जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ९

Submitted by Theurbannomad on 25 May, 2021 - 16:31

साईक्स पिको करार हा ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी परस्पर आपापसात बसून केलेला उद्योग. या करारामागचा उद्देश होता आचके देणाऱ्या ऑटोमन साम्राज्याचे तुकडे कशा प्रकारे करायचे आणि कोणकोणते भाग कोणाकोणामध्ये वाटून घ्यायचे. १९१६ सालच्या जानेवारीत , अगदी नाताळच्या मेणबत्त्या विझायच्या आत या करारावर सह्या झाल्या. या करारात वास्तविक इटली आणि रशिया हे दोन भिडूसुद्धा सामील होते...पण त्यांना अरबस्तानच्या वाळवंटात विशेष रस नव्हता. रशियाला भूमध्य समुद्रात उतरायचा मार्ग तेव्हढा मोकळा करून हवा होता , जो मिळाल्यावर त्यांनी पुढच्या वाटाघाटींमध्ये विशेष सहभाग नोंदवलाच नाही. आर्मेनियाचा पश्चिम भाग, इस्तंबूल आणि तुर्कस्तानमधले एजियन , भूमध्य आणि काळ्या समुद्राला जोडणारे जलमार्ग रशियाने आपल्या हातात आणले.
ब्रिटिश आपल्या लौकीकाला साजेशी खेळी इथेही करत होते. एकीकडे त्यांच्या वतीने मक्केचा शरीफ असलेला हुसेन बिन अली याच्याशी सर हेन्री मॅकमोहन वेगळ्याच वाटाघाटी करत होते. शरीफ यांच्या सैन्याने तत्कालीन ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात आघाडी उघडावी आणि ऑटोमन साम्राज्य अस्ताला न्यावं असा ब्रिटिशांचा प्रस्ताव होता.. आणि त्याबदल्यात ते शरीफ यांना त्यांचं अरब साम्राज्य ( मक्का - मदिना या दोन महत्वाच्या स्थळांसकट ) देणार होते. पाहुण्यांच्या काठीने विंचू मारण्याची ही ब्रिटिश कूटनीती. दुसरीकडे याच ब्रिटिशांच्या वतीने मार्क साईक्स त्याच ऑटोमन साम्राज्याच्या वाटणीसाठी फ्रॅन्कवा जॉर्जेस - पिको या फ्रेंच अधिकाऱ्याशी बोलणी करायला बसले होते. आपल्या तीर्थरुपांनी जणू काही हे सगळे प्रांत आपल्याला आंदण दिलेले आहेत या थाटात हे दोघे जानेवारी महिन्याच्या सुखद वातावरणात एका तंबूत टेबलवर या प्रांताचा नकाशा पसरवून बसलेले होते.
सर्वप्रथम पिको यांनी आपल्या हातात निळ्या रंगात बुडवलेला ब्रश घेतला आणि एका फटक्यात भूमध्य समुद्राच्या काठावरच प्रदेश आणि सध्याच्या इराक, सीरिया, पश्चिम जॉर्डन, लेबनॉन या देशांचा प्रदेश निळा केला. मोसूल पासून थेट बेरूत पर्यंतचा आडवा पट्टा त्यांनी आपल्या ' खिशात ' घातला. साईक्स लाल ब्रश घेऊन पुढे आले आणि त्यांनी जॉर्डनपासून थेट आखाती देशांपर्यंतचा भाग लाल रंगात रंगवला. त्यानंतर पाळी आली ती व्यापारी बंदरांची. ब्रिटिशांकडे हैफा, बसरा आणि एडन ही बंदरं होती, आणि फ्रेंचांकडे बेरूत आणि एकर ही बंदरं.त्यांनी आपापसात चर्चा करून या बंदरांमध्ये एकमेकांना मुक्त व्यापार करू द्यायचा निर्णय घेतला. ब्रिटिशांना वास्तविक मोसूल आणि मेसोपोटेमियाचा भाग सोडायची इच्छा नव्हती, कारण तिथे तेल असल्याचे अहवाल त्यांना मिळालेले होते, पण त्यांनी अखेर त्या बाबतीत नमतं घेतलं.
पॅलेस्टिन आणि जेरुसलेम या भागावर दोघांकडून वाटाघाटी झाल्या. ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या नकळत पॅलेस्टिनी अरबांना आणि ज्यू लोकांना एकाच वेळी त्यांच्या स्वतंत्र देशाचं आमिष दिलेलं होतंच...तेव्हा या भागात फ्रेंचांनी नाक खुपसलेलं त्यांना चालणार नव्हतं....पण शेवटी त्यांनी आपल्या स्वभावाला साजेसा निर्णय घेऊन वेळ मारून नेली. जेरुसलेमचा भाग आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली असावा असा या दोघांनी ' निर्णय ' घेतला आणि साईक्स यांनी तात्पुरता पॅलेस्टिनचा प्रश्न बाजूला ठेवला.
पुढे रशियन क्रांतीने बोल्शेव्हिक सत्तेत आले आणि त्यांच्या हाती रशियाच्या प्रतिनिधींनी नेमले या कराराचे दस्ताऐवज पडले. ब्रिटिश आणि फ्रेंचांनी हा करार अतिशय गुप्त ठेवला होता. शरीफ यांना रसद पुरवून ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्याच्या कबरीवर फुलं वाहण्याची पुरेपूर तयारी केली होती...पण बोल्शेव्हिकांनी नेमका हा करार शरीफ यांच्या हाती ठेवला आणि ते खवळले. जे साम्राज्य पुढे माझं होणार, ते या दोघांनी आपापसात आधीच वाटून घेतलेलं आहे हे त्यांना पचायला अवघड गेलं...पण शेवटी त्यांनी रागारागात थेट ब्रिटिशांना जाब विचारला. त्यांनी साळसूदपणे ' हा तात्पुरता करार असून तुम्ही जोवर सत्तारूढ होतं नाही तोवर आम्ही दोन देशांनी या भागात प्रशासकीय व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी तो केला आहे ' अशा पद्धतीच्या भूलथापा त्यांना दिल्या. शरीफच ते....त्यांनी धूर्त ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपला राग आवरला. ब्रिटिशांनी पुढे दमास्कसमध्ये आपल्या फौज घुसवून ऑटोमन फौजांना धूळ चारल्यावर त्यांनी अगदी अगत्याने शरीफ यांना या ऐतिहासिक शहरात पहिलं पाऊल ठेवायचा मान वगैरे दिला. या सगळ्यामुळे हरखून जाऊन शरीफ यांनी आपली सगळी शक्ती ब्रिटिशांच्या मागे उभी करून ऑटोमन साम्राज्य संपवायच्या कार्यात हातभार लावला.
१९०५ साली सातवी ज्यू परिषद भरल्यावर तिथून ज्यू प्रतिनिधी बाहेर पडले, ते थेट मायभूमी मिळवायच्या उद्देशानेच. १९१४ साली सुरु झालेल्या पहिल्या महायुद्द्धापर्यंत एक लाख ज्यू पॅलेस्टिनमध्ये आलेले होते...आणि त्यांनी सलग भूभाग विकत घेऊन तिथे आपल्या वस्त्या - किबुट्झ - उभारलेल्या होत्या. १९१६ साली साईक्स - पिको करार झाला. ऑटोमन साम्राज्य पुढच्या दशकभरात खिळखिळं होऊन गेलेलं होतंच....तेव्हा ज्यू लोकांनी अधिक जोमाने आपल्या लोकांना पॅलेस्टिनी भागात पाठवायला सुरुवात केली. स्थानिक पॅलेस्टिनी इतके कोत्या दृष्टीचे होते, की पैसा मिळाल्यावर त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी विकल्याच, पण तिथे उभ्या राहणाऱ्या किबुट्झ बघूनही त्यांना पुढचा धोका लक्षात आला नाही.
साल १९१७. दोस्त राष्ट्रं पहिलं महायुद्ध जिंकणार याचा अंदाज आता सगळ्यांना आलेला होता. तिथे ब्रिटिश संसदेत डॉक्टर चैम वाइझमान यांनी आपल्या हाताशी धरलं आर्थर बाल्फोर यांना. हे ब्रिटिश सांसद चर्चिल यांचे कट्टर विरोधक. वाइझमान यांनी ऍसिटोन या रसायनाच्या साहाय्याने दारुगोळा बनवायची पद्धत शोधून काढून ब्रिटिशांना ऐन युद्धात मोलाची मदत केली होती. त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल त्यांचा गौरवही झालेला होता. त्यांनी आपलं हे सगळं वजन वापरलं बाल्फोर यांच्या साहाय्याने एक जाहीरनामा तयार करण्यात. खुद्द बाल्फोर यांनी तो संसदेच्या पटलावर मांडला आणि मंजूर करून घेतला. या जाहीरनाम्यात झिओनिस्ट ज्यू लोकांना जेरुसलेम येथे त्यांच्या पवित्र भूमीत ' राष्ट्रीय सदन ' स्थापन करण्याचा हक्क असल्याचं एक कलम होतं. या शब्दाचा अर्थ जाणून बुजून संदिग्ध ठेवला गेला होता.
अशा प्रकारे ब्रिटिशांनी एकीकडे फ्रेंचांबरोबर जेरुसलेम आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली ठेवण्याचा, दुसरीकडे शरीफ यांच्याबरोबर जेरुसलेम त्यांच्या अरब सत्तेचा भाग म्हणून सामील करण्याचा आणि तिसरीकडे स्वतःच्या संसदेत जेरुसलेमला ज्यू लोकांचं ' राष्ट्रीय सदन ' स्थापन करण्याचा गुंतागुंतीचा राजकारणी डाव खेळून या देवभूमीचं भविष्य रक्ताच्या लाल रंगात रंगेल याची तजवीज करून ठेवली. या सगळ्यातून त्यांनी आपली अनेक इप्सित साध्य केली असली, तरी पुढे या देवभूमीवरचा हिंसेचा शाप दूर करण्यात मात्र त्यांना यश आलं नाही.
ज्यू लोकांनी या जाहीरनाम्याचा सोयीस्कर अर्थ लावला असा, की ब्रिटिशांनी त्यांना आपला देश स्थापन करण्याची मुभा दिलेली आहे....आणि त्यानंतर ज्यू लोकांची मायभूमीकडे जाण्याची आस शतपटींनी वाढली. त्यांनी हजारोंच्या संख्येने जेरुसलेम आणि आसपासच्या भागात वस्त्या उभारायला सुरुवात केली. महायुद्ध संपल्यावर शरीफ यांनी आपल्याला मिळालेल्या वचनाप्रमाणे ब्रिटिशांनी आपलं अरब राज्य आपल्याला आखून द्यावं यासाठी भुणभुण सुरु केली. ब्रिटिशच ते....त्यांनी पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला जागून नवे फासे टाकले.
अमेरिकेने पहिल्या महायुद्धात जरी प्रत्यक्षात युद्धभूमीवर उतरून फारसं काही केलं नसलं, तरी त्यांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव सगळ्या साम्राज्यवादी देशांना करून दिली होती. त्यांनी महायुद्धानंतरच्या वाटाघाटी सुरु होताच या युरोपीय देशांच्या छातीत धडकी भरवणारी मागणी केली - अरबस्तान, लेव्हन्ट आणि आखाती भागात लोकशाही स्थापन व्हावी आणि तीही आपल्या देखरेखीखाली, ही ती मागणी. हे ऐकून युरोपीय देश चांगलेच हबकले. ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी आपल्या नुकसानीची गणितं मांडल्यावर त्यांना या मागणीतले धोके स्पष्ट व्हायला लागले.
ब्रिटिशांनी पुन्हा एक धूर्त खेळी केली. त्यांनी सीरिया आणि पॅलेस्टिन एकत्र करून तो भाग वचनपूर्तीची ' सुरुवात ' म्हणून शरीफ यांच्या हाती दिला. फ्रेंच इथे चवताळले...कारण साईक्स - पिको करारानुसार सीरिया त्यांचा असणार होता. ब्रिटिशांनी फ्रेंचांना पटवून दिलं, की या नामधारी राजाला फ्रेंचांच्या अखत्यारीत राहायला लागणार आणि त्या व्यवस्थेच्या आडून लोकशाहीचं झेंगाट आपोआप दूर होणार...तेव्हा फ्रेंचांनी या सगळ्या प्रकाराला होकार दिला. पण ब्रिटिशांना हे व्यवस्थित ठाऊक होतं, की सीरियाच्या भागातल्या अरब लोकांना फ्रेंच जराही आवडत नव्हते. ब्रिटिशांच्या अपेक्षेप्रमाणे शरीफ आपल्या नव्या राज्याच्या सिंहासनावर बसल्यावर तिथल्या जनतेने त्यांच्यावर दबाव आणून फ्रेंच सैन्याशी उभा दावा मांडला. फ्रेंचांनी माशी झटकावी तसा या किडूकमिडूक अरबी सैन्याचा उठाव मोडून काढला आणि शरीफ यांना थेट पॅलेस्टिनला हाकलून दिलं. शरीफ यांच्या दुसऱ्या मुलाने - अब्दुल्लाने आपली फौज जमवून जॉर्डन नदीच्या काठाशी डेरा टाकला खरा, पण फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याशी दोन हात करणं आपल्या आवाक्याबाहेरचं असल्याची खात्री होताच त्याने अखेर नांगी टाकली. तो ब्रिटिशांच्या कानाशी पुन्हा एकदा आपल्या वडिलांना मिळालेल्या वचनांचा पाढा वाचत भुणभुण करत राहिला.
अखेर नव्याने पंतप्रधान झालेल्या सर विन्स्टन चर्चिल यांनी या तिढ्याला सोडवायच्या दृष्टीने पुढाकार घेतला. १९२१ साली कैरो येथे एक परिषद भरली. तिथे चर्चिल यांनी जॉर्डन नदीच्या पूर्वेकडचा भाग शरीफ यांना त्यांचं साम्राज्य म्हणून देऊ केला. सीरिया हातचा गेल्यामुळे शरीफ यांनी पॅलेस्टिन आणि इराक आपल्याला मिळावा म्हणून कटकट सुरु केली. त्यापैकी इराकचा थोडासा भाग त्यांना मिळालाही. मग त्यांनी जॉर्डन नदीच्या पश्चिमेचा भाग मागून पहिला...इथे चर्चिल यांनी कठोरपणे त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. कारण काय, तर या भागात ज्यू लोकांची असंख्य पवित्र स्थानं आहेत...जी शरीफ यांच्या हाती न जावी हा साधा सोपा उद्देश. इथे या सगळ्या वाटाघाटींनंतर जॉर्डन नदीच्या पूर्वेला एक देश अस्तित्वात आला - ट्रान्सजॉर्डन. शरीफ यांना तिथल्या राजेपदावर बसवून चर्चिल यांनी त्यांची बोळवण केली. त्यांनी अब्दुल्लाच्या हाती या भागाची सत्ता देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो अर्थातच मंजूर झाला.
आता पाळी होती शरीफ यांच्या थोरल्याची - फैसल याची. त्याला मिळाला इराकचा भूभाग. हा भूभाग तेलसंपन्न आणि गुंतागुंतीच्या समाजरचनेचा. उत्तरेच्या मोसूल भागात कुर्द, नेस्टोरियन ख्रिश्चन यांचं प्राबल्य. दक्षिण भागात शिया वरचढ. बगदादच्या आसपास सुन्नी आणि या सगळ्यात अधून मधून ज्यू लोकांच्या घेट्टो वस्त्या. फैसल स्वभावाने साधा, अगदीच महत्वाकांक्षा नसलेला. तो आपल्या शब्दाबाहेर नसेल याची ब्रिटिशांना खात्री होती, म्हणून त्याला इराकच्या राजगादीवर त्यांनी बसवलं.
शरीफ यांच्या धाकट्या अली याला सध्याच्या सौदी अरेबियाच्या हेजाझ प्रांताचा सर्वेसर्वा करून ब्रिटिशांनी त्यालाही मार्गी लावला. सौदी अरेबिया अजून अस्तित्वात यायचा होता. इब्न सौद यांची टोळी अजून प्रबळ व्हायची होती आणि शरीफ यांच्या हाती मक्का आणि मदिनेच्या किल्ल्या अजूनही होत्या. अशा प्रकारे आपल्या हाती सगळी सत्ता ठेवून नामधारी राजे म्हणून शरीफ यांच्या कुटुंबियांच्या मार्फत ब्रिटिशांनी अरबस्तानचा कारभार मार्गी लावला - पॅलेस्टिन आणि जेरुसलेम वगळून. तिथे ज्यू लोक प्रचंड संख्येने येत होतेच....
या सगळ्यामुळे जेरुसलेम आणि आसपासच्या भागात दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत इतका असंतोष निर्माण झाला, की त्यावर नियंत्रण ठेवणं ब्रिटिशांनाही जड जायला लागलं. दुसऱ्या महायुद्धाचे लोण जसजसे या भागात पसरायला लागले, तशी इथली समीकरणं पुन्हा बदलली. आता या समीकरणात एक नवा भिडू प्रत्यक्षात उतरणार होता - अमेरिका आणि त्याला इथे आणणार होतं इथल्या जमिनीत भरभरून उपलब्ध असणार तेल. त्यातून संपन्न झालेल्या अरबांकडून आता पॅलेस्टिन या देशाला मान्यता मिळवण्याचे प्रयन्त होणार होते, पण त्या सगळ्यांवर कुरघोडी करत इस्राएल एक देश म्हणून अस्तित्वात येणार होता...पण त्यावर पुढे. तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users