कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी १.६१७ प्रकाराबद्दल वैज्ञानिकांत मतभेद आहेत.

दुसरी बाजू :
१. या प्रकारात एकूण पंधरा जनुकीय बदल झालेले आहेत. त्यापैकी ठराविक दोघांचा ठळकपणे उल्लेख करून त्याला ‘डबल mutant’ असे चुकीचे नाव माध्यमांनी रूढ केले.

२. आता वरील जे दोन बदल आहेत त्यातील एक जुनाच (कॅलिफोर्नियावाला) आहे. तर दुसऱ्या बदलाचे जीवशास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व नाही.

३. म्हणून बी १.६१७ मुळेच भारतातील दुसरी लाट जोरात पसरली का, हे ठामपणे म्हणता येत नाही. या प्रकाराला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली गेली आहे.
...................................
“B.1.617 हा करोनाचा उपप्रकार भारतीय नाही”, सर्व दावे निराधार असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट!
https://www.loksatta.com/desh-videsh-news/claim-new-corona-variant-is-in...

B.1.617 हा करोनाचा उपप्रकार भारतीय नाही”, सर्व दावे निराधार असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट!>> डॉ. यावर आपलं मत काय आहे? एखाद्या चर्चेत प्रत्येक वेळी दोन तीन वेरेंटबद्दल बोलताना आकडे सांगताना घोळ होऊ शकतो, लोकांना कळण्यात अडचणी येऊ शकतात तेव्हा सोयीसाठी असे युके, आफ्रिका, इंडीयन वेरेंट बोलले जाते. इतर बाबतीत ढिम्म असणारं सरकार इतक्या लगबगीत यावर का बोलतंय? म्हणजे अजूनही हेडलाईन्स मॅनेज करायचा मोह सुटत नाही का?

फिल्मी
तुमच्या प्र आधीच मी शास्त्रीय माहिती दिली आहे.

"२. आता वरील जे दोन बदल आहेत त्यातील एक जुनाच (कॅलिफोर्नियावाला) आहे. तर दुसऱ्या बदलाचे जीवशास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व नाही."

राजीव करवाल व मिशेलिन टायर्स चे इंडिया सी इओ ह्यांचे कोविड मुळे निधन झाले. दोघे ५८ व ५३ चे होते. दोघां च्या करीअर्स जबरदस्त व आता असा मृत्यु.. फार वाइट वाटले.

कुमार सर, या जनुकीय बदलांच्या बाबतीत दोन्ही बदल एकत्र आल्याने greater than some of its parts असा परिणाम दिसू शकतो. जरी individual variants भारतात निर्माण झाले नसले तरी double mutant किंवा त्याहून अधिक mutations एकत्र असलेला variant भारतात सर्वप्रथम आढळला असे असू शकते.

हे केवळ 'भारतीय' शब्दावरुन चाललंय असं वाटलं. 'चायनीज व्ह्यायरस' सारखं भारतीय व्हायरस म्हटलं तर चालत नाही बहुतेक. बाकी त्यात वेळ दवडण्यात अर्थ नाही.

ह्या व्हायरस ची जास्त च चर्चा घडवून आणली जात आहे जागतिक पातळीवर.एड्स ,mars, sarse, येवून गेले पण एवढी detail चर्चा कधीच झाली नाही.
ज्ञानअमृत तर खूप पाजलं गेले ह्या वेळेस.
१)व्हायरस म्हणजे काय?
२) तो कसा पेशीत एन्ट्री करतो.
३)त्याचे mutation कसे होते.
४) लस म्हणजे काय.
५) प्रतिकार शक्ती कसे काम करते.
ह्या सर्व विषयाच्या माहितीचा एवढं पुर आला की माणसाला पहिल्यांदाच व्हायरस विषयी माहिती झाली आहे.
सर्व माहिती आहे पण उपाय कोणाकडे च नाही.
काय करायचं आहे असल्या वांझोट्या माहितीच .
लोकांना स्वतः ला वाचवण्याचा कोणताच शस्वत मार्ग कोणाकडेच नाही.
विद्वान पण होवू शकते,होण्याची शक्यता आहे,असल्या भाषेत ज्ञान वाटत असतात.
असेच होईल ,हे असेच घडेल असा ठाम पना नाही.
कारण जी काही माहिती आहे व्हायरस ह्या जमाती विषयी ती खूप जुनी आहे लोकांची पाठ आहे.त्या मध्ये नवीन काहीच माणसाला माहीत नाही.
पण corona चे जे वागणे आहे ते पूर्णतः माणसाला नवीन आहे.

अमेरिकेत आता दोन डोस झालेल्यांना मुखलंगोट वापरण्याची (indoors or outdoors) जरूर नाही - CDC

बरोबर.
पण खालील ठिकाणी मात्र अजून ते वापरायचे आहेत :
बस रेल्वे किंवा विमान प्रवास
रुग्णालये
अनाथालये आणि
तुरुंग

भारतात दुसरी लस घेण्यासाठी गर्दीत जाण्यापेक्षा एक लस आधीच घेतलेली असेल तर घरी बसने जास्त योग्य ठरेल का?

चालेल पण लसीनुसार २ डोसमधले अंतर सांभाळावे.

कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत १६ आठवडे.

अंतर सांभाळणे अशक्य आहे. सध्या एकच लस मिळेल/ पुरेल. जास्त उपलब्ध झाल्यातर दोन मिळतील. हा कटू निर्णय कोणीतरी घेणे आवश्यक आहे. थोड्या लोकांना पूर्ण संरक्षण देण्यापेक्षा खूप लोकांना थोडा वेळ संरक्षण आणि मिळालेल्या वेळात जास्तीत जास्त लस निर्मिती आणि दोन डोसाकडे वाटचाल हाच फेअर मार्ग असेल.

आमचा कोव्हीशील्डच्या दुसऱ्या डोसच नंबर आज लागला आहे. दहा आठवडे झालेत पहिला घेऊन. तेव्हा आता घेऊनच टाकू म्हणतोय (दुपारची वेळ दिलीय.). पुढे अजून गर्दी होईल, केव्हा मिळेल सांगता येत नाही. आमच्याकडे अद्याप १८+ चे लसीकरण सुरूच झाले नाही.

हे असंच उगीच.. १६ आठवड्यांनी दुसरा डोस घेणार्‍यांना जास्त इम्युनिटी मिळते तर ज्यांनी चार आठवड्यांनी घेतलाय त्यांनी तिसरा डोस घ्यावा का?

घेऊन टाका कोव्हीशिल्ड
इम्युनिटी 4 आठवडे आणि 4महीने अश्या बऱ्याच सॅम्पल डेटा चा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल.
माझ्या मते सध्याचा 4 महिन्याचा निर्णय हा सिरम बरोबर घासाघीस करायला आणि इतर कंपनीच्या लस येईपर्यंत लागणारा काळ आहे.

७२ वर्षीय व्यक्तीला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा तर दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा.
दुसरी लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसू लागल्यावर झाला खुलासा
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-senior-citizen-giv...

के कोव्हीशिल्ड चे नॉर्मल रिऍक्शन पण असू शकते.
त्वचा कोरडी हे वेगळे लक्षण आहे.पण एरवी ताप येतोच कोव्हीशिल्ड घेतल्यावर.
(मागे एकदा कोणत्या तरी देशाने मुद्दाम डोस वेगवेगळे दिले होते ना?)

पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/coronavirus-vaccine...

आता गेलो होतो ठरल्याप्रमाणे लस घ्यायला.
१. आज कोव्हीशील्डचा स्टॉक आलाच नव्हता, जो स्टॉक होता तो सकाळीच संपला.
२. नविन नियमाप्रमाणे आता कोव्हीशील्ड दुसरा डोस पहिल्या डोसच्या ८४ दिवसानंतरच. तशी सूचनाच लावली होती गेट वर. आम्हाला ७० दिवस झालेत, तेव्हा लस उपलब्ध असली तरी आज मिळाली नसती.

नविन नियम लगेच चालु पण केला . लसी चे काय चालु आहे काही कळत नाही. आमच्या कडे पहिला डोस बूकिन्ग असुन सुद्धा देत नाही आहेत. दोन नंबर चे डोस चालु आहेत बोलतात. डोस एक सुरु झाला की फोन करु.

Ivermectin : मतभिन्नता

भारतात गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यांच्या सरकारांनी तेथील लोकांना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोव्यात ते 18 वर्षावरील लोकांना तर उत्तराखंडमध्ये दोन वर्षावरील सर्वांना (गरोदर व स्तन्यदा सोडून) देण्याचे ठरले आहे.

डब्ल्यूएचओ आणि खुद्द या औषधाची निर्माती कंपनी Merck यांनी हे औषध कोविड संदर्भात देण्यास विरोध दर्शविला आहे.

संदर्भ वाचला.
लसीच्या दोन मात्रांमधील अंतर यावर सध्या जगभरात वेगवेगळे प्रयोग चालू असलेले दिसतात.

आज मा मुख्य्मन्त्री ठाकरे याण्चे भाशण आहे. मेडिक्ल काउन्सिल कडुन ई मेल आला आहे.

To RMP,

In lieu of Covid 19 situation Hon'ble chief minister, Government of Maharashtra has decided to make conversation with Registered Medical Practitioners.

Therefore, I am forwarding herewith link as under. All RMP are requested to be present on 16th May, 2021 at 12.00 noon.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार

रविवार, १६ मे, दुपारी १२ वाजता

डॉक्टरांसाठी एक खास कार्यक्रम

श्री. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी थेट संवाद

डॉ. संजय ओक, डॉ. शशांक र जोशी आणि डॉ. राहुल पंडित

पहा OneMD च्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर

https://youtu.be/7dH0X0FTCpc

https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/

Please find the attachment received from the Government.

कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.

नुकतेच निधन पावलेले खासदार राजीव सातव हे अशा प्रकारच्या आजाराला बळी पडले.

आदरांजली.

Pages