जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ८

Submitted by Theurbannomad on 25 May, 2021 - 14:10

एकोणिसाव्या शतकात युरोपीय महासत्तांनी आशिया, आफ्रिका आणि अरबस्तानाची आपापसात वाटणी करून घेतली होती. अरबस्तान आणि लेव्हन्ट भागात तेव्हा अनेक साम्राज्य आपल्या शेवटच्या घटका मोजत होती. ऑटोमन आणि पर्शियन साम्राज्य युरोपीय महासत्तांनी अंकित झालेली होती. युरोपियन महासत्तांनी जागोजागच्या प्रांतात तयार झालेल्या स्वयंभू सुभेदारांना आधी फूस लावली, त्यांना आपापल्या साम्राज्याच्या विरोधात भडकावलं आणि त्यांच्यातल्या साठमाऱ्यांमध्ये आपले हात धुवून घेतले. जिथे कोणी नव्हतं, तिथे त्यांनी आपली प्यादी आणून बसवली. अखेर या विस्तीर्ण भूभागावर युरोपियन साम्राज्यवाद्यांनी आपला अंमल बसवला.
या सगळ्यात आघाडीवर होते ब्रिटिश आणि फ्रेंच. एकमेकांना सतत पाण्यात बघणारे, एकमेकांशी सतत स्पर्धा करणारे पण वेळप्रसंगी आपल्या फायद्याचा वास आला तर एक होऊन इतर युरोपीय स्पर्धकांना मागे रेटणारे हे दोघे सांड पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात गेले सुएझच्या कालव्याच्या प्रकरणामुळे. फ्रेंच अभियंते आणि इजिप्तमधले फ्रेंच राजनैतिक अधिकारी असलेले फर्डिनांड द लेसेप्स यांनी आपल्या फावल्या वेळात जुन्या हस्तलिखितांचा अभ्यास करायला सुरुवात केला. त्यात अनपेक्षितपणे त्यांना पुरातन काळात इजिप्तच्या फारो राजाने तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडणारा कालवा तयार केल्याचा उल्लेख सापडला आणि त्यांच्या डोक्यात ही कल्पना घर करून गेली. तेव्हाच्या इजिप्तच्या सर्वेसर्वा मुहम्मद अली पाशा याच्या मुलाला - सैद पाशाला त्यांनी ही कल्पना सांगितली आणि या दोघांनी मिळून फ्रांस - इजिप्त या दोन देशातल्या अनेक धनदांडग्यांना हाताशी धरलं. शेवटी फ्रेंचांनी ९९ वर्षांसाठी कालव्याचा हक्क आपल्या पदरात पडून घेऊन कामाला सुरुवात केली.
या सगळ्याकडे चरफडत बघणाऱ्या ब्रिटिशांनी पुढे एक धूर्त व्यापारी खेळी केली. कालव्यात तिजोरी रीती केल्यावर पाशा पुरेसा खंक झाला आहे हे बघून त्यांनी इजिप्तच्या लांब धाग्याच्या कापसाची खरेदीच बंद केली. पाशाला पैशांची चणचण भासू लागल्यावर त्याने ब्रिटिशांना त्यांच्या कृतीबद्दल जाब विचारला. ब्रिटिशांनी साळसूदपणे कालव्याचे ४०% समभाग आपल्या पदरात पडून घेतले आणि त्याच्या मूल्याइतके पौंड पक्षाच्या तिजोरीत भरून त्याला पुन्हा एकदा गब्बर केलं. या सगळ्यामुळे फ्रेंच चांगलेच संतापले आणि दोघा महासत्तांमध्ये चांगलाच बेबनाव निर्माण झाला. इतका, की त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरु झाली.
या सगळ्यात ब्रिटिशांकडून आघाडीवर होते पंतप्रधान बेंजामिन डिझरेली. हेमूळचे ज्यू, त्यामुळे ज्यू वर्तुळात चांगली उठबस असणारे...पण राजनैतिक आघाडीवर आपल्या महत्वाकांक्षेला पूर्णरूप द्यायला त्यांनी ख्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा स्वीकारलेला होता. त्यामुळे ख्रिस्ती लोकांशीही त्यांची चांगली घसट होती. त्यांना साथ मिळाली रॉथशिल्ड कुटुंबाची...हे कुटुंब युरोपमधलं बँकिंगच्या क्षेत्रातील बलाढ्य नाव होतं. अर्थातच हे कुटुंब ज्यू होतं.
पुढे या ब्रिटिशांनी पाशाच्या विरोधात इजिप्तमध्ये वातावरण तापवून त्यालाही पदच्युत केलं. त्याच्या मुलाला गादीवर बसवून त्यांनी ' सैन्य ' आणि ' तिजोरी ' सोडून बाकी सगळं कारभार करण्याची ' स्वायत्तता ' त्याच्या पदरात टाकली आणि फ्रेंच साम्राज्याचा इजिप्तवरचा वरचष्मा संपला.
फ्रेंचांनी सुएझच्या कालव्याच्या मुखाशी उभा करण्याच्या उद्देशाने तयार केलेला ' स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ' त्यांनी या सगळ्या प्रकारामुळे खट्टू होऊन थेट अमेरिकेच्या पदरात घातला - भेट म्हणून. पण या प्रकारानंतर एकमेकांच्या अहंकाराला शमवण्याची जी स्पर्धा युरोपीय सत्तांमध्ये सुरु झाली, त्यात शकलं पडली आफ्रिका आणि अरबस्तानच्या भागांची. याची सुरुवात झाली ब्रिटिशांकडूनच - त्यांनी मोरोक्को देशाचा भूभाग फ्रेंचांना ' आंदण ' दिला - कसा, तर तिथे फ्रेंचांची निरंकुश सत्ता त्या देशावर स्थापन करण्यासाठी आपण मदत करू हे आश्वासन देऊन. तिथे आधीपासून स्पॅनिश लोकांनी किनारी भागात बस्तान बसवलं होतं...कारण जिब्राल्टरच्या चिंचोळ्या समुद्रधुनीच्या एका बाजूला मोरोक्को तर दुसऱ्या बाजूला स्पेन....या दोन्ही महासत्तांनी स्पेनला व्यवस्थित डावलून आपले मनसुबे सफल केले. मोरोक्कोच्या बाजूचा अल्जेरिया आधीपासूनच फ्रेंचांचा होता. पण ब्रिटिश मुरलेले राजकारणी....इतक्या महत्वाच्या सामुद्रधुनीवर फ्रेंचांचा वरचष्मा राहायला नको हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी मुद्दाम ही खेळी केली होती, कारण या प्रकारामुळे इटली आणि जर्मनी भडकले. युरोपचा व्यापारी मार्ग या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून जात असल्यामुळे सगळ्यांचा जीव तिच्यात अडकलेला होता.
अखेर हे सगळे वसाहतवादी देश आणि अटलांटिकपलीकडून आलेली अमेरिका असे सगळे जण टेबलवर बसले आणि त्यांनी मोरोक्कोवर फ्रेंचांचा ताबा मान्य केला. जर्मनी या सगळ्यामुळे बिथरला आणि त्यांनी थेट ऑटोमन साम्राज्याशी घसट वाढवून पुढे अनेक उचापती केल्या. या सगळ्याचा थेट संबंध भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशांशी येत असल्यामुळे तिथले अनेक प्रदेश या साठमारीत भरडले गेले. त्या प्रदेशांमधला एक होता पॅलेस्टिन आणि तेव्हा या प्रदेशावर वर्चस्व होतं ऑटोमन साम्राज्याचं.
पुढे झिओनिस्ट चळवळ युरोपमध्ये आकाराला येऊ लागली आणि या भागाचं समीकरण पुन्हा एकदा डळमळीत होऊ लागलं. जगभरातल्या ज्यू लोकांना आपला हक्काचा देश आपल्याच पवित्र कनानच्या भूमीत आकाराला यावा अशी स्वप्नं पडू लागली ती पहिल्या जागतिक ज्यू परिषदेमुळे. हा काळ विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचा. या काळात एकीकडे लोकशाहीचं वारं बऱ्याच देशांमध्ये वाहायला लागलेलं आणि दुसरीकडे इस्लामी जगताच्या खलिफापदाचा मान मिरवणाऱ्या ऑटोमन साम्राज्याची शेवटची घटका जवळ आलेली. रशियात राज्यक्रांती झाली ती बोल्शेविकांच्या हातात सत्ता देऊन विसावली. ते लोण पुढे चीनमध्ये जाऊन तिथे प्रस्थापित राजघराण्याविरोधात जात सन यत् सेन यांनी साम्यवादी विचारसरणी जवळ केली. युरोपमध्येही राजेशाही नावाला उरलेली....पण अचानक ऑस्ट्रिया - हंगेरीचा आर्चड्यूक फ्रांस फर्डिनांड याचा सारजेवो येथे खून झाला आणि पहिल्या महायुद्धाच्या तुताऱ्या फुंकल्या गेल्या.
या युद्धात धनाढ्य ज्यू व्यापाऱ्यांची महती समस्त युरोपला कळली. युद्धात लागणारा पैसा , शस्त्रास्त्र, रसायनं , तंत्रज्ञान अशा सगळ्या आघाड्यांवर ज्यू लोकांच्या कंपन्या युरोपीय सत्तांना टेकू देत होत्या. या धनाढ्य ज्यू लोकांमध्ये अनेक जण ' एरेट्झ इस्राएल ' च्या स्वप्नाने भारलेले होते. त्यांनी या सगळ्याच्या मोबदल्यात मागणी केली आपल्या स्वतंत्र इस्राएल देशाची. आडून आडून युरोपियन ज्यू आपल्या ' मायभूमीत ' जाण्याच्या उद्देशाने पॅलेस्टिनमध्ये आपली संख्या वाढवत होते. त्यांनी आपल्याकडच्या पैशांच्या मोबदल्यात पॅलेस्टिनी अरबांकडून जमिनी विकत घेतल्या. त्याही सलग. एकदा जमिनी मिळवल्या की तिथे ते आपली घरं बांधायचे, आपल्या वस्त्या उभारायचे आणि त्यात ज्यू लोकांव्यतिरिक्त कोणीही घुसणार नाही याची काळजी घ्यायचे.
पण काही वर्षातच हिटलरच्या रूपाने ज्यू लोकांचा कर्दनकाळ जर्मनीमध्ये अवतरला. त्याला साथ मिळाली अमीन अल हुसेनी या आग्यावेताळाची. हा पॅलेस्टिनी अरब कडवा राष्ट्रवादी विचारांनी भारलेला...आणि त्यात त्याचा वंश थेट मोहम्मद पैगंबरांशी नातं सांगणारा असल्यामुळे हा जेरुसलेमचा मुफ्तीही होता. त्याचा झिओनिस्ट चळवळीला कडवा विरोध. या दोघांनी मिळून ज्यू लोकांचा जो नरसंहार केला, त्यामुळे जगभरात ज्यू लोकांविषयी अचानक प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. लाखो ज्यू ' होलोकॉस्ट ' च्या नृशंस हत्याकांडात मेले असले, तरी त्या निमित्ताने युरोपभरातून ज्यू लोकांचा लोंढा जेरुसलेम आणि पॅलेस्टिनच्या दिशेला वळला.
या सगळ्या गोंधळात भर घातली सदानकदा वेगवेगळ्या देशांमध्ये / धर्मांमध्ये / जातींमध्ये ' घोळ ' घालत आपल्या सत्तेचा खुंटा बळकट करणाऱ्या ब्रिटिशांनी, ब्रिटिशांहून चिवट आणि दडपशाही गाजवण्यात पुढे असलेल्या फ्रेंचांनी आणि दूर अटलांटिक पल्याड राहून सगळ्या विश्वावर सत्ता गाजवणाऱ्या अमेरिकेने. दोन महायुद्धात ऑटोमन साम्राज्याची अखेर झालीच, पण केमाल पाशा यांनी आपणहून खिलाफत गुंडाळून मुस्लिम जगताच्या नेतृत्वाची पोकळी निर्माण केली. ती जागा भरून काढली नव्याने क्षितिजावर उदयाला येत असलेल्या सौदीने. मुस्लिम जगतात मक्का आणि मदिना या दोन जागा अतिशय महत्वाच्या...त्याच अब्दुल अझीझ इब्न सौद याच्या नेतृत्वाखाली सौदी वहाबी फौजांनी आपल्या ताब्यात आणल्या आणि त्यांनी मुस्लिम जगाचं नेतृत्व स्वीकारलं.
ब्रिटिश आणि फ्रेंच ( आणि काही प्रमाणात रशिया ) या सांडांनी मिळून अरब - लेव्हन्ट भागात जो काही घोळ घातला, त्याचं नाव ' साईक्स - पिको ' करार. या करारामुळे या भागात निर्माण झालेली राजकीय सुंदोपसुंदी अजूनही इथे अधून मधून धुमसत असते...पण त्यावर पुढच्या भागात. तोवर अलविदा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेखमाला.
>>ऑस्ट्रिया - हंगेरीचा आर्चड्यूक कैसर विल्यम याचा सारजेवो येथे खून झाला >>
येथे कैसर विल्यम ऐवजी 'फर्डिनांड/ फर्डिनांद असे हवे ना?
कैसर विल्यम प्रशियाचे होते.

@ विवेक
धन्यवाद. चूक दुरुस्त केली.