पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंडरग्राऊंड मेट्रो धोकादायक ठरू शकते. वीज गेली किंवा पाणी शिरलं तर.

मुंबईत मोनोरेल अडकली आहे. एसी बंद, दरवाजे उघडत नाहीत. काचा बंद. ती वरती आहे तरी धोका झाला आहे. तर जमिनीखालील या मेट्रोचं काय? कोलकाता मेट्रोत कधी वाइट प्रसंग झाला होता का?

मोनोरेल मध्ये अडकलेला प्रवाशांना अत्यंत भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली. सगळ्या राजकारण्यांना मुंबई पाहिजे पण मुंबईकराचेही अवस्था पाहत नाही. मनोरेल मधून बाहेर येताना सुद्धा घसरणाऱ्या स्लाईड पण नाहीये. प्रत्येक जण आपापल्या जीवावरती खाली उतरतोय शिडीवरून. काही लोक आपापल्या बॅगा आपल्याच खांद्यावरती घेऊन उतरतायेत. सामान खाली नेण्यासाठी काहीतरी सोय करायला पाहिजे होती दोरी वापरून. मनोरेल यांना एक्झिट डोअर पण नाही किंवा इमर्जन्सी लाईटची पण सुविधा नाही. काय सुरक्षितता आहे याच्यात. बाहेर पाऊस आत , हवेची सोय नाही ,मुंबईच वातावरण. पत्रकार तर लोकांना धड उतरू नाही देत नाहीये एवढे फ्लॅश मारतात तोंडावर. खाली उतरला उतरल्या प्रश्नांचा भडीमार.
स्त्रिया किंवा लहान मुलं कशी बाहेर येणारेत

मग नियम बदलण्याच्या मागे लागा. चुकीच्या ठिकाणी उभे राहिल्यास दंड करणारा जगातील पहिला देश आणि पहिली मेट्रो ठरू आपण. पथदर्शी प्रकल्प वगैरे. नियमाला विक्षिप्त रुल असं तुमच्या नावावरुन नाव देण्याची मी शिफारस करतो.

डिझास्टर मॅनेजमेंट आणि फायर फाइटिंग ड्रील हे काही कंपन्यांत कसोशिने केले जाते तसे या मेट्रोचे करावे.
आम्ही केले आहे. आगीचे डिपार्टमेंट आणि एक कायम कर्मचारी असतो. पण त्यांच्या मदतीला इतर खात्यांतून दोन दोन लोकांना तयार केलेले असते. भोंगा वाजतो आणि लाऊड स्पीकर वरून घोषणा होते घटना कुठे आहे. फायरची गाडी, सुरक्षा कर्मचारी, ॲम्ब्यूलन्स गाड्या येतातच. इतरांनी दिलेली कामे करण्यासाठी तयार रहायचे. फायरचा पाईप जोडायचा, स्ट्रेचर तयार ठेवायचे इत्यादी. एका माणसाला झोपवले जाते, त्याला उचलून स्ट्रेचरवरून गाडीत ठेवायचे. असा माणूस एवढा जड होतो की उचलता येत नाही. तर ड्रील केल्याने खऱ्या अडचणी कळतात. आणि मुख्य म्हणजे अशावेळी निर्णय कोणी घ्यायचे, संचालन कुणी करायचे हेसुद्धा ठरवलेले असते.

आता या संध्याकाळच्या मोनोरेलच्या घटनेत अडचणी कळल्या. काचा फोडायच्या का नाही यावर चर्चा झाली. दरवाजे कापायचे का नाही याचाही निर्णय घ्यायचा होता. आणलेला कटर वापरता येइल का हे माहीत नव्हते. शेवटी आतल्या प्रवाशांनीच एक काच कशीतरी उघडली. (वाहनांच्या काचा या स्टील फ्रेमवर सिलिकोन सीलने चिकटलेल्या असतात. ते काढलं बहुतेक.) मोनोरेलचा भक्कमपणा या वेळी त्रासदायक ठरला. आणि इमरजन्सी एक्झिट असते का आणि ते आतल्या सामान्य प्रवाशांना उघडायचे असेल तर माहीत हवे ना? सहज उघडणारे असेल तर दुर्घटना घडू शकते ना! म्हणून पक्केच असणार. आणि मुंबईच्या पावसात गंजलेही असेल.

सरकत्या जिन्यावर मुळात धावतपळत चढायचं, उतरायचंच कशाला? मध्यंतरी दिल्लीत मेट्रो स्टेशनवर अश्याच एका माणसाचा धक्का लागून मी पडता पडता वाचले. सरकत्या पट्ट्यावर घासून हाताला खरचटण्यावर भागले.
आणि हो, मी डाव्या बाजूलाच उभी होते जिन्यावर.
सरकत्या जिन्यांवर घाई करून तुम्ही स्वतः बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालत नाही का?

मेट्रो, बस पकडायची असेल तर किमान पंधरा मिनिटे आधी पोहोचावं............
(सर्वात आधी पुण्याच्या मेट्रो धाग्यावर मुंबईची उदाहरणे देतो आहे त्याबद्दल क्षमस्व, कारण मला पुण्याची विशेष अशी काही माहिती नाही)
समजा,
१. रोज सकाळी माझ्या भाच्याला त्याच्या स्कूल बस मध्ये सोडून मग मेट्रोने ऑफिस गाठण्याचा माझा शिरस्ता आहे. नेहमी स्कूल बस येण्याची वेळ आणि माझी ठरलेली मेट्रो यात पुरेसे १० मिनिटांचे अंतर आहे. पण एके दिवशी एका yz Creta वाल्याने स्कूल बसच्या मार्गात वन-वे मध्ये गाडी घालून संपूर्ण रस्ता जाम केला आणि त्यामुळे स्कूलबसला यायला उशीर झाला. आता मी माझ्या ५-६ वर्षांच्या भाच्याला तसाच एकटा सोडून माझी ठरलेली मेट्रो पकडायला जाऊ का? (कारण मूर्ख, माठ लोक escalator वर उजवी बाजू अडवून उभे असतील म्हणून) अशा वेळी मला त्याला स्कूल बसमध्ये बसवून मग मेट्रो स्टेशन गाठेपर्यंत ठरलेली मेट्रो तर चुकली तर निदान लगोलग मागून येणारी मेट्रो तरी मिळावी अशी अपेक्षा असणे आणि त्यासाठी धावपळ करणे चुकीचे आहे का??? त्या yz Creta वाल्याच्या आणि escalator उजव्या बाजूस उभे राहणाऱ्या माठ लोकांच्या चुकीची शिक्षा मी का माझा लेटमार्क लावून घेऊन भोगू???????
२. एक अबक नावाचा युवक नालासोपारा / विरार येथे राहतो आणि चकाला येथे नोकरीला आहे, जो अंधेरीपर्यंत ट्रेनने येतो आणि पुढे मेट्रो पकडतो. नेहमीच्या त्याच्या प्रवासाच्या गणितामध्ये १५-२० मिनिटांचा वेळ राखीव आहे. आजही तो घरातून व्यवस्थित आधी निघाला, ठरलेली fast ट्रेन पकडली, ट्रेनही वेळेवर निघाली. पण वाटेत कुणी महामूर्ख कानात इअरफोनचे बोळे टाकून रेल्वे रूळ ओलांडत होता, त्याला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही, ट्रेनने त्याला उडवला. नियमानुसार मोटरमनने हमाल येऊन dead body उचलेपर्यंत ट्रेन थांबवली आणि ट्रेनमधल्या ५ - ६ हजार जणांचा वेळ वाया गेला (ज्यात आपला हा अबक नावाचा युवकही आहे). आता जेव्हा तो अंधेरीला पोहोचेल तेव्हा त्याने ठरलेली तर मेट्रो गेली पण निदान लवकरात लवकरची जी मेट्रो येईल ती पकडण्यासाठी पण धावपळ करायची नाही का? कारण escalator वर उजव्या बाजूस उभे राहण्याऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून!!!
३. एक युवक आहे. साधारण दीड वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले आहे आणि आता लवकरच तो बाबा होणार आहे. त्याच्या पत्नीस आठवा महिना सुरु आहे व ती महिन्याभरापुर्वीच ओटभरणीचा कार्यक्रम झाल्यावर बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे व हा युवक नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आहे. अचानक त्याला त्याच्या सासूचा फोन आला की, "*** (त्याची बायको) बाथरूममध्ये घसरून पडली आहे, आणि तिच्या पोटात खूप दुखते आहे." त्याने लगेच फोनाफोनी करून तिच्या घरी ambulance पाठवली आहे व कामावरुन सुट्टी घेऊन तोही हॉस्पिटलमध्ये जायला निघाला आहे. पण हो, त्याने escalator वर उजवी बाजू अडवून ठेवणाऱ्यांना दुखावता कामा नये, त्यांच्याशी तुसडेपणाने वागता कामा नये! कारण गार्डनमध्ये फिरल्यासारखे मेट्रो स्टेशनवरच्या escalator उजव्या बाजूस उभे राहून गप्पा मारणे हा त्यांचा मुलभूत हक्क आहे, नाही का????

बस स्थानक, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक येथे धावपळ करणारा प्रत्येकजण हा बेजबाबदारपणे घरून उशिरा निघालेला नसतो, त्यापैकी कोणाची काही ना काही emergency असू शकते!!!

मुळात 'उभे राहायचे असेल तर डावीकडे उभे रहा, चालणाऱ्यासाठी उजवी बाजू मोकळी सोडा' इतका सरळसाधा नियम पाळण्यात अडचण काय आहे?? बरे हे नियम काही आम्ही कालच्या दिवसात बनवलेले नाहीत. महाराष्ट्रात पहिली मेट्रो दि. ८ जून २०१४ रोजी धावली (वर्सोवा - घाटकोपर लाईन) त्याला आता ११ वर्षांहून अधिक काळ लोटला. आणि तेव्हापासून हा नियम आहे. आणि ११ वर्षे हा पुरेसा मोठा कालावधी आहे एवढ्या साध्या नियमासाठी!!!

मध्यंतरी दिल्लीत मेट्रो स्टेशनवर अश्याच एका माणसाचा धक्का लागून मी पडता पडता वाचले. सरकत्या पट्ट्यावर घासून हाताला खरचटण्यावर भागले.
आणि हो, मी डाव्या बाजूलाच उभी होते जिन्यावर.

तुम्ही डाव्या बाजूलाच उभ्या असाल पण उजव्या खांद्यावर मोठी बॅग वगैरे होती का ते आठवून पहा! कदाचित त्यामुळे उजवी मार्गिका अडवली गेली असेल

विमु. पुण्यात आलात कि तुम्हाला माझ्याकडून ट्रीट.
नळस्टॉपला उतरलं ना,कि उजव्या बाजूच्या लिफ्टच्या मागच्या बाजूला जोशीकाकांचं हॉटेल आहे. मेट्रो गैरसोयीची आहे पण एव्हढ्यासाठी जमवूयात आपण. Happy

Escalator वर एका बाजूला उभे राहणे हा नियम जगात सर्वत्र आहे. मी अनेक देशात मेट्रोने फिरलो आहे. रस्ता अडवण्याचे प्रकार कधी कधी तिथेही घडतात. पण excuse me म्हणाले की ओशाळून लागलीच जागा करून देतात. आपण नियम पाळला नाही तर दुसऱ्याला दोष का द्यायचा?

राभूंचा पॉइण्ट बरोबर आहे. परदेशातही सुरूवातीला गोंधळ होतच असेल. पण हळुहळू एक सिस्टीम तयार झाली. तेथील लोकांच्या मूळच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे ती लौकर रूजली. आपल्याकडे ती नवीन आहे. तिची तुलना एकदम सुधारित आवृत्तीशी होत आहे. खेड्यापाड्यातून येणार्‍यांना ती पटकन न समजणे सहज शक्य आहे. बोर्ड लावून, सतत सूचना देऊन लोकांना हळुहळू माहीत होईल.

तरीही काही लोक पाळणार नाहीत. वर्षानुवर्षे माहीत असलेले रहदारीचे नियम कोठे पाळतात? पण ते न पाळणे हे फक्त गावाहून आलेले अशिक्षितच करतात असे नाही. इथेही तेच होईल.

वि.मु - इमर्जन्सीत, घाईत असलेले लोक वाटेत आलेल्या प्रत्येकावर चिडतील. ते नॉर्मल आहे. पण ते तेवढ्यापुरते. एरव्ही जर वरकरणी सुशिक्षित दिसलेली व्यक्ती जर अशी मधेच उभी असेल तर त्यांच्यावर राग येणे साहजिक आहे. तो कसा व्यक्त करावा हे त्यांचा व आपला साइज बघून ठरवावे Happy पण राग साहजिक आहे. शहराबाहेरून आलेल्या नवख्या व्यक्तीला बेफिफिट ऑफ डाउट द्यावा.

पण ते न पाळणे हे फक्त गावाहून आलेले अशिक्षितच करतात असे नाही. >> बरोबर आहे हे. रहदारीचे नियम पाळले नाहीत तर नक्कीच कठोर कारवाई व्हावी कारण हेतूच तसा असतो. एस्केलेटर्सच्या बाबतीत गावाहून आलेले / अशिक्षित यांचं सोडा शहरी सुशिक्षितांनाही भीती वाटते. एस्केलेटर्स काही लोकांच्यात रूळलेली सिस्टीम नाही. मॉलमधे पहिल्या पायरीवर पाय ठेवता न आल्याने लिफ्टने जाणारे कितीतरी लोक दिसतात.

हो खरं आहे. मी पहिला एस्कलेटर 90s मध्ये पाहिला. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आर्केडमध्ये होता. सोबती त्याने गेले, मी जिना चढून. त्यानंतर अनेक ठिकाणी एक्सलेटर असूनही जिना वापरला. अगदी विमानतळा वर सुद्धा. आता सवय झाली.

मुंबईतली गर्दी बघितली आणि हा फक्त डावीकडे उभे रहा हा नियम पाळायचं ठरलं तर काय होईल? समजा एका वेळी १०० लोक एस्कलेटर वापरणार आहेत. त्यातले धाडधाड उतरणारे किती असतील? आणि उभे राहून उतरणारे किती? अशी उजवी बाजू रिकामी सोडली तर फलाट रिकामं व्हायला आणखी वेळ लागेल आणि सग़ळ्यांचे मिळून जास्त मनुष्य सेकंद लागतील.

मुंबईत लोक साध्या जिन्याने जाताना डावी बाजू धरा हा नियम पाळत नाहीत. जिन्यात मधल्या लँडिंगला फेरीवाले, भिकारी असतात.
बोरिवलीला फलाट १-२-३ एकाला एक लागून आहेत. १ नंबरला गाडी आली की तो +२ पूर्ण ओलांडून जवळपास पाव भाग ३ चाललं की बाहेर पडता येतं. आता गाडीतून उतरलेले लोक फोन बघत, वाचत, बोलत चालतात. ट्रेनमध्ये ताटातूट झालेली जोडपी मागे पुढे बघत एकमेकांची वाट बघतात. यात लवकर बाहेर पडण्यात इतरांना अडथळा येतो .
बस स्टॉपमध्ये रांग लावायला जागा असली तरी लोक रस्त्यावर समांतर रांग लावतात. ज्येष्ठ नागरिक बस स्टॉपला बागेतला बाक समजून गप्पा मारायला बसतात.
अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यांवरून राग येत राहिला तर आयुष्यातली काही वर्षे नक्की कमी होतील.

नियम असो वा नसो, खरं तर हाती पायी धड असणार्यांनी जिनेच वापरावेत. कमीत कमी जिथे आहेत तिथे तरी. बर्‍याचदा लोक एस्कलेटर वर रांग लावून येतील पण बाजुचे जिने बर्‍याच वेळी रिकामेच असतात. मेट्रो ने मी अजून पुण्यात प्रवास केला नाहीय पण जर का डावीकडे उभ राहायचा नियम बनवला असेल तर राहवे ना? नाही राहिले आणि एखाद्याला पुढे जायचे असेल तर बाजूला होऊन जाऊ द्यायचे. कमीत कमी वर चढायला तरी सुरुवात करावी. भरत यांनी वर म्ह्टल्या प्रमाणे ऊजवी बाजू रिकामी सोडली तर फलाट रिकामं व्हायला आणखी वेळ लागेल. खरं तर त्या वेळी डाव्या आणि उजव्या बाजूच्या लोकांनी एस्कलेटर वर न थांबता पुढे पुढे जात राहावे. फलाट अजून लवकर रिकामा होईल. एस्कलेटर वर चालल्यामुळे कमीत कमी ५-१० पायर्‍या चढण्या उतरण्याच्या कमी होतील आणि थोडा फार व्यायाम होईल तो वेगळाच. बादवे, मी जिनेच वापरतो शक्य असेल तिथे Happy

<वेळी डाव्या आणि उजव्या बाजूच्या लोकांनी एस्कलेटर वर न थांबता पुढे पुढे जात राहावे> यात पडापडी झाली की भरपूर वेळ वाचेल.

मेट्रो मध्ये खूप घाई अस णार्‍यांसाठी बंजी जंपिं किंवा रॅपलिंगची सोय असावी.

नियम असो वा नसो, खरं तर हाती पायी धड असणार्यांनी जिनेच वापरावेत. > +१
दक्षिण कोरिया मध्ये धडधाकट लोकानी जिने वापरावेत म्हणुन काय उपाय केला ते बघा ( विडियो मध्ये करी जपान म्हटले असले तरी हे कोरिया मध्येच आहे )
https://www.youtube.com/shorts/RnsrJuSyZ_4

>> यात पडापडी झाली की भरपूर वेळ वाचेल.
इतकी वर्षे मुंबईच्या खचाखच गर्दीत कधी पडापडी नाही झाली. ( एल्फिन्स्टन ला झाली ती पूल कोसळला या अफवेने आणि अपवादात्मक). त्या मानाने मेट्रो ची गर्दी कमीच आहे. या सरकत्या जिन्यावर देखील घेतील सांभाळून लोक स्वःताला. ठेवा भरवसा Happy

Pages