कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरती वावे यांनी दिलेल्या संदर्भानुसार ही महासाथ यथावकाश संपेल. मात्र बराच काळ आपल्याला गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करावे लागेल.

सध्या बऱ्याच कार्यालयांत लोकांना आत सोडताना ताप आहे की नाही, हे यंत्राने पहात आहेत. निव्वळ ताप असणे म्हणजे काही कोविड निदान नव्हे. यातून तंत्रज्ञांना एका उच्चस्तरीय रोगनिदान तंत्राची कल्पना सुचली आहे. बाधित व्यक्तीच्या श्वासातुन काही विशिष्ट रसायने ( VOCs) बाहेर पडतात.

एक छोटे यंत्र जर आपण नाकाभोवती धरले आणि त्यात श्वास सोडला, तर संबंधित व्यक्ती बाधित आहे की नाही ते कळू शकेल. थोडक्यात, मद्यपी व्यक्ती जशी आपण उच्छवास चाचणी यंत्राने ओळखतो त्याच धर्तीवर ही चाचणी आहे.

अर्थातच ही चाळणी चाचणी असणार आहे - रोगनिदान नव्हे. या अत्याधुनिक तंत्राबद्दल पुढील प्रतिसादात लिहितो.

पुढे चालू..
या यंत्रामध्ये सोन्याच्या सूक्ष्मकणांचा (nanoparticles) समावेश आहे. प्रक्रिया अशी होते :

कोविडबाधित व्यक्ती यंत्रात श्वास सोडते. त्यामध्ये विशिष्ट रसायने असतात. त्यांचा व सूक्ष्म कणांचा संपर्क आला की विद्युत संदेश तयार होतात. त्यातुन व्यक्ती बाधित असल्याचा संकेत मिळतो. सध्या हे संशोधन चालू असून प्राथमिक पातळीवरील यंत्र तयार झालेले आहे. ते वापरून covid-19 आणि निरोगी लोक यांच्या चाचण्या झाल्यात.

सध्या हे तंत्र निदानातील अचूकता 76% दाखवत आहे. अधिक प्रयोग व प्रमाणीकरण यातून त्याची अचूकता उंचावेल अशी आशा आहे.
मशीन लर्निंग या संकल्पनेवर हे तंत्र आधारित आहे. या विषयावर इथल्या तंत्रज्ञांनी जरूर मत द्यावे. वाचण्यास उत्सुक !

<<कोलेस्टेरॉल कमी करणारी Statins आणि अन्य एका प्रकारची औषधे कोविडमध्ये उपयोगी पडू शकतील असा प्राथमिक निष्कर्ष आहे.<< हे खरे असावे. मला हॉस्पिटलमधे Ator Tablet देत होते. डिस्चार्ज मिळाल्यानन्तर ही ८ दिवस ही गोळी घ्यायला सांगितली होती.

आज वाचतेय हा धागा. खुप छान माहिती देत आहात डॉक्टर! धन्यवाद!

आर्या, धन्यवाद.
कोविड झाला होता का ?
ती गोळी तुम्हाला आधीपासून चालू होती की नव्याने दिली ?

हो . कोविड झाला होता.
हि गोळी आधिपासुन नव्हती मला. आधी फक्त शुगर अन थायरोइडच्या गोळ्या सुरु होत्या.
हॉस्पिटलाईज झाल्यावर आणी न्युमोनिया डिटेक्ट झाल्यावर हि गोळी दिली.

https://www.maayboli.com/node/73962 इथे मी काय काय कॉम्प्लिकेशन्स झाले होते त्याचा उल्लेख केलाय.

वाचले.
आपण बरे झाल्याबद्दल अभिनंदन
आरोग्यशुभेच्छा !

>>>> प्राथमिक पातळीवरील यंत्र तयार झालेले आहे. ते वापरून covid-19 आणि निरोगी लोक यांच्या चाचण्या झाल्यात >>>
छान आयडीया. नुसत्या गनपेक्षा चांगलीच.

मशीन लर्निंग या संकल्पनेवर हे तंत्र आधारित आहे >> थोडक्यात म्हणजे यात सुरवातीला एक अल्गोरिदम फीड केलेला असतो. त्यावरून मशीन ओके / नॉट ओके ( इथे टेस्ट पॉझिटिव्ह /निगेटिव्ह) निकाल दर्शवणे सुरू करते. पुढे यात इतर टेस्ट वरून पडताळा करून दिलेला निकाल बरोबर होता की चूक याचा मशीनला फीडबॅक द्यावा लागतो. अशा तऱ्हेने मशीन मध्ये सुरवातीला फिड केलेला अल्गोरिदम अपडेट होत जातो आणि तिची अचूकता हळूहळू वाढत जाते.

एकीकडे धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी जोर धरत असतानाच तिरूपती देवस्थानातील अनेक कर्मचाऱ्यांनाही याआधीच करोनाची लागण होऊन गेली आहे. बाराव्या शतकातील पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात एकूण ४०४ जण काम करतात. त्या सगळ्यांची चाचणी सकारात्मक आली आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी दिली. ते म्हणाले की, जगन्नाथ मंदिरातील पूजाअर्चा चालू असून सध्या कुणीही सेवेकरी उपस्थित नाहीत. जगन्नाथ मंदिर मार्चपासून करोनामुळे बंद ठेवण्यात आले होते.

करोना झालेले सर्व जण घरी विलगीकरणात असून पूजाविधीची माहिती असलेले फार कमी लोक असल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे.

बलभद्र, देवी सुभद्रा, जगन्नाथ यांच्या पुजेसाठी किमान १३ पुजारी लागतात. त्यामुळे सेवेकरी व पुजारी मिळून रोज ३९ जणांची गरज असते. जगन्नाथाच्या रुपात येथे विष्णूची पूजा केली जाते. पुरीचे मंदिर वेगळे असून तेथे सकाळपासून रात्रीपर्यंत पूजा विधी चालू असतात.

एक पूजाविधी केला नाही तर दुसरा करता येत नाही असे जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले.

आणखी सेवेकरी व पुजारी करोनाग्रस्त झाले तर अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे प्रशासन कनिष्ठ पुजारी व सेवेकऱ्यांची व्यवस्था करण्याच्या विचारात आहे. पुरी जिल्ह्य़ात करोनाचे १२५५ रुग्ण असून ५२ बळी गेले आहेत.

माझ्या मैत्रिणीच्या घरातले सगळेच पॉझीटीव्ह होते. काल टेस्ट निगेटीव्ह आलीये.

तिला श्वासाचा त्रास नव्हता तरी 'करक्युमा लोंगा' हे हळदीचे औषध त्यांनी घ्यावे का? काही साईड इफेक्ट आहेत का याचे?
कृपया मार्गदर्शन करावे __/\__

'करक्युमा लोंगा' हे हळदीचे औषध त्यांनी घ्यावे का?
>>>
आयुर्वेदिक औषधांचा माझा अभ्यास नाही.
अन्य कोणी जरूर सांगावे.

करक्युमा लोंगा हे हळदीचेच बायनॉमियल नाव आहे.
हळदीचे जे काही साईड इफेक्ट्स असतील तेच त्याचे असतील.

पण जर या नावाखाली औषध म्हणुन मिळत असेल तर त्यात नक्की काय काय घटक आहेत हे ही बघायला हवे.

लेबल वर ते औषध आहे असं म्हटलेलं नाही. FDA ने दावा तपासलेला नाही.
Natural dietary supplement म्हटलं आहे

विनिता मी काही जाणकार नाही यातला, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की हळद किंवा तिचे extracts या नावाखाली विकत असतील. आणि तेच दिसत आहे. करक्युमीन (करक्युमिनॉईड्स) हळदीचे घटक आहे. तेव्हा वरकरणी घेण्यास हरकत नसावी असे वाटते पण शंका असेल तर या पेक्षा सरळ हळदच घेतली तर काय वाईट. सर्दी/खोकल्यावर ज्या प्रमाणात घेतो त्या प्रमाणात घ्यावी.
(अर्थात जाणकार नसल्याने याचा करोना आजारावर काय उपयोग वगैरे याची शून्य माहिती आहे.)

विनिता ,

हळदीमध्ये antioxidant गुणधर्म आहे. असा गुणधर्म असणारी रसायने खालील परिस्थितीत उपयोगी पडतात:
१. वाहिन्यांत रक्तगुठळ्या होऊ नयेत आणि
२. प्रतिकारशक्तीचे सुयोग्य नियंत्रक म्हणून.

हे दोन्ही कोविड संदर्भात लागू आहे.

आयुर्वेदिक डॉ च्या सल्ल्याने तुम्ही ठरवा.

बरोबर मानवकाका! पण आपण वापरतो ती हळद उकडून कुटलेली असते. तिचा औषधी गुण कमी झालेला असतो.
हे प्रोसेस न केलेल्या हळदीचे बनवलेले आहे Happy
घेतल्याने काही नुकसान होईल असे वाटत नाही.

आयुर्वेदिक डॉ च्या सल्ल्याने तुम्ही ठरवा. >> धन्यवाद कुमार सर __/\__
हे औषध मला माझ्या बहीणीनेच सुचवले आहे जी कृष्णा हॉस्पिटल, कराड ला काम करत होती. तिचा ह्याचा अभ्यास आहे Happy

तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ खर्च करून इथे सोप्या भाषेत लिहिता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद! >>> वत्सला + 1

वाचून बरं वाटलं. कारण बाहेरून आणलेल्या , येणार्‍या वस्तू आधीपेक्षा वेगळ्या प्रकारे स्वच्छ करणे , बाजूला ठेवणे असले उद्योग केले नाहीत. अर्थात त्यामागे नक्की विचार होता, असे नव्हे. आपसूक झाले. रेस्टॉरंट्स सुरू झाल्यापासून त्यांच्याकडून अन्नपदार्थ मागवले.>>> भरत +1. आम्हीही मास्क घालणे, शारीरिक स्वच्छता आणि कमीत कमी वेळा घराबाहेर पडणे, बाहेर पडल्यास योग्य शारीरिक अंतर राखणे, रोज वाफ घेणे एवढंच करतो.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
...........
या साथीच्या सुरवातीस हा आजार शक्‍यतो वृद्ध आणि अन्य व्याधीग्रस्तांना होतोय असे चित्र होते. परंतु गेल्या तीन महिन्यांत त्याचे चित्र बदलते आहे.
पन्नाशीच्या आतील आणि अन्य आजारविरहित लोकांनाही तो होतोय असे दिसते. अशा काही रुग्णांचे जागतिक अभ्यास आता प्रसिद्ध झालेत.

त्यात दखलपात्र असा गट म्हणजे कोविडमुळे मेंदूविकाराचा झटका (स्ट्रोक) आलेले रुग्ण. किंबहुना असा झटका येणे हेच त्यांच्या कोविडचे पहिलेवहिले लक्षण ठरले. या रुग्णांमध्ये आजाराच्या तीव्र दाह प्रक्रियेमुळे प्राधान्याने रक्तगुठळ्या निर्माण होतात. एक विशेष बाब म्हणजे त्यांना श्वसनाचा कुठलाच त्रास होत नाही. थेट मेंदूविकाराचा झटकाच येतो.

<<त्यात दखलपात्र असा गट म्हणजे कोविडमुळे मेंदूविकाराचा झटका (स्ट्रोक) आलेले रुग्ण. किंबहुना असा झटका येणे हेच त्यांच्या कोविडचे पहिलेवहिले लक्षण ठरले. या रुग्णांमध्ये आजाराच्या तीव्र दाह प्रक्रियेमुळे प्राधान्याने रक्तगुठळ्या निर्माण होतात. एक विशेष बाब म्हणजे त्यांना श्वसनाचा कुठलाच त्रास होत नाही. थेट मेंदूविकाराचा झटकाच येतो.<<
अरे बाप्रे, हो का?

Pages