जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०३

Submitted by Theurbannomad on 17 May, 2021 - 14:42

अब्राहम जसा तीन धर्मांचा आद्यपुरुष होता , तसा तीन बायकांचा दादलाही होता. जेव्हा तो उर कासिदिम येथून कनानकडे निघाला होता, तेव्हा त्याचं लग्न झालेलं होतं. त्याची बायको सारा ही त्याचीच सावत्र बहीण होती. त्या काळी अशा पद्धतीची लग्न सर्रास होत असत. ही सारा अब्राहमबरोबर त्या सगळ्या खडतर प्रवासात सामील होती. तेव्हाच्या प्रथांनुसार पदरी गुलाम बाळगणं गुन्हा मानला जात नसे. अब्राहमच्याही घरात अनेक गुलाम होते. हेगार नावाची ईजिप्शियन स्त्री त्याची ' खास ' गुलाम होती. ( मुस्लिम धर्मिय मात्र तिला गुलाम नाही, तर अब्राहमची दुसरी बायको मानतात. )

अब्राहम वयाच्या ७५-७६ व्या वर्षी कनान येथे आला आणि पुढच्या पाच-सहा वर्षात त्याने तिथे आपलं ज्यू राज्य स्थापन केलं...पण पंच्याऐंशी वय होऊनही त्याला मूलबाळ होऊ शकलं नाही. साराची कूस उजवत नसल्यामुळे ते दाम्पत्य चिंतीत होतं, पण देवदूतांनी त्याला आश्वस्त केलं होतं....नंतर कर्मधर्मसंयोगाने हेगारची कूस उजली आणि अब्राहमला वारस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सवतीला ( तेही गुलाम स्त्री असलेल्या सवतीला ) आपल्याआधी गर्भधारणा झालेली....साराच्या डोळ्यात ही बाब खुपली आणि त्यातून दोघींमध्ये उभा दावा मांडला गेला. हेगार तशाच गर्भार अवस्थेत अब्राहमच्या घरातून निघून गेली, पण वाटेत एका देवदूताने तिला समज देऊन परत पाठवलं. अखेर तिला मुलगा झाला, ज्याचं नाव त्या देवदूताच्या आदेशानुसार ' इश्माएल ' ठेवलं गेलं.
पुढे देवदूताच्या आश्वासनानुसार सारासुद्धा गर्भार राहिली. अब्राहम या वेळी ९९ वर्षाचा होता. साराच्या मुलाचं नाव ' आयझॅक '. अब्राहमची तिसरी बायकोसुद्धा गुलाम स्त्रीच होती, जिचं नाव होतं केतुरा. आयझॅकच्या जन्मानंतर या केतुरापासून अब्राहमला अजून सहा मुलं झाली.

इतका मोठा कुटुंबकबिला म्हणजे कुरबुरी आल्याच....यहोवा देवतेचा आशीर्वाद मिळालेला आद्यपुरुष असला तरी अब्राहम कुटुंबकलहापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकला नाही...त्याचा वारसदार कोण होणार यावरून पुन्हा तंटे सुरु झाले. इश्माएलकडून एकदा आयझॅकची थट्टा काय झाली, प्रकरण इतकं विकोपाला गेलं की अब्राहमने आपल्या दोन्ही अर्धांगिनींना एकत्र आणलं आणि त्यांच्याशी निर्वाणीची भाषा करून पाहिली. त्यातून निष्पन्न इतकंच झालं, की हेगार आणि इश्माएल यांची बीरशेबा प्रांतात ' पाठवणी ' करून झाली.

काहीही झालं, तरी इश्माएल अब्राहमचा वंश होता...तेव्हा त्यालाही राज्यसत्ता मिळणार होतीच....यहोवाचं तसं भाकीतच होतं...परंतु अब्राहमचा वारसाहक्क मात्र यहोवाने आयझॅकला दिलेला होता. दोघे भाऊ आपल्या आयांप्रमाणे एकमेकांचा द्वेष करत नव्हते, अन्यथा त्यांच्यातच तलवारीची भाषा बोलली गेली असती....अब्राहमच्या अंतिम क्षणी त्याच्या दफनच्या वेळी ते दोघे उपस्थित होते.

पुढे आयझॅक ज्यू धर्मियांचा झेंडा हाती घेऊन साम्राज्यविस्ताराला लागला. त्याचे सावत्र भाऊ आजूबाजूच्या लहानमोठ्या प्रांतांचे सुभेदार झाले. इश्माएलने आपल्या आईच्या संमतीने एका ईजिप्शियन स्त्रीबरोबर संसार थाटला आणि असिरिया - इजिप्तच्या सीमाभागाच्या प्रांतांमध्ये त्याने आपलं बस्तान बसवलं. त्याची १२ मुलं या भागातल्या छोट्या छोट्या प्रांतांची सर्वेसर्वा झाली. आयझॅकचे पुढचे वंशज म्हणजे जगबुडीतून निवडक पशू - पक्षी आणि मनुष्यांना वाचवणारा नोआ....पुढे ख्रिस्ताच्या जन्माच्या १००० वर्षं आधी ज्यू राजा डेव्हिड याने जेरुसलेम आणि आसपासच्या परिसरात ज्यू साम्राज्याची स्थापना केली. त्यानेच यहुदी धर्माच्या पहिल्यावहिल्या महाप्रचंड मंदिराची मुहूर्तमेढ रोवली आणि हे प्रचंड मंदिर पुढे चार शतकं ज्यू धर्मियांचं तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झालं. साधारण ५८६ बी.सी.मधे त्यावर परकीय शत्रूंनी आक्रमण करून यहुदी लोकांच ते पवित्र मंदिर उध्वस्थ केलं. तिथे वसलेल्या ज्यू (यहुदी) लोकांना कैदेत टाकलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले. ५० वर्षानंतर यहुदी लोकांना पर्शियन राजा सायरस ने पुन्हा जेरुसलेम ला येऊन आपलं मंदिर उभारण्याची मुभा दिली. त्या नंतर अलेक्सझांडर दि ग्रेट याने ३३२ बी.सी. मध्ये जेरुसलेम वर ताबा मिळवला. त्यानंतर रोमन, अरब, पर्शियन, इस्लामिक अश्या अनेक राज्यकर्त्यांनी पुढल्या १०० वर्षात आक्रमण करून ताबा मिळवला.

इश्माएलच्या पुढच्या ४० पिढ्यांनंतर ( जवळ जवळ २,६७० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ) सध्याच्या सौदी अरेबियाच्या हेजाझ प्रांतात मक्का येथे मोहम्मद याचा जन्म झाला. मोहम्मद ज्या घरात जन्माला आला ते घर व्यापारी कुटुंबाचं. बानू हाशिम हे त्यांचं घराणं. मोहम्मद यांचे वडील त्यांच्या जन्माआधीच निर्वर्तले होते, तर आई जन्मानंतर सहा वर्षात. त्यांचा सांभाळ केला त्यांच्या आजोबांनी आणि काकांनी. त्यांच्या काळात आसपासच्या प्रांतात वाढलेली आर्थिक विषमता, कमी होत चाललेली माणुसकी आणि भोगवादाकडे वाढत चाललेला लोकांचा ओढा त्यांना अस्वस्थ करत होता. तिशीनंतर त्यांनी हळू हळू विरक्ती पत्करून आसपासच्या डोंगरातल्या गुहांमध्ये बसून ध्यान करायला सुरुवात केली. तिथे त्यांना गेब्रिएल नावाच्या देवदूताने दृष्टांत देऊन जो काही उपदेश केला, तो उपदेश म्हणजेच कुराण. इथेच मोहम्मदांनी एकेश्वरवादाच्या मार्गाने जाणारा आपला वेगळा धर्म - इस्लाम स्थापन केला. मोहम्मद हे अशा प्रकारे ईश्वराचे प्रेषित म्हणून मान्यता पावले.

मोहम्मदांचा संबंध जेरुसलेमशी आला तो ' ईस्रा वल मिराज ' च्या निमित्ताने. देवदूतांनी त्यांना मक्केहून जेरुसलेम येथे नेलं आणि तिथल्या अल अकसा मशिदीच्या परिसरातून त्यांना देवदूताने स्वर्गाचं दर्शन करवून आणलं. त्या नंतर अनेक वर्ष मुस्लिम आणि यहुदी समाजासाठी जेरुसलेम हे अतिशय पवित्र स्थान म्हणून मानलं गेलं. यहुदी आणि मुस्लिम धर्माचे लोक इकडे हजारो च्या संख्येने येत राहिले.वर सांगितलं त्या प्रमाणे यहुदी लोकांच मंदिर जेरुसलेम मधे सगळ्यात आधी होतं असं इतिहास सांगतो. रोमन लोकांनी ७० ए.डी. मधे हे मंदिर उध्वस्थ केलं. ज्याची एक भिंत आज फक्त शाबूत आहे. त्यामुळेच यहुदी लोकांसाठी ती खूप पवित्र आणि धार्मिक आहे. त्याच जागेवर शेकडो वर्षांनी अल अकसा ही मशीद बांधण्यात आली.याच मशिदीच महत्व मुस्लिम धर्मातील लोकांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाचं आहे. इकडेच ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असं पवित्र थडग्यांच चर्च आहे. अशा प्रकारे जेरुसलेमची फक्त ३५ चौरस किलोमीटर भागात पसरलेली ही जागा तीन धर्मांसाठी अतिशय महत्वाची आहे...आणि म्हणूनच या जागेचा ताबा मिळवण्यासाठी तिन्ही धर्मियांमध्ये अनेक वर्षांपासून झटापटी सुरु आहेत.

ज्यू धर्मियांना आपल्या पवित्र भूमीतून परागंदा कशा पद्धतीने व्हावं लागलं, त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या हत्येचा कलंक कसा लागला आणि ज्यू - मुस्लिम - ख्रिस्ती धर्माचा तिढा पुढे कसा गुंतत गेला हे पुढच्या प्रकरणात...तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान माहिती.
हे इतकं जुनं काहीच माहिती नव्हतं...
तेव्हा देवदूत असे सर्रास रस्त्याने फिरायचे वाटतं...?

Happy
पण तुम्ही लिहीत राहा....छा न लेखमाला!

अल अकसा मशिदीच्या परिसरातून त्यांना देवदूताने >>>>>> आब्राहमचा वंश इस्माईल. त्याच्या ४०व्या पिढीतील मोहम्मद.म्हणजे त्याचा मूळ धर्म यहुदीच.पण अडीच हजारापेक्षा जास्त कालौघात मूळ धर्माच्या रुढी,परंपरा बदलल्या गेल्या.
रोचक वाटतेय वाचायला.

@ आंबट गोड
बायबल, तोरा , कुराण आणि तत्सम सगळ्या ग्रंथांमध्ये हे लिहिलेलं आहे.. तेव्हाचे पुराणपुरुष इतके दीर्घ काळ कसे जगले हेही आश्चर्यच! आणि वयाच्या ९९ व्य वर्षी त्यांना मुलं कशी झाली हे दुसरं आश्चर्य.

@ देवकी
धर्म ही संकल्पना तेव्हा फार वेगळी होती. धर्माचा एका विशिष्ट देवाला पूजणारे आणि त्या देवाने दिलेल्या चालीरीती - शिकवणुकी पाळणारे लोक इतका मर्यादित अर्थ होता. तेव्हाच्या लढाया धर्माच्या मुद्द्यावरून नव्हे तर साम्राज्य विस्ताराच्या कारणासाठी होत होत्या. पुढे वेगवेगळ्या साम्राज्यान्नी विशिष्ट धर्म स्वीकारल्यावर धार्मिक लढायांना ' क्रूसेड ' च स्वरूप आलं.

तसे तर आपलेही श्रीकृष्ण , भीष्म वगैरे भारतीय युद्धाच्या वेळी 140 वर्षांचे होते असे उल्लेख आहेत .....
पण यांचे देव इतके डायरेक्ट बोलायचे तसे आपले मात्र त्यामानाने बरेच दुष्प्राप्य म्हणायचे......!!