पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेट्रो + सध्याचे रस्ते/ रेल्वे असा एकत्र नकाशा कुठे मिळेल का? रेंज हिल / रेंज हिल डेपो/ शिवाजीनगर इ. ठिकाणहुन मार्ग कसा गेला आहे बघायची उत्सुक्ता होती.

लंपन मस्त काम केलंत, मॅपसाठी थॅंक्स.

परवा नवरा म्हणत होता त्याला पुणे स्टेशनला उतरून नळस्टॉपला जाणं बरं पडेल. हा मार्ग सुरू झालाय का.

बहुतेक मेट्रो मार्ग हे जुन्या रेल्वे, रस्त्यावरच आहेत.
------
मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो आडवी छेदून जाते म्हणजे नवीन प्रवास मार्ग.

लंपन .. मस्त प्रवास!
एकदा मेट्रो पिकनिक म्हणून आम्ही गेलो होतो.. मेट्रो थांबल्यावर त्यातून एक कुटुंब उतरत होत.. मुलगी तिसरीत असावी बहुदा.. तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया- आई आपण दुसऱ्या वर्ल्ड मध्ये आलोय का Proud

अंजू ताई झाला आहे सुरू, त्यांना खूपच सोयीस्कर पडेल. रेल्वेने पुणे स्टेशनला उतरले की लागूनच मेट्रो स्टेशन आहे. त्यांना मेट्रो बदलायची पण गरज नाही, निळी लाईन ही एकच लाईन पकडायची (पुणे स्टेशन वरून निळीच जाते) जी त्यांना nalstop ला सोडेल.

थॅंक यु .

स पे त जायचं असेल तर शिवाजीनगर ते मंडई बरं पडेल, शुक्रवार पेठेत पण अगदी बरं पडेल. सासरचे जवळचे नातेवाईक पुण्यात जिथे तिथे आहेत.

मेट्रोने सायकल सह प्रवास एकदम छान झाला, कुठेही गर्दि नाही तिथल्या स्टाफ ने सायकल नेण्यासाठी / तिकिट काढण्यासाठी व्यवस्थीत गाईड केले. एकूण प्रवासा पैकी १४ किमी चे अंतर मेट्रो ने तर ६ किमी चे अंतर सायकलवर
तिकीट रू २५/- फक्त
आता कपड्याचा एक जास्तीचा जोड ऑफिस मधे ठेवला की झाले.

सायकलला परवानगी आहे ?
पहिल्या वेळेला एक काका युट्यूबवर सांगत होते कि त्यांना सिक्युरिटीने प्रत्येक ठिकाणी अडवलं.

सायकलला परवानगी आहे ?>>
पुण्याचे माहित नाही, पण मुंबईच्या लाईन 2A आणि लाईन 7 च्या मेट्रोमध्ये परवानगी आहे, शिवाय डब्यात विशिष्ट stand आहेत ज्यात सायकल उभी पार्क होते, ज्यामुळे जागा जास्त लागत नाही. आणि सायकलसाठी वेगळे कोणतेही चार्जेस नाहीत. आपल्याच तिकिटात सायकल नेता येते.
लाईन १ मध्ये मात्र परवानगी नसावी, कारण डब्यात तशी व्यवस्थाही नाही आणि गेल्या महिन्यात मी projector screen (Length - Approx 6 ft) नेऊ शकतो का ते विचारले तर त्यांनी नाही सांगितले.

सायकलला परवानगी आहे ?<<<< आहे
कुठेही अडवत नाहीत
उलट मदत करतात >>>>>> हे वाचून खूप आनंद झाला. कॅनडातून प्रतिसाद लिहितेय .... इथलं किती सर्वसोयींयुक्त सहज,सोपं साधं मनुष्य जीवन आहे आपल्याकडे का असू नये? असा बाहेर कुठेही फिरताना हा विचार मनात आला नाही असं झालंच नाही ....
आशादायी चित्र!

Bus 6 km साठी 8 ते 10 रुपये तिकीट असेल.
लोकल ट्रेन साठी 5 रुपये तिकीट आहे.
पण मेट्रो साठी 25, रुपये तिकीट .
महाग आहे त्या मुळे गर्दी कमी आहे.
रिक्षा आणि टॅक्सी नी प्रवास करणारेच मेट्रो नी जातील.
बस,ट्रेन चे प्रवासी मेट्रो नी जाणार नाहीत.
मुंबई मध्ये पण तसेच आहे

चांगली गोष्ट आहे. किमान असा पर्याय तरी उपलब्ध आहे की जास्त पैसे देऊन चांगल्या सोई विकत घेता येतात. ज्याला परवडेल तो वापरेल, बाकीचे इतर पर्याय बघतील.

पण मग चांगलं आहे ना.. लोकल आणि बसमधली गर्दी तरी कमी होईल.
पुणे मेट्रोचं वर्णन वाचून आता प्रवास करण्याची उत्सुकता वाढली आहे. वनाज ते गरवारे कॉलेज आणि परत हा प्रवास हौसेखातर केलाय एकदा.

आमच्या इथे गेली चार वर्शे तरी मेट्रोचे बांधकाम चालू आहे. व कधी होईल कोण जाणे परिस्थिती आहे. पण रिक्षावाले घाबरौन आहेत. कमी अंतरासाठी लोके आता मेट्रोच घेतील. कोण रिक्षाने येइल आमचा धंदा बंद होईल असे ऐकले अनेकांकडून. पण ज्येना, बारक्या पोरांना पाळ णा घरात सोडून हपिसला जाणा र्‍या आया व असे स्पेशल गृप ह्यांना आटोच सोयीची होते. आमच्या इथे जॉन्स न स्टेशन होईल बहुतेक.

नवी मुंबईमध्ये बेलापूर-खारघर-पेंदर (तळोजा) ह्या एकमेव मेट्रो मार्गाचे २०११ पासून काम सुरु आहे जी मार्गिका अद्यापही प्रवाश्यांच्या सेवेस उतरली नाही. मात्र गेल्या ३ वर्षांपासून टप्प्याटप्प्यांत ट्रायल सुरु असतांना दिसतात.

मेट्रो बाबत कर्नाटक मध्ये पण वाद झाला होता मेट्रो ही भारतीय रेल्वे chya कंट्रोल मध्ये नको.
कारण राज्यसरकार जास्त खर्च करते .(राज्य सरकार प्लस स्थानिक स्वराज्य संस्था, प्लस राज्याची जमीन )
तेव्हा मेट्रो ही राज्यसरकार च्याच नियंत्रणात असावी.
हा पॉइंट खूप महत्वाचा आहे.
त्या बाबत पण राज्यांनी जागरूक असावे.
दक्षिण भारतातील राज्य जागरूक च असतात.
आपला महाराष्ट्र च भोळा आहे.
दीरघकालीन ह्याचा परिणाम होवू शकतो

Bus 6 km साठी 8 ते 10 रुपये तिकीट असेल.
लोकल ट्रेन साठी 5 रुपये तिकीट आहे.
पण मेट्रो साठी 25, रुपये तिकीट .
महाग आहे त्या मुळे गर्दी कमी आहे.<<<<

मला ऑफिसला जाण्यासाठी २० किमी (एका बाजुने)

बसने
पुणे स्टेशन ते भोसरी - ति. २५/-
भोसरी ते कंपनी शेअर रिक्षा १०/-
प्रवास वेळ १.३० तास

रेल्वेने
घर ते पुणे स्टे. पार्किंग २५/-
रेल्वे ने पुणे स्टे. ते कासारवाडी ५/-
कासारवाडी ते भोसरी १०/-
भोसरी ते कंपनी १०/-
लोकलचा प्रवास २० मी. पण वेटींग टाईम बे भरवशाचा १ ते १.३० तास सुधा लागू शकतात.

घर ते कंपनी दुचाकी ४०/- ते ५०/- रुपये पेट्रोल , वेळ ४५+ मिनीटे

मेट्रोने
घर ते मेट्रो स्थानक - १ किमी - सायकल - ०/- (वेळ ३ / ४ मि.)
मेट्रो स्थानक ते वल्लभ नगर २५/- ( २० मि )
वल्लभनगर ते कंपनी ५ किमी - सायकल - ०/- ( १५ ते २० मि.)
(मेट्रो मधुन सायकल नेता येते त्यामुळे या साठी : फिल गुड : )

बस,ट्रेन चे प्रवासी मेट्रो नी जाणार नाहीत.
मुंबई मध्ये पण तसेच आहे >> नाही. मुंबईत वर्सोवा - घाटकोपर मार्गावर मेट्रो तुफान चालते. मुंबईकर पैसा आणि वेळ ह्यात वेळेला प्राधान्य देतो Happy

मुंबई मेट्रोला माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी पैसे दिले होते.
तर मुंबईच्या नव्या लाईन्स आणि इतर शहरातल्या मेट्रोंना आदरणिय पंतप्रधान मोदीजींनी पैसे दिले आहेत.

मुंबई असेल किंवा पुणे रोज कामासाठी लोक बाहेर जातात.
प्रवास खर्च कमीत कमी असावा ही सर्वांची इच्छा असते.
12 km साठी रोज 40 रुपये खर्च करणे परवडत नाही.
त्या मुळे मेट्रो ला प्रवासी नाहीत.
मुंबई ठाणे 33 km साठी 250 रुपयात महिनाभर किती ही प्रवास करता येतो ट्रेन नी.
एकदाच प्रवास रोज केला तरी दुहेरी प्रवासाचे फक्त 8 रुपये पडतात.
मग 12 km एकेरी प्रवास साठी 40 रुपये कोण खर्च करेल..
मेट्रो आणि वंदे भारत ह्यांचं हेतू समान आहे..
कोणता हेतु त्याचा विचार करा

मुंबई ठाणे 33 km साठी 250 रुपयात महिनाभर किती ही प्रवास करता येतो ट्रेन नी.
एकदाच प्रवास रोज केला तरी दुहेरी प्रवासाचे फक्त 8 रुपये पडतात.
>>

आणि तरीही प्रत्येक बजेटनंतर लोक बोंब मारतातच की रेल्वेचे दर वाढवल्याने किती महाग झाली आहे. प्रवास जवळपास फुकट पाहिजे आणि तरीही रडणे सुरूच.

मुंबईत वातानुकूलित आणि अर्धवातानुकूलित सेवा सुरू झाल्यामुळे सर्वसाधारण सेवांची संख्या कमी झाली आहे. वातानुकूलित गाडीच्या आगे मागे धावणाऱ्या साध्या गाड्यांना तुफान गर्दी असते. तसेच मोठ्या मुख्य रस्त्यांवर मेट्रो मार्ग बांधल्यामुळे खाली रस्त्यांवर प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. पश्चिम महामार्गावरसुद्धा मेट्रो स्टेशनच्या खाली चार पदरी रस्त्याच्या दोन दोन मार्गिका थांबलेल्या ( waiting )रिक्षांच्या ओळींनी भरलेल्या असतात.

महाराष्ट्र ने हे मागास राज्यांना रोजगार पुरवायचे उद्योग करू नयेत.. .मेट्रो पूर्ण राज्य शासनाच्या अधिकारात असेल तर मेट्रो बनवा नाही तर महाराष्ट्र च्या कोणत्याच शहरात मेट्रो नको..फुकट देशभरातील भिकर्यांची संख्या वाढते

>>वातानुकूलित गाडीच्या आगे मागे धावणाऱ्या साध्या गाड्यांना तुफान गर्दी असते. तसेच मोठ्या मुख्य रस्त्यांवर मेट्रो मार्ग बांधल्यामुळे खाली रस्त्यांवर प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. >> तुफान गर्दी कधी न्हवती? तशीच रस्त्यावर कोंडी कधी न्हवती? मुंबईला सर्वांगिण विकास वगैरे सोडून आपल्याला जे परवडतं ते करावं दुर्बल वगैरे घटकांचा विचार सोडून द्यावा कारण मुंबईहे एक्सायरी डेट उलटून गेलंलं शहर आहे. इतकी कोंडी, गर्दी होऊनही पुरेसे तुमच्या आमच्यासारखे खापिसु लोक मुंबई का सोडत नाहीत याचं कारण शोधा. आणि ते इतर शहरं कशी डेव्हलप केली नाही या रडगाण्याच्या पलीकडचे आहे. आपल्या पिढ्यानपिढ्याच्या सायकी मधलं आहे.

Pages