कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by हेमंतकुमार on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अभ्यास पूर्ण होण्याच्या अगोदर च संशोधक मीडिया ला माहिती पुरवत असावेत असाच प्रकार चालू आहे.>> हेमंत ३३ ... अगदी अगदी.... त्यामुळे किती उपयुक्त अन किती वावड्या काही ही कळत नाही अन त्यात सेल्प स्टाइल्ड एक्सपर्ट्सची कमी नाही...... लांछ्चनास्पद आहे

गोंधळ निर्माण होईल अशी उलटसुलट मत जबाबदार लोक च करत आहेत.
त्या मुळे संशयाचे वातावरण ,भीती चे वातावरण निर्माण होते

भारतात दुसरी लाट आली ती डेल्टा varriant मुळे तो २०२० च्या शेवटी माहीत झाला .
आता ब्रिटन मध्ये जी लाट चालू आहे ती पण डेल्टा varriant मुळे डेल्टा प्लस चे खूपच कमी रुग्ण तिथे पण आहेत.
भारतात डेल्टा प्लस चे ४० रुग्ण सापडले आहेत.
ही सर्व मीडिया ची माहिती आहे.
एप्रिल मध्ये डेल्टा प्लस माहीत झाला.
Delta प्लस चे जास्त रुग्ण नाहीत .
मग हा डेल्टा प्लस जास्त घातक आहे,लसी ना दाद देणार नाही,वेगाने पसरेल.
हे सर्व निष्कर्ष कोणत्या अभ्यासावर आधारित आहे.
हे एक मोठ कोड च आहे.

बाकी जवळजवळ सर्व राज्यांमधील कोविड केसेस कमी होत असताना महाराष्ट्र आणि केरळातल्या केसेस म्हणाव्या तशा कमी होताना दिसत नाहीत. पहिल्या लाटेनंतरही असंच झालं होतं. याचं कारण काय असेल?

महाराष्ट्रात खूप चांगली इंडस्ट्री असल्याने रोजगार निमित्ताने खूप जास्त लोक सगळीकडून येतात. लोकसंख्या डेन्सिटी कमी होत नाही.
(आणि जर नंबर ऑफ केसेस :: नंबर ऑफ टेस्ट्स असेल तर कोणा कोपर्‍यातल्या राज्यात टेस्टस होणे, त्यासाठीच्या लॅब, हॉस्पिटल लांब असतील, त्यामुळे टेस्ट चे प्रमाणही आपोआप कमी असेल.)

केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा मध्ये प्रति दशलक्ष चाचणीचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे, सध्याच्या डेटा नुसार.

आणि प्रति दशलक्ष सध्याच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र तिसरा आहे, केरळ पहिला, आंध्र दुसरा.

करोना फक्त दक्षिण भारतात आहे की काय?
सध्या आसाम, ओरिसामध्ये ही केसेस वाढताहेत.
महाराष्ट्रात कोल्हापूरचे आकडे भयावह आहेत. जोडीला सध्या सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये केसेस अधिक वेगाने वाढताहेत.

काळजी वाटते आकडे वाचून महाराष्ट्रातले. आणि त्याहून वाईट म्हणजे लोक आता परत 'सुटायला' लागलेत असं वाटतंय. ग्रहमखं, लग्नं, वाढदिवस वगैरे करतायत. निदान भरपूर प्रमाणात लसीकरण होईपर्यंत तरी थांबलं पाहिजे.

महाराष्ट्रात सर्वाधिक active cases पुण्यात आहेत.
बंगलोरमध्ये पुण्याच्या जवळपास दुप्पट active cases. आहेत.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकात सर्वाधिक active cases होत्या. ते आता तिसऱ्या स्थानी आहे. कर्नाटकातील साथ ओसरते आहे असं दिसतं.

वावे, अगदी मनातले बोललीस. कधी कधी सोशल मिडीयावरचे वास्तुशांति नि लग्नाचे इ फोटो पाहून वाटते की कोव्हीड इ फक्त अफवा आहे. भारतात सगळं व्यवस्थित चालू आहे.

सीमंतिनी, अगदी! मी गेल्या वर्षीही इथे कुठेतरी लिहिलं होतं की ही माणसं समांतर विश्वात जगतात असं वाटतं.

औद्योगीकरण, महानगरांमधील लोकसंख्येची घनता आणि माणसांचे चलनवलन हीच कारणे रुग्णवाढी मागे असावीत. काही महिन्यांपूर्वी यावर चर्चा झालेली आहे

उद्योगीकरण, महानगरांमधली लोकसंख्येची घनता, माणसांचं चलनवलन ही तशी जनरल कारणं आहेत.
केरळमध्ये तर महानगरं नाहीत. महाराष्ट्रातलं महानगर मुंबई. तिथे त्या मानाने गेल्या वर्षी आणि याही वर्षी लवकर नियंत्रणात आल्या केसेस. ग्रामीण भागात आणि लहान शहरांत वाढतायत केसेस.
अर्थात हे मी बातम्या वाचून बनवलेलं मत आहे.

ग्रामीण भागात वाढतायत त्या बहुधा शहरी टुरिस्ट रेझॉर्ट्स ना, टुरिस्ट पॉईट ला भेटी दिल्याने वाढत असतील.शहरात जे निर्बंध पाळले जातात ते मजेच्या जागी, रिलॅक्स झाल्यावर थोडे बाजूला पडत असावेत.
पुणे ग्रामीण चा रिकव्हरी रेट आता अश्याच पद्धतीने कमी झाला आहे.

राज्यांच्या दरडोई उत्पन्नाची सांंगड लोकांच्या (कामधंद्यासाठीच्या ) चलनवलनाशी आणि त्यातून रोगप्रसाराशी घालणारा एक लेख वाचला होता.
२०११ जनगननेनुसार केरळमधली ४७ & वस्ती नगरांत / शहरांत आहे.

सिंगापुर मध्ये ३५% लोकाचे दोन डोस झाले आहेत, ९ ऑगस्ट पर्यन्त ६६% होतील आणि जेव्हा सरकारने निश्चित केलेली आकडेवारी गाठली की सगळे पुर्वीसारखे होणार आहे.

https://www.loksatta.com/explained-news/explained-singapore-surprising-c...

छान .
..............
लसीचे दोन डोस भिन्न प्रकारच्या तंत्रज्ञानाचे घेऊन लस मिश्रणाचे काही प्रयोग चालू आहेत. काही युरोपीय देशांमधील प्रयोगांमध्ये उत्साहवर्धक निष्कर्ष आढळले आहेत. अर्थात अजून हे प्रयोग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाहीत.

तरीसुद्धा एक रोचक बाब त्यातून पुढे आलेली आहे. कोविशिल्ड प्रकारच्या लसीमुळे शरीरात T -सेल्सची निर्मिती चांगली होते. तर फायझर प्रकारच्या लसीमुळे शरीरात अँटीबॉडीज अधिक चांगल्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे भविष्यात या दोन लसींचे मिश्रण देण्याबाबत अधिक विचार करता येईल.

विषाणूच्या बदलत्या नव्या उपप्रकारांविरुद्धही अशा प्रकारचे मिश्रण अधिक उपयुक्त ठरू शकेल ठरू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात अधिक संशोधनाची गरज आहे.

https://www.nature.com/articles/d41586-021-01805-2

फिजी सरकारनं एक सूचना जारी केली आहे. करोनाची लस न घेतलेल्यांना जॉब देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी दिले आहेत
https://www.loksatta.com/desh-videsh-news/fiji-government-announce-vacci...

आमच्या इथेही एका कंपनीने लस घेणार नाही सांगणार्‍या ३०० जणांना पिंक स्लीप दिली. त्यात नवर्‍याच्या मित्राच्या बायकोचाही जॉब गेला.

नांदेड मध्ये मंगळवारी शून्य नवीन करोना cases होत्या.
आता hi संख्या avg १०-१५ अशी आहे.
कायमची शून्य सगळीकडे होऊ देत

नांदेड छान
कोल्हापूर, सातारा आणि अन्य ६ जिल्ह्यात अजून चिंता आहे

Pages