लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेंजर आहेत मॅडम
आता असे बोलल्यास किमान 6 पालक व्हॉटसप वर भांडणे, 2 पालक टीचर ना फोन करुन भांडणे, 10 पालक शाळेला इमेल करून भांडणे, 2 पालक स्थानिक नगरसेवकाला शाळेत घेऊन जाऊन समज देणे यापैकी एक किंवा बऱ्याच घटना घडतील Happy

हो पण बाई डेंजर होत्या म्हणून आपल्याला जरा नीरक्षीरविवेक आला. सध्या परिस्थिती अशी वाटते की २०३० पर्यंत वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड "शुद्ध लिहीणारे इसम" ही 'एनडेंजर्ड स्पीशीज' घोषित करेल.

मुळात व्हॉटसपवरच्या सुविचाराचं पुस्तक बनवणं इतकी अफाट योजना आहे की त्यापुढे मला आजूबाजूच्या बातम्या दिसल्याच नाहीयेत.पुस्तकात व्हॉटसप सारखे फूल, मांजरीची पावलं वगैरे इमोजी पण असतील का 5 ओळीनंतर? >>. टोटली. मलाही उत्सुकता आहे. आणि फॉरवर्ड कसा करणार? व्हॉट्सअ‍ॅप वरचा सुविचार न वाचता, न विचार करता फॉरवर्ड करता आला नाही तर काय उपयोग Happy

अशा दाव्यांची एवढी सवय झालीय की ते सोमी, वर्तमानपत्रात रोज न दिसल्यास चुकल्यासारखे वाटते. >>> मानव Lol

Happy सगळं करून पुन्हा उजळ माथ्याने ----
" स्पष्ट, नेमक्या, विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी" आमंत्रण दिलेय....
Edited by -- Prashant Patil. हेही श्रेय घेतलेय.
मग संपादनपूर्व मजकूर काय असेल? शाल, श्रीफळ ची सोय करायलाच लागेल आता.

धाग्याच्या विषयाशी संबंधित विनंती अशी आहे कि .. धाग्याच्या नावात "भाकरी" चे अनेकवचन वापरले आहे ते चुकीचे आहे. भाकरी चे अनेकवचन "भाकरी" च असते ..भाकऱ्या नाही.

भाकऱ्या नाही.>>
हा ग्रामीण अपभ्रंश वाचला होता.
..............................
@ गणोबा ,

भाकरी is the form in the Konkan̤--always singular, becoming in the plural भाकऱ्या.

मोल्सवर्थ शब्दकोश
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B1%...)

तुमचं बरोबर दिसतंय, पण आमचंही चुकलेले नाही. देशावर शाळा शिकल्याने भाकरी चे अनेकवचन "भाकरी" असेच शिकलो.
हा बघा एक संदर्भ : https://www.transliteral.org/dictionary ह्यात भाकरी शोधा (पूर्ण लिंक कॉपी होत नाहीये )
इथे लिहिलंय कि " देशावर भाकर (अनेकवचन "भाकरी") आणि कोंकणात भाकरी (अनेकवचन "भाकऱ्या") अशी रूपे रूढ आहेत.

गंभीर बातमी पूर्ण शहानिशा करून द्यावी याचेही भान माध्यमांना नाही.

गेल्या तासात ...
निशिकांत कामत : मृत्यू/ अतिगंभीर
अशा दोन्ही बातम्या फिरत आहेत.
आधी एका ट्वीटमध्ये ‘मृत्यू’.

मग ती अफवा असल्याचे रितेश देशमुखांचे निवेदन.
पुन्हा काही टीव्हीत मृत्यू.

..... जरा दम धरावा ...

आता ३.३१ दुपारी ही बातमी :
निशिकांत कामत यांच्या निधनाच्या अफवा; रुग्णालयाची माहिती

https://www.loksatta.com/manoranjan-news/critically-acclaimed-director-n...
.................................
पण त्याआधीच मटा मृत्यू जाहीर करून बसले होते.
हे पाहा २ जागरूक वाचक :
(https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...)

१. लेटेस्ट कमेंट
लाज वाटली पाहिजे तुम्हाला मटा.. खोटी बातमी दिली होती.. ती चूक मान्य करून दिलगिरी तरी व्यक्त करा
ujjwal pawaskar

२. अजून एक जागरूक वाचक:

कृपया अशा जिवन मरणाच्या सीमेवर असणार्या माणसांसाठी खात्रीशीर बातमी असल्याशिवाय.. प्रथम बातमी देण्याच्या सवंग स्पर्धेत भाग घेऊ नये.
Shubhada Kulkarni

वरील दोघांना धन्यवाद !

मराठी पेपरांत जशा शुद्धलेखनाच्या चुका पदोपदी दिसतात तशा इंग्रजी पेपरांमध्ये स्पेलिंगच्या चुका दिसतात का? केवळ उत्सुकता म्हणून विचारत आहे. मी भारतातले इंग्रजी पेपर फार वाचत नाही म्हणून हा प्रश्न पडला आहे.

इंग्लिश पेपरमध्ये नसतात चुका
इंग्लिश लिहिताना स्पेल चेक ने करेक्ट होतेच
मराठी लिहिताना मूळ लिहिताना असे काही लिहितो की मराठी स्पेल चेक पण शरणागती पत्करत असेल

होय, दिसतात की.
व्याकरणाच्या पण.
बाकी its / it’s यासारख्या मुलभूत गोष्टी समजून घेणे तर इतिहासजमा झालय !
..............................
मागील चर्चेत ' द हिंदू' बद्दल काही लिहीले आहे.

असतात कधीकधी हिंदूमध्ये व्याकरणाच्या/ स्पेलिंगच्या चुका. कधी एक शब्द चुकून दोनदा छापतात. कधी वाक्यरचना अगम्य असते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या क्रीडा पानावर
Rahul breaks Messi's record
असे लीड स्टोरी च्या हेडिंग मध्ये छापून आले होते
सगळे एकदम बुचकळ्यात की हा राहुल कोण मेस्सीचे रेकॉर्ड तोडणारा
कधी नाव पण ऐकलं नाही
बातमीत वाचलं तेव्हा कळलं तो स्पेन चा Raul होता Happy

२३ सप्टेंबर २०१९ चा हा सकाळ पहा काय म्हणतो आहे? फक्त नागरिकांनी ते साध्य कसं करायचं याबाबत मार्गदर्शक सूचनापण द्यायला हव्या होत्या असं मला तरी वाटतं. नाहीतर पुन्हा म्हणणार की नागरिक सहकार्य करत नाहीत.
Sakal.jpg

दोन्ही बातम्या अशक्य आहेत! Rofl
पहिल्या बातमीत मथळ्याचा जाऊदे, पण बातमीतल्या शब्दांचासुद्धा एकमेकांशी काही संबंध नाहीये!

+१
हळूहळू आपले हसणेही आटू लागलंय !

धन्य आहेत!!
पहिल्याला अजिब्बात नावे ठेवायची नाही हं..."पानमे पुदीना देखा, नाक का नगीना देखा" असले एकमेकाशी ताळमेळ नसलेले शब्द चालवून घेता, अगदी तिकीट काढून काढून बघायला जाता आणि बिचार्‍या आपल्या वार्ताहराला नावे ठेवता. करण जोहर कडे पाठवा याला. हिट्ट गाणे लिहून देईल...

हाहाहा
... एकसे एक भारी आहेत सगळे !

Pages