीट ६०). वेळ मात्र फारसा वाचत नाही, रोज सवा ते दीड तास लागतोच. सिव्हील कोर्टला मेट्रो लाईन चेंज करण्यात वेळ जातो आणि दोन लाईनच्या मेट्रोचे टायमिंग अलाईन नाही, त्यामुळे पंधरा मिनिट तर आरामात वाया जातात. पण तरीही प्रवास सुखकर आहे.

मागच्या पानावरची चर्चा वाचली. पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय बेकार आहे. इथे मुंबै सारख्या दर पाच दहा मिनिटांनी लोकल नाहीत, अगदी आता आतापर्यंत आकुर्डी स्टेशनवरून सकाळी ९नंतर एकदम ११वाजता लोकल होती, पाच एक वर्षांपूर्वी १०.१५ला एक लोकल सुरू झाली, ती पण शिवाजी नगर पर्यंत. इथे पी एम टी चा उर्मट वाहक सुट्टे पैसे नसेल तर अगदी खाली उतरायला लावतो (ह्यात अजिबात अतिशयोक्ती नाही), रिक्षावाला जवळचे भाडे घेत नाही, बस अत्यंत वाईट अवस्थेत आणि घाणेरड्या असतात (एसी बस आल्यात हल्ली, त्या बऱ्या असतात). ह्या सर्वांशी तुलना करता मेट्रो सेवा उत्तमच आहे, उणिवा आहेत पण होईल सुधारणा हळूहळू.

जे लोक मेट्रो स्टेशनच्या जवळ राहतात किंवा मेट्रो स्टेशनला जायला ज्यांना बस आहे , आणि कामाचे ठिकाण सुद्धा मेट्रोच्या जवळच आहे असे लोक खरोखर भाग्यशाली म्हणायला हवेत. गोलाकार पुण्यात असे भाग्य मिळणे हे इतरांना हेवा वाटावे असेच आहे.

मेट्रोवर आतापर्यंत २१ हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत.

इलेक्ट्रीक एसी बसची किंमत एक करोड ते अडीच करोड (डबल डेकर) रूपये आहे. १००० बसेस घेतल्या तर जास्तीत जास्त २५०० करोड रूपये खर्च होतील. मोबाईलवर बसचे तिकीट, डिजीटल तिकीट यासाठी जास्तीत जास्त दहा कोटी रूपये. उरलेल्या पैशात फ्लायओव्हर बांधणे, रस्ते रूंद करणे ही कामे झाली असती.

१००० बसेस ने कुठलाही माणूस कुठूनही बसून जाऊ शकतो.
त्यात ३३ माणसे बसू शकतात. २५ उभे राहून जाऊ शकतात.

नवीन डबल डेकर बसेसची क्षमता -
त्यात ७० माणसे बसू शकतात. ४० उभे राहून जाऊ शकतात.

मेट्रो मधे बसलेले + उभे असे ९७० प्रवासी जाऊ शकतात. ९ बसेस सोडल्या तर एका मेट्रोचे काम स्वस्तात होते. १५ कोटी रूपयात !
मेट्रो २५% सुद्धा भरली जात नाही. साधारण २५० प्रवासी असतात. म्हणजे दोनच बसेस सोडाव्या लागतील. ३ ते ४ कोटी रूपयात !
बसेस मधे जागा नसते.
म्हणजे आधी लक्ष बसेस वर द्यायला पाहिजे होतं.

<< १००० बसेस ने कुठलाही माणूस कुठूनही बसून जाऊ शकतो. >>

याला म्हणतात Penny-wise and Pound-foolish.
१. हजार बस रस्त्यावर आल्या की गर्दी किती वाढेल?
२. एक सारखेच अंतर जायला बसला किती वेळ लागेल आणि ट्रेन/मेट्रोला किती वेळ लागेल? लोकांच्या वेळेला काहीच किंमत नाही का? (मुंबईत मिनिटामिनिटाचा विचार करून प्रवास होतो.)
३. मेंटेनन्सचा खर्च विचारात घेतला का?
४. प्रवास वेळेवर होण्याची शक्यता ट्रेन/मेट्रोमध्ये आहे की बसमध्ये?

पुणे असो वा मुंबई वा न्यूयॉर्क, ट्रेन सेवा ही बसपेक्षा नक्कीच जलद आहे आणि त्यात जास्त प्रवासी नेण्याची क्षमता आहे.

बसेस कडे लक्ष द्यायला पाहिजे होतं हे खरं.<<< उलट लोकल सेवे कडे लक्ष देणे खुप गरजेचे होते

पुणे - लोणावळा दरम्यान बहुतेक जागा रेल्वेच्या ताब्यात आहे जिथे आजुन दोन ट्रॅक चे विस्तारीकरण आरामात / कमी खर्चात होऊ शकले असते.
पुणे - देहुरोड / तळेगाव, चिंचवड - लोनावळा अश्या टप्प्यंमधे १५-२० मि. च्या प्रवासी फेर्‍या सहज शक्य झाल्या असत्या .
आणि हे शिवाजीनगर- पिची मेट्रो साठी केलेल्या केलेल्या खर्चापेक्षा कमी रुपयात झाले असते. जनतेची सुद्दा माफक दरात सोय झाली असती.

सशाला अनुमोदन. हेच लिहिणार होतो. पुणे लोणावळा चौपदरीकरणाचे काम गेली १५ वर्षे फक्त ऐकून आहे. ते एकदा झाले की दर दहा मिनिटांनी लोकल उपलब्ध होऊ शकेल. हे काम पुढील दहा वर्ष तरी नक्कीच नाही होणार. पुण्यात डबल डेकर बस होत्या लांबच्या रुटसाठी, त्या ९०च्या मध्यात बंद केल्या. मेट्रोपण निगडी स्वारगेट का नाही चालू केली हे त्यांनाच माहीत. निगडी स्वारगेट मार्ग गर्दीत चालेल. पुण्यात मेट्रो आणि ए सी बस तिकीट सेम आहे. आणि बस हाच एकमेव सोयीस्कर पर्याय आहे, त्यामुळे लोकांना एसी बस तिकीटाची सवय आहे. मेट्रो मार्गांचे नीट नियोजन केले तर नक्कीच लोक गर्दी करतील.

लोकल कडेही, पण सध्या पुण्यात कोणत्याच आयटी पार्क च्या बऱ्याच जवळ जायला आगगाडी उपयोगी न पडता pmpml बसेस उपयोगी पडतात फक्त, म्हणून बसेस वर लक्ष म्हटलं.
कोणी मुंबई दादर ते थेट हिंजवडी फेज1 2 3, किंवा मुंबई ते खराडी, मगरपट्टा किंवा पुणे विमानतळ ते हिंजवडी अशी रेल्वे काढली तर जास्त पैसे द्यायला पण तयार आहे.

Penny-wise and Pound-foolish >>> पहिल्यांदाच ही म्हण वाचली. बरं. मग तुमचा प्रतिसाद वाचून हे आठवलं.
Don't let your impulsive reaction to conflict betray your intelligence.

आपण मेट्रो वर किती खर्च करतोय त्यात काय काय होईल याचे चित्रण आहे. घाईत खरेच 1000 बसेस रस्त्यावर येणार आहेत या समजुतीत तुम्ही चंद्रावर पोहोचलात.

20000 कोटी रूपये घातले. ते फक्त दोन रूटवर. तुमचा काय समज आहे, पुणेकर फक्त या रूटच्या आजूबाजूला राहतात का?
आधीच्या पानांवर लोकानी सांगितले आहे की.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या जुळ्या शहरातले दोन रूटवर लाखभर प्रवासी वाहून नेण्याची ही धडपड तुमच्या मते व्यवहार्य आहे? कारण ती आवडत्या पक्षाने उभारली म्हणजे त्रुटी नाहीतच, कुणी सांगितल्या तर त्याची संभावना करायची काम झाले.

1000 बसेस आणल्या तरी पंधरा ते वीसपट जास्त आहे मेट्रोचा खर्च हा त्या प्रतिसादाचा अर्थ आहे. पुण्यात निगडी स्वारगेट, खराडी वनाज, हडपसर खडकवासला अशा मेट्रो झाल्या तरी पुण्याच्या रचनेमुळे त्या इंटरचेंजवर बदलून जाण्यापेक्षा रस्तामार्गे कमी वेळात जाता येणार आहे.

बसेस खूप सोडल्या तर बसायला जागा मिळते. बसायला जागा मिळाली कि लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतात. त्यामूळे खासगी गाड्या कमी येतात रस्त्यावर. हा थंब रूल आहे.

ही वाहने रस्त्यावर आली नाहीत तर पेट्रोल वाचत नाही का?

पुण्यात खासगी वाहने किती आहेत हे गुगल करून पहा. 90 साली आठ लाख दुचाक्या होत्या. तुम्हाला 1000 बसेस ची भीती वाटली. बस कुठूनही कुठेही जाऊ शकते. एखाद्या मार्गावर बसेस कमी असतील तर कमी गर्दीच्या मार्गावरच्या बसेस त्या मार्गावर आणता येतात. नियोजनात लवचिकता राहते. मेट्रोचे मार्ग प्रतिसाद नाही म्हणून वळवता येतात का?

भारतात आग्रा, जयपूर सहीत अनेक मार्गावर मेट्रोचा प्रतिसाद नाही. नागपुरात सुरूवातीला राईड म्हणून लोकांनी गर्दी केली. आता?
या सर्व प्रोजेक्टसचा खर्च काढा. हे पैसे पाण्यात गेले कि नाही? मेट्रो साठी नियोजन करुन ठेवायचे आणि शहरे वाढली कि मेट्रो सुरू करायची ही पद्धत असते. त्या आधी सर्व्हे करून घेतात. याला तुमच्यात नियोजन म्हणत नाहीत का? भरमसाठ खर्च आणि ताजमहाल बांधत सुटणे हे तुमच्यात नियोजन असेल तर बरोबर.

मेट्रोचा मेंटेनन्स नाही?
1000 बसेस खरेदी केल्या तरी उरलेल्या 18000 कोटीत पुढची वीस वर्षे मेंटेनन्स, डिजेल चा खर्च वाचत नाही का? आजू जे 18000 कोटी रुपये वाचले त्याचे 20 वर्षांत व्याज बघा. आजच्या 18000 कोटींचे 20 वर्षांनी असलेले मूल्य बघा.

जेव्हा सिविल कोर्ट ते कात्रज , पीसीएमसी ते निगडी हे रूट तयार होतील तेंव्हा अजून दहा वीस हजार कोटींचा चुराडा होईल.
यापेक्षा जास्त कांदा सोलून दाखवता येत नाही.

मुळात जशी लोकसंख्या वाढते त्याच प्रमाणात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वाढवत न्यायला हवी. मग हे मेट्रो वगैरेची गरज पडली नसती. वरातीमागुन घोडे नाचवले की मग काय होणार ?

वाहन संख्या
पुणे मनपा हद्दीत
दुचाकी 32, 23,135
चारचाकी 7, 53,222
रिक्षा - 72000

पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत
दुचाकी 23,92,521
चारचाकी 1,32,458
13 एप्रिल 2023 रोजी.

पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीच्या बाहेर असणाऱ्या वाहनांची संख्या माहित नाही.

बसेस कडे लक्ष दिले पाहिजे होते ते मान्य पण १००० बसेस विकत घेण्याचा खर्च आणि मेट्रो लाईन साठी २१००० कोटी याची तुलना नाही होउ शकत. तुलना करायची असल्यास १००० बस साठी सिग्नल नसलेले ब्रिज, १००० बस रात्री उभ्या कण्यासाठी जागा याचा पण खर्च जमेत धरला पाहिजे.
आणि फक्य बसेस च्या खरेदीची जर तुलना करायची असल्यास १००० बस आणि तेवढ्याच प्रवासी लोकासाठी मेट्रो चे डबे ह्याचा खर्चाची तुलना केली पाहिजे.

करा ना.
आकडेवारी सहीत लिहा. मी आकडेवारी दिली आहे. असे केले पाहिजे असे नाही लिहिले.

नियोजन शून्य शहर आणि सरकारी प्रतेक कामात 40% वर दलाली प्रशासकीय अधिकारी आणि नेते ह्यांच्या कडे जाते.
20 रुपयाचा काम असेल तर त्या साठी दोनशे रुपये सरकारी तिजोरी मधून जातात.
त्या मुळे भारत विकसनशील मधून विकसित ह्या श्रेणी मध्ये येत च नाही..
खोडी आकडेवारी ,सरासरी नी काढलेले फसवे आकडे सोडले तर खरा तर भारत विकसनशील सुद्धा नाही..अविकसित देश च आहे.

पहिल्या पानावरचे मुद्दे पुन्हा येऊ लागले आहेत. फिरून फिरून भोपळे चौक टाळा.

समजा, मला खालील प्रवास रोज करायचा आहे.
टिळक रोड वरून विश्रांतवाडी
सदाशिव पेठ ते वारजे - शिवणे
वडगाव बुद्रुक ते उन्ड्री / कोंढवा
धानोरी ते हिंजवडी
औंध ते मांजरी
आंबेगाव बुद्रुक (किंवा नर्हे - धायरी) ते किवळे - रावेत.
( ही काँबिनेशन्स वाढवता येतील )

तर मी कोणत्या मेट्रोने जावे ? साधारण किती वेळ लागेल ?
मेट्रो स्टेशनला कसे जायचे ? मेट्रो स्टेशनवरून पुढे कसे जावे ?
तिकीट किती लागेल ?
बसने किती वेळ लागेल ? तिकीटाचे पैसे किती लागतील ?
स्वतःच्या वाहनाचा वापर केला तर ?

वाहतुकीसाठी सगळे पर्याय उपलब्ध हवेत. एकच पर्याय सगळीकडे उपयोगी पडेल असं नाही. तसंच एकच पर्याय सर्वोत्कृष्ट म्हणून बाकीचे नकोतच, असंही नको. सगळ्यांचा ऑप्टिमम वापर व्हावा.

पुण्यासारखी भौगोलिक रचना असलेल्या ठिकाणी दोन किंवा तीन सरळसोट रेल्वे रूट उभारणे हे काही सिरीयस प्लानिंगचे लक्षण वाटत नाही. जेव्हढा पैसा यासाठी लागणार आहे त्या मानाने रिझल्ट्स तितके परिणामकारक असणार नाहीत.
मुंबईत राहणार्‍याला लोकल किंवा मेट्रो उपयुक्त वाटेल. पण ते सगळीकडे लागू होत नाही. मुंबईची होणारी वाढ आणि लोकलच्या लाईन्स हे उत्तम जुळून आलेले उदाहरण आहे. मधे मधे खाडी असल्याने सेंट्रल लाईनवरच्या कोणत्याही उपनगरात लोकलने उतरून पायी किंवा शेअर रिक्षाने जाता येते.

पुण्यात आडवे तिडवे मेट्रो रूट चालू केले तर नक्कीच उपयोग होईल.

<< पुण्यात आडवे तिडवे मेट्रो रूट चालू केले तर नक्कीच उपयोग होईल. >>

बरोबर, पण त्यासाठी कुणीतरी, कधीतरी सुरुवात तर केली पाहिजे ना. नुसते भोकाड पसरत बसलात तर कसं होणार? (जनरल विधान, तुम्हाला उद्देशून नाही.)

विकिपीडिया नुसार:
The project was proposed way back in 2007 by the Chief Ministers of Maharashtra, but did not move ahead due to many reasons. The DPR was itself approved only on 12 June 2012. At an event in 2013 during his tour of the city, the Metroman E. Sreedharan blamed the people involved in planning and implementing the project for the long delay, stating that "Pune lost five valuable years in unnecessary discussions instead of executing the project."

<< वाहतुकीसाठी सगळे पर्याय उपलब्ध हवेत. एकच पर्याय सगळीकडे उपयोगी पडेल असं नाही. >>
सहमत. पण मग २१,००० कोटी वाले (जो चुकीचा आकडा आहे) येऊन म्हणतील, इतका पैसा का खर्च केला? त्या पैशात प्रत्येक पुणेकराला सायकल देता आली असती.

Pages