जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग १०

Submitted by Theurbannomad on 26 May, 2021 - 11:52

दुसरं महायुद्ध सुरु झालं ते जर्मनीच्या पुढाकाराने, पण त्याला जबाबदार होते पहिल्या महायुद्धात जेते ठरलेले सगळे देश. त्यांनी जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी आणि त्यांनी जर्मनीचं केलेलं विभाजन या दोन गोष्टी त्या देशाच्या नागरिकांच्या जिव्हारी लागलेल्या होत्या. हिटलरने जनतेच्या मनातल्या रागाला मोकळी वाट करून दिली आपल्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित असलेल्या भाषणांद्वारे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये स्थापन केल्या गेलेल्या ' वायमार रिपब्लिक ' मध्ये - हे सरकार दोस्त राष्ट्रांच्या हातातलं बाहुलं होतं - ज्यू लोकांनी पुष्कळ ढवळाढवळ केली होती. त्यांनी या कुडमुड्या सरकारच्या स्थापनेत पडद्याआडून खूप काही घडवून आणलं होतं. महायुद्धापूर्वीच्या ' प्रशिया ' मधल्या लब्धप्रतिष्ठितांमध्ये तब्बल २४% ज्यू होते...महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८% विद्यार्थी ज्यू होते....या सगळ्यामुळे मूळच्या जर्मन लोकांमध्ये त्यांच्याविषयी राग होताच. महायुद्धानंतर या ज्यू लोकांनी दोस्त राष्ट्रांना पडद्याआडून मदत केली हाही राग जर्मन लोकांमध्ये होता.

हिटलर स्वतः आर्यन वंशाला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्यांपैकी होता. सेमेटिक वंशाचे ज्यू त्याला तसेही आवडत नव्हतेच....तो त्यांच्या वंशाला हीन मानायचा. त्याचं असं ठाम मत होतं, की ज्यू फक्त पैसा आणि प्रतिष्ठा बघतात, देशाभिमान वगैरे त्यांना विशेष महत्वाचा वाटत नाही कारण ते तसेही कोणत्याच देशाचे नाहीत....त्याचा जर्मनीतल्या साम्यवादी विचारांच्या गटांवरही राग होता, पण त्याच्या डोळ्यात खुपत होते ज्यू. या सगळ्याचा विस्फोट झाला ज्यू विरोधात जनमत तापण्यात. महायुद्धाला सुरुवात झाल्यावर हिटलरने या ज्यू लोकांचा वंशसंहार करण्याची मोहीमच हाती घेतली आणि आपल्या एका खास सहकाऱ्याला - रैनहार्ट हेड्रीच याला - फक्त ज्यू लोकांच्या नरसंहारासाठी तैनात केलेला होता. त्याचा उजवा हात होता एडॉल्फ ऐचमन. या दोघांनी गॅस चेंबरसारख्या अमानवी पद्धतीने हजारोंनी ज्यू लोकांची कत्तल केली.

या सगळ्याचा परिणाम असा झाला, की ज्यू लोक हजारोंच्या संख्येने जर्मनीतून इतस्ततः पळाले. त्या सगळ्यांना ओढ होती इस्रायलची. आपल्या हक्काच्या देशाची. महायुद्धात एकीकडे जर्मनी पोलंड, हंगेरी, फ्रांस, बेल्जीयम असे महत्वाचे देश गिळंकृत करत होता आणि दुसरीकडे ब्रिटन या जर्मन लाटेला तोंड देत टिकून होता. हिटलरने आपल्या आततायी निर्णयाने एकाच वेळी रशिया आणि ब्रिटन अशा दोन्ही आघाड्या उघडून आपल्याच पायावर धोंडा पडून घेतला आणि त्याचा विजयरथ भरकटला. अखेर १९४५ साली एकीकडे हिटलरचा पाडाव आणि दुसरीकडे जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने फेकलेले अणुबॉम्ब या दोन महत्वाच्या घटनांनी दुसरं महायुद्ध संपलं.

या महायुद्धाच्या काळात अरबस्तानातही प्रचंड उलथापालथ होत होती. १९२४ साली इब्न सौद यांच्या कडव्या वहाबी फौजेने हेजाझ प्रांतावर चढाई केली. हा प्रांत होता ब्रिटिशांनी शरीफ यांच्या हाती दिलेला...पण इब्न सौद यांच्या फौजा पुढे अरबस्तानात प्रबळ होणार हे ब्रिटिशांनी ताडलं होतं. त्यांनी शरीफ आणि इब्न सौद यांच्यातल्या साठमारीत बघ्याची भूमिका घेतली. शरीफ, अली आणि त्यांचे लोक जिवाच्या आकांताने या भागातून पळून गेले ते थेट भूमध्य समुद्राच्या सायप्रस बेटावर. इब्न सौद यांनी वाळवंटात अशी काही मुसंडी मारली, की मक्का - मदिना या दोन महत्वाच्या जागांसकट हेजाझ , नजद , अल अहसा आणि असीर असे प्रचंड प्रांत त्यांनी आपल्या अमलाखाली आणले. इब्न सौद यांनी आपल्या कुटुंबाच्या नावाने या प्रांताचा मिळून असा एक देश जन्माला घातला - सौदी अरेबिया. या देशाला लगेच ब्रिटिशांनी आणि इतर महासत्तांनी मान्यता दिली. ही घटना १९३२ सालची - म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या सहा-सात वर्षांपूर्वीची.

हे सौदी वाहाबी कट्टर सुन्नी पंथीय. धर्मवेडे आणि हिंस्त्र. तशात त्यांच्या भूमीत भरभरून तेल सापडल्यावर त्यांना अचानक जगाच्या पाठीवर अतोनात महत्व प्राप्त झालं. त्या तेलाच्या वासाने अमेरिका या वाळूत अवतरली आणि स्थिरावली. दुसऱ्या महायुद्धात युरोपीय राष्ट्रं इतकी खंक झाली होती, की त्यांच्याच्याने आपल्या वसाहती सांभाळणंही मुश्किल होऊ लागलं. अमेरिका लोकशाहीच्या बाजूने आपलं वजन टाकणारं राष्ट्रं...त्यामुळे युरोपीय राष्ट्रांना कुरकुरत आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य द्यावं लागलं.

अमीन अल हुसेनी याने दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेरुसलेम येथे बराच हैदोस घातलेला होता. जेरुसलेम येथे ज्यू लोकांचं शिरकाण करण्यासाठी आपल्या भडक भाषणांद्वारे त्याने अनेक पॅलेस्टिनी तरुणांना चिथावलेलं होतं. तशात ब्रिटिशांच्या कूटनीतीत त्याने स्वतःचा धूर्तपणा मिसळून जेरुसलेमच्या अल अकसा मशिदीचा ग्रँड मुफ्ती व्हायची पायरीसुद्धा पार केली. मशिदीच्या घुमटाला सोन्याचा पत्रा लावण्याचं अचाट काम त्याने या काळात पूर्ण केलं. हे सगळं करत असताना त्याने दुसरीकडे ज्यू लोकांची अशी भयानक कत्तल केली की त्याच्यासमोर हिटलर मवाळ वाटेल....१९३७ साली अखेर ब्रिटिशांनी त्याला पकडून तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आणि तो जेरुसलेम येथून थेट बर्लिनला हिटलरकडे पळाला. जर्मनीने बोस्निया देश पादाक्रांत केल्यावर हुसेनीने तिथे ज्यू लोकांच्या वंशसंहारात हिटलरला ' मोलाची ' मदत केली. हिटलरच्या पाडावानंतर हुसेनी फ्रान्सला पळाला ....पण या टप्प्यावर ब्रिटिशांनी जी खेळी केली, ती धूर्तच नव्हे तर कुटीलसुद्धा होती.

त्यांनी या हुसेनीला पुन्हा इजिप्तला पाठवून दिलं. का, तर त्याच्या ' कीर्तीचा ' वापर करून त्यांना आसपासच्या मुस्लिम साम्राज्यांना चुचकारायचं होतं. एव्हाना इब्न सौद यांना हुसेनी आवडायला लागलेला होताच....त्यांनी तेलाच्या मार्गाने येत असलेल्या पैशांचा एक ओघ त्याच्याकडे वळवला. त्याने या पैशांचा वापर करून एक रेडिओ प्रसारण केंद्र आणि वर्तमानपत्र सुरु केलं आणि ज्यू विरोधी विखार ओकत वातावरण पुन्हा तापवलं. या वेळी मात्र ज्यू लोकांनी त्याला आणि त्याच्या बगलबच्च्यांना असा तडाखा दिला, की तो पॅलेस्टिनमधून पळून गेला. असं म्हणतात, की त्याला पॅलेस्टीनचं अरब मुस्लिम प्रजासत्ताक स्थापन करायचं होतं आणि त्यासाठी तो खास कैरोहून जेरुसलेमला आला होता.

इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेने आता आपले पाय चांगलेच ऐसपैस पसरले होते. या संघटनेचा म्होरक्या होता हसन अल बन्ना. सुएझ कालव्याच्या बांधणीच्या काळात युरोपीय महासत्तांच्या हाती इजिप्तचं सरकार ' विकलं ' गेल्यामुळे अरब आणि मुस्लिम यांच्यावर अन्याय झाला आहे, अशी भावना तेव्हाच्या इजिप्तच्या तरुणांमध्ये प्रबळ होत होती. त्यांनी बन्नाला आपली मळमळ बोलून दाखवली आणि १९२७ साली मुस्लिम ब्रदरहूड स्थापन झाली. ही संघटनाही रक्ताची चटक लागलेली. १९४८ साली तत्कालीन इजिप्शियन राजे फारूख यांना ही संघटना इतकी डोईजड झाली की त्यांनी या संघटनेला छाप लावण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्याचा परिणाम इतकाच झाला, की पंतप्रधान नाकारी या संघटनेकडून अल्लाच्या वाटेवर धाडले गेले. याचा परिणाम होऊन इजिप्तच्या लष्कराने आणि निमलष्करी दलाने या संघटनेची अशी काही धरपकड केली, की त्यात हसन अल बन्ना स्वतःच मारला गेला. हे सगळं हुसेनीच्या डोळ्यांदेखत होत असल्यामुळे तोही इरेला पेटला.

या सगळ्या काळात पॅलेस्टिनी भूमीवर ज्यू लोकांचा संघर्ष सुरूच होता. जर्मनीने चेकोस्लोवाकियाचा घास घेऊन रशियाकडे मोर्चा वळवल्यावर जर्मन सेनानी रोमेल याने इजिप्तच्या दिशेलाही एक आघाडी उघडली. आता हा रोमेल पॅलेस्टिनलाही येतो की काय,म्हणून ज्यू घाबरले. ज्यू लोकांनी पहिल्या महायुद्धानंतर ' पाल्माक ' नावाची एक लष्करी सेना उभारली होती. या सेनेद्वारे इस्रायलला येत असलेल्या ज्यू लोकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, त्यांचं आजूबाजूच्या मुस्लिम माथेफिरूंपासून रक्षण करणे, वेळ पडली तर त्यांच्या खाण्यापिण्याची - राहण्याची सोया करणे अशी कामं पाल्माक करत असे. तिचा प्रमुख होता पुढे इस्राएलच्या पंतप्रधानपदी बसलेला यिझताक राबीन. या काळात ब्रिटिशांनी युद्धात अरबांची मदत घेण्यासाठी ज्यू लोकांच्या पुनर्वसनाच्या कामात मुद्दाम अडथळे आणले होते. ब्रिटिश सैन्य पॅलेस्टिनच्या सीमारेषांवर तैनात केलं गेलं होतं. पाल्माक त्या सैन्याच्या तटबंदीतून रात्रीच्या वेळी शिताफीने पलीकडच्या ज्यू निर्वासितांना हळूच ज्यू वस्त्यांमध्ये आणत असत. पुढे ज्यू वस्त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी ' हगाना ' नावाची वेगळी संघटना तयार केली. शिवाय तशाच पद्धतीच्या ' इरगुन ' आणि ' स्टर्न गॅंग ' या दोन संघटनाही तेव्हा तयार झाल्या होत्या. गम्मत म्हणजे, या संघटनांच्या प्रमुखपदी असलेले ज्यू ब्रिटिशांनी लष्करी प्रशिक्षण देऊन तयार केले होते...ही खास ब्रिटिश कूटनीती. दोन्ही बाजूंच्या लोकांना आपापसात भिडवत आपलं इप्सित साध्य करण्याचे हे खास ब्रिटिश डाव....

१९४० साली युरोपमधून ज्यू लोकांना घेऊन हैफा बंदरात एक जहाज आलं. पेट्रीय नावाच्या त्या जहाजात १८०० ज्यू दाटीवाटीने बसले होते. ब्रिटिशांनी हे जहाज बंदरातच अडवून ठेवलं. हगाना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या जहाजात बॉम्ब ठेवला. उद्देश हा, की बॉम्बस्फोट झाल्यावर तरी ब्रिटिश त्या ज्यू लोकांना उतरवून घेतील...पण त्या स्फोटानंतर ते जहाज बुडून १८०० ज्यू लोकांना जलसमाधी मिळाली. याचा परिणाम असा झाला, की कैरोच्या लॉर्ड मोईने या ब्रिटिश उच्चअधिकाऱ्याचा खून पाडून ज्यू लोकांनी त्यांची चुणूक दाखवली.

अमेरिकेत ज्यू लॉबी आता सक्रिय झाली. तिथे डेव्हिड बेन गुरियन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांच्यावर असा दबाव आणला, की त्यांनी ब्रिटिशांना ज्यू लोकांची केलेली कोंडी शिथिल करण्याचे आदेश द्यावे लागले. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अटली यांनी या सगळ्यातून तोडगा म्हणून भलताच प्रकार केला. अमेरिकेच्या बरोबरीने एक समिती नेमून ज्यू लोकांची अवस्था अभ्यासावी आणि त्यातून तोडगा काढावा असा प्रस्ताव त्यांनी अमेरिकेला दिला. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली ज्यू आणि अरबांचं संयुक्त संघराज्य तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण पुन्हा ब्रिटिशांनी त्या कल्पनेला विरोध केला. १९४६ च्या मे महिन्यात पुन्हा त्यांनी ज्यू लोकांना घेऊन आलेल्या जहाजाला परत पाठवून दिलं. अखेर ज्यू लोकांनी ब्रिटिशांना असा काही तडाखा दिला, की त्यांची पळता भुई थोडी झाली. १९४६ च्या २२ जुलै रोजी जेरुसलेम येथे किंग डेव्हिड हॉटेलमध्ये - जिथे ब्रिटिशांनी आपलं लष्करी मुख्यालय थाटलं होतं - दुधाच्या बाटल्यांमधून स्फोटकं नेऊन ज्यू लोकांनी असा काही स्फोट घडवून आणला की ब्रिटिश हादरले. त्यांनी मग मुकाट युनोपुढे ज्यू - पॅलेस्टिन प्रश्न सोडवायचा प्रस्ताव ठेवला आणि आपलं अंग काढून घेतलं.

युनोने आमसभा भरवली आणि ३३ विरुद्ध १३ मतांनी पॅलेस्टिनच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला. पॅलेस्टीनेचे तीन तुकडे पडले. जॉर्डन सीमारेषेपाशी वेस्ट बँक आणि इजिप्त सीमारेषेशी गाझा असे दोन पॅलेस्टिनी अरबांचे प्रांत आणि त्यामध्ये ज्यू इस्राएल अशी वाटणी झाली. ५५% भूभाग मिळाला सहा लक्ष ज्यू लोकांना आणि ४५ % भूभाग मिळाला १२ लक्ष पॅलेस्टिनी अरबांना. हा प्रस्ताव मुळातच होता अन्यायकारक. ज्यू लॉबीने आपल्या आर्थिक ताकदीने हा असा विषम प्रस्ताव पुढे दामटवलेला स्पष्ट दिसत होता. या प्रस्तावानंतर ब्रिटिश सैन्य जिथून जिथून मागे गेलं, तिथे वेगाने सुसंघटित ज्यू सैन्य पसरत गेलं आणि तिथून त्यांनी पॅलेस्टिनी अरबांना हुसकावून लावलं. जेरुसलेम तेव्हढा युनोने आपल्या देखरेखीखाली ठेवला.

१९४८ साली अखेर बाल्फोर जाहीरनाम्याचा आधार घेऊन इस्राईलने आपल्या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली. हे सगळं होत असताना पॅलेस्टिनी लोक हुसेनी आणि मुस्लिम ब्रदरहुडकडे आशेने बघत होते. पलीकडे सौदीच्या इब्न सौद यांनाही हे सगळं खुपत होतं. इराक, जॉर्डन वगैरे भागातले सुन्नी मुस्लिमही या सगळ्या प्रकारामुळे संतापलेले होते...पण ज्यू लोकांनी दुसऱ्या महायुद्धात मिळवलेली सहानुभूती, त्यांच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्यांच्या पाठीशी उभी असलेली प्रबळ राष्ट्रं ( विशेषतः ब्रिटन, फ्रांस आणि अमेरिका ) या सगळ्यामुळे जेरुसलेमसकट इस्रायलची स्थापना झाल्यावर त्याला जागतिक मान्यताही मिळाली. डॉक्टर चैम वाइझमान , डेव्हिड बेन - गुरियन, रुवेन शिलोह अशा रथी - महारथींनी एरेट्झ इस्राएल अखेर अस्तित्वात आणून दाखवलं.

हे राष्ट्र जन्माला आल्या आल्या त्यांना आजूबाजूच्या अरब राष्ट्रांशी चार हात करावे लागलेच. अरबांनी संघटन कौशल्य आणि सुसूत्रता दाखवली असती तर इस्राएल कधीच जगाच्या नकाशातून पुसला गेला असता, पण ते काही होणार नव्हतं....त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रात्री भाग ७ ते १० वाचून काढले. मस्त माहिती मिळतेय. सौदी अरेबियाच्या जन्माबद्दल आधी वाचलं नव्ह्तं.