कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव,
Statins व कोविड या विषयावर गेले चार महिने अनेक अभ्यास चालू आहेत. त्यापैकी काहींत या औषधांची उपयुक्तता दिसली आहे. ‘परंतु कोविडवर हेच औषध’ असे काही सिद्ध झालेले नाही. साधारण चित्र असे आहे:

१.ज्या रुग्णांना (हा आजार होण्यापूर्वी) ही औषधे मेद कमी करण्यासाठी चालू आहेत, त्यांची ती यादरम्यानही चालू ठेवावीत. फायदा होतो.

२. पण, ज्यांना ती पूर्वी कधी दिलेली नव्हती त्यांना नव्याने द्यावीत का, हा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यासाठी सध्याचा अभ्यास अपुरा आहे.

३. या औषधांना जो दाहप्रतिबंधक आणि पेशीसंरक्षक गुणधर्म आहे, तो ती औषधे दीर्घकाळ दिल्यावरच दिसून येतो. म्हणून वरील मुद्दा २ महत्त्वाचा ठरतो.

ओके धन्यवाद.
म्हणजे नव्याने कोव्हीडसाठी म्हणुन सुरू करण्यात काही हशील नाही.

कोविड बरा व्हायला लोकांनी घरे गहाण टाकली आहेत

लस आली म्हटली तर अगदी गोर गरीब ही पैसे मोजून घेतील , दोनदापण घेतील

साद,
लसीची सक्ती >>
याबाबत २ संदर्भ मिळाले:

1. भारत व ब्राझील :
https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/health-new...

2. अमेरिका :
https://scroll.in/latest/970891/coronavirus-vaccine-will-not-be-mandator...

थोडक्यात:
१. एकदम सर्वांना सक्ती होणार नाही. आधी आरोग्यसेवक, खूप जनसंपर्क असणारे, इ. गटांना.
२. कायद्याने सर्वांना सक्ती हा गुंतागुंतीचा विषय आहे. त्या ऐवजी लस घेतलेल्या व्यक्तीस अन्य फायद्याचे प्रलोभन, हा दृष्टीकोन ठीक राहतो.

सक्ती असो नसो. आपला तर नकार ब्वा. काय ते किमान तीन पाच वर्षांच्या संशोधनातून तावून सुलाखून आलेले असेल तेव्हा विचार करणे इष्ट. उगाच दुनिया पळते म्हणून आपण धावायचं ह्याला काही अर्थ नाही.

डॉ कुमार,तुमची समजवून सांगण्याची हातोटी विलक्षण सोपी आहे, अवघड विषय पटकन समजून जातात,
तुम्ही एकप्रकारे आमचे फॅमिली डॉक्टर सुद्धा झाले आहात+1 ,
माझे तर कुमार सरांनी असं सांगितलय म्हणजे असंच असणार असं सुरू असतं ... फक्त तुमचेच लेख मी कुटुंबातील सदस्यांना पाठवते. बाकी कशावरच विश्वास नाही राहीलायं. तुमचे लेख व स्वतःचे तारतम्य यावरून सगळे निर्णय घेण्यात येतात+1111

ह्या विषयावरचे आपले लेख अप्रतिम होते. क्लिष्ट विषय सोपा करून थोडक्यात सांगण्याची हातोटी आपल्याला लाभली आहे.
सध्या मला एक अगदीच प्राथमिक पातळीवरचा प्रश्न पडलाय. तर सध्या बाहेरून इस्त्री करून आणलेले कपडे वापरणे कितपत सुरक्षित आहे? दुकानातून इस्त्री करून आणल्यावर ते कुठे आणि त्या जागी किती वेळ ठेवावे? गरम इस्त्री फिरवल्यानंतर इतरांकडूनही त्या कपड्यांची हाताळणी होते. म्हणून प्रश्न पडला.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
इथे माहिती लिहिताना ती विविध अधिकृत वैद्यकीय संदर्भ चाळून व खात्री करून लिहीत आहे. त्यामुळेच तुम्हाला ती विश्वासार्ह वाटते आहे याचा आनंद आहे.

* कपडे बाहेर इस्त्रीला जरूर द्यावेत. त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. किंबहुना एक गोष्ट मी चार महिन्यांपूर्वीच या धाग्यांमध्ये स्पष्ट केली होती. निर्जीव वस्तूमधून या विषाणूंचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे होणारा संसर्ग हा खूप क्षीण स्वरूपाचा आहे.

मी स्वतः कुठल्याही वस्तू निर्जंतुक वगैरे करण्याच्या भानगडीत पडलो नाही. आपली हात स्वच्छता पुरेशी आहे.

ह्या विषयावरचे आपले लेख अप्रतिम होते. क्लिष्ट विषय सोपा करून थोडक्यात सांगण्याची हातोटी आपल्याला लाभली आहे....+1111

काही मेडिकल टर्म्स समजत नसल्याने प्रतिसाद देता येत नाही ईतकेच..पण तुम्ही इथे दिलेली सगळी माहिती नेहमी वाचते.....

निर्जीव वस्तूमधून या विषाणूंचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे होणारा संसर्ग हा खूप क्षीण स्वरूपाचा आहे.>>>>

डॉक्टर एक अजुन शंका.

भाज्या कितपत स्वच्छ कराव्या? मी केवळ पाण्याने धुणे सुरु ठेवले आहे अर्थात धुता येण्याजोग्या भाज्या केवळ. बाकी ८ ते १२ तास दूर ठेवतो. गेले ५ महिने असेच सुरु आहे.

काल ऑक्सीमिटर आणला पेन वर आधी प्रयोग केला तो काहीही दाखवत नाही. आपले रिडींग ८७ ते ८८ पासुन वाढत जाऊन ९७ ते ९८ स्थिर होते हे योग्य आहे का?

मृणाली,
धन्यवाद.
काही मेडिकल टर्म्स समजत नसल्याने

>>>> बिनधास्त विचारत चला. अगदी सोप्या भाषेत सांगेन. सामान्यांना समजावे हाच तर उद्देश्य आहे.
शुभेच्छा

कृष्णा,
* जरा या धाग्याला भेट देणार का?
पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
https://www.maayboli.com/node/76797
बहुतेक सर्व शंकानिरसन केलेले आहे.

• भाज्या कितपत स्वच्छ कराव्या? मी केवळ पाण्याने धुणे सुरु ठेवले आहे
>>>
मी सुद्धा हेच. या मुद्द्यावर बाऊ नको.

“हा संसर्ग झालेल्यापैकी काहींचाच आजार गंभीर का होतो ?” हा लाखमोलाचा प्रश्न आपल्याला सतावतोय.

त्याची उकल करण्याचे दृष्टीने अनेक पातळ्यांवर संशोधन चालू आहे. आतापर्यंत गवसलेले काही मुद्दे असे :

१. विषाणूंचा हल्ला >> शरीरात विचित्र अँटीबॉडीज (ऑटो अँटीबॉडीज) तयार होतात >> त्या विषाणूचा प्रतिकार करण्याऐवजी आपल्या शरीराच्या प्रतिकार प्रथिनांनाच नष्ट करतात >> प्रतिकारशक्ती दुबळी पडते.

२. अशा काही रुग्णांत जनुकीय बिघाड आढळले आहेत. अशा जवळपास 13 जनुकांचा या दृष्टीने अभ्यास चालू आहे. अशा बिघाडाने या व्यक्तींच्या शरीरात interferons ही प्रथिने तयार होत नाहीत. (एरवी ही प्रथिने तयार होऊन विषाणूंचा नाश करतात).

डाॅ, खरंच निर्जीव वस्तुंना फक्त पाण्याने धुणे पुरेसे आहे का?
उदा. बिस्कीटाचे पुडे, इतरही प्लास्टिक कव्हरमधून येणार्या वस्तु आम्ही साबणाच्या पाण्याने धुतो. त्याची गरज नाही का?

पुजेसाठी फुले येतात, त्यांना कसे सॅनिटाइज करावे?

डॉ कुमार, अतिशय उत्तम प्रकारे समजाऊन सांगत आहात तुम्ही! कुठेही वाचणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होत नाही. अगदी to the fact updates अगदी सोप्या शब्दांत सांगत आहात! मी इथे (ऑस्ट्रेलियातील) यासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा इतर काहीही न वाचता फक्त तुमचे इथले प्रतिसाद/माहिती मधून मधून वाचते. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ खर्च करून इथे सोप्या भाषेत लिहिता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद! तसेच मायबोली अडमीन/संस्थापक यांचेही आभार!

डॉ कुमार,
तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ खर्च करून इथे सोप्या भाषेत लिहिता त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद!
माझा एक प्रश्न:
बागेत (पार्क) मध्ये मुलांना खेळायला नेणे कितपत सुरक्षित आहे? ईथे अमेरिकेत काहि पालक डिस-इन्फ़ेक्टिन्ग वाईप्स वापरुन झोपाळे घसरगुन्ड्या स्वच्छ करत आहेत. तसेच मास्क घालतात मुले. तेवढे पुरेसे आहे का?

आपण सर्वांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आभार !

निर्जीव वस्तूंतून होऊ शकणारा संसर्ग क्षीण आहे, हे अद्याप बऱ्याच लोकांना पटत नाही.
ठीक आहे. एक चांगला संदर्भ देतो.
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/prevent-getting-sick/how-covid...

त्याचा सारांश :
१. जरी हा विषाणू काही पृष्ठभागांवर काही काळ टिकत असला तरी हा काही या आजाराच्या फैलावाचा मुख्य मार्ग नव्हे.
२. व्यक्ती ते व्यक्ती संपर्काशी तुलना करता वस्तूंशी संपर्क हा मुद्दा गौण आहे.
आता गम्मत काय होते पाहा.

वरील मार्ग २ अत्यंत महत्वाचा असूनही त्यात लोक चालढकल करतात, आणि मार्ग १ गौण आहे त्याचा बाऊ करत बसतात !

बागेत (पार्क) मध्ये मुलांना खेळायला नेणे कितपत सुरक्षित आहे?

>>> खेळणाऱ्या मुलांतील शारीरिक अंतर जास्त आणि एकूण तिथल्या मुलांची संख्या अल्प, असे जिथे जमेल तिथे मुले न्यावीत.

<निर्जीव वस्तूंतून होऊ शकणारा संसर्ग क्षीण आहे>

हे वाचून बरं वाटलं. कारण बाहेरून आणलेल्या , येणार्‍या वस्तू आधीपेक्षा वेगळ्या प्रकारे स्वच्छ करणे , बाजूला ठेवणे असले उद्योग केले नाहीत. अर्थात त्यामागे नक्की विचार होता, असे नव्हे. आपसूक झाले. रेस्टॉरंट्स सुरू झाल्यापासून त्यांच्याकडून अन्नपदार्थ मागवले.

स्वतःचे घराबाहेर पडणे कमीतकमी राहील याची काळजी घेतली.

कुमार, उपयोगी माहिती देत आहात.
आम्ही भाज्या नुसत्या धुवून घेतो, पार्सल सॅनिटाइ़झ करुन घेतो. टेट्रा पॅक दूध कंटेनर नुसता धुवून मग उघडून फेकून देतो.

टेट्रा पॅक दूध कंटेनर नुसता धुवून मग उघडून फेकून देतो. Uhoh
असं नका करू!
.
.
.
.
.
.
त्यातलं दूध तरी काढून घ्या भांड्यात, फेकण्या आधी.

आजच्या 'हिंदू' मध्ये एक चांगला लेख आलाय जेकब जॉन आणि एम एस शेषाद्री यांचा.
त्यांनी म्हटलंय की भारतातल्या केसेसचा पीक आत्ता सप्टेंबरच्या मधल्या दोन आठवड्यांंमधे आला. आता हळूहळू नवीन केसेसची संख्या कमी होत मार्चपर्यंत एपिडेमिक फेज संपेल आणि पँडेमिक फेज राहील.
फक्त रोजच्या केसेसच्या आकड्यावर नाही, तर सेरो सर्व्हेच्या आधारावर हे निष्कर्ष त्यांनी काढले आहेत.

डॉ कुमार, तुमचे सगळे लेख वाचले. अवघड विषय सोपा करून सांगता. आणि मनातल्या सगळ्या शंका प्रतिसादात दिलेल्या उत्तरातून फिटून जातात. तुमचे मनापासून आभार. एक विचारते दळणाचे डबे गिरणीतून आणल्यावर 2- 3 दिवस बाजूला ठेवून वापरले तर योग्य ती काळजी घेतली गेली ना?

दळणाचे डबे गिरणीतून आणल्यावर 2- 3 दिवस बाजूला ठेवून वापरले तर >>>

याने तुम्हाला मनशांती मिळत असेल तर ठीकच !
माझे यावरील विचार एव्हाना वरील प्रतिसादांत दिलेच आहेत.
कशालाही हात लावल्यावर तो आपण स्वच्छ केला की पुरे. तो लगेच आपल्या नाकातोंडाला लागणार नाही हे पाहणे अधिक महत्वाचे.

अस्पर्शतेची भीती मनातून काढावी.

Pages