जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०७

Submitted by Theurbannomad on 23 May, 2021 - 11:06

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात थिओडोर हर्टझल यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळपुरुषांच्या पावलांवर पाऊल ठेवून समस्त पृथ्वीतलावर विखुरलेल्या ज्यू लोकांना एक महत्वाचं आवाहन केलं. यहोवा देवतेने फक्त ज्यू लोकांसाठी नेमून दिलेल्या कनानच्या पवित्र भूमीवर आपला हक्काचा देश - ' इस्राएल ' निर्माण करण्यासाठी एकत्र यावं हे ते आवाहन म्हणजेच ' झिओनिसम ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कडव्या ज्यू राष्ट्रवादाची सुरुवात. अठराव्या शतकापासून पूर्व युरोपमध्ये विखुरलेल्या ज्यू लोकांमध्ये सुरु झालेली ' हसकला ' नावाने ओळखली जाणारी चळवळ हा झिओनिसमचा तात्विक आणि बौद्धिक पाया. युरोप, मध्यपूर्व आणि आजूबाजूच्या भागातल्या सर्वाधिक प्राचीन संस्कृतींपैकी सगळ्यात प्राचीन आणि म्हणून ' आद्य ' असलेली ज्यू संस्कृती तिच्या मूळ स्वरूपात जपणं हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता, ज्यातून ' झिओनिसम ' ला पोषक पार्श्वभूमी तयार व्हायला मदत झाली.

या काळात युरोपमध्ये प्रचंड उलथापालथ होत होती. दूर अमेरिकेत लोकशाही आकाराला येत होती. युरोपमध्येही त्या दिशेने हालचाली होत होत्या. ' कधीही सूर्य ना मावळणाऱ्या ' साम्राज्याच्या बढाया मारणाऱ्या ब्रिटनमध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच संसदेची स्थापना झालेली होती. पुढे सहा दशकांनंतर ' फ्रेंच राज्यक्रांती ' होऊन युरोपमधल्या या दुसऱ्या महासत्तेला लोकशाही स्वीकारावी लागली. युरोपच्या भूमीवर सतत नवीनवी समीकरणं जन्माला येत होती. उर्वरित जगाची - विशेषतः आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेकडच्या प्रदेशांची या वसाहतवादी देशांनी वाटणी करून घेतलेली होती आणि आपापल्या वसाहतींमधून अधिकाधिक साधनसंपत्ती कशी ओरबाडत येईल याची या सगळ्या देशांमध्ये चढाओढ लागलेली होती.

अशा सगळ्या वातावरणात शांतपणे आपल्या वस्त्यांमध्ये - ' घेट्टो' मध्ये - सर्वसामान्य जीवन जगणारे ज्यू लोक कोणाच्या अध्यात ना मध्यात अशा पद्धतीने सगळ्यांपासून सामान अंतर राखून होते. थेट दुसऱ्या शतकात रोमन सेनानी सेक्सटस जुलियस सेव्हरस याने केलेल्या भीषण पराभवानंतर रोमन साम्राज्याच्या जाचाला घाबरून ज्यू लोक कनानच्या भूमीतून जे परागंदा झाले, ते १७-१८ शतकं परतले नाहीत. त्यातले काही युरोपमध्ये , काही थेट भारतापर्यंत आणि काही रशियाच्या भूमीवर स्थिरावले. या ज्यू लोकांनी बरोबर नेल्या दोन महत्वाच्या गोष्टी - आपल्या यहोवा देवतेने दिलेल्या शिकवणुकीचा धर्मग्रंथ - ' तोरा ' आणि आपली मूळ भाषा - ' हिब्रू ' . हे ज्यू लोक होते हाडाचे व्यापारी. जोडीला कमालीची चिकाटी आणि कष्ट उपसायची तयारी असल्यामुळे ते जिथे गेले तिथे गब्बर श्रीमंत झाले. पण पारशी लोक जसे भारतात पळून आल्यावर भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन गेले, तसे ज्यू मात्र जगातल्या कुठल्याही देशातल्या संस्कृतीत विरघळून गेले नाहीत. आपल्या वस्त्या उभारून, आपल्या संस्कृतीला कवटाळून आणि आपल्या धर्माला चिकटून हे ज्यू स्वखुशीने ' उपरे ' राहिले.
युरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वसामान्य लोकांमध्ये ज्यू लोकांविषयी प्रचंड तिटकारा निर्माण झाला.ज्यू लोकांच्या हाती एकवटलेल्या पैशांमुळे आणि त्यापाठोपाठ त्यांच्याकडे आपसूक चालत आलेल्या ' राजकीय आणि सामाजिक ' ताकदीमुळे त्यांच्यावर सामान्य जनता खार खाऊन होती , शिवाय ख्रिस्ती धर्माचं प्राबल्य असलेल्या युरोपमध्ये येशूच्या ' हत्येला ' जबाबदार असलेल्या ज्यू धर्मियांबद्दल घृणा होतीच. तशात फ्रान्समध्ये ' ड्रेफस अफेयर ' नावाने प्रसिद्ध असलेली एक अशी घटना घडली, ज्यामुळे ज्यू लोकांच्या आत्मसन्मानाला चांगलीच ठेच लागली.

फ्रेंच सैन्यदलात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या आल्फ्रेड ड्रेफस यांच्यावर वरिष्ठ फ्रेंच अधिकाऱ्यांनी फ्रान्सच्या विरुद्ध हेरगिरी करून महत्वाची माहिती जर्मनीला पुरवल्याचा ठपका ठेवला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे या प्रकरणात सामील असलेला खरा देशद्रोही सापडलाही, जो फर्डिनांड एस्तेरहाझी नावाचा फ्रेंच आर्मी मेजर होता. पण मधल्या काळात या घटनेमुळे फ्रेंच जनतेकडून ज्यू लोकांवर चांगलीच चिखलफेक झाली. ज्यू लोकांना अक्षरशः देशद्रोही, कपटी आणि कारस्थानी अशा शेलक्या विशेषणांनी संबोधलं जाऊ लागलं. पुढे सत्य परिस्थिती पुढे येऊनही या घटनेचे घाव काही भरून आले नाहीत. हे सगळं सहन करत असतानाच थिओडोर हर्टझल यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला - ज्यू लोकांचा स्वतःचा देश जन्माला घालायचा आणि ज्यू लोकांनी तिथे पूर्ण सन्मानाने आपल्या मातृभूमीच्या कुशीत ताठ मानेने जगायचं.
आपल्या या उद्दिष्टाच्या दिशेने त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ' वर्ल्ड ज्युईश काँग्रेस ' भरवून. १८९७ साली बासल येथे भरलेल्या या परिषदेत अथक प्रयत्न करून हर्टझल यांनी जगभरातून २०८ मान्यवर ज्यू लोकांना एकत्र आणलं होतं. शिवाय देशोदेशीचे २६ पत्रकार या परिषदेच्या वृत्तांकनासाठी आलेले होते. या परिषदेत आडमार्गाने का होईना, पण ज्यू लोकांचा हक्काचा देश त्यांच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या उद्देशाची पायाभरणी झाली. हे काम पुढे हाती घेतलं रशियामध्ये जन्माला आलेल्या आणि पेशाने बायोकेमिस्ट असलेल्या डॉक्टर चैम वैझमन यांनी. किण्वन क्रियेला औद्योगिक पातळीवर यशस्वी करण्याचं काम करणारे किमयागार ते हेच.

या मनुष्याने स्वतंत्र ज्यू राष्ट्र उभारण्याचं इतकं मनावर घेतलं, की त्यासाठी त्यांनी आपलं ब्रिटिश दरबारातलं वजन वापरून थेट ब्रिटिश संसदेचं पंतप्रधानपद भूषविलेल्या आर्थर बाल्फोर यांनाच आपल्या प्रभावाखाली आणलं.' बाल्फोर डिक्लरेशन ' या नावाने प्रसिद्ध असलेल्या जाहीरनाम्याचे हे जनक. या जाहीरनाम्यात प्रथमतः ज्यू लोकांच्या हक्काच्या भूमीचा उल्लेख ब्रिटनसारख्या महासत्तेच्या संसदेत उघडपणे झाला. या जाहीरनाम्यात हेतुपुरस्पर पॅलेस्टिनमधल्या ज्यू लोकांना ' त्यांची पवित्र भूमी ' मिळावी याचा उल्लेख स्पष्ट ठेवून बाकीच्या गोष्टी मात्र संदिग्धपणे मांडल्या गेल्या होत्या. तेव्हाच्या ब्रिटिश आसमंतात आपला आब राखून असलेले अनेक ज्यू - ज्यात धनाढ्य बँकर लॉर्ड रॉथशिल्ड, सांसद हर्बर्ट सॅम्युएल असे महत्वाचे लोक होते - या जाहीरनाम्याच्या बाजूने असल्यामुळे एका अर्थाने ज्यू लोकांच्या ' इस्राएल ' च्या मागणीला चांगलाच राजाश्रय मिळाला.

या सगळ्यातून झालं एकच - यूरोपच नाही, तर अगदी अमेरीकेहूनही ज्यू लोक भरभरून आपल्या पवित्र भूमीकडे निघाले. ' आलिया ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यू लोकांच्या स्वगृही परतण्याच्या या प्रवासातून हजारो ज्यू पॅलेस्टिनच्या भूमीवर उतरले. ज्यू लोकांकडे पैसा भरभरून होताच, जोडीला ' बाल्फोर जाहीरनाम्याच्या ' आडून आपलं इप्सित साध्य करून घ्यायचा बेरकीपणाही होता. १८८२ साली ' आलिया ' ची पहिली लाट आली ती जेमतेम ३०-३५००० ज्यू लोकांची. परंतु या सगळ्या घडामोडींनंतर १९२९-१९३९ दरम्यानच्या पाचव्या लाटेत तब्बल २५०००० ज्यू आपल्या मातृभूमीमध्ये परतले. तशात हिटलरने ज्यू लोकांचा केलेला वंशसंहार, अरबी धर्मगुरू अमीन अल हुसेनीसारख्या ज्यू-द्वेष्ट्यांनी ज्यूंचा केलेला नरसंहार या सगळ्या घटनांमुळे ज्यू लोकांबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली.

अखेर १४ मे १९४८ चा तो दिवस उजाडला. अमेरिकेपासून युरोपपर्यंतच्या अनेक बलाढ्य देशांमध्ये पसरलेल्या ज्यू लोकांनी आपल्या अथक प्रयत्नांनी जगाच्या पटलावर आपला हक्काचा देश जन्माला घातला. अमेरिकेचे खमके राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रख्यात असलेले रुझवेल्टही ज्यू लॉबीच्या दबावापुढे तग धरू शकले नाहीत, तिथे इतरांची काय कथा ! पुढच्या वर्षभरात या ' इस्राएल' चा ' संयुक्त राष्ट्रसंघात ' समावेश झाला. पॅलेस्टिनच्या अरबांना आपल्या भूमीचे तुकडे पडत असूनही काहीही करता आलं नाही. या ज्यू राष्ट्राचे - स्वतंत्र इस्राएल देशाचे पहिले राष्ट्रप्रमुख झाले अर्थात चैम वैझमन आणि अमेरिकेत ज्यू लोकांची तगडी लॉबी तयार करून अमेरिकेच्या सिनेटमध्ये ज्यू लोकांचा दबदबा निर्माण करणारे डेव्हिड बेन गुरियन झाले इस्राएलचे पहिले पंतप्रधान.

तेलसंपन्न अरबी देशांनी चहुबाजूने वेढलेल्या आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती पाचवीला पुजलेल्या या देशाला सतत अस्तित्वाचा संघर्ष करावा लागणार हे उघड होतं. यहोवा देवाने नक्की कोणत्या उद्देशाने असा भूप्रदेश आपल्या अनुयायांना ' पवित्र भूमी ' म्हणून नेमून दिला होता, हे त्यालाच माहित, परंतु त्याच्या या अनुयायांनी पुढे अशा परिस्थितीतही जे काही करून दाखवलं, त्याला जगाच्या इतिहासात खरोखर तोड नाही.

अथक संघर्ष करून आणि प्रसंगी रक्ताचं शिंपण करून पुन्हा एकदा शून्यातून उभा केलेला आपला हक्काचा देश ज्यू लोकांनी प्राणपणाने जपला, तो आजतागायत. १९४८ पासून ते आत्तापर्यंत या देशाने फत्ते केलेल्या विस्मयकारक लष्करी मोहिमा या देशाच्या विजिगीषू वृत्तीची प्रचिती तर देतातच, शिवाय या मोहिमांच्या आखणीमागे पडद्यापुढून आणि पडद्याआडून काम करणाऱ्या असंख्य लोकांमध्ये असलेल्या सुसूत्रतेचीही महती पटवून देतात.

स्थापनेआधीपासून या देशाने अंगिकारलेल्या लष्करी संस्कृतीचा हा परिपाक. सर्वसामान्य नागरिकही वेळप्रसंगी शस्त्र घेऊन आपल्या पवित्र भूमीच्या रक्षणार्थ शत्रूशी दोन हात करायला सज्ज होऊ शकेल, अशी या देशाची महती. सैनिकी प्रशिक्षण प्रत्येकाच्या शैक्षणिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्यामुळे आणि आईच्या गर्भातूनच मिळत असलेल्या कमालीच्या चिवट वृत्तीमुळे इस्राएलच्या प्रत्येक नागरिकात एक परिपूर्ण योद्धा लपलेला असतोच. जोडीला थंड डोक्याने आणि अतिशय योजनाबद्ध रीतीने प्रत्येक मोहीम तडीस नेण्याची क्षमता या देशाच्या लष्कराला आणि हेरखात्याला जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाच्या पातळीवर नेऊन सोडते.

शेजारच्या अरबस्तानमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि रशिया या तीन महासत्ता आपापल्या पद्धतीने वाळूत रेषा काढून तिथे नवनवे घोळ घालण्यात गुंग होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात या महासत्ता स्वतः खिळखिळ्या झाल्या तरी त्यांच्यातली साम्राज्यवादी मस्ती जिरली नव्हती...त्यातून पुढे जे काही प्रकार घडले, त्यातून अरब जगत सगळ्याच अर्थाने दुभंगल...आणि या भागात तेल सापडल्यावर इथे या सगळ्या साम्राज्यवादी देशांचा ' बाप ' या भागात अवतरला. हा देश एक तर आर्थिकदृष्ट्या प्रबळ. युरोपमधून निर्वासित झालेल्या अनेक कुशाग्र लोकांना आसरा देणारा...आणि त्यांच्या जोरावर आपलं तंत्रज्ञान जगाच्या चार पावलं पुढे नेलेला..... हा देश म्हणजेच ' अमेरिका '.

अमेरिकेत ज्यू लोकसंख्या मोठी.... सगळेच महत्त्वाचे उद्योग, वित्तसंस्था, वृत्तपत्र संस्था, शैक्षणिक संस्था यांमध्ये ज्यू लोकांचं प्राबल्य होतं. अल्बर्ट आईनस्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, वॉल्ट डिस्ने, रॉबर्ट ओपन्हाईमार.....अशी जागतिक कीर्तीची मोठी नावं ज्यूच आहेत. इतकंच काय, पण युरोप आणि अमेरिकेत तेव्हाही आणि आजही राजकीय क्षेत्रात ज्यू लॉबी आपला प्रचंड दबावगट राखून आहे. या सगळ्याचा परिपाक इतकाच, की भांडकुदळ आणि भडक अरबांना सुसंघटित आणि संपन्न ज्यू लोकांनी त्यांच्या नाकावर टिच्चून आपला देश तयार करून दाखवला आणि तोही जेरुसलेमसकट! त्यावर पुढच्या भागात सविस्तर बोलू, तोवर अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती

सुंदर माहिती.
साधारण किती भाग लिहिण्याचे नियोजन आहे? पुढचा भाग लवकर येऊ दे.

@ sharadg
१५-२० भाग सहज होतील. शक्य तितक्या लवकर लिहून post करण्याचा प्रयत्न करतो आहे.