
लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................
दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.
भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.
दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.
लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.
ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :
१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................
डॉ कुमार,
डॉ कुमार,
रेअर डिसऑर्डर म्हणून माहीत असलेले सर्व आजार अचानक असे कॉमन म्हणून जास्त प्रमाणात सरफेस का होतायत?निव्वळ स्टिरॉइड ने गेलेली प्रतिकार शक्ती की आपल्या एकंदर डी एन ए मध्येच काही बदल झालाय?(जरा अज्ञ वाक्य आहे हे.)
म्हणजे यापुढे अजून काही दुर्मिळ आजार कॉमन म्हणून दिसण्याची शक्यता पण आहे का?
स्टिरॉइड व अन्य
स्टिरॉइड व अन्य प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारी औषधे हे महत्वाचे कारण आहे. + मूळ आजाराची तीव्रता + अनियंत्रित मधुमेह .
अन्य काही संभाव्य आजार यांच्यामुळे :
Aspergillus, Candida
धन्यवाद.
धन्यवाद.
ही सगळी नावं फक्त हाऊस एमडी मध्ये ऐकली होती.
देव करो आणी प्रत्यक्ष ऐकावी कोणालाच न लागो.
भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर
भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावी; भारत बायोटेकचा दावा
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bharat-biotech-covaxin-effecti...
CORONA झालेल्या व्यक्ती काय
CORONA झालेल्या व्यक्तीी वर काय ट्रीटमेंट करायची.
कोणत्या टेस्ट करायच्या.
कोणती औषध द्यायची.
हे उपचार करणारे डॉक्टर ठरवत आहेत की रोग नियंत्रण संस्था,who, आणि बाकी सरकारी संस्था नी guidelines दिलेली आहे आणि त्या नुसार च उपचार करायचे अशी सक्ती केलेली आहे.
नक्की कोण ठरवतं उपचार काय करायचे,औषध कोणती द्यायची हे.
ताजी बातमीकरोना उपचारांमधून
ताजी बातमी
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh-news/govt-removes-plasma-therapy-as...
इतके दिवस प्लाझ्मा
इतके दिवस प्लाझ्मा मिळाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचे काय मग ? ते नक्की कशामुळे बरे झाले असतील ?
असो...
आज अनेक दिवसांनी पुण्यात रुग्णसंख्या १००० च्या आत आहे....हे तात्पुरते आहे की खरच आता साथ उतरणीला लागली आहे कोण जाणे.
कारण अजुनही जवळच्या, ओळखिच्या लोकांच्या मृत्युच्या बातम्या येतच आहेत
मनात असा विचार आला की माझ्या ओळखितले सुमारे २५-३० लोक गेल्या २ महिन्यात मरण पावले. माझे काही नातेवाइक..ऑफिस मधले काही लोक.....मी राहाते तिथले आजुबाजुचे लोक ई ई......हा आकडा माझ्या साठी खुप मोठा आहे...माझ्या सारखे अनेक लोक असतील...मग जर इतके लोक मला माहित आहेत आणि मी ज्यांच्याशी बोलले ते पण असेच म्हणत आहेत तर मग खरच कोरोना ने गेलेल्या लोकांचा खरा आकडा बाहेर आलाच नाहिये का ?
प्लाज्मा >>
प्लाज्मा >>
हा उपचार तसा मर्यादित स्वरूपातच उपयुक्त होता. आजाराच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात काहीजणांना त्याचा उपयोग होत होता ( जोडीने .अन्य औषधे पण लागायची) त्याच्या वापराबाबत तज्ञांमध्ये पहिल्यापासूनच मतभिन्नता होती.
जर त्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही, तर उलट त्यातून विषाणूचे नवे अवतार उत्क्रांत होण्याचा धोका होता असे काही तज्ञांचे मत आहे.
माझे दिर जे कोरोना पॉजिटीव
माझे दिर जे कोरोना पॉजिटीव होते.ते आता बरे आहेत.
सुदैवाने संपर्कात आलेले सगळे निगेटीव्ह आहेत.
चांगली बातमी, मृणाली
चांगली बातमी, मृणाली
जर त्याचा वापर काळजीपूर्वक
जर त्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही, तर उलट त्यातून विषाणूचे नवे अवतार उत्क्रांत होण्याचा धोका होता असे काही तज्ञांचे मत आहे.>> ही भीती वावगी नाही हे मान्य. पण सिस्टीम तर कोसळली आहे. कुठेच काही होप्स नाहीत अशा परिस्थितीत प्लाझमाने जगणाऱ्यांची संख्या सिग्निफिकंट आहे आणि हे पाहता प्लाझ्मा वर बंदी हा प्रॅक्टिकली चुकीचा निर्णय आहे. आणि हो, सरकार किंवा सो कोल्ड तज्ज्ञांनी कोणता डाटा घेऊन हा निर्णय घेतला यावर कुठेच वाच्यता नाही.
बंदी फक्त ज्ये ना पुरती आहे
बंदी फक्त ज्ये ना पुरती आहे का?
याचा 2डीजी चा वापर वाढवण्यासाठी काही संबंध असेल का
रक्तद्र्व उपचार :
रक्तद्र्व उपचार :
हा एक संदर्भ आहे : The Lancet १४ मे :
https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(21)01064-3/fulltext
: ५७९५ रुग्णांवर प्रयोग >> उपयुक्त नाही.
................
बंदी फक्त ज्ये ना पुरती आहे का?
>>>
वयाचा काही उल्लेख नाही.
...........
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
( थोडक्यात "बंदी" नसते )
गेल्या काही दिवसात ऐकलेल्या
गेल्या काही दिवसात ऐकलेल्या ओळखीच्या लोकांच्या मृत्यूच्या बातम्यांमध्ये आय सी यू मध्ये दाखल होऊन उपचार, नंतर काही काळाने नॉन कोविड वॉर्ड मध्ये हलवले अथवा डिस्चार्ज मिळण्या इतपत रिकव्हरी आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू असा खूप ठळक पॅटर्न दिसतोय. यामध्ये (ओळखीच्या केसेस मध्ये)मधुमेह इत्यादी शारीरिक व्याधी असणाऱ्यांसोबतच तिशीतल्या निरोगी व्यक्तीही आहेत. याआधी याबद्दल काही चर्चा झाली आहे का? नसल्यास याबद्दल काही अधिक माहिती मिळू शकेल का?
मेघना,
मेघना,
मूळ लेखाला दिलेली ६/५/२१ ची पुस्ती बघा.
धन्यवाद डॉक्टर. माझ्या
धन्यवाद डॉक्टर. माझ्या प्रश्नच रोख तरुण पिढी बाधित होण्यात वाढलेले प्रमाण नव्हता, तर उपचारोत्तर हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यू च्या वाढत्या संख्येबद्दल होता. आधीच्या पोस्ट मधला प्रश्न सुस्पष्ट नसल्याबद्दल क्षमस्व. तरीही हा लेख व आधीच्या पानांवरील चर्चा पुन्हा एकदा सावकाशीने वाचते.
डॉ कुमार योग्य उत्तर देतीलच
डॉ कुमार योग्य उत्तर देतीलच.माझे चार आणे: ट्रिटमेंट मध्ये वापराव्या लागणार्या स्टेरॉइडस आणि खूप लिटर ऑक्सीजन मुळे हृदयावर ताण पडतो. अर्थात हे दोन्ही वापरणे टाळता येत नाही.
मेघना,
मेघना,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर बरंच गुंतागुंतीचे आहे; सरसकट असे नाही देता येणार.
१. ज्यांना बरीच वर्ष मधुमेह आहे त्यांना जेव्हा कोविड होऊन रुग्णालयात दाखल करावे लागते तेव्हा एकंदरीत शरीरातील स्ट्रेस वाढतो. त्यातून हॉर्मोन्सच्या उलथापालथी होतात. त्यात विविध उपचारांची भर पडते, आणि मग ही सगळी परिस्थिती हृदयासाठी कमकुवत होते.
२. समजा, पूर्वीचे आजार नाहीत. कोविड शरीरातील जवळजवळ आठ अवयव किंवा यंत्रणांवर परिणाम करतो. त्यात हृदयस्नायूंचाही समावेश आहे आणि रक्तवाहिन्यांचा देखील. त्यामुळे काही रुग्णांच्या बाबतीत असे होण्याची शक्यता असते.
डॉ, ती लांसेटची लिंक ओपन होत
डॉ, ती लांसेटची लिंक ओपन होत नाही.
लांसेटची लिंक ओपन होत नाही. >
लांसेटची लिंक ओपन होत नाही. >>>
मुळात ती मोफत दिसत नाही. कुकीज वगैरे प्रकरण इथं बरीच छळतात !

अस्पष्ट पार्श्वभूमीवर मी एका वेळेस जेमतेम दोन ओळी अशा प्रकारे तो सारांश वाचला.
डॉक्टर,
डॉक्टर,
नागपूर आणि इतर काही ठिकाणी म्युकर मायकोसिस चा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू वाढले आहेत.
हा प्रसार नेमका कशातून होतो आणि रुग्णापर्यंत पोचतो?
दुसरे असे की कोविड पूर्वीही अनेक गंभीर आजार आणि विकार अस्तिस्तवात आहेत त्यामुळे प्रतिकार शक्ती खूप कमी होते, पण त्या आजाराना जोडून मुकर मायकोसिस चा एवढा गंभीर प्रादुर्भाव कधी ऐकलेला नाही. (कदाचित मला पुरेशी माहिती नाही).
पण स्टिरॉइड चा वापर, प्रतिकारशक्ती चा अभाव ही बऱ्याच आजारमधील सामान्य गोष्ट आहे मग कोविड मध्ये असे नेमके काय होते आहे जे म्युकर साठी एवढे पोषक ठरते आहे?
स्वासु,
स्वासु,
धाग्यातील १/५/२१ ची पुस्ती पाहा
स्वा सु
स्वा सु
मुळात हा आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
अर्थात विदा वगैरेचा सावकाशीने अभ्यास करावा लागेल
सर, आज मितीस आशादायक काय काय
सर, आज मितीस आशादायक काय काय आहे, हे सांगाल का?
रेव्यु,
रेव्यु,
त्याचे योग्य उत्तर द्यायला बऱ्याच गोष्टींचा विदाच अभ्यासावा लागेल.
एक लगेच लक्षात येणारे म्हणून हे पाहता येईल
https://www.google.com/search?q=rate+of+covid+recovery+in+india&sxsrf=AL...
भारत
Cases 2.52Cr व Recovered 2.16Cr = ८५.१७%
......
इसराईलमध्ये सर्वात आशादायक चित्र आहे.
जेव्हा विषाणूचा संसर्ग दर एक लाख लोकांमागे फक्त एक व्यक्ती इतका कमी होतो, तेव्हा आपण हा आजार काबूत ठेवला आहे असे म्हणता येईल. सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक).
धन्यवाद कुमार सर
धन्यवाद कुमार सर
माझा एक प्रश्न : केसेस वाढतात की कमी होताहेत हे प्रकाशित करतांना टक्केवारी का देत नाहीत?
कॉमन सेन्स आहे..... लगेच प्रगती कळते.... शाळेत सुध्दा टक्केवारी सांगतात.... एवढे बालबोध ज्ञान आरोग्य मंत्रालयास नाही का?
अन मग उगीचच प्रसार माध्यमवाले निरर्थक धुमाकूळ घालतात
डेटा जितका रॉ तितका तो सच्चा.
डेटा जितका रॉ तितका तो सच्चा.
एकदा प्रोसेसिन्ग चालू केलं की आपल्याला हवा तसा तो वळवणे हा सॅटिस्टिशिअनच्या हातचा खेळ बनतो. टक्केवारी कशा बरोबर काढायची हे टार्गेट बदलतं ठेवायचं का इ. इ. इ.
भक्त संप्रदायात युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडाच्या लोकसंख्येची बेरीज आणि भारताची लोकसंख्या आणि केसेस अशी अचाट टक्केवारी तयार करुन भारतीय तात्या कित्ती बाई ग्रेट अशा पोस्टी वाचल्याच असतील. त्यापेक्षा स्वच्छ डेटा बरा. तो योग्य रिपोर्ट झाला नाही तर फक्त एकाच ठिकाणी बोट ठेवता येतं.
एकदा हे स्टॅटिस्टिशिअन्सच्या हातात गेलं की मग बघायला नको.
प्लाझ्मानंतर रेमडेसिव्हिरच्या
प्लाझ्मानंतर रेमडेसिव्हिरच्या वापरावर बंदी?
https://www.esakal.com/desh/remdesivir-may-be-dropped-soon-as-there-is-n...
अमिताव जी
अमिताव जी
>>>>डेटा जितका रॉ तितका तो सच्चा.>>> त्यात न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही हवे... एकच देतात
मग कळेल चाचणीत किती टक्के बाधित आहेत
मुंबई मनपा रोजच्या टेस्ट्स,
मुंबई मनपा रोजच्या टेस्ट्स, पॉझिटिव्ह केसेसची संख्या हे दोन्ही देतात.
केंद्राच्या आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावरही दिवसभरातल्या टेस्ट्सची संख्या देतात.
महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर एकूण टेस्टची संख्या देतात. आदल्या दिवशीची वेगळी आकडेवारी देत नाहीत.
Pages