जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०१

Submitted by Theurbannomad on 16 May, 2021 - 15:51
jerusalem

२०२१ सालच्या मे महिन्यात, तेही रमझानच्या पवित्र महिन्यात पुन्हा एकदा जेरुसलेम नावाच्या शापित देवभूमीवर मृत्यूचं तांडव सुरु झालं. निमित्त झालं इस्राएलच्या लष्कराने जोरजबरदस्ती करून शेख जर्रा वस्तीतून पॅलेस्टिनी अरब कुटुंबांना हलवायला सुरुवात केली, या बेदरकार कृतीचं....या घटनेच्या आसपासच इस्राईलने कोरोना संकटावर अंकुश लावल्याची आणि आपल्या लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुखपट्ट्यांचा नियम शिथिल केल्याची घोषणा करून समस्त जगाला आपली दाखल घ्यायला पुन्हा एकदा भाग पाडलं होतं. एक राष्ट्र म्हणून इस्राएल किती सुसंघटित आणि सुसूत्रपणे काम करू शकतं, हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलं होतं....पण त्यांच्या या कामगिरीवर भाळून ज्यांनी ज्यांनी चार कौतुकाचे शब्द बोलून दाखवले होते, त्यांचे दात पुढच्याच आठवड्यात घशात घालण्याचं महान काम इस्राएलने करून दाखवलं.

सध्याच्या महामारीच्या वातावरणात जग ढवळून निघत असताना आपल्या छुप्या मनसुब्यांना इस्राएलने प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली ती डोक्यावर अटकेची किंवा किमान भ्रष्टाचाराच्या खटल्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या राष्ट्राध्यक्ष बिन्यामीन नेतान्याहू यांच्या पुढाकाराने. नेसेट म्हणजेच इस्राएलच्या संसदेत सतत बहुमताची कसरत करत असलेल्या नेतान्याहू यांनी आपल्या सरकारच्या स्थैर्याचा राजमार्ग हा असा शोधला असं अनेक जाणकारांचं मत आहे. एकदा जहाल यहुदी राष्ट्रभावनेला चिथावलं आणि ' एरेट्झ इस्राएल ' च्या घोषणेआडून दडपशाही करून अधिकाधिक भूमी इस्रायलला जोडली की आपोआप नेसेटमधल्या बहुमताचा प्रश्न तडीस जाईल अशी ही नेतान्याहू यांची खेळी त्यांच्या धूर्त आणि युद्धखोर प्रतिमेला साजेशीच.

जगाच्या पाठीवरच्या तीन मुख्य धर्मांचं उगमस्थान असलेल्या जेरुसलेम परिसरात अवघ्या चार-पाच दिवसात पुन्हा एकदा स्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती अशा सगळ्या पार्श्वभूमीवर. अर्थातच दोन्ही बाजूंच्या जागतिक समर्थकांनी आपापल्या परीने ' आभासी जगतावर ' प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आणि एक एक करत अनेक ' ख्यातनाम ' व्यक्ती या मुद्द्यावर भाष्य करायला लागल्या. सौदीच्या पाठिंब्यावर २०१८ सालापासून अरब आसमंतातल्या अनेक देशांनी इस्राएलशी आपले संबंध जुळवायला सुरुवात केलेली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांचा उद्योगी जावई आणि राजनैतिक सल्लागार जॅरेड कुशनर, सौदीचा भावी सर्वेसर्वा आणि २०१७ सालापासून सौदी अरेबिया देशावर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित करणारा सुधारणावादी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान अल सौद, ट्रम्प यांच्या जवळच्या गोटातले बिन्यामीन नेतान्याहू आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबी या तेलसंपन्न अमिरातीचा आणि पर्यायाने या देशाचा भावी सर्वेसर्वा राजपुत्र मोहम्मद बिन झाएद अल नाहयान अशा महत्वाच्या भिडूंनी मिळून अनेक दशकांपासून चालत आलेली अरब - इस्राएल द्वेषाची परंपरा मोडीत काढली होती. अमिरातीपाठोपाठ बहरैन, ओमान, सुदान, मोरोक्को या देशांनीही इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली. या सगळ्यातून अखेर ज्यू - अरब यांच्यातला रक्तरंजित संघर्ष थांबेल आणि या परिसरात शांतता नांदेल अशी अनेकांची आशा होती, पण युद्धखोरी आणि अतिकडवेपणा नसानसात मुरलेल्या झिओनिस्ट ज्यू आणि पॅलेस्टिनी अरबांमध्ये संघर्षाची काडी पडलीच !

आधुनिक इतिहासाच्या अनुषंगाने बघितल्यास या सगळ्याची सुरुवात जरी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये वाढीस लागलेल्या झिओनिस्ट चळवळीमुळे झालेली दिसत असली, तरी ज्यू धर्मियांच्या इतिहासात डोकावल्यावर मात्र या संघर्षाची पाळंमुळं थेट ज्यू - मुस्लिम - ख्रिस्ती या तिन्ही धर्माचा आद्यपुरुष असलेल्या अब्राहमच्या काळात रुजलेली दिसतात. या लेखमालेत जेरुसलेम या शापित देवभूमीला केंद्रस्थानी ठेवून आपण या परिसरात घडलेल्या अशा अनेक घटनांचा मागोवा घेणार आहोत, ज्यामुळे या परिसराच्या वर्षानुवर्षाच्या संघर्षाला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल...आपल्या काश्मीर प्रश्नाची अनेक अभ्यासक जरी जेरुसलेमच्या प्रश्नाशी तुलना करत असले, तरी माझ्या मते या तुलनेला विशेष अर्थ नाही, कारण काश्मीर प्रश्न केवळ सत्तर वर्षं जुना आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांपुरता मर्यादित आहे...पण जेरुसलेम प्रश्न मात्र समस्त अरब जगत आणि ज्यू धर्मियांमधला हजारो शतकं जुना आहे.

लेखमालेचा आरंभ करताना मला पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांचं एक प्रसिद्ध वाक्य आठवतं -
" anyone who relinquishes a single inch of Jerusalem is neither an Arab nor a Muslim . "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयावर एखादा चर्चेचा धागा असावा असं वाटलं होतं. म्हणजे की दूरगामी परिणाम करणारी स्फोटक परिस्थिती आहे. शिवाय कुणा एकाची बाजू घेणे हेसुद्धा धोकादायक आणि काळजी करण्यासारखं ठरेल.

>>तरी ज्यू धर्मियांच्या इतिहासात डोकावल्यावर मात्र या संघर्षाची पाळंमुळं थेट ज्यू - मुस्लिम - ख्रिस्ती या तिन्ही धर्माचा आद्यपुरुष असलेल्या अब्राहमच्या काळात रुजलेली दिसतात. <<
हम्म, इंटरेस्टिंग थियरी...

माझ्या माहितीनुसार, झायनिस्ट चळवळी अंतर्गत ज्युंनी आटमन साम्राज्य अस्तित्वात असतानाच पॅलेस्टॅइन मधे वसाहती निर्माण केल्या. पहिल्या महायुद्धानंतर आटमन साम्राज्य संपुष्टात आलं, ब्रिटिशांनी पॅलेस्टाइनचा ताबा घेतला, पुढे ज्युइश स्टेट स्थापित (युएनच्या संमतीने) करण्याचा उद्देशाने. पण पुढे दुसरं महायुद्ध झालं, ज्यामुळे ब्रिटिशांना आर्थिक्/सामरिक फटके बसले, आणि त्यांनी पॅलेस्टाइनमधुन अंग काढुन घेतलं. त्या दरम्यान झायनिस्ट चळवळ अमेरिकेच्या सपोर्टने अजुन स्ट्राँग झाली. आणि त्यांनी त्यांच्या वाटेला आलेल्या पॅलेस्टाइन वर संपुर्ण ताबा प्रस्थापित केला. पुढे युएनने हि इझरेलला मान्यता दिली, जी अरब राष्ट्रांना (इजिप्त, इराक, लेबनन, सिरिया इ.) मान्य न्हवती. आणि हेच कारण पुढच्या ऑनगोइंग संघर्षाला कारणीभूत ठरलं...

आता यात एब्राहमचा वाटा खरोखर किती, हे वाचायला आवडेल...

झायनिस्ट चळवळ अमेरिकेच्या सपोर्टने ....
ज्यू लोकच अमेरिका चालवतात असं ऐकून आहे. ठोस पुरावा नसणारच. तरीही...

पण ही लेखमाला आहे. लेखक काय म्हणतो पाहू.