जेरुसलेम - एक शापित देवभूमी - अंतिम.

Submitted by Theurbannomad on 31 May, 2021 - 17:10
jerusalem davi

Bhaag 14 - https://www.maayboli.com/node/79147
Bhaag 13 - https://www.maayboli.com/node/79146
Bhaag 12 – https://www.maayboli.com/node/79103
Bhaag 11 - https://www.maayboli.com/node/79093
Bhaag 10 - https://www.maayboli.com/node/79080
Bhaag 09 - https://www.maayboli.com/node/79064
Bhaag 08 - https://www.maayboli.com/node/79061
Bhaag 07 - https://www.maayboli.com/node/79043
Bhaag 06 - https://www.maayboli.com/node/79000
Bhaag 05 - https://www.maayboli.com/node/78993
Bhaag 04 - https://www.maayboli.com/node/78987
Bhaag 03 - https://www.maayboli.com/node/78979
Bhaag 02 - https://www.maayboli.com/node/78976
Bhaag 01 - https://www.maayboli.com/node/78972

जेरुसलेम शहराच्या अनुषंगाने अरब - इस्राएल आणि त्यातही पॅलेस्टीन - इस्राएल संघर्षाचा इतिहास धुंडाळायचा हा प्रयत्न वाचकांच्या समोर आणताना मला या विषयाचे असंख्य कंगोरे अनुभवायला मिळाले. अरबांच्या आणि ज्यू लोकांच्या आयुष्यात डोकावायची संधी मिळाली. जेरुसलेम येथे प्रत्यक्षात जायची संधी न मिळूनही या शहरात मनसोक्त ' फिरता ' आलं. ज्यू लोकांचा चिवटपणा, लढाऊ वृत्ती, प्रसंगी उफाळून येणारा कट्टरपणा, आपल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी वाट्टेल त्या थराला जाऊन राजकारण करण्याची वृत्ती हे मला पदोनपदी जसं जाणवलं, तसंच अरबांमधला आडमुठेपणा, मुत्सद्दीपणाचा अभाव, एकीचा अभाव, आत्ममग्न वृत्ती हेही मला अनुभवता आलं. जेरुसलेम येथे ज्यू, अरब आणि ख्रिस्ती लोकांनी केवळ आपलं आणि आपलंच एकहाती वर्चस्व असावं या हट्टापायी वर्षानुवर्षे जो काही धुडगूस घातलेला आहे त्यामुळे या देवभूमीत सतत रक्ताचं शिंपण होत राहिलेलं आहे.

आधुनिक काळात या संघर्षातून ख्रिस्ती लोकांनी अंग काढून घेतलं असलं तरी ज्यू आणि अरब मात्र इथे भांडतच राहिले. त्यातून जन्माला आला फक्त आणि फक्त रक्तपात. खरं तर एकाच वेळी वेलिंग वॉलसमोर पठाण करणारे ज्यू, आलं अकसा मशिदीत नमाज पढनारे मुस्लिम आणि चर्च ऑफ द होली सेपल्चर येथे प्रार्थना करणारे ख्रिस्ती असं जगाच्या तीन मुख्य धर्माचं एकत्रीकरण येथे दिसायला हवं...पण ते होणं या शहराच्या नशीबात अजून तरी आलेलं नाही.

इस्राएलमध्ये बिन्यामीन नेतान्याहू सत्तेत आल्यावर त्यांनी आपल्या सुप्रसिद्ध बेमुर्वतखोर स्वभावाला अनुसरून या संघर्षाला अजून खतपाणी घातलेलं आहे. झालं असं, की नेतान्याहू सत्तेत आले ते हमासने केलेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर. त्यांचा लिकुड पक्ष तसाही थोडासा कट्टर. १९९३ साली ओस्लो येथे इस्राएल आणि यासर अराफत यांच्या PLO मध्ये झालेल्या शांतता करारातून या दोन्ही बाजूंनी हिंसाचार थांबवून चर्चेला प्राधान्य द्यावं असा तोडगा अमेरिकेच्या पुढाकाराने निघालेला होता....पण नेतान्याहू यांनी हमास या कराराला जुमानत नसल्यामुळे या कराराच्या वैधतेवरच शंका व्यक्त केली. हमास म्हणजे पॅलेस्टीन नाही, हे माहित असूनही त्यांनी समस्त पॅलेस्टिनी लोकांना हिंसाचारासाठी जबाबदार धरलं.

नेतान्याहू खरं तर १९९३ सालीही पंतप्रधान झाले होते आणि तेव्हा ते बऱ्यापैकी विवेक राखून वागायचे. तेव्हाही अधून मधून त्यांच्या बेमुर्वतखोर स्वभावाची झलक दिसलेली होतीच, पण ती तेव्हढ्यापुरतीच. तेव्हा नेतान्याहू यांचे पूर्वसुरी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांनी सबुरी दाखवून एक योजना रोखून धरलेली होती. इस्राएलच्या ' अरब क्वार्टर ' भागातून वेस्टर्न वॉल टनेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचोळ्या भुयारी मार्गाकडे जाण्याचा रस्ता तयार करण्याची ही योजना पॅलेस्टिनी अरबांना पसंत नव्हती. एक तर त्यांच्या भागातून हा मार्ग त्या भुयारी मार्गाकडे जाणार होता आणि त्या मार्गाच्या पलीकडे ज्यू लोकांचं स्तोत्रपठण करण्याचा मोठा चौथरा होता. भुयारी मार्गाच्या वरच्या भागात मुस्लिम लोकांची दुकानं होती...त्यामुळे त्यांचाही प्रश्न होताच. हे भुयार पॅलेस्टिनींसाठी काहीच महत्वाचं नव्हतं.... पण ज्यू लोकांना मात्र हे भुयार त्यांच्या चौथऱ्याकडे जाण्याचा पुरातन रस्ता असल्यामुळे महत्वाचं होतं.

नेतान्याहू यांनी हा मार्ग तयार करण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखवला आणि दोन्हीकडचे भडक माथ्याचे लोक आपापसात भिडले. वास्तविक या सगळ्याची गरज नव्हती...पण नेतान्याहूच ते. अखेर दोन्ही बाजूंच्या पन्नास-साठ लोकांची आहुती पडल्यावर जेरुसलेमचे दंगे निवळले. त्यानंतर त्यांनी यासर अराफत यांना चर्चेसाठी पाचारण केलं आणि हेब्रोन करार घडवून आणला. या कराराची पार्श्वभूमी समजायला १९९४ सालच्या यित्झाक राबिन आणि यासर अराफत यांच्यातल्या गाझा - जेरिको करारात डोकावून बघावं लागेल...या करारानुसार इस्राईलने पॅलेस्टिनी नेत्यांच्या हाती गाझा आणि वेस्ट बँक भागात राज्यशकट हाकण्याची थोडेफार स्वायत्तता देण्याचं कबूल केलं होतं. पॅलेस्टिनी पोलीस दल स्थापन करून पॅलेस्टिनी लोकांच्या भागात इस्रायली लष्कर आणि निमलष्करी दलांचा हस्तक्षेप काही प्रमाणात कमी करण्याचीही योजना त्यात होती. हेब्रोन करारात इस्राएलच्याच हेब्रोन भागात पॅलेस्टिनी लोकांचा आणि ज्यू लोकांचा भाग स्पष्टपणे आखून पॅलेस्टिनी भागातून इस्राईलने पाय काढून घेण्याचं कलम होतं. पुढे याच कराराचा विस्तृत आराखडा म्हणजे ' वाय रिव्हर मेमोरँडम ' वर एकमत करण्याच्या दृष्टीने नेतान्याहू आणि अराफत एकत्र आले. तिथे मात्र नेतान्याहू यांनो ' थ्री नो'स ' नावाने प्रसिद्ध असलेली तीन कलमं करारात समाविष्ट करण्यासाठी आग्रह धरला. ' इस्राएल गोलान टेकड्या सोडणार नाही, जेरुसलेमवर पूर्ण हक्क फक्त इस्राएलचाच असेल ज्यात कोणतीही तडजोड असणार नाही आणि कोणत्याही पूर्वशर्ती ठेवून करार करता येणार नाही ' ही ती कलमं.

एकीकडे अशा प्रकारे अराफत यांना कात्रीत पकडून नेतान्याहू यांनी हमासवर लक्ष्य केंद्रित केलं. हमासचा जॉर्डनमध्ये आश्रयाला गेलेला नेता खालेद मशाल याची त्यांनी हत्या घडवून आणली खरी, पण त्यात मोसादचे हस्तक पकडले जाऊन नेतान्याहू यांना चर्चेच्या टेबलावर यावं लागलं आणि शेख यासीनसारख्या पाताळयंत्री पॅलेस्टिनी नेत्याला सोडावं लागलं...या सगळ्यामुळे नेतान्याहू यांचं सरकार पुढल्या निवडणुकीत पडलं. लोकांना नेतान्याहू यासर अराफत यांच्या बाबतीत थोडे जास्तच मवाळ वाटले हे विशेष... शिवाय हमासच्या बाबतीत त्यांनी उचललेल्या पावलांमधून शेख यासीनला सोडून द्यायची नामुष्की इस्रायलला सहन करावी लागली याचाही ज्यू लोकांना राग आलाच होता.

पुढे याच नेतान्याहूंनी २००९ साली पुन्हा एकदा निवडणुकीत उडी घेतली. तिथे अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी पॅलेस्टिनच्या निर्मितीला अनुकूल मतं व्यक्त केल्यावर नेतान्याहू संतापले. ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच वातावरण अचानक बदलायला लागलं. नेतान्याहू यांनी पॅलेस्टिनच्या निर्मितीला समर्थन देण्याच्या बदल्यात आपल्या अटीशर्ती समोर ठेवल्या. जेरुसलेम पूर्णपणे इस्राएलच्या ताब्यात असेल , पॅलेस्टिनकडे स्वतःचं सैन्य नसेल, पॅलेस्टिनी लोक त्यांच्या नेमून दिलेल्या सीमारेषांमध्येच राहतील , ' परतीचा मार्ग ' कधीच धरणार नाहीत आणि ज्यू लोकांना मात्र वेस्ट बँक किंवा गाझाच्या ज्यू घेट्टो वस्त्यांमध्ये राहून वस्त्या ' नैसर्गिकपणे ' विस्तारण्याची मुभा असेल या त्यांच्या अटी त्यांच्या पूर्वीच्या पंतप्रधानपदाच्या काळातल्या त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होत्या. अशा सगळ्या वातावरणात ते पुन्हा एकदा निवडून आले आणि आता त्यांच्यातला कट्टरतावादाकडे झुकलेला पण धूर्त पाताळयंत्री राजकारणी जगापुढे येणार होता.

२००९ च्या ऑगस्टमध्ये ते अचानक आपल्या कचेरीतून नाहीसे झाले. अनेकांनी अनेक कयास बांधल्यावर अखेर सत्य बाहेर आलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते थेट मॉस्को येथे रशियन राजकारण्यांशी वाटाघाटी करायला गेले होते - इराणला रशियाने S -३०० जातीची विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकू नये या त्यांच्या मागणीसाठी त्यांनी इराणला मदत करत असलेल्या रशियन तंत्रज्ञांची नावं उघड करण्याचा प्रकार केला होता. पुढे इराणला त्यांनी पदोनपदी लक्ष्य करायला सुरुवात केली.

या सगळ्याच्या आडून त्यांनी इस्राएलमध्ये रमत श्लोमो नावाच्या जेरुसलेमलगतच्या भागात १६०० नवी अपार्टमेंट्स बांधायच्या आराखड्याला मंजुरी दिली. या प्रकाराला ओबामा यांनी विरोध केला खरा, पण नेतान्याहू बधले नाहीत. जेरुसलेम भागात अशा प्रकारे ज्यू लोकांची संख्या वाढवत नेली तर पुन्हा या भागात दंगे पेटतील या ओबामांच्या इशाऱ्याकडे त्यांनी कानाडोळा केला. पण या सगळ्यातून त्यांना जागं केलं ज्यू लोकांनी महागाई वाढल्याच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनांनी...शेवटी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी एकीकडे महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी काही पावलं उचलली आणि दुसरीकडे पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांना पॅलेस्टिनला देश म्हणून मान्यता देऊन तिथून इस्रायली सैन्य परत बोलवायचं लेखी वचन दिलं... आणि या सगळ्या ' पुण्याईवर ' त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन दाखवलं.

२०१३ साली अल्पमताचं सरकार बनवून नेतान्याहू पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि आता त्यांच्यात सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती घर करायला लागली. या वेळी त्यांच्या सरकारात बहुमतासाठी त्यांना टेकू द्यायला आलेल्या हतनूआ , युनाइटेड तोरा जुडाईसम आणि येश अतिद या राजनैतिक पक्षांपैकी पहिले दोन कट्टर ज्यू. त्यांच्यात ज्यू मूलतत्त्ववादी विचारांचा भरणा असलेले राजकारणीच जास्त. त्यांच्या दबावामुळे नेतान्याहू अधिकाधिक आक्रमक होत गेले. पुढे त्याचं कट्टर ज्यू दबावगटामुळे त्यांनी ज्यू लोक बळजबरीने आपल्या वस्त्या पॅलेस्टिनी लोकांच्या भागात वाढवत नेत असल्याच्या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष केलं.

२०१५ साली पुन्हा एकदा सरकार पडल्यामुळे निवडणूक होऊन चौथ्यांदा नेतान्याहू पंतप्रधान झाले. याही वेळी त्यांनी टेकू घेतले ज्यूईश होम, युनाइटेड तोरा जुडाईसम , कुलानु आणि शास या पक्षांचे. या सगळ्यांचा लौकिक अतिउजव्या राजकारणाचा. त्यातूनच नेतान्याहूंनी जेरुसलेमचा पूर्वीचा ग्रँड मुफ्ती आणि कडवा पॅलेस्टिनी ' अमीन अल हुसेनी ' याच्या सांगण्यावरूनच हिटलरने ज्यू लोकांचा नरसंहार केल्याची धडधडीत खोटी आणि इतिहासाचा विपर्यास करणारी विधानं केली. उद्देश काय, तर पॅलेस्टिनी लोकांना हिटलरपेक्षाही वाईट ठरवून त्यांच्या विरोधात ज्यू लोकांची घृणा अधिक तीव्र करायची....अशामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच टीका झाली. जर्मनीच्या चांसेलर अँजेला मर्केल यांनी तर त्यांच्या या कृतीला हिटलरच्या कृष्णाकृत्यांच इतिहासातलं महत्त्व कमी करून त्या नराधमाच्या जागी बळजबरीने पॅलेस्टिनी लोकांना बसवायचं हे हीन कृत्य आहे अशा शब्दात फटकारलं....कारण वास्तविक हुसेनी हिटलरला भेटायच्या पाच महिने आधीच ' होलोकॉस्ट ' सुरू झालेलं होतं.

पुढे २०१७ साली खुद्द नेतान्याहू यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांची चौकशी व्हायला लागली आणि त्यांच्या डोक्यावर अटकेची तलवार टांगलेली दिसायला लागली. कोर्टात खटले उभे राहिले आणि इतिहासात प्रथमतः ज्यू पंतप्रधानाला अटक होणार अशी चिन्ह दिसू लागली. अशा परिस्थितीत कोणताही आत्ममग्न नेता जे करेल, तेच त्यांनी केलं....लोकभावनेला फुंकर घालून आपल्या बाजूला सहानुभूती मिळवायचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आणि ते अधिकाधिक अतिउजव्या कृती करायला लागले.

२०१९ साल उजाडलं तेच कोरोना विषाणूच्या सावटाखाली जगाच्या पाठीवर भल्या भल्या देशांच्या व्यवस्था डळमळीत होऊन. चीनने या विषाणूची माहिती दडपायचा प्रयत्न केला तो त्यांच्याही आणि जगाच्याही अंगाशी आला. त्याच्या आधाराने नेतान्याहू यांनी जमेल तितक्या आवडीने निवडणुका पुढे ढकलून दुसरीकडे कट्टर ज्यू लोकांना मोकळं रान उपलब्ध करून दिलं. आता इस्राएलच्या सीमारेषा कोणत्याही कराराला न जुमानता पॅलेस्टिनी वस्त्यांमध्ये विस्तारू लागल्या. २०२० सालच्या एप्रिलमध्ये अनुकूल वातावरणनिर्मिती होताच नेतान्याहू यांनी पुन्हा निवडणुका घेतला आणि पुन्हा एकदा अल्पमताचं सरकार स्थापन करून दाखवलं. आता ते पाचव्यांदा इस्राएलचे पंतप्रधान झाले होते. एकीकडे विषाणूच्या धोक्यांशी चार हात करण्याच्या उद्देशाने त्यांनी धडाक्याने लसीकरण मोहीम राबवून ' जगाच्या पाठीवरचा मुखपट्ट्यांचा नियम शिथिल केलेला पहिला देश ' म्हणून इस्राएलचं नाव इतिहासात नोंदवून ठेवलं आणि दुसरीकडे पॅलेस्टिनच्या बाबतीत आपलं आततायी आणि दडपशाहीचं धोरण पुढे रेटलं. या संघर्षाने पुन्हा एकदा वातावरण पेटवलं.

या वेळी संघर्षाचे चार कोन होते....इस्राएल - वेस्ट बँक संघर्ष, इस्राएल - गाझा संघर्ष, गाझा - वेस्ट बँक संघर्ष आणि पॅलेस्टिनी अरब लोकांच्यातल्या अंतर्गत बंडाळ्या. एप्रिलमध्ये वास्तविक पॅलेस्टिनी निवडणुकाही होणं अपेक्षित होतं, पण हमास वेस्ट बँकवरही वर्चस्व मिळवेल अशी चिन्ह दिसताच पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. या काळात अमेरिकेत ट्रम्प जाऊन जो बायडेन सत्तेत आले होते, जे ओबामांच्या परंपरेतले असल्यामुळे त्यांचा इस्राएलच्या युद्धखोरीला विरोध होता. ट्रम्प यांनी ओबामांनी महत्प्रयासाने इराणशी घडवून आणलेल्या अण्वस्त्र बंदीच्या करारातून एकतर्फी बाहेर पडत इराणला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडीत पकडायची कृती केली होती, पण बायडेन यांनी पुन्हा जुने सूर आळवल्यावर इराण नव्याने शिरजोर होऊ पाहत होताच...पलीकडे तुर्कस्तानात पुन्हा एकदा खलिफापदाच्या मुकुटावर डोळा ठेवून रिसेप तय्यीप एर्दोगन सत्तेत आले होते. सौदीमध्ये मोहम्मद बिन सलमान इस्रायलशी दोस्ती करू पाहात होता. मुस्लिम जगतात कधी नव्हे ते तीन तीन सांड एकमेकांशी राजकारणाच्या पटावर भिडत होते आणि प्रत्येकाच्या चाली तिरकस पडत होत्या.

अशा विचित्र वातावरणात ठिणगी पडली शेख जर्रा भागात. पूर्व जेरुसलेमच्या या भागात अरब पॅलेस्टिनी बहुसंख्य. तिथेच ज्यू वस्त्या असलेल्या माउंट स्कुपस, माउंट झिऑन, माउंट ऑफ ऑलिव्हस या टेकड्या आहेत...इथेच जेरुसलेम विद्यापीठही आहे. या भागातल्या अरबांना मुस्लिम बहुल भागात घरं देऊन त्यांच्या जागी ज्यू वस्त्या वाढवाव्या यासाठी कोर्टात ज्यू लोकांनी याचिका दखल केली होती. शेख जर्रा भागात अनेक वर्ष नांदणारे पॅलेस्टिनी अरब यामुळे चिडले. १९६७ च्या युद्द्धानंतर पूर्व आणि पश्चिम जेरुसलेम ज्यू अमलाखाली एक झालं तो दिवस - ' जेरुसलेम डे ' या वेळी नेमका रमझानच्या महिन्यात आला. एकाच दिवशी अल अकसा मशिदीत समूहाने मुस्लिमांचं नमाज पठण आणि ज्यू लोकांचं ' सेलिब्रेशन ' कोविड विषाणूच्या संसर्गासाठी अनुकूल वातावरण ठरेल म्हणून दमास्कस गेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल अकसा मशिदीच्या परिसराच्या प्रवेशद्वाराशी जमावबंदी घालून आणि मशीदीतही १०००० पेक्षा जास्त लोक जमू नये असे आदेश देऊन प्रशासनाने यावर तोडगा काढला...

वास्तविक यात कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नसायला हवं, पण पूर्वीच्या अनुभवांमुळे पॅलेस्टिनी लोकांची मनं कलुषित झालेली होती.... पॅलेस्टिनी मुस्लिमांनी या सगळ्याचा भलताच अर्थ काढला आणि त्यांनी आदेश झुगारायचा पवित्रा घेतला.... तब्बल ६०००० मुस्लिम मशिदीच्या परिसरात जमले आणि त्यांना पांगवणाऱ्या पोलिसांवर त्यांनी दगडफेक सुरु केली....अर्थातच दंग्यांना तोंड फुटलं. इस्रायली पोलिसांनी पॅलेस्टिनी नागरिकांना शब्दशः फोडून काढायला सुरुवात केली आणि पॅलेस्टिनी तरुणांनी दगडफेकीसारखी आगीत तेल ओतायची कृती करून वातावरण चिघळवलं. शेख जर्रा याचिकेचा ११ मे रोजी लागणार असलेला निकालही पुढे ढकलला गेला...

हमासने या वातावरणाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने गाझा भागातून इस्राएलच्या अशखलोन,अशदोद, लोड, बीरशेबा आणि चक्क तेल अवीव या भागाला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागली. इस्राएलकडे ' आयर्न डोम ' नावाची अत्याधुनिक प्रणाली आहे, जी क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करू शकते आणि लोकांना सावध करण्यासाठी मोठ्या आवाजात भोंगाही वाजवू शकते. ज्यू नागरिकांनी आपापल्या घरातल्या ' शेल्टर रूम्स ' मध्ये आसरा घेतला. इस्रायली सैन्याने प्रत्युत्तरादाखल भीषण हवाईहल्ला आणि क्षेपणास्त्र हल्ला करून हमासच्या तोंडाला पुन्हा एकदा फेस आणला. हमासच्या गाझा येथील मुख्यालयाला जमीनदोस्त केलं. हमासच्या सहा महत्वाच्या नेत्यांची रवानगी अल्लाच्या वाटेवर करून दिली. आपले रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रणाल्या थेट गाझा सीमारेषेवर तैनात करून इस्राईलने हमासला एकदाच काय ते संपवायचा विडा उचलला....जगाला आधीच कोविड विषाणूमुळे धाप लागलेली, त्यामुळे इस्रायलला रोखणार कोण हाच प्रश्न अरब नेत्यांना पडला.

आजही पॅलेस्टिनच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. नेतान्याहू दिमाखाने पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. हमासच्या नादी लागून पॅलेस्टिनी लोकांनी स्वतःच्या भूतकाळाप्रमाणेच वर्तमानकाळाची आणि कदाचित भविष्याचीही राखरांगोळी करून घेतलेली आहे. जेरुसलेममध्ये ज्यू पोलिसदलाने दमनशाही चालवून अरबांना अक्षरशः दूरवरच्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये हाकलून दिलेलं आहे आणि आता त्यांची दादागिरी हाताबाहेर जायला लागलेली आहे. नाही म्हणायला एर्दोगन यांनी तुर्कीच्या बाजूने पॅलेस्टिनी लोकांची खिंड आंतरराष्ट्रीय पातळीवर लढवायचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे, पण त्यात सहानुभूती कमी आणि सौदीच्या हाती असलेल्या मुस्लिम जगताच्या प्रमुखपदावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचं राजकारण जास्त आहे. अरब देश स्वतःच सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टीन आणि तिथल्या सततच्या कुरबुरींमध्ये नाक घालण्याच्या भानगडीत पडण्यापासून स्वतःला रोखत आहेत, कारण त्यांना संघर्षापेक्षा व्यापक जनाधार मिळवून स्वतःच्या भविष्याची तरतूद करून ठेवायची आहे.

जेरुसलेम शहर मात्र एखाद्या अविचल शांत ऋषीमुनीप्रमाणे नव्याने होणाऱ्या जखमा अंगावर बाळगत कधी तरी आपल्याच भूमीतून निपजलेल्या तीन धर्मांच्या लेकरांच्या मेंदूत प्रकाश पडेल या आशेवर अजूनही तग धरून आहे. कधी काळी लोकांच्या कल्याणासाठी सुळावर चढलेला येशू आणि जेरुसलेम शहर एकसारखंच...फक्त येशूप्रमाणे जेरुसलेम कधी पुनर्जीवित होईल, याची या शहरावर खरं प्रेम करणारे सगळे जण वाट बघत आहेत !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय माहितीपूर्ण लेखमालेसाठी मनापासून धन्यवाद! या शेवटच्या भागात आधीच्या सर्व भागांच्या लिंक्स देऊ शकाल का? म्हणजे मायबोलीवर नसलेल्या लोकांबरोबर संपूर्ण मालिका शेअर करता येईल.

@ जिज्ञासा

How to do it? मला नक्की कळतं नाहीये मी प्रत्येक भागाची हायपरलिंक कशी तयार करू ते...

खूप छान लिहीले आहे. सगळी मालिका आवडली.
नेत्यान्हू ची पण छान माहिती दिलीत.

एखादी मालिका 2012पासून सिरीया मधिल परिस्तिथी वर लिहा.

Theurbannomad, प्रत्येक भागाचा क्रमांक लिहून त्यापुढे URL पेस्ट केलीत तरी चालेल. पहिल्या (अजून संपादन करता येत असेल तर) किंवा शेवटच्या भागात हे केलेत तर मग तो एकच भाग शेअर केला की सगळ्या भागांच्या लिंक्स मिळतील. उदाहरणार्थ -
भाग १: https://www.maayboli.com/node/78972
याशिवाय तुम्ही ॲडमिनना लेखमालिका बनवण्याची विनंती करू शकता. तसं झालं तर मग छानच.

@ जिज्ञासा

प्रत्येक भागाची ही लिंकच कशी करायची ते मला माहित नाही. त्यांचं setting कुठे आहे?

Theurbannomad, प्रत्येक भाग उघडल्यावर browser च्या address bar मध्ये जी लिंक असते तीच कॉपी पेस्ट केली आहे मी इथे. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे असं मला वाटतं.

ओह संपली मालिका. हा भाग वाचायचा शिल्लक ठेवतो. आधीचे काही सुटलेले भाग क्रमाने वाचत मग हा शेवट वाचेन

जिज्ञासा म्हणत आहेत तसे सोप्या पद्धतीने या भागात सर्व लिंक्स देऊ शकता.
मलाही काही जणांशी हि लेखमाला शेअर करायची ईच्च्छा आहे.

खूप शिकायला मिळालं ह्या लेखमालेतून्, लेखनशैली पण खूप वस्तूनिष्ठ आहे, वेग्वेगळ्या विषयांवर कृपया लिहित जाल का? वाचायला आवडेल..

छान झालीये लेखमाला... सुरुवातीला वाटलं होतं, की अरबस्तानचा इतिहासच पुन्हा रिपीट होईल की काय... पण नंतर मुळ मुद्द्यावर आल्यावर रोचक झाली Happy

अजून एक प्रश्न् पडला...तो म्हणजे, या सर्व भागांत कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात...?
हिब्रू, अरेबिक, पर्शियन...?

इतके भांडखोर असले तरी त्यांची मूळ भौगोलिक पार्श्वभूमी समान असल्याने भाषा, भूषा, भोजन, व्यवसाय, रहाणी, कला ....या सर्वांत काहीतरी तर समान सूत्र असेल ना?
काय इतके भांडत बसायचे !! ........... शेवटी मानवता महत्वाची नाही का?

मस्त मालिका आता रोमन एंपायर वर लिहा. जेरुसलेमचा ज्यूज चा इतिहास व रोमन एंपायर लिंक्ड आहे. एकाच घटनेचा दोन बाजूनी विचार करता येतो. व्हेस्पेशिअन चा ज्यु मंदिरावर हल्ला हेतर जबरद स्त प्रकरण आहे.

मस्त झाली लेखमालिका. खूप माहिती मिळाली. एक सुचवू का? जगात एव्हढे देश आहेत. त्यातल्या काही देशांच्या जन्माच्या कथांवर एक मालिका करू शकाल का? इथे सौदीबद्दल आणि इस्त्रायलबद्दल लिहिलंत तसं. ही माहिती इंटरनेटवर मिळेलही. पण एका ठिकाणी वाचायला मिळाली तर मस्तच.

>>खूप छान झाली आहे मालिका<< +१
इझ्रेल आणि जेरुसलेम माझ्याकरता अतिशय इंट्रिगिंग देश/शहर आहेत. या देशा/शहराच्या ऐतिहासीक जडण-घडणीचा घोषवारा लेखात झालेला आहेच, पण माझा इंटरेस्ट थोडा वेगळा आहे. बिगरी पासुन, माझ्याबरोबर बाक शेअर करणारा माझा एक शाळकरी मित्र त्याच्या कुटुंबासहित, आम्हि साधारण ४-५वीत असताना इझ्रेलला मुव झाला. त्यानंतर त्याचा काहि पत्ता नाहि. आता टेक्नालजीच्या सहाय्याने त्याला शोधुन, इझ्रेलला भेट देण्याचा माझा मानस आहे, बघुया कधी योग येतो ते...

खूप अभ्यासपूर्ण लेखमालिका. यातला काही भाग इतरत्र इंग्रजीत वाचला होता. एका इस्रायली कंपनीत काम केल्यामुळे तेल अविवलाही भेट दिली आहे. ऑफीसातले सहकारी इस्रायली असल्याने त्यांच्याकडून ही (थोडी एकांगी) माहिती मिळत होती. पण गेल्या काही वर्षात तो एकांगी पण थोडासा कमी होतानाही दिसला होता. पण काही माहिती मलाही नवीन होती. इथे सगळे इतके सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद.

लेखमाला प्रचंड आवडली. ज्यू लोकांना इतका त्रास का सहन करावा लागला हा प्रश्न आधी पडायचा. त्याची उत्तरे हळुहळु मिळत गेली. ह्या लेखमालेने अजून माहिती मिळाली.

अरबस्तानाचा इतिहास व ज्यू बद्दल वाचताना एक गोष्ट मनात ठसत गेली की हे सगळे धर्म मानव कल्याणाकरता निर्माण केलेले नसून सत्तेसाठी निर्माण झालेले पक्ष आहेत. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात जसे भरपूर काही लिहिलेले असते पण प्रत्यक्षात त्यातले काहीही करायचे मनावर घेतले जात नाही तसे ह्या धर्मांच्या जाहीरनाम्यात प्रेम, अहिंसा, करुणा, शांती, सद्भाव वगैरे सगळे लिहिलेले असते पण
धर्मसंस्थापकांसह सगळे हा जाहीरनामा ते सोडून इतरांनी पाळावा याचा आग्रह धरतात आणि हातात तलवारी घेऊन इतर पाळतात की नाही यावर लक्ष ठेवतात Happy :). तीन मोठे धर्म एका जागी उगम पावले ती जागा किती पवित्र व मंगलमय असायला हवी. प्रत्यक्षात तिथे जमणारे सगळे माझा धर्म मोठा व चांगला ही भावना घेऊन जमतात. किती वाईट आहे हे सगळे. हे कुठलेही धर्म नव्हते तेव्हा मानव जास्त सुखी होता का..

इतके भांडखोर असले तरी त्यांची मूळ भौगोलिक पार्श्वभूमी समान असल्याने भाषा, भूषा, भोजन, व्यवसाय, रहाणी, कला ....या सर्वांत काहीतरी तर समान सूत्र असेल ना?
काय इतके भांडत बसायचे !!

>>>>>>

भावकीतलीच भांडणे कट्टर असतात Happy

आज इझ्रेलच्या पार्लमेंटमधे नेतन्याहु यांच्यावर निसटता विजय मिळवुन बेनेट पंतप्रधान झाले. इझ्रेल सारख्या सतत युद्धाच्या ऐरणीवर असणार्‍या देशाकरता नेतन्याहु यांच्यासारखंच नेतृत्व हवं, बेनेट त्यांच्याच मंत्रीमंडळातले पण ते आता नेतन्याहु यांचा वारसा पुढे कसा नेतील, किंवा त्या टापुत शांतता प्रस्थापित करु शकतील का, तेहि कडबोळं सरकार घेउन, हे पहाणं रोचक ठरणार आहे...