जेरुसलेम - एक शापित देवभूमी -१२

Submitted by Theurbannomad on 28 May, 2021 - 07:23

यासर अराफत हा माणूस तसा गुंतागुंतीचा. एका बाजूला कॅम्प डेव्हिड करार पूर्णत्वाला नेण्यास अमेरिकेची मदत केल्यामुळे थेट नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारा यासर अराफत दुसरीकडे विमान अपहरण करून खंडण्या वसूल करण्यातही पटाईत होता. त्याने प्रशिक्षित केलेले पॅलेस्टिनी माथेफिरू तरुण जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, इजिप्त आणि पॅलेस्टिनी भागात धुमाकूळ घालत असायचे. आंतरराष्ट्रीय मंचावर पॅलेस्टिनी लोकांचा चेहरा आणि आवाज बनलेला अराफत प्रत्यक्षात आपल्या या प्रतिमेचा वापर आपल्या तुंबड्या भरण्यासाठीही करत होता. त्याने इस्रायलला संपवायची भाषा करून जहाल अरब लोकांमध्ये आपली लढाऊ प्रतिमा जाणीवपूर्वक रित्या तयार केलेली होती.

या अराफतच्या उचापती अनेकांना डोईजड झालेल्या होत्या. सहा दिवसांच्या युद्धात पॅलेस्टिनी अरबांनी माती खाल्ल्यावर त्यांच्या हातून इतकी जमीन निसटली कर निर्वासित पॅलेस्टिनी हजारोंच्या संख्येने आजूबाजूच्या देशात पांगले. त्यापैकी अनेकांनी आपल्या ' अंगभूत कर्तृत्वाने ' त्या त्या देशाच्या सरकारला नाकी नऊ आणले. या बाबतीत पहिला नंबर लागला जॉर्डन देशाचा. इथे जॉर्डन - वेस्ट बँक सीमेच्या भागात निर्वासित पॅलेस्टिनी लोकांनी आपल्या वस्त्या तयार केल्या आणि तिथे त्यांची दादागिरी सुरू झाली. जॉर्डनच्या लोकांना तिथे जायला यायला चक्क ' कर ' द्यावा लागे. एकदा तर तिथे कोणत्यातरी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला गेलेल्या पोलिसाचा शिरच्छेद करून त्या मुंडक्याने हे पॅलेस्टिनी फुटबॉल खेळले होते...शिवाय या भागातून ते सतत इस्राएलच्या कुरापती काढत असल्याने पलीकडून इस्राएल त्याच्या प्रत्युत्तरादाखल अधून मधून अशी जबरदस्त कारवाई करायचे की हा भाग सतत युद्धाच्या सावटाखाली राहायचा. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला या सगळ्याला इतके वैतागले की त्यांनी अखेर एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. अब्दुल्ला यांनी अराफत यांना जॉर्डनच्या उपपंतप्रधान पदाची ऑफर देऊनही त्यांची मस्ती गेली नाही, उलट पॅलेस्टिनी लोकांनी आता उघडपणे जॉर्डनच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसत अब्दुल्ला यांना आपला माज दाखवून दिलं

अब्दुल्ला यांना संधी मिळाली १९७० च्या सप्टेंबर महिन्यात. या महिन्यात पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी तब्बल चार विमानाचं अपहरण करून त्यापैकी तीन जॉर्डनची राजधानी अम्मान येथे उतरवली. तिन्ही विमानांमधून लोकांना उतरवून त्या अतिरेक्यांनी या विमानांना बॉम्बने उडवून दिलं आणि जगभरात त्याचं चित्रीकरण पाठवून दिलं. अराफत यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी या घटनेचा निषेध केला, पण तो तेव्हढाच. राजे हुसेन यांनी मार्शल लॉ पुकारला आणि या पॅलेस्टिनी कटकटीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लष्कराला पाचारण केलं. इजिप्तच्या जमाल अब्देल नासेर यांनी मध्यस्थी केली, पण त्यांचं अचानक निधन झालं आणि पॅलेस्टिनी उघड्यावर पडले. जॉर्डनच्या लष्कराने लगेच कारवाईला सुरुवात करून पॅलेस्टिनी निर्वासितांची न भूतो न भविष्यती अशी कत्तल केली. अरब देशाने अरब निर्वासित लोकांना अशा पद्धतीने मारण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ...पण त्यामुळे पॅलेस्टिनी जॉर्डन मधून जे पाळले ते शेजारच्या लेबनॉनमध्ये विसावले.

पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूती असलेल्या अरबी नेत्यांनाही विशेष काही करता आलं नाही, कारण अतिरेकी कारवाया करून पॅलेस्टिनी लोकांनी आपल्याबद्दलची सहानुभूती गमावलेली होती. शिवाय सगळ्यांनी त्यांच्या माजोरड्या वृत्तीचा अनुभव घेतलेला होताच...सौदी, इराक, सीरिया, जॉर्डन यांपैकी कोणाला हे पॅलेस्टिनी आपल्या घरात नको होते....दूर राहून आपण हवी ती मदत पॅलेस्टिनी लोकांना करू पण ते दूरच राहिलेले बरे असा त्यांचा पवित्रा झालेला होता. या सगळ्यामुळे लेबनॉन उगीच भरडला गेला....

लेबनॉन देश अतिशय सुरेख. भूमध्य समुद्राच्या शेजारचा, आल्हाददायक हवामान असलेला. युरोपला खेटून असल्यामुळे पर्यटन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर व्यापारात खाऊन पिऊन सुखी झालेला. या देशाचा राजनैतिक तिढा मात्र काही और होता. झालं असं, की फ्रेंचांनी या देशातून जायला आधी बरीच खळखळ केली पण अखेर जायचा निर्णय घेतल्यावर एक विचित्र व्यवस्था इथे अस्तित्वात आणली. १९४० ते १९४८ या काळात टप्प्याटप्प्याने फ्रेंच इथून निघाले. लेबनॉन येथे पूर्वीपासूनच अनेक निरनिराळ्या पंथाची आणि धर्मीयांची वस्ती होती. त्यांच्यात राजकीय हक्क समसमान वाटायचा एक जगावेगळा ' फॉर्म्युला ' फ्रेंचांनी शोधला...

राष्ट्राध्यक्ष मॅरोनाईट ख्रिस्ती , पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसदेचा अध्यक्ष शिया मुस्लिम, उपपंतप्रधान आणि संसदेचा उपाध्यक्ष ग्रीक ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती असावा अशी ही विचित्र व्यवस्था. यात झालं इतकंच, की लेबनॉन देशात इतके दबावगट निर्माण झाले की देशाच्या दृष्टीने विचार करून कशावरच एकमत होणं दुरापास्त झालं. अरबांनी या देशावर पॅलेस्टिनी लोकांना शरण द्यायला दबाव आणला...मानवतावादी दृष्टीकोण हे गोंडस कारण देऊन त्यांनी लेबनॉनला भरीस पाडलं आणि इस्राएल - लेबनॉन - सीरिया सीमेच्या भागात पॅलेस्टिनी एकदाचे स्थिरावले. इथेही त्यांनी काही काळाने आपल्या लीला दाखवायला सुरुवात केली आणि लेबनॉन देश पोळून निघाला, तो आजतागायत स्थिरावू शकलेला नाही.

सहा दिवसांच्या युद्धानंतर पुन्हा एकदा अरब इस्राएलचा घास घ्यायला पुढे आले १९७३ साली. या युद्धाला योम किप्पूर युद्ध म्हणतात, कारण इस्राएलचा योम किप्पूर सण सुरू असतानाचा मुहूर्त साधून अरब राष्ट्रांनी युद्धाला तोंड फोडलं. या वेळी अरब अधिक जोमाने आणि संख्येने सरसावले होते. सीरिया, इराक, लेबनॉन, इजिप्त, लिबिया, अल्जीरिया, मोरोक्को असे सगळे जण या वेळी एकवटले होते. सौदी अरेबियाने भरभरून पैसा आणि शस्त्र पुरवलेली होती. एकट्या जॉर्डन देशाने यात विशेष सहभाग दाखवला नाही, कारण त्यांना घरचंच थोडं झालं होतं.

सुरुवातीला अरबांनी इस्रायलला बेसावध पकडलं खरं, पण पुढे ज्यू लॉबीने अमेरिकेला भरीस पाडून त्यांच्याकडून हजारो टन शस्त्रसामुग्री आणि दारूगोळा मिळवला. या काळात इस्राएलचे प्रमुखपद होते गोल्डा मायर या महिलेकडे. त्यांनी आपल्या सैन्यप्रमुख, मोसाद प्रमुख आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना एकत्र आणून अतिशय कमी काळात आपली आघाडी मजबूत केली. एरियल शारोन यांनी आपल्या रणगाडा तुकडीला इजिप्तच्या पायदळ तुकडीसमोर नेलं. त्यांनी इजिप्शियन पायदळ तुकडीच्या भिंतीला भेदून रणगाडे थेट इजिप्तमध्ये घुसवले आणि इजिप्शियन सैन्याला मागच्या बाजूने घेरलं. इस्रायली पाराट्रूपर झपाट्याने इजिप्तच्या भूमीत उतरले. त्यांनी इजिप्शियन सैन्याभोवती असा काही फास आवळला की सुएझ कालवा इजिप्तच्या हातून जातो की काय अशी परिस्थिती आली. दुसरीकडे इस्राएलच्या दुसऱ्या लष्करी आघाडीने थेट दमास्कसच्या सीमा भागात हल्ले चढवून सीरियाच्या तोंडचं पाणी पळवलं.

अखेर कैरो आणि दमास्कस इस्राएलच्या हाती पडेल अशी चिन्हं दिसत असल्यामुळे रशिया खडबडून जागा झाला. युनोमध्ये रशियाने आपण या युद्धात सक्रीय होऊ अशी धमकी दिल्यावर युनोने पुन्हा एकदा मध्यस्थी सुरू केली. अखेर अमेरिकेने दबाव आणून इस्रायलला शांत केलं, अन्यथा सीरिया, इजिप्तचा सुएझ कालव्याच्या भाग आणि कदाचित कैरोही इस्रायलने पादाक्रांत केलं असतं. या युद्धानंतर अमेरिकेने कॅम्प डेव्हिड करणार घडवून आणला, ज्याच्या वाटाघाटीत इस्राएलचे मेनाचेम बेगिन, पॅलेस्टाईनचे यासर अराफत आणि इजिप्तचे अन्वर सदात सामील होते. प्रत्यक्ष करणार होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्टर बेगिन आणि सदात यांच्याबरोबर हजर होते.

या करारानंतर सदात यांची इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूडने दिवसा ढवळ्या सैनिकी सूत्रसंचालन होत असताना हत्या केली...कारण काय, तर कॅम्प डेव्हिड करार. हा करार अरब - इस्राएल यांच्यातला शांतता करणार म्हणवला जात असला तरी त्यामुळे प्रत्यक्षात विशेष शांतता काही प्रस्थापित झाली नाही...फक्त नोबेल शांतता पुरस्कारावर बेगिन आणि अराफत यांची नावं नोंदवली गेली. हा कदाचित या पुरस्काराचा सगळ्यात वाईट अपमान असावा....कारण तो मिळवणारे दोघेही शांततेच्या मार्गाने कधी गेलेही नव्हते आणि जाणारही नव्हते.

या युद्धात खऱ्या अर्थाने इस्रायलने आपल्या सामर्थ्याची चुणूक अरब जगातला दाखवून दिली, कारण सगळ्या अरब राष्ट्रांना एकटा इस्राएल पुरून उरला. पॅलेस्टाईन आपल्या आडमुठ्या स्वभावामुळे कायम सहानुभूती गमावत राहिला आणि पुढे पुढे अरब जगतालाही त्यांची अडचण व्हायला लागली. अराफत यांनी स्वतःची माया विलक्षण गतीने वाढवली...इतकी की त्यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. त्यांच्या समोर हळू हळू आता एक नवा भिडू आपली पॅलेस्टिनी संघटना घेऊन उभा राहत होता. ही संघटना होती हमास आणि हा नवा भिडू होता शेख अहमद यासीन. ही संघटना पुढे अतिरेकी कारवायांमध्ये अराफत यांच्याही वरताण कामं करणार होती...त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम संकलन.
प्लीज या सर्व देशांचे नकाशे देता येतील तर पहा.... पुढच्या भागात.. म्हणजे अधिक चांगले समजेल..........................................

छान !!!!
लेख बऱ्या पैकी रोचक , माहितीपूर्ण वाटला !
आंबट गोड यांच्या सुचने प्रमाणे नकाशे दिले तर वाचताना इस्रायल चा पराक्रम अजून अधोरेखित होईल .....

शनिवार रविवार एका दमात सगळे लेख वाचून टाकले. खूप छान माहिती दिली आहे.
सध्याचे इस्त्राईल चे पंतप्रधान नेत्यांहू बद्दल पण लिहा.

दहा दिवस साऱ्या जगाला फाट्यावर मारून पॅलेस्टाईन ला भाजून काढणाऱ्या इस्रायल मधील राजकीय अंतर्गत कुरबुरी पुन्हा वाढल्या आहेत .
अल्पमतात तील सरकार नेत्यांहू ने इतक्या दिवस टिकवले याचेच आश्चर्य आहे ......

वर कँप डेविडचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर साधारण ९३च्या सुमारास (क्लिंटन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) इझ्रेल आणि पिएलओ मधे ओस्लो करार झाला. त्या कराराच्या पार्श्वभूमीचं सिनेमॅटिक वर्णन ओस्लो या चित्रपटात आहे. जमल्यास बघा...

छान मालिका !
अगदी सध्याची परिस्थिती पुन्हा बदललेली दिसते. 2020 मध्ये चार अरब देशांनी इस्राएल ला recognize केलंय.