लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरोना किंवा करोना या उच्चारा बाबत भाषिक स्वातंत्र्य आहे. त्याबद्दल आग्रही राहता येणार नाही. पण आरोग्याबाबत असलेली तपशीलातील चूक सजग वाचक या अधिकारात इथेही तुम्ही अमक्या पुस्तकात अशी अशी तपशीलातील चुक आढळ्ली असे म्हणू शकतात. तपशील देत नाही तोपर्यंत अन्य वाचकांना त्याबद्दल भाष्य करता येणार नाही. मग ती जागरुकता तुमच्या पर्यंतच मर्यादित राहिल. वाचकांचा दबाव गट तयार होणार नाही.

प्रकाश,
वाचकांचा दबावगट यावर सहमत.

आता करोना/ कोरोना याबद्दल थोडे.
गेले तीस वर्षे करोनरी हृदयविकार हा शब्दप्रयोग मराठी वृत्तपत्रातून व्यवस्थित छापला जात आहे. करोनरी आणि करोना यांचे मूळ एकच आहे. तेव्हा आता अचानक ‘क’ चा ‘को’ केला, ह्याचे फक्त आश्चर्य वाटते.

चलता है , क्या फरक पडता है ही वृत्ती असल्याने अशी उदाहरणे सापडतात . चूक दाखवल्यास एवढं काय मनावर घ्यायचं अस उत्तर मिळतं. Happy

जागरूक नागरिक किंवा जागरूक वाचक म्हणून तुम्ही योग्य तेच केले.
त्याबद्दल अभिनंदन.
चुकीचं शब्द एक तर प्रिंटिंग मिस्टेक मुळे छापला जातो किंवा
खरा शब्द काय आहे ह्याची पक्की खात्री नसणे.

>>>>
जागरूक नागरिक किंवा जागरूक वाचक म्हणून तुम्ही योग्य तेच केले.
त्याबद्दल अभिनंदन.>>>> +७८६

>>>>
जागरूक नागरिक किंवा जागरूक वाचक म्हणून तुम्ही योग्य तेच केले.
त्याबद्दल अभिनंदन.>>>> +७८६

वाचक म्हणून आपली काही जबाबदारी असते ही जाणीव लोप पावल्याने हल्ली (माझ्यासहीत) कुणीही लेखक होतात. अनेक लेखक असल्याने अनेक व्यासपीठे भूछत्राप्रमाणे उगवली. मग गुणवत्ता नियंत्रित ठेवणे कठीण असले काहीसे दुष्टचक्र सुरू आहे. आपण केलेत ते योग्यच केले.
उच्चार कोण कसा करतो ह्याबद्दल मी फारशी आग्रही नसते उदा: काही इटालियन भाषिक इंग्रजी बोलताना व्हायरसचा उच्चार व्हिरूस असा काहीसा करताना ऐकले आहेत. जोवर संभाषण कळते तोवर मी सोशिकपणा दाखवते. मात्र लिखित शब्द मूळ भाषेनुरूप, शुद्ध व योग्य असावा (उदा: सेफ्टी वि. सेप्टीक).

जागरूक नागरिक किंवा जागरूक वाचक म्हणून तुम्ही योग्य तेच केले. त्याबद्दल अभिनंदन>>>>अगदी .
पहिले क्रिटिकल , दुसरे आवश्यक, तिसरे साधे वाटले.

बरेच कष्ट घेता तुम्ही कुमार.
आता वर्तमानपत्रात प्रूफ रिडींग हा प्रकार बहुतेक अदृश्य आहे.साधारण इंग्लिश मिडीयम ची नुकतीच मराठी शिकलेली मुलं जसं मराठी लिहितील तश्या चुका केलेल्या असतात.शब्द खाऊन पूर्ण वाक्य निरर्थक झालेले असते.रोज बघून डोळ्याला त्रास होतो.पण सामना, सकाळ,लोकसत्ता, मटा सर्व या चुकांच्या बाबत सारख्या पातळीवर असल्याने समानतेची भावनाही वाढीला लागते ☺️☺️

शब्द खाऊन पूर्ण वाक्य निरर्थक झालेले असते>>> हो कधी ते विनोदी देखील होते. जुळ्या मुलींच्या जन्मवेळेत साधारण 15 मिनिटाचा फरक होता मधल्या काळात नक्षत्र बदलल्याने एक काळसर व एक गोरी झाली असे डॉ भा.नि. पुरंदरे यांनी म्हटल्याचे मी पुस्तकात लिहिले होते ते नक्षत्र ऐवजी वस्त्र झाले होते

अनु, धन्यवाद !

सर्व या चुकांच्या बाबत सारख्या पातळीवर असल्याने समानतेची भावनाही वाढीला लागते ☺️☺️ >>>> + ११११
मध्यंतरी एका 'दर्जेदार' पेपरात डॉ हर्षवर्धनना केंद्रीय गृहमंत्री करून टाकले होते !

एक शंका आहे. लष्कराच्या भाकऱ्या हा वाक्प्रचार लष्कराच्या कडक शिस्ती वरून आलेला आहे काय ?

छान लेख, आजच माझ्या वडिलांनी आमच्या WA group वर पाठवलं होत कि मटा मध्ये सलग दोन दिवस तेच शब्द कोडं येतय आणि तेही चुकीचे

साद, नाही.

पूर्वी ज्या गावी लष्कराचा तळ असे त्या गावच्या लोकांना शिपायांची, भाकऱ्या भाजणे यासारखी कामे करावयास लावीत. >>>>

म्हणजेच आपला ज्याच्याशी अर्थाअर्थी संबंध नाही अशी कामे करणे
..
धनु, छान !

प्रुफ रिडींग आता कालबाह्य झाले आहे दैनिकामधून असे वाटते ते वाचताना

डॉ तुम्हाला प्रणाम त्यांच्या पर्यंत पोहचण्याच्या प्रयत्ना करीता

निलुदा, धन्यवाद.

प्रुफ रिडींग आता कालबाह्य झाले आहे >>>> यावरून एक आठवले:

वृत्तपत्र छापतानाची एक घोडचूक आणि त्यामुळे संबंधिताची गेलेली नोकरी, यासंबंधी एक रोचक किस्सा पुढच्या प्रतिसादात लिहितो.
हमो मराठे यांनी तो त्यांच्या स्वतःबद्दलच त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे. आता माझ्याजवळ ते पुस्तक नसल्याने त्या घटनेतील राजकीय व्यक्तीचे नाव मात्र लिहीत नाही.

सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा हमो सकाळी एक नोकरी, संध्याकाळी अभ्यासक्रम आणि आर्थिक गरज म्हणून रात्रपाळीची एक अर्धवेळ नोकरी एका दैनिकात करत होते. रात्रीची नोकरी अकरा वाजता सुरू होई. एके दिवशी ते खूप त्रासलेले आणि दमलेले होते. तरीही रात्रपाळीस गेले होते.

त्यादिवशी एक महत्वाची बातमी कार्यालयात येऊन धडकली होती. ती एका राष्ट्रीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल होती. त्यांना पेप्टिक अल्सरचा बराच मोठा त्रास झाला होता. त्यामुळे रुग्णालयात ठेवले होते. हमोना बातमीचा मथळा लिहायचा होता :

“ अमुक-तमुक यांना अल्सरचा आजार”.
तेव्हा हमो बरेच पेंगुळलेले होते आणि ते तपशीलात असे लिहून गेले :

“***** यांना कॅन्सरचा आजार” !
मुद्रितशोधन न करता हमो घरी निघून गेले.

आता लक्षात घ्या. त्याकाळी कर्करोगाचे उपचार आजच्या इतके प्रभावी नव्हते. त्यामुळे एकदा कर्करोग झाला की ‘आता आज ना उद्या सगळे संपले’, हीच जनभावना होती.

झाले, सकाळी ही बातमी छापून अंक वितरित झाले. दुसऱ्या दिवशीच त्या संपादकाचे धाबे दणाणले. संबंधित पक्षाकडून असंख्य फोन त्यांना येत राहिले त्यांनी कपाळावर हात मारला आणि हमोना बोलावणे धाडले. हमो तिथे गेल्यावर त्यांनी छापलेला अंक त्यांच्या समोर धरला आणि सांगितले की आता याचे प्रायश्‍चित्त तुम्हीच घ्यावे.

क्षणाचाही विलंब न लावता हमोनी त्या नोकरीचा राजीनामा दिला होता.

20200703_111825_LIN.jpg

डोळे झाकून वर्तमानपत्र छापतात का देव जाणे? आजच्या महाराष्ट्र टाईम्सच्या नागपूर आव्वृत्तीमध्ये आजच्याच शब्द्कोड्यांचे उत्तर कालच्या कोड्याचे म्हणून दिलंय. संबंधीत image मध्ये उदाहरणादाखल mark केलंय.

राहुल, सहमत आहे.

असा अनुभव घेतलाय काही वेळेस. कधीकधी तर कोडयातील आडव्या आणि उभ्या शोधसूत्रांची छापताना बरोबर उलटापालट झालेली असते. तेव्हा तर सोडविणाऱ्या व्यक्तीची खूप चिडचिड होते.

एक छोटी सूचना.
तुमच्या प्रतिसादातील ‘झापतात’ हे त्वरित संपादित करून ‘छापतात’ करून टाका. Bw

एक छोटी सूचना.
तुमच्या प्रतिसादातील ‘झापतात’ हे त्वरित संपादित करून ‘छापतात’ करून टाका --- चूक दुरुस्त केली; शोधून काढल्याबद्दल धन्यवाद.
असा अनुभव घेतलाय काही वेळेस. कधीकधी तर कोडयातील आडव्या आणि उभ्या शोधसूत्रांची छापताना बरोबर उलटापालट झालेली असते. तेव्हा तर सोडविणाऱ्या व्यक्तीची खूप चिडचिड होते. --- नुकत्याच रविवार विशेष कोड्यात झालेलं (आज महाराष्ट्र टाईम्स, नागपूर आवृत्तीच्या संपादकांना शब्दकोड्यांतील चुका दाखवणारा mail लिहिलाय, ह्याद्वारे भविष्यातील चुका टाळतील ही अपेक्षा आहे).

तुम्ही तर लोकसत्ता, लोकमत, मटा आणि सकाळ यांच्या ऑनलाईन एडिशन किंवा फेसबुकवर ते जे टाकतात ते वाचूच नका
बाकीची सगळी कामे सोडून आयुष्यभर चुकाच दुरुस्त करत बसावे लागेल
कधी कधी मला हे जे कोणी लिहितात त्यांना भांग वगैरे मिळते का काय इतपत शंका येते
गेल्याच आठवड्यात लोकमत ने 69 हजारात 36 राफेल विमाने खरेदी करणार असल्याचे वृत्त छापले होते
म्हणलं अशाने लोकं घरोघरी ताफे ठेवतील की Happy

<< ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. >>

<< एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव. >>

<< त्या घटनेतील राजकीय व्यक्तीचे नाव मात्र लिहीत नाही. >>

कुमार सर,
तुम्ही आयुष्यात नेहमीच "पॉलिटिकली करेक्ट" लिहिता का हो?

तुम्ही एकंदरीत घेतलेली मेहनत आवडली, त्याबद्दल नक्कीच कौतुक केले पाहिजे.

तुम्ही आयुष्यात नेहमीच "पॉलिटिकली करेक्ट" लिहिता का हो? >>

होय, सार्वजनिक ठिकाणी लिहिण्याचे संकेत मी नेहमीच पाळतो.

हमो यांचे ते पुस्तक मी २००५ मध्ये वाचले होते. आता ते माझ्याकडे नाही.
जर असते तर तो संदर्भ डोळ्याने पाहून मी व्यक्तीचे नाव जरूर लिहीले असते.
धन्यवाद.

विषयाच्या अनुषंगाने ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रातील एका सदराबद्दल लिहीतो. काही वर्षांपूर्वी मी ते त्यांच्या छापील अंकात पाहिले होते. रोजचा अंक वाचल्यानंतर जर वाचकांना त्यातील चुका - म्हणजे स्पेलिंग, तपशील, व्याकरण किंवा वाक्यरचना- याबद्दल काही सुधारणा सुचवाव्या वाटत असतील, तर त्यासाठी मुभा होती. त्यांच्या रोजच्या अंकात असे एक सदर होते.

त्यात सुरुवातीस असे वाक्य होते “ जास्तीत जास्त निर्दोष अंक देण्याचा आम्ही प्रयत्न करतोच. पण शेवटी चुका कोणाच्याही हातून होऊ शकतात. वाचकांनी अशा सर्व चुका रोजच्या रोज आम्हाला कळवत जाव्यात.”
त्या सदरात चूक आणि सुधारणा असे दोन्ही छापले जाई.

गेल्या तीन वर्षात मी द हिंदू पाहिलेला नाही त्यामुळे सध्याची कल्पना नाही.

Pages