कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

((नक्की माहित नाही; अंदाजे सहा ते आठ महिने.}}...

डॉक्टर मग हे 6 ते 8 महिन्यांनी लसीचा प्रभाव राहणार नाही का ?..अशा परिस्थितीत कोविड चा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर पुन्हा लस घ्यावी लागेल का ?

आपण लहान मुलांना ज्या लसी देतो त्या एकदाच देतो (2 -3 टप्प्यात असल्या तरी) आणि त्यांचे संरक्षण कायम मिळते . कोविड लसी तशा प्रकारच्या नाहीत का?

लहान मुलांना ज्या लशी देतो त्या संशोधन होऊन २ पिढ्या प्रूव्ह झाल्या आहेत. त्या लशींचे पण त्या काळी करोना लस सारखेच संभ्रमात्मक असेल.(डॉ योग्य उत्तर देतीलच.)

रेव्यु,
वृत्तपत्रीय बातम्यांनुसार भारतातील दोन्ही लसी बी- 16 17 विरुद्ध प्रभावी आहेत असा दावा केलेला दिसतो.
https://www.businesstoday.in/coronavirus/covishield-covaxin-protect-indi...

परंतु एकूण हे प्रकरण संदिग्ध आहे. अजून पुरेसा विदा मिळाल्यानंतरच काही काळाने याचे उत्तर स्पष्ट होईल.

स्वासु,
स्पष्ट सांगायचे तर सध्याच्या लसी या अजूनही प्रयोगाधीन आहेत. सध्या त्यांनी लसीचा तिसरा डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती किती वाढेल, याचे प्रयोग सुरू केले आहेत. यासंदर्भात काही प्राथमिक निष्कर्ष वाचायला मिळतात.
त्यानुसार तिसरा डोस घेतल्यानंतर एक वर्ष (किंवा दीड ?) संरक्षण मिळेल असे सूचित होते.

इथे सगळ्यांनी एक लक्षात घ्यावे. कुठलीही नवी लस परिपूर्ण व्हायला दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी जातो हा इतिहास आहे. त्यामुळे या एक दोन वर्षांत असे विविध प्रयोग आणि त्यातून मिळणारे निष्कर्ष बदलते राहतील.

पुढच्या लाटेत मुलंही सापडू शकतील. मुंबई मनपाने त्या दृष्टीने मुलांसाठी बेड्सची सोय करायला सुरुवात केली आहे.
ICMR ने काही नव्या टेस्टिंग गाइडलाइन्स जाहीर केल्याचा न्युज फ्लॅश दिसतोय

आपण लहान मुलांना ज्या लसी देतो त्या एकदाच देतो (2 -3 टप्प्यात असल्या तरी) आणि त्यांचे संरक्षण कायम मिळते . कोविड लसी तशा प्रकारच्या नाहीत का? >>>

यानिमित्ताने एखाद्या लसीचे संरक्षण किती काळ टिकते यासंबंधी सर्वसाधारण विवेचन.
१. कुठल्याही नव्या लसीला मान्यता मिळून ती वापरात येते, तेव्हा भविष्यात ती किती काळ संरक्षण देईल हे सांगणे कठीण असते. अनेक वर्षे तिचा वापर झाल्यावरच याचे उत्तर मिळते.

२. ज्या विषाणूंच्या पृष्ठभागावर विशिष्ट (dense) प्रकारची प्रथिने असतात त्यांच्या बाबतीत लस बरेच आणि दीर्घकाळ संरक्षण देऊ शकते. म्हणजेच विषाणूचा प्रकार सुद्धा महत्त्वाचा ठरतो.

३. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरण होते तेव्हा व्यक्तीपासून व्यक्तीला हा रोगप्रसार थांबत जातो. त्यामुळे तसेही संसर्ग कमी होतात. अशा परिस्थितीत लसीमुळे मिळालेले संरक्षण कमी होत गेल्याचे समाजात लक्षात देखील येत नाही(unnoticed) !

४. एक उदाहरण म्हणून सर्वपरिचित ट्रिपल लस बघा. ही डी, टी आणि पी या तीन जंतूंच्या विरोधात आहे. त्यातील घटसर्प व धनुर्वाताविरुद्धचे संरक्षण ४० हून अधिक वर्षे मिळते. परंतु डांग्या खोकल्याविरुद्धचे जेमतेम ५-१० वर्षे.

पुढच्या लाटेत मुलंही सापडू शकतील. >> हा विषाणू दर लाटेगणिक वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींना का बाधित करतोय?
पहिल्या लाटेत फक्त वयस्कर आणि सहव्याधी असणारे ह्यांना अधिक धोका होता. तेव्हा लहान मुलं ही career असतात. पण त्यांना या आजाराचे विशेष परिणाम जाणवत नाहीत असे सगळेच तज्ञ ठामपणे सांगत होते. मग आताच अचानक लहान मुलांनापण धोका आहे असं मत का आणि कसे तयार झाले?

लहान मुले तेंव्हा बाहेर पडत नव्हती
झाकून ठेवली होती

पण आता घरच्याच कुणा ना कुणाला झाला , नोकरी व्यवसाय ये जा सुरू झाले म्हणून तेही सगळे रिस्क मध्ये येणार

या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.

मुलांमध्ये हा आजार होणार हे काही ‘अचानक’ तयार झालेले मत नाही. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी त्याचे सूतोवाच अमेरिकादी देशांमध्ये झाले होते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.

२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.

लहान मुले तेंव्हा बाहेर पडत नव्हती
झाकून ठेवली होती>> आता बाहेर पडताहेत का? कुठे?
पण आता घरच्याच कुणा ना कुणाला झाला>> पहिल्या लाटेत ज्यांना झाला त्यांच्या कोणाच्याच घरात मुले नव्हती का? तेव्हा मुलं मोठ्या संख्येने बाधित होत आहेत असे कोणी म्हटले नाही. लहान मुलांसाठी हॉस्पीटलमधे वॉर्ड वगैरे ही कोणी बनवले नाहीत.

आता बर्‍याच सोसायटीत लहान मुलं एकमेकांकडे खेळायला जातात.
मास्क आणि सॅनिटायझर चे नियमही बरेच सैल झालेत.
जिथे आई बाबा कामात असतात तिथे थोडी मोठी मुलं दारावर पार्सल्स घेतात. हात धुणं, ३० सेकंद वगैरे तर अजिबातच पाळले जात नाही.
हे सर्व मुलांना परत परत सांगून डोक्यावर मारत रहावं लागतं.

हे सर्व मुलांना परत परत सांगून डोक्यावर मारत रहावं लागतं.>> ह्या अखंड मार्‍यामुळे आणि सतत घरात कोंडून रहावे लागल्यामुळे मुलांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळे ती ह्या आजाराला बळी पडत आहेत. असं कोणाला वाटत नाही का?

कुमार सर एक प्रश्न लहान मुलांसंदर्भात- मुलांना मल्टिविटमीन गोळ्या देणे (पाण्यात घालून एनर्जी ड्रिंक सारखे) कितपत योग्य आहे? खरेच गरज आहे का सध्या? की फक्त कोवळ्या उन्हात खेळू देणे बरे. (कोरोनाचे नियम पाळुन)

भरत, धन्यवाद !

सियोना,
मुलांना मल्टिविटमीन गोळ्या देणे >>> नाही म्हणजे नाही ! सकस आहार हेच उत्तर....

सोहा, सध्या तरी तुमच्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे - आले कोरोना विषाणूच्या मना तिथे आपले काही चालेना. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे - जसे भूकंप, पूर, वादळे यांची तीव्रता अथवा परीणाम यांचे केवळ अंदाज बांधता येतात आणि त्यावर केलेल्या सर्व उपाययोजना लागू पडाव्यातच अशी अपेक्षा आपण ठेवत नाही तसेच सध्याच्या कोरोनाच्या महामारीचे आहे. We are in the middle of it. आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारावर आपण अंदाज बांधतो आहोत उपाय करतो आहोत पण आपल्याला या विषाणूची संपूर्ण माहिती नाही. त्याचे पुढे रूप कसे बदलेल आणि या बदलाचा काय बरा वाईट परिणाम होईल याचा देखील संपूर्ण अंदाज नाही. We must acknowledge these limitations.

डॉक्टर, उत्तरांबद्दल धन्यवाद.

म्हणजे लस घेणं उपयुक्त आहे (शॉर्ट टर्म) पण सुयोग्य निसर्गस्नेही जीवनशैली (आहार, व्यायाम निकोप मन इत्यादी इत्यादी) अनुसरणे जास्त सुरक्षा देते असंच ना?

माधव,
अगदी बरोबर !
यात मी अजून एक भर घालू इच्छितो. जरा काही खुट्ट झालं, की घ्या औषधाची गोळी ही प्रवृत्ती सुद्धा बदलली पाहिजे. शरीरावर वारंवार होणारे भरमसाठ औषधांचे मारे हे देखील निसर्गविरोधीच असतात.

सध्या निरोगी लोक घाबरून स्वतःहून विविध जीवनसत्वे व खनिजांच्या गोळ्या खाताहेत ते पण अयोग्य.

इथे सगळ्यांनी एक लक्षात घ्यावे. कुठलीही नवी लस परिपूर्ण व्हायला दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी जातो हा इतिहास आहे. त्यामुळे या एक दोन वर्षांत असे विविध प्रयोग आणि त्यातून मिळणारे निष्कर्ष बदलते राहतील..

तो पर्यंत दुसराच कोणता तरी व्हायरस मानवात संक्रमित होवून नवी साथीचा आजार आलेला असतो.म्हणजे हा खेळ अखंड चालू असतो.एड्स गेला की सार्स 1 आला तो जात नाही तोच sars 2 आला,bird flue वैगेरे चालूच असतात. न बरा होणार क्षय रोग पण आला.
मानवाला रोगांपासून मुक्ती कधीच मिळणार नाही त्याचा स्वीकार केलाच पाहिजे.
अजुन कॅन्सर वर खात्रीशीर उपचार नाहीत.कॅन्सर बरा करणे किंवा आहे त्याच स्थितीत ठेवणे आज तरी अशक्य अशीच गोष्ट आहे.

मानवाला रोगांपासून मुक्ती कधीच मिळणार नाही त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. >>> हवे तेवढे अनुमोदन !!
+

यात आइन्स्टाइन यांच्या वाक्याची भर घालतो :
मानवी शरीर आणि सोपेपणा हे विरुद्धार्थी शब्द आहेत !

वर हेमंत यांच्या प्रतिसादावरून एक जुनी आठवण जागी झाली. आमच्या अभ्यासक्रमातील औषधशास्त्र विषयाच्या मुखपृष्ठावर एक मजकूर ठळक अक्षरात लिहिलेला होता तो असा :

आजारांचा औषधांनी मुकाबला करण्याचा झगडा चिरंतन आहे. तो प्राचीनकाळी जंगलात सुरु झाला आणि आजपर्यंत तो अव्याहत चालू आहे.

सध्या निरोगी लोक घाबरून स्वतःहून विविध जीवनसत्वे व खनिजांच्या गोळ्या खाताहेत ते पण अयोग्य>>> अगदी हेच मला उत्तर अपेक्षित होते.

नात्यातील काही लोक कोरोना बाधित झाली होती त्यांच्याशी बोलल्यानंतर मिळालेला फुकटात सल्ला होता मल्टिविटामीन गोळ्या खा.

डाॅ , प्रत्येक प्रश्नाला लगेच प्रामाणिकपणे उत्तर देता .... खूप कौतुक वाटतं.
आमच्या सो.मध्ये दोनजण दगावले दोघंही लसवंत होते व दोघेही हार्ट ॲटॅकने गेले. ७०चे गृहस्थ करोनातून बाहेर आले होते. घरातच विलग होते. औषधांमुळे शुगर वाढली म्हणून दवाखान्यात भर्ती होते दहा दिवस. खूप डिप्रेशन आलं. बरे झाल्यावर घरी आले. मुलाने दिनानाथला (आधी दुसर्या दवाखान्यात होते) जाऊन परत एकदा जचेकअप करुन आणलं. सगळे पॅरामीटर्स ओके होते. सकाळी डोळे फिरवले म्हणून दवाखान्यात नेत असतानाच गेले.
दुसरे गृहस्थ साठीचे. ते घरीच विलग. दोघंही पॅझिटीव्ह. अस्वस्थ वाटतंय म्हणून दवाखान्यात नेलं लगेचच ॲटॅकने गेले. बाॅडी दिलीच नाही. सौ एकटीच घरी कोणी मदतीला जाऊ शकत नाहीये.
हा औषधांचा दुषपरिणाम की वेळ आली होती ?
डाॅ, विपू चेक कराल का?

मंता,
होय !
धन्यवाद.
...............
त्यांच्या मृत्यूचे कारण इथून सांगणे बरोबर नाही. सर्व नीट अभ्यासावे लागेल.
वाढलेले ग्लुकोज हे बऱ्याच कटकटी निर्माण करते.
जर का जुना मधुमेह असेल तर धोका अधिक वाढतो.

कारण कळलं नाही कळलं तरी माणूस परत येणार नाहीये पण अशा केसेस होतायेत एवढंच सांगायचं होतं. मनाने खचून जाताहेत माणसं असंही वाटतंय. मानसिक आजार बळावलेत का की बळावतील ?

आमच्या इमारतीत आज अजून एक पेशंट सापडला. बाहेर न जाणारा,घरात सर्वजण सगळ्या गोष्टी पाळणारे असूनही २३ वर्षांच्या मुलाला ताप आला होता.काल घरातल्या सर्वांची टेस्ट करून घेतली.कामवाल्यांपासून ते आजीआजोबांपर्यंत निगेटिव्ह निघाले.तरुण पॉझिटिव्ह निघाला.आजी, तापाच्या दिवशी नातवाच्या सोबत होती.आता नातू घरातच विलगीकरणात आहे.
त्यांच्या कामवालीचा रिपोर्र्ट निगेटिव्ह आला आहे.तर तिने दुसर्‍या घरी काम केले तर चालेल का?

इतक्यात नको असं वाटतं.
तिला ७ दिवस तरी आयसोलेट होता यावे, या दिवसांचा पगार मिळावा. (आणि या सुट्टी दिवसात लग्न, नातेवाईक गाठीभेटी न करण्याची तिला नीट धोके सांगून समजही द्यावी)मला समज हा शब्द कडक अर्थाने वापरायचा नाहीये.))
पॉझिटिव्ह यायला काही काळ जावा लाग्तो अशीही थिअरी ऐकली.

हेच मलाही वाटतेय..पण ती बाई,पॉसिटिव्ह रुग्णाच्या घरी काम करणार आहे.भीती वाटते की तिच्या घरी लागण होईल की काय?

Pages