कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नवरा १७ एप्रिल पासून डार्विन, ऑस्ट्रेलिया मध्ये विलीगीकरणात आहे. इथे येणाऱ्या विमानात एकूण ४७ जणांना संसर्ग झाला त्यात हा पण होता. इथल्या नियमांप्रमाणे दिवसातून एकदा ताप चेक करतात आणि फोने वर  लक्षणे काय आहेत विचारतात. कोणतीही औषधे देत नाहीत, दिवसभराचे जेवण सकाळी ६ वाजता अजून देतात आणि रूम मध्ये मिक्रोवेव्ह नाही(पण फ्रिज आणि किटली आहे). त्याला खूप ताप आणि खूप कोरडा खोकला आहे. पण बिचार्याला थंडगार अन्न खाऊन त्रास होतोय. ब्रेकफास्टसाठी थंड दही आणि कॉर्नफ्लेक्स देतात. अन्न जात नाही, वाफ घ्यायला स्टीमर नाही, रूम मधला AC बंद करायचा नाही, रूम ची खिडकी उघडायची नाही. कोरड्या खोकल्यावर काही औषध देत नाहीत. अशाने  तो कसा बरा  होणार?! आणि खोकला पूर्ण गेल्याशिवाय घरी सोडणार नाही म्हणतायत! सगळंच अवघड आहे. तुरुंगवास परवडला ह्या पेक्षा! आपल्याकडे अजून कॉमनसेन्स वापरात आहेत हे पाहून खूप बरे वाटते. 

पल्वली,
वाचून वाईट वाटले. मोकळी हवा खूप महत्वाची आहे.
असो. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

डॉक्टर, माझ्या मम्मीला जानेवारीत कोव्हिडं झाला होता, लंग इन्फेक्शन पण होते, त्यासोबत ऑटोइंम्युन आजारही आहेत. आता अचानक तिची दाढ खुप दुखत होती म्हणून डेंटिस्टला दाखवले तर त्यांनी सांगितले की कोव्हीड होऊन गेल्यावर किमान सहा महिने दात काढता येत नाही. अन नंतरही जर काढायची असेल तर एमडी डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागते की दाढ/दात काढू शकता, जर ते डॉक्टरांनी दिले नाही तर आम्ही दाढ काढत नाही, कारण जर फँगस इन्फेक्शन झाले तर पेशंटच्या जीवावर बेतू शकते.
प्लिज मला सांगा की अश्या काही केसेस झाल्या आहेत का? अन जर त्रास सहन करण्यापलीकडे असेल तर या परिस्थितीत काय करावे?

धन्यवाद

व्हिबी, प्लीज डॉक्टरांना म्यूकर मायकॉसिस या बद्दल माहिती विचारा.

माझा भाऊ, जो ओरल सर्जन आहे, त्याने आजच याविषयी लिहिलेली माहिती खाली देत आहे.
*कोरोनामुक्तांनो सतर्क राहा*

पासष्ट वर्षांचे श्री अण्णासाहेब पाटील (नाव बदलले आहे) कोरोना वॉर्डमधून सुखरूप घरी परतले. आठ दिवस ऑक्सिजनवर असल्यामुळे घरी सगळे चिंतातुर होते तर अण्णांना असलेला अनियंत्रित मधुमेह ही डॉक्टरांसाठी चिंतेची बाब होती. नातेवाईकांची ऑक्सिजन, रेमडेसव्हिरसाठी थोडी धावपळ झालीच. सुदैवाने डॉक्टरांचे अथक परिश्रम आणि अण्णांच्या प्रबळ इच्छाशक्तीने संकटावर मात केली आणि ते रोगमुक्त झाले. सगळ्यांना हायसे वाटले.

पण घरी आल्यावर अण्णांना वरच्या जबड्यात अधूनमधून तीव्र वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं. शिवाय कोरोना होण्याअगोदरही त्यांना दातांचा त्रास होत होताच. सावकाश जाऊ डेंटिस्टकडे असं म्हणत आणि पॅरासिटॅमॉल खात अण्णा वेळ मारून नेत होते.
असेच काही दिवस गेले आणि जबड्यातील वेदना असह्य होऊ लागली, डोकंही दुखू लागलं. अचानक एका बाजूचे अनेक दात हलू लागले. मग मात्र त्यांनी आपल्या डेंटिस्टकडे धाव घेतली. डेंटिस्टने ओरल सर्जनच्या मदतीने निदान केलं 'म्युकर मायकोसिस'
अण्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करावी लागली. त्यांचे प्राण तर वाचले परंतु वरचा जबडा मात्र बराचसा काढून टाकावा लागला.

म्युकर मायकोसिस हा एक गंभीर आजार आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे अश्यांमध्ये क्वचितच आढळतो. परंतु अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एड्स तसेच प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे (स्टिरॉइड्स, सायक्लोस्पोरिन आदी) घेणाऱ्या रुग्णांना हा चट्कन लक्ष्य बनवतो.

म्युकर ही एक प्रकारची बुरशी आहे जिचे तंतू हवेत, मातीत, अन्नात असू शकतात व ते नाकावाटे, जेवणातून शरीरात प्रवेश करू शकतात. रक्तातील वाढलेली साखर हे बुरशीचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे अनियंत्रित मधुमेहींमध्ये हा संसर्ग झपाट्याने वाढतो. जर रुग्णाची प्रतिकारशक्ती काही कारणांनी कमी झाली असेल तर ह्या बुरशीच्या संसर्गाला काही अटकाव राहात नाही व संसर्ग बळावतो.
म्युकर बुरशी मानवी शरीराच्या कुठल्याही भागाला ग्रासू शकते. परंतु सध्या कोरोना झालेल्या रुग्णामध्ये वरचा जबडा, सायनस आणि डोळ्यांवर अधिक परिणाम दिसून येत आहे.

सुदैवाने ह्या बुरशीचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज होत नाही. म्युकर बुरशीचे तंतू हवेत, मातीत, अन्नात सहज सापडतात. त्यामुळे हवेतून, दूषित मास्क, ऑक्सिजनच्या अस्वच्छ नळ्यांमधून बुरशीचे तंतू नाकातोंडात शिरकाव करु शकतात व सायनसमध्ये (वरच्या जबड्याच्या हाडातील नैसर्गिक खोबण) ठाण मांडून बसतात.

लवकरच हे तंतू रक्तवाहिन्यांमध्ये आपले हातपाय पसरतात व रक्तवाहिन्या कायमस्वरूपी निकामी होतात. परिणामी हाडांचा रक्तपुरवठा खंडित होतो व हाड मृतावस्थेत जाते.
दुर्दैवाने इतके सगळे घडेस्तोवर रुग्णाला वरकरणी काहीच त्रास जाणवत नाही व रुग्ण गाफील राहतो. ह्या स्थितीत क्ष किरण तपासणी वा अन्य रक्त चाचण्या केल्या तरी त्या बऱ्याचदा सर्वसाधारण आढळून येतात. त्यामुळे लवकर निदान होत नाही.

काही दिवसातच जबड्याचे हाड नष्ट होऊन तिथे जंतुसंसर्ग होऊ लागतो (सुपर इन्फेक्शन) व हिरड्यांमधून पू येणे, दात हलू लागणे, ताप येणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात. बुरशी संसर्गामुळे नसांनाही सूज येते व रुग्णाला असह्य वेदना होऊ लागतात ज्या सौम्य वेदनाशामकांनी कमी होत नाहीत व विशेष प्रकारची औषधे द्यावी लागतात.
ही लक्षणे बुरशीने शरीरात प्रवेश केल्यापासून साधारणपणे पंधराव्या दिवसानंतर दृग्गोचर होतात.

वरचा जबडा व सायनसमधून म्युकर बुरशी आपला मोर्चा डोळ्याच्या खोबणीकडे वळवते. डोळ्याभोवती सूज येते, डोळा उघडण्यास त्रास होतो, नजरेवर विपरीत परिणाम होऊ लागतो, कायमस्वरूपी अंधत्व येते.

हा संसर्ग येथून वेगाने मेंदूतही जाऊ शकतो व मेंदूदाह उद्भवतो. अश्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते.

*निदान*

प्रादुर्भाव झालेल्या उतींची कॅलकोफ्लोर चाचणी तसेच KOH स्टेनिंगच्या मदतीने म्युकर संसर्गाचे जलद निदान केले जाते. मोठ्या शहरांमधील बहुतेक सर्व संस्थात्मक रुग्णालयांमध्ये ही चाचणी उपलब्ध आहे.
सिटीस्कॅन व एमआरआय चाचण्या करून रोगाची व्याप्ती अभ्यासली जाते व त्यानुसार उपचार योजना आखली जाते.

*उपाययोजना*

बुरशीचा प्रादुर्भाव झालेला भाग पूर्णपणे काढून टाकण्यास सध्यातरी दुसरा पर्याय नाही. हे उपचार मोठ्या रुग्णालयात ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन, कान नाक घसा तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ आणि मधुमेह विशेषज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने केले जातात.

पुढील प्रसाराला आळा घालण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अँटीफंगल औषधांची इंजेक्शन्स, रक्तशर्करा काबूत आणणे व रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढवणे हेसुद्धा उपचारांचे अविभाज्य घटक आहेत.
सध्या तरी बुरशीरोधक औषधांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. तसेच ती औषधे अनेक आठवडे घ्यावी लागतात ज्यामुळे मोठा खर्च होतो.

ह्या रोगाचे निदान जितक्या लवकर होईल तितकी शस्त्रक्रियेची व्याप्ती कमी करता येते. अर्थातच शस्त्रक्रियेनंतरचे व्यंग कमी राहते. तथापि म्युकर बुरशीचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याने निदान करण्यास व उपचार सुरू करण्यास विलंब झाला तर शरीराचे अधिकाधिक भाग निकामी बनतात व काढून टाकावे लागतात. जबड्याच्या हाडांसोबत डोळाही पूर्णपणे काढून टाकावा लागतो ज्यामुळे फार मोठे वैगुण्य प्राप्त होते. म्हणूनच कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनी दातांच्या वरकरणी किरकोळ वाटणाऱ्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

साधारणपणे सहा महिन्यांनी जबड्याचे पुनर्निर्माण करण्याची शस्त्रक्रिया केली जाते ज्यात पायाचे हाड काढून जबड्याच्या ठिकाणी रोपण केले जाते.
डोळा काढलेल्या जागी कृत्रिम डोळा बसवला जातो तथापि दृष्टी मात्र प्राप्त होत नाही.

*प्रतिबंध*

कोरोनामुक्त सर्व व्यक्तींनी पुढील किमान दोन महिने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, घरात वा अन्यत्र स्वच्छ चांगल्या प्रतीचा मास्क वापरणे, मुखारोग्य व दंतारोग्य उत्तम ठेवणे, सतत हात धुणे व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रथिनयुक्त आहार, जीवनसत्त्वे तसेच नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

तसेच कोरोनामुक्त झाल्यावर आपल्या दंतरोगतज्ज्ञाकडून जबड्याची व दातांची सखोल तपासणी करणे कान नाक घसा तज्ज्ञांकडून सायनसची तपासणी व एक्सरे करणे आवश्यक आहे. कोरोना होण्यापूर्वी मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनामुक्त झाल्यावर मधुमेह झालेला आढळून येत आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर बारीक नजर ठेवणे महत्त्वाचे आहे.

म्युकर संसर्गाला वेळीच आळा घालण्यात अपयश आले तर हा रोग प्राणघातक ठरतो हे लक्षात घेऊन सर्वांनी सजग राहणे अत्यावश्यक आहे.
डॉ प्रसाद दाढे
मॅक्झिलोफेशियल सर्जन
पुणे

व्ही बी
कोविड च्या काही रुग्णांना नंतर हिरड्यांचा दाह, रक्तस्त्राव व तोंडात अल्सर तयार होणे असे होऊ शकते इतके माहिती आहे.
काहींना म्युकर संसर्गही होऊ शकतो .
परंतु दंतवैद्यकांच्या उपचारांच्या धोरणासंबंधी काही कल्पना नाही

वादग्रस्त औषध आणि कोर्टकचेरी !

अमेरिकेत एक 68 वर्षीय बाई कोविडबाधित असून गेले महिनाभर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्या नातेवाईकांची इच्छा होती की या बाईंना Ivermectin या औषधाचे उपचार द्यावेत. वास्तविक अमेरिकेत या औषधाला अधिकृत मान्यता नाही. पण जगात इतरत्र ते बऱ्यापैकी वापरतात. सदर रुग्णालयाने नातेवाईकांची विनंती फेटाळून लावत ते औषध देण्यास ठाम नकार दिला.

मग नातेवाईकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिथे त्यांनी लेखी हमी दिली, की या औषधाचे जे काही दुष्परिणाम होतील त्याच आम्हीच जबाबदार राहू.
अखेर न्यायालयाने रुग्णालयास हे औषध रुग्णास देण्यासंबंधीचा आदेश दिला.

(https://www.chicagotribune.com/coronavirus/ct-elmhurst-hospital-ivermect...)

मतभिन्नता व दिलासा !

“एका सीटी स्कॅनमध्ये ३०० एक्सरेच्या बरोबरीचे रेडिएशन असते”
- एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

मात्र भारतीय इमेजिंग डॉक्टरांच्या संघटनेनेनुसार हा दावा बरोबर नाही. त्यांच्यामध्ये एक सिटीस्कॅन पाच ते दहा क्ष किरण इतकाच किरणोत्सर्ग पोचवतो.

https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/radiologists-rubbish-dr-r....
….
तारतम्याने वापर हे महत्वाचे.

डॉक्टर, त्या विराफीन औषधाविषयी काही अधिक अद्ययावत बातमी आहे का ?

म्हणजे शासनाने त्याला परवानगी दिल्यानंतर कोविड रुग्णांसाठी त्याचा वापर व त्याला मिळालेला प्रतिसाद यासंदर्भातील वैद्यकीय वर्तुळातील काही अपडेट?

डॉक्टर,
पहिली लाट वयस्कर लोकांना घातक ठरली, दुसरी लाट तरुण लोकांना घातक आहे, तिसरी लाट आल्यास ती मुलांसाठी घातक असेल वगैरे बातम्यांत येत आहे ते काय आहे आणि कसे होते. म्हणजे वायरस म्युटेट होतो म्हणून होते का?

स्वासु
मी त्यावर नजर ठेवून आहे. पण अजून खात्रीशीर माहिती नाही मिळाली.
..
स्वाती,
तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर याच धाग्यावर इथे दिलेले आहे :
पान ६
Submitted by कुमार१ on 5 May, 2021 - 12:16

न्यु यॉर्क टाइम्समधल्या या लेखानुसार जागतिक आरोग्य संघटनेने करोना कसा पसरतो याबद्दलच्या माहितीत गेल्या आठवड्यात भर घातली आहे. बंद जागेत तो हवेतल्या हवेतही पसरतो.
The virus can also spread in poorly ventilated and/or crowded indoor settings, where people tend to spend longer periods of time. This is because aerosols remain suspended in the air or travel farther than 1 metre (long-range).
WHO ने हे सांगायच्या आधी बरेच तज्ज्ञ असे म्हणत होतेच.

लेखात जितके सेन्सेशनलाइज केले आहे तितके ते आहे का?

भरत
तो लेख खाते असल्याशिवाय वाचण्यास उपलब्ध नाही. तरीपण मुद्दा लक्षात आला.
या विषाणूंचा प्रसार अधिकतर हवेतून की थेंबांच्या स्पर्शातून हा अशक्य काथ्याकूट झालेला विषय आहे ! दोन्ही बाजूंचे आपापले खंदे वैज्ञानिक आहेत आणि त्यांची आपापली मते वैद्यकीय नियतकालिकात येत आहेत. कुठलीच बाजू फार ताणू नये असे वाटते.
थोडक्यात असे दिसते :

बंदिस्त हवेत जिथे मोकळी हवा खेळती नसेल तिथे अंतर आणि मास्क याचे महत्त्व जास्त आहे. पुरेसे लसीकरण झालेल्या काही देशांत आता बाहेर मोकळ्या हवेत फिरताना मास्कचे बंधन काढलेले आहे.

धन्यवाद डॉक्टर!

भरत,
थंड हवेच्या प्रदेशात सतत सगळे बंद, उष्णतेचा र्‍हास कमी व्हावा म्हणून घेण्यात येणारी काळजी यामुळे आतील हवेची गुणवत्ता मुळातच कमी असते. त्यात हा वायरस अति संक्रमणशील. मास्क न घालता वावर केल्यावर ती व्यक्ती तिथून निघून गेली तरी बंद जागेत ती हवा तशीच रहाते. व्यक्ती बाधित असेल तर विषाणू हवेत रहाणार आणि संसर्ग होणार. आमच्या इथे कंपल्सरी मास्क, डोळ्याला सेफ्टी ग्लासेस यामुळे फॅक्टरीतून संसर्ग हा प्रकार फारसा नाही मात्र हॉल टाईप चर्च मधून (गाणे होते) संसर्ग हा प्रकार बराच झाला.

मला येतोय पूर्ण वाचता.

त्यांचा मुद्दा हा आहे की लोकांना घरात राहायाला सांगितले. तुलनेने बाहेर मोकळ्या हवेत (गर्दी नसलेल्या ठिकाणी) ते जास्त सुरक्षित होते.

बँका, कार्या लये दुकानांतले ६ फूट अंतर निर्माण करणारे अडथळे कुचकामी आहेत.

वायुवीजनावर अधिक लक्ष दिले नाही. इ.

सिटी स्कॅन 2 प्रकारे करतात
1. Screening
2. Deep study

Screening मध्ये एक्स्पोजर कमी असते , जे बहुतांशी कोविड मध्ये जे चेस्ट सिटी करतात , त्याला लागते

Deep study वाले जास्त वेळ चालते , त्याला एक्स्पोजर अजून 4,5 पट जास्त लागते

ऐकीव माहितीवर आधारित

नक्की टर्मिनोलॉजी व आकडेवारी तज्ज्ञांकडून माहिती करून घेणे

दोन दिवसांपूर्वी मला एका बँकेच्या कर्ज शाखेत जायचे होते.
तिथे गर्दी असण्याची शक्यता होती आणि आत तासभर तरी लागण्याची शक्यता होती. मी घरून निघताना N95 मास्क आणि वरून हेल्मेट घालून गेलो. स्कुटर पार्क करून हेल्मेट काढून N95 च्या वर अजून एक सर्जिकल मास्क चढवला आणि कार्यालयात गेलो. तिथे आलेले जवळपास सगळेच, आणि तिथले सगळेच कर्मचारी एकावर एक दोन मास्क्स घालून होते.
पण मी वगळता मी नीट पाहिलेल्या सगळ्यांनी आधी सर्जिकल मास्क घालून त्यावर N95 मास्क घातला होता.

तर दोन मास्क घालायचे असल्यास आधी सर्जिकल वरून N95 असा काही प्रोटोकॉल आहे का?

मला वाटले की N95 तोंडावर फिट बसतो, त्या खाली सर्जिकल घातला तर कदाचित हे नीट साध्य होणार नाही.
दुसरे असे की सर्जिकल मास्क डिस्पोजेबल आहे आणि N95 आपल्याला परत वापरायचा आहे तेव्हा डिस्पोजेबल मास्क वरून लावलेला बरा.

सरकार किंवा सरकारी अंकुश असणाऱ्या संस्था जे जे काही सांगतात त्यावर पटकन किती विश्वास ठेवावा अशी सद्यस्थिती आहे. सिटी स्कॅन का करू नये सांगताना गुलेरिया साहेब इतक्या मख्ख चेहऱ्याने बसले होते की अशा नरो वा कुंजरवो पद्धती आता चटकन ओळखायला येऊ लागल्याचा भास होतोच Wink

दोन मास्क घालायचे असल्यास आधी सर्जिकल वरून N95 असा काही प्रोटोकॉल आहे का? >>
सामान्य माणसांसाठी नाही.
याच भागात आधी चर्चा झालीय.

आमच्या इथे मुळात आपल्या कडे भरपूर साठा आहे आणि पँडेमिक काही इतक्या लांब येत नाही असे म्हणत आधी चीनला प्रोटेक्टिव गिअर पाठवणे झाले. नंतर पँडेमिक आल्यावर फ्रंट लाईन वर्कर्सनाच कमतरता अशी अवस्था होती. त्यात सामान्य नागरीकांनीही मास्क-मास्क केले असते तर अजूनच पंचाईत तेव्हा सामान्य नागरिकांनी मास्क लावायची अजिबात गरज नाही असे सांगत राहीले. घरगुती दोन घडीचा कापडी मास्क वापरा असे सांगेपर्यंत इट वॉज टू लेट! तोपर्यंत मास्क हवा-नको होवून दोन तटही पडले होतेच.

पूरक उपचार : ताजी बातमी

भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आजच दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते.
मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.

https://www.thehindu.com/news/national/dcgi-approves-anti-covid-drug-dev...

हा कुठल्या सध्याच्या औषध/इंजेक्शन ला रिप्लेस करेल की हा पूर्ण वेगळा, मेडिकल ऑक्सिजन बरोबर द्यायचा जादा चा उपचार आहे?
(दुसऱ्या शब्दात, हे दिलं म्हणून ते द्यावं लागलं नाहींआशी काही केस आहे का?)

सध्याच्या औष ध /इंजेक्शन ला रिप्लेस करेल >>>
नाही.
मेडिकल ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णाचा पूरक उपचार आहे.
त्याच्या वापराने मेडिकल ऑक्सिजन पासून लवकर सुटका होते.

>>मेडिकल ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णाचा पूरक उपचार आहे.
त्याच्या वापराने मेडिकल ऑक्सिजन पासून लवकर सुटका होते.>> आशादायक बातमी.

डॉक्टर ..माझ्या मुलाने (वय- २१ वर्ष)७ मे ला covishield चे पहिलं vaccine घेतलं... त्याला काल दुपारपासून अंगदुखी, डोकेदुखी आणि कणकण आहे...ताप १०० च्या आतच आहे...किती दिवस ही लक्षण राहतात?

डॉ योग्य ते सांगतीलच.
फार तर दिड किंवा २ दिवस. हात दुखला तरी थोडा हलवत रहायचा. ताप एक चांगली झोप मिळाली क्रोसिन घेऊन की जातोच.
हातदुखी पुढचे काही दिवस राहील पण फक्त स्पॉट वर दाब पडला तरच. ती पण कमी होत जाईल. जितके नॉर्मल रुटीन, जास्त लिक्वीड आणि
नीट वेळेत झोप तितके लवकर बरे होत जाते.

मला व्हॅक्सिन घेतल्यावर दोन दिवसांपर्यंत लोग्रेड (१०० पर्यंत) ताप, अंगदुखी असेल तर काळजी चे कारण नाही. टायलेनॉल (अ‍ॅसिटोमिनोफिन/ पॅरसिटेमॉल), अ‍ॅडव्हिल (आयब्युप्रोफेन) गरज वाटली तर घ्यायला सांगितले.
तीन दिवसांवर ताप राहिला तर वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले.

Pages