लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७९ जयप्रकाश नारायण यांच्यावर मुंबईच्या जसलोक इस्पितळात उपचार चालू असताना त्यांच्या निधनाची अफवा पसरली. लोकसभेने त्यांना श्रद्धांजली वाहिली. ऑल इंडिया रेडियोने नियमित प्रक्षेपण थांबवून त्यांच्या निधनाची घोषणा केली.

ओह !

सकाळी १० वाजताच्या बातमीनुसार….
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा खुलासा येथे आहे:

https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/movies/celebrities/st...

विक्रम गोखले अजूनही प्रकृतीशी झुंजत आहेत

How information technology progresses and communication decays.

विक्रम गोखले यांच्या तब्येतीत सुधारणा !
ते आता डोळे उघडत आहेत. 48 तासात व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो
- रुग्णालयाचे निवेदन

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/vi...

अखेरीस विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची बातमी आलेली आहे
आदरांजली !
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/movies/celebrities/st...
विकिपीडिया नुसार त्यांचे जन्मसाल 1945 आहे
आताचे त्यांचे वय देण्याबाबतही माध्यमांमध्ये घोळ दिसलेला आहे
कोणी 77 तर कोणी 82 लिहिलेले आहे

दिसायला लहानशी चूक आहे पण त्यामुळे लोह धातू ऐवजी मुलाचे नाव ( आर्यन) होऊन बसले आहे ! :

तुमच्या शरीरात आर्यनची कमतरता आहे हे कसं ओळखाल? ‘अशी’ लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावधान!

https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/3312170/be-careful-iro...

लॉल!

आज आमचं नेहमीचं इंग्रजी वृत्तपत्र आलं नाही. त्याऐवजी टाइम्स ऑफ इंडिया आलाय. बाँबे टाइम्स पुरवणीत wanna beat, shaadi असे शब्द शीर्षकात आहेत. मटानेही त्यांच्या पुरवण्यांत अशीच भाषा वापरायला खूप आधीपासून् सुरुवात केली असं इथे मायबोलीवरच वाचल्याचं आठवतं.

"आळा" >>> अरेरे !

वरील चुकांना आळा कसा घालायचा !
.......
रच्याकने....

जागतिक फुटबॉल स्पर्धेतील एखादा सामना संपल्यानंतर जर प्रेक्षागृहात जपानी प्रेक्षक असतील तर ते संपूर्ण प्रेक्षागृह स्वतः स्वच्छ करतात असे एका लेखात वाचण्यात आले.
अभिनंदन !

झेंड... Lol

मननीय लेख :
https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-marathi-language-in-marathi...

गुगल भाषांतर ही इतर भाषांमधलं ज्ञान आपल्या भाषेत आणण्यासाठी जादूची किल्ली आहे. पण ही एक उपयुक्त सुविधा आज आपण केवळ विनोदाचं साधन म्हणून वापरतो. भाषांतराचे विनोद किंवा वृत्तपत्रीय मजकुरातल्या चुका पाहून मनोरंजन करून घेण्यापेक्षा त्यात दुरुस्त्या व्हाव्या म्हणून एकतरी पाऊल का उचलत नाही?

पाऊल कुणी उचलावं अशी अपेक्षा आहे? वृत्तपत्रीय मजकुरातल्या चुका ही पत्रकार आणि संपादक यांची जबाबदारी आहे. ते स्वतः धड काम करत नसतील, त्यामुळे त्यांची चेष्टा झाली तर त्यात वाचकाची काहीच चूक नाही.

तो लेख वाचून मलाही आपल्या या धाग्याची आठवण आली होती.

आपण वाचतो त्या वृत्तपत्रातल्या चुका त्यांना रोजच्या रोज कळवाव्यात असा विचार मी मागे याच धाग्यावर मांडला होता. प्रत्यक्षात आणायलाच हवा.
आमच्याकडे लोकसत्ता येतो. तपशिलातल्या चुका त्यांना कळवल्या तर ते दखल घेतात असा अनुभव आहे.
हे सध्या तरी छापील आवृत्ती किंवा ई पेपरसाठीच करायला हवं. त्यांच्या संकेतस्थळावर दिसणार्‍या अनेक बातम्या त्यांनी लिहिलेल्या असतात का याबद्दल शंका आहे.
गुगल भाषांतर कसं सुधारायचं याची कल्पना नाही. गुगल मॅप सुधरायचा प्रयत्न एकदा केला होता. खूप किचकट वाटलेलं.

भरत+१
मी संबंधित संपादकांना अधूनमधून ईमेल करत असतो.

पण मुळात आमच्या चुका बघून हसण्याऐवजी, तुम्ही पाऊल उचलून आम्हाला कळवत जा, असे म्हणायचे म्हणजे आगाऊपणा नाही का?

पहिल्याच पानावर आशुचॅम्प यांनी उत्तर दिले आहे. बाकीची सगळी कामे सोडून आयुष्यभर चुकाच दुरुस्त करत बसावे लागेल.

आपण बाकी करतो ती सगळी कामेच असतात का? आता इथे तुमच्याशी वाद घालत बसण्याऐवजी वृत्तपत्राला त्यांच्या चुका कळवल्या तर तो वेळ सत्कारणी लागेल.
का करावे?
बुडती हे जन देखवेना डोळा

वाद घालत नाहीये. वृत्तपत्राला त्यांच्या चुका एखाद्या वाचकाने कळवल्या तर तो त्याचा चांगुलपणा आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण लेखात लिहिल्याप्रमाणे "चोराच्या उलट्या बोंबा" बघून आश्चर्य वाटले इतकेच.

ते सदरलेखन आहे. वृत्तपत्राच्या संपादकीयांपैकी कोणी लिहिलेलं नाही. त्यातून त्या वृत्तपत्रांनाही कानपिचक्या द्यायला हव्यात.

वृत्तपत्रे - पेपर किंवा ऑनलाईन - सुधारणेच्या फार पलीकडे गेलेली आहेत असे वाटते.
त्यांना चुका कळवणे हा चांगुलपणा असला तरी अरण्यरुदन ठरेल/ठरतेय !

Pages