कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुग्णाच्या घरचे निगेटिव्ह असले तरी त्यांनीही विलिनीकरण टाळणं गरजेचं आहे. कामवाली हवीच असेल तर तिला सात दिवस घरीच ठेवून घ्यावं.

हो. आणि निगेटिव्ह लोक मधल्या काळात संपर्क येऊन पॉझिटिव्ह बनू शकतात.
शक्यतो बाईंना एक्स्पोज करु नये या धोक्याला.खाण्या पिण्याला शक्ती नसल्यास डबा लावता येईल.हल्ली ३ मील्स चे आणि नीट पथ्य पाळून आयसोलेशन मधल्यांसाठीचे डबे मिळतात. खूप सर्व्हिसेस आहेत.
उभ्याने पुसायचा मॉप असल्यास स्वच्छता पण खूप जड जाणार नाही.
वाकड, पिंपरी इथे दिवसाला ३५०० मध्ये आयसोलेशन सेंटर आहेत. स्वच्छतेची काळजी, जेवण आणि लागतील ती औषधे दिली जातील.
कितीही चांगली काळजी घेतली तरी एरोसोल पार्टिकल हा मुद्दा विचाराधीन असतोच.

मानसिक आजार बळावलेत का की बळावतील ? >>>

गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर वैद्यकीय नियतकालिकात बरेच काही प्रसिद्ध झालेले आहे. अर्थातच सततच्या तणावयुक्त वातावरणाचा लोकांवर परिणाम होत आहे.
याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर यापूर्वी मी एक प्रतिसाद लिहीलेला आहे. कोविडचे दीर्घकालीन (एक वर्षानंतर) परिणाम हाही वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे पण सध्या तो नको. सवडीने पाहता येईल.

मंता,
होय, आहेत तर !
आता यात दोन भाग आहेत.

विशिष्ट कारणाने लस न घेणारे. यात निरीक्षण केल्यावर मला तीन प्रकारची कारणे आढळली:
१. विविध औषधांची ऍलर्जी आहे म्हणून. हे शास्त्रीय कारण आहे.
२. काही ऑटोइम्यून प्रकारचे आजार असलेले लोक. त्यांच्या बाबतीत संबंधित डॉक्टरच्या सल्ल्यानेच रुग्णसापेक्ष निर्णय घ्यावा लागतो.
३. आधुनिक वैद्यक वगळता इतर पद्धतींवर ठाम विश्वास असलेले काही लोक.

हे वगळता लस-विरोधक हे एक मोठे संघटन आहे. अमेरिकेत त्याचा बराच बोलबाला आहे. वृत्तपत्रीय माहितीनुसार सध्याच्या एका बलाढ्य लस कंपनीचे माजी अध्यक्ष देखील या संघटनामध्ये सामील आहेत.

युरोपमध्ये एझेड लसीमुळे अत्यल्प लोकांवर गंभीर परिणाम झाले. त्याचा परिणाम म्हणून सुद्धा लस नाकारणारे काही लोक वाचनात आले.

कोविन सिस्टिम सोबत फास्टेस्ट फिंगर फस्ट राउंड जिंकून आज पुण्यात लसीकरण करून घेतले. कोविशील्ड मिळाली..
दवाखान्यात जायला खूप भीती वाटली. N95 + साधा कापडी असा डबल मास्क आणि शिवाय ते प्लास्टिक चं फेसशिल्ड वापरलं. 2 तास भयंकर गेले.डॉक्टर लोक दिवस दिवस पीपीई किट मध्ये कसे काढत असतील या कल्पनेने भरून आलं मला.
डॉक्टर लोकांना मनापासून सलाम .
लस टोचली ते कळलं पण नाही. माझ्या आधी लस घेऊन बाहेर गेलेला मुलगा परत येऊन नर्स बाईंना 2 दा विचारून गेला की "अहो नक्की दिली ना मला लस. मला नाही कळलं "
नंतर observation room मध्ये तोच मुलगा लस घेतलेल्या दंडाचा सेल्फी काढताना दिसला . कुठे काही बारीक छिद्र तरी दिसतं का बघत असावा ..हा हा हा
आता अनेक ठिकाणी अचानक covaxin च कशी चांगली यावर लोक बोलत आहेत. राज्य सरकार ने पण अचानक 18-44 मधल्या जास्तीत जास्त लोकांना covaxin देणार असे जाहीर केले आहे . म्हणजे असे आज सकाळ मध्ये वाचले.
Whatapp university मध्ये पण दोन्ही लसीचा उहापोह आणि covaxin च कशी चांगली असे लेख येऊ लागलेत.
असो. आता जास्त विचार करायचा नाही असे ठरवले आहे. जे सगळ्यांचं होईल तेच आपलं होईल

कुठली चांगलीला सध्या काही अर्थ नाही.
कुठलीच न मिळणे याच्याशी तुलना करता कुठली तरी मिळण्याने तुमचे आयसीयू मध्ये जाण्याचे आणि दगावायचे चान्सेस कित्येकपटींनी कमी होतात, तेच महत्त्वाचे.

मी पण दुसरा डोस घेण्यासाठी दोन मास्क परत ते प्लास्टिक चे फेसशील्ड लावून गेलो होतो .आठ दिवस पूर्वी.
पण दोन मास्क आणि faceshild लावल्यावर शरीराचे तापमान अचानक खूप वाढले .नर्स बोलली पण तुमचे अंग किती गरम झाले आहे.
तर dr he असे अचानक तापमान कशामुळे वाढत.
नंतर घरी आल्यावर सर्व मास्क काढल्यावर तापमान नॉर्मल वर आले.

अमितव +१.
वेगवेगळ्या लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी झाल्या आहेत. तेव्हा चाचण्यांच्या दरम्यान त्या त्या ठिकाणी कुठला स्ट्रेन किती धुमाकूळ घालत होता यावरूनही लस किती प्रभावी या टक्केवारीत कदाचित फरक येत असेल. त्यामुळे ही ८५% प्रभावी ती ९६% याला फारसे महत्व नसावे, अद्याप तरी.

मानव
वयोगटानुसार कोविशिल्ड आणि कोवाक्सीन यासंदर्भात परिणामकारकतेची टक्केवारी हा मुद्दा नाही. कोविशिल्डच्या दुर्मिळ संभाव्य दुष्परिणामबद्दलचा हा मुद्दा आहे, जो तरुण लोकांमध्ये आढळला.

त्यामुळे युरोप आणि ऑस्ट्रेलिया मध्येही तसाच निर्णय झालेला आहे. 45-50 वयोगटाच्या आत अन्य लस तर ज्येष्ठांना कोविशिल्ड. तर काही देशांत पहिला डोस कोविशिल्ड झाला असेल तर दुसरा फायझर.

>>काही देशांत पहिला डोस कोविशिल्ड झाला असेल तर दुसरा फायझर. >> हे कुठे झालंय?
आमच्याकडे AZ चे डोस सुरुवातीला आले, मग दुसर्‍या डोसची काही खात्री नाही म्हणून मिक्स अँड मॅच करावं का काय असं वाचतोय पण यावर अजुन पब्लिक हेल्थने काही सांगितलेलं नाही. कुठे केलं असेल तर प्लीज लिंक शेअर करा.
रक्तात गाठी होण्याची टक्केवारी, व्हॅक्सिन'मुळे' गाठींची टक्केवारी, आणि गाठी होण्याची टेंडंसी असलेल्या व्यक्तीला कोविड झाला आणि त्याच्या औषधोपचारात गाठी होण्याची टक्केवारी बघितली की सर्वांनी व्हॅक्सिन घ्यावे हे स्पष्ट दिसतं.

Covaxin पेक्षा covishield घेतल्या नंतर त्रास जास्त होतो म्हणजे ताप येणे,अंगदुखी,इत्यादी.
असेच खूप लोकांचे ऐकले आहे .मी covaxin घेतली आहे जास्त काही त्रास जाणवला नाही .
पण covishild घेतली त्यांना जास्त साईड इफेक्ट जाणवले.
काही नी तर धास्ती च घेतली आहे.covishield ची.
जे आजू बाजूला,मित्र मंडळीत जाणवले ते व्यक्त केले आहे.
शास्त्रीय मत किंवा दावा नाही

कोव्हीशिल्ड चे इफेक्ट आपल्याला वर्षातून एकदा ताप कणकण येते आणी आराम केल्यावर परत घाम येऊन बरे वाटते तसाच आहे.
१ दिवस नीट झोप आराम केल्यावर सर्व व्यवस्थित होते. मी कोव्हिशिल्ड घेऊन आल्यावर स्वयंपाक केला, गिरणीत गहू आणि ज्वारी दळली, गिरणी साफ केली.इतकं करेपर्यंत ६-७ तास झाले होते. हातदुखी चालू झाली होती आणि पावसाळी हवा असल्याने थंडी वाजत होती.क्रोसिन घेऊन झोपले, मग सकाळी थोडी माफक कामे(सुपरडेली बॅग मधून भाज्या काढून लावणे वगैरे) केली आणि क्रोसिन घेऊन झोपले.मग दिवसभर आराम केला.ताप होता पण त्रास होण्याइतका नाही.त्या दिवशी कुशीवर मात्र वळता येत नाही इंजेक्शन दिलेल्या.
पण यातल्या कोणत्याच गोष्टी असह्य, त्या त्रासाची भिती वाटणे, त्यासाठी लस टाळणे वगैरे या लेव्हल च्या अजिबात नव्हत्या.

>>काही देशांत पहिला डोस कोविशिल्ड झाला असेल तर दुसरा फायझर. >> हे कुठे झालंय?
आमच्याकडे AZ चे डोस सुरुवातीला आले, मग दुसर्‍या डोसची काही खात्री नाही म्हणून मिक्स अँड मॅच करावं का काय असं वाचतोय पण यावर अजुन पब्लिक हेल्थने काही सांगितलेलं नाही. >>>> +१

मलाही तोच प्रश्न होता. असं चालतं का? आणि मग नव्या वॅक्सिनचे दोन डोन घ्यावे लागणार का ? (म्हणजे एकूण तीन).

पराग
वर जो डेन्मार्कचा दुवा दिला आहे तो वाचलात का ?
ज्या देशांनी तसा निर्णय घेतला आहे त्यांच्याकडे दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा चालणार आहे.
म्हणजे एकूण दोनच डोस घ्यायचे.
आता प्रत्यक्ष अंमलबजावणी ते देश कधी करणार आहेत त्याबद्दल मला कल्पना नाही

Submitted by mi_anu on 5 May, 2021 - 12:47>>> असाच अनुभव मला Pfizer लस घेतल्यावर आला.

वरील सर्वांचे लस घेतल्यानंतर चे अनुभव वाचले.
व्यक्ती तितक्या प्रकृती हे त्यातून दिसून येते.
सर्वांनाच कुठलाही अधिक त्रास न होवो आणि जास्तीत जास्त प्रतिकारशक्ती मिळो ही शुभेच्छा !

अंदाजे सहा ते आठ महिने.}}...
डॉक्टर मग हे 6 ते 8 महिन्यांनी लसीचा प्रभाव राहणार नाही का ?..अशा परिस्थितीत कोविड चा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर पुन्हा लस घ्यावी लागेल का ? आपण लहान मुलांना ज्या लसी देतो त्या एकदाच देतो (2 -3 टप्प्यात असल्या तरी) आणि त्यांचे संरक्षण कायम मिळते . कोविड लसी तशा प्रकारच्या नाहीत का?>>>>
इथे(अमेरिकेत) दरवर्षी फ्लू चा त्रास होऊ नये म्हणून शॅाट घ्यावे लागतात. बहुतेक कोविडसाठीही अशीच लस घ्यावी लागेल.

Pages