लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. कुमार, जागरूक नागरिक आणि वाचक म्हणून तुम्ही जे कर्तव्य बजावता आहात (लष्कराच्या भाकऱ्या भाजता आहात Wink ) त्याबद्दल तुमचं खरोखरच कौतुक वाटतं.

तुम्ही तर लोकसत्ता, लोकमत, मटा आणि सकाळ यांच्या ऑनलाईन एडिशन किंवा फेसबुकवर ते जे टाकतात ते वाचूच नका
बाकीची सगळी कामे सोडून आयुष्यभर चुकाच दुरुस्त करत बसावे लागेल >>>> अगदी सहमत आहे. व्याकरण, स्पेलिंग्ज, वाक्यरचना कशावरही लक्ष देत नाहीत. बाकी आकडे, नावं हे तपशील ही वाट्टेल ते असतात. वाक्याचा अर्थ बदलेल म्हणूनही प्रूफ रिडींग करत नाहीत. Punctuation..... ते काय असतं?
त्यापेक्षा फेसबुकवर दिसणाऱ्या बातम्या स्कीप कराव्यात.

मीरा, धन्यवाद !
....................................
चर्चा रंगली आहे तर आता वैद्यकीय पाठ्यपुस्तकांतील चुकांवर काही लिहितो.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अभ्यासक्रमात बरीच पुस्तके ही ब्रिटिश असायची. त्यामध्ये स्पेलिंगची चूक तर जवळजवळ कधीच नाही आणि तपशिलाची चूक अभावानेच असायची. गेल्या वीस वर्षात या क्षेत्रावर अमेरिकी पगडा बसला. आता जास्त पुस्तके अमेरिकेतून येऊ लागली. आता काही पुस्तकांच्या आवृत्त्या अतिवेगाने निघू लागल्या. परिणामी मुद्रितशोधन ढासळले.

आता स्पेलिंगच्या आणि तपशिलाच्या चुका देखील अधूनमधून दिसू लागल्या. अशाच माझ्या एका पुस्तकात एक घोडचूक सलग तीन आवृत्यापर्यंत चालू होती. त्यामुळे मी अस्वस्थ होऊन तिचा कसा पाठपुरावा केला याचा किस्सा पुढील प्रतिसादात लिहितो……..

पुस्तकातील विषय होता: पायाच्या अंगठ्याचा एक आजार. त्याचे वर्णन सुरू झाले. पुढे दोन परिच्छेद झाल्यावर एकदम मजकुरात ‘ हाताच्या अंगठ्याचा सांधा’ अशी ओळ आली. लगेच पुढे पायाचे वर्णन चालू.

आता ही चूक पाठ्यपुस्तकात अक्षम्य आहे. म्हटलं, मुद्रणदोष आहे, सोडून द्या. दोन वर्षांनी पुढची आवृत्ती आली आणि ते पान उघडून बघितले. चूक जशीच्या तशीच. त्याही पुढच्यात अजून एकदा असेच.
आता मला राहवेना.

मग प्रकाशकाच्या संस्थळावर गेलो आणि तिथल्या संपर्कातून ईमेल पाठवली. महिनाभर वाट पाहिली. काही उत्तर नाही. पुन्हा स्मरणपत्र. प्रतिसाद नाहीच.

या पुस्तकातील धडे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले होते. संबंधित धडा अमेरिकी लोकांनी. अन्य काही धडे आपल्या चेन्नईच्या एका लेखिकेने लिहीले होते. मग त्या बाईंच्या संस्थेच्या संस्थळावर गेलो. इथे त्यांचा वैयक्तिक ईमेल मिळाला. त्यांना विचारले की तुम्ही ती चूक दुरुस्त करण्यासंबंधी काही मदत कराल काय?
त्यांचे उत्तर आले, “होय, मी जरी त्या धड्याची लेखिका नसले तरीदेखील मी तुमचा निरोप प्रकाशकांपर्यंत पोचवते”.
……..
आता या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीची मी वाट पाहत आहे.

लष्कराच्या भाकऱ्यांबद्दल तुमचे अभिनंदन डॉक्टर ! पण ते किती मनस्तापाचे काम आहे याची कल्पना आहे.

लेखक- कवी, वार्ताकार, भाषेचे शिक्षक, पत्रकार ई. भाषाजीवींनी तरी निर्दोष लिहावे, तसा किमान प्रयत्न दिसावा ही माझी अपेक्षा असते. But this is like wishing too much Happy

द हिंदू ची आठवण विशेष आवडली. Proof reader नकोसा असल्यास / परवडत नसल्यास हे तरी किमान सर्वच छापील माध्यमांना करता येईल.

लोकसत्ता आणि सामना साठी आदल्या दिवशी किंवा 1 तास आधी बातम्या पाठविल्यास मी विना मोबदला प्रूफ रीडर बनायला तयार आहे.अजिबात बघवत नाहीत डोळ्यांना बातम्या.

१. अनिंद्य,
धन्यवाद चांगली सूचना.
२. अनु,
नव्या भाकऱ्या भाजण्यासाठी शुभेच्छा !
३. वावे,
फारच छान शब्दचित्र ! या मानाने त्यांच्या संस्थलावरील वरील बातम्या तशा ठीक वाटतात.

टीव्ही वरच्या बातम्या बघायचे मी मी कधीच बंद केले आहे. आता पेपरच्याही सहसा वाचत नाही.
दिवसातून तीन वेळेस शांतपणे रेडिओच्या बातम्या ऐकतो. फार मस्त वाटते.

मच्छिमार बातमी कहर आहे. बातमीदाराने एकदा तरी वाचायचं ना काय लिहीलं आहे स्वतः ते.. शुद्धलेखनाचे नियम माहिती नसताना प्रकाशनक्षेत्रात येणे एकवेळ समजून घेता येईल - पापी पेट का सवाल है! पण असं आपण स्वतः लिहीलेलं (टाईप केलेलं) वाचायचचं नाही आणि तरी त्याबद्दल पगार घ्यायचा हा प्रकार अनाकलनीय आहे.

पूर्वी कुठल्यातरी मासिकात/पेपरात एक सदर असायचे "उपसंपादकाच्या डुलक्या". टायपो आणि त्यातून होणारी मजेदार वाक्ये असत. हल्ली टायपिंगला कुंभकर्ण नेमल्यासारखी परिस्थिती असल्याने ते सदर आता केवढं मोठ्ठ झालं आहे अशी उत्सुकता आहे Happy

पु लं चे "खुर्च्या" वाचताना "डुकराच्या मांसाची तळलेली भजी", "पोपच्या खालोखालच्या दर्जाचा अधिकारी" वगैरे वाचून आपण खळखळून हसलो होतो तेव्हा नियतीनेही मंद स्मित केले असेल को लोकहो, थोडे थांबा हेच रोजच्या पेपरात वाचावे लागणार आहे.

वरील तिन्ही प्रतिसादांना >>> +१११
............................................
"अमृत" मासिकात मुद्राराक्षसाचा विनोद आणि उपसंपादकांच्या डुलक्या असायचे.
काहे मजेदार उदा:

- तू उगी चहात पाय गाळतोस.

-बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना तो ठेच लागून पडला.

- पाच सुवासिनींनी मंत्र्यांना आवळले. !!!!

अमृत" मासिकात मुद्राराक्षसाचा विनोद आणि उपसंपादकांच्या डुलक्या असायचे....
मलाही आठवले ते. मजेदार असायचे.
"अमृत" खूप आवडायचे. निघते का अजूनही ?

अस्मिता,
नाही ना !
अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.

कित्येक जुनी अमृत मासिकं पुन्हा पुन्हा वाचली आहेत. आईच्या लहानपणीची... आजोळी मोठे कपाट होते.
वाईट वाटले फार दर्जेदार वाटायचे अमृत.

पूर्वी ज्या गावी लष्कराचा तळ असे त्या गावच्या लोकांना शिपायांची, भाकऱ्या भाजणे यासारखी कामे करावयास लावीत. >>>>

ही कामे विना मोबदला (म्हणजे फुकट!) करवुन घे त.
' घरचे खावुन लष्कराच्या भाक री भाजणे' अशी ही म्हण आहे.

पुस्तके , नियतकालिके वाचताना त्यातल्या चुका संबंधितांना कळवाव्यात असं नेहमी वाटतं. पण बहुतेक वेळा करायचं राहून जातं.
तुम्ही हे नेटाने करता हे कौतुकास्पद आहे.

आकाशवाणी एफेम गोल्डवरच्या मराठी कार्यक्रमांतल्या आर जे कार्यक्रम संपवताना " आता अमुक तमुक(स्वतःचे नाव) ला XXXX कार्यक्रम संपवण्याची अनुमती द्या" असं म्हणायच्या. हे दिंदी चं भ्रष्ट मराठी रूप होतं. म्हणून लोक सत्ता लोकमानससाठी त्याबद्दल पत्र लिहिलं. तोवर आकाशवाणीवा ले फेसबुक, ट्विटर, ईमेलवर आले नव्हते. फोन होते पण ते डायल इन कार्यक्रमांसाठी.
माझं पत्र छापताना लोकसत्ताने त्यात काही बदल करून ते जरा जास्तच खरमरीत केलं.

यानंतर काही दिवसांत एका डायल इन कार्यक्रमासाठी माझा फोन लागला (फोन संभाषण प्रक्षेपित होत नाही) तेव्हा त्या पत्राबद्दल सांगून उलट मीच दिलगिरी व्यक्त केली की तुम्हांला सरळ न लिहिता वर्तमानपत्रात लिहिलं आणि त्यात माझे नसलेले शब्द घुसडले गेले.

लोकसत्तेला क्वचित पत्रे लिहिली आहेत आणि बहुतेक वेळा त्यांची दखल घेतली गेली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या पाठ्यपुस्तकांत विकिपिडियावरचा मजकूर, तोंडी सांगितलेला मजकूर लिहून काढताना त्याच उच्चाराचा पण वेगऴ्या स्पेलिंगचा आणि अर्थातच चुकीच्या अर्थाचा शब्द, कोणताही आधार नसलेले जनप्रवाद किंवा मत अभ्यासान्तीचे निष्कर्ष असल्यागत छापणे असे प्रकार दिसलेत.

सुमेधा + ११
भरत, धन्यवाद. तुमचीही जागरूकता छान. नुसत्या टीकेपेक्षा कृती केव्हाही चांगली.
.......
आमच्या भागात एक लेखन साहित्याचे दुकान आहे. त्यांनी दुकानावर Stationary असा निऑन मधील छान मोठा फलक लावलाय. त्या शब्दाचे स्पेलिंग चुकले आहे ( योग्य .....ery असे आहे). मला ते खटकत होते पण त्यांना सांगायचे टाळत होतो. भाषामाध्यमातच इतकी बेफिकिरी दिसते, तर यांना कुठे सांगा असे वाटे.

जशी त्यांच्याशी घसट वाढली तसे एकदा सांगितले. ते अर्थपूर्ण हसले आणि बघतो असे म्हणाले. त्यानंतर वर्षाने त्यांनी त्या पाटीतून A काढून E बसवून घेतला. आता तो E अन्य अक्षरांच्या तुलनेत नवा आणि वेगळ्या रंगछटेत उठून दिसतो.
त्यांच्या या कृतीबद्दल सलाम !

चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे आभार !

……………………………
ज्यांना निर्दोष लेखन हा महत्त्वाचा विषय वाटतो, त्यांच्यासाठी एक पुस्तक सुचवेन. पुस्तकाचे नाव आहे Write better, Speak better. रीडर्स डायजेस्टचे हे प्रकाशन आहे. बरेच जुने पुस्तक आहे.

जरी ते इंग्लिश असले तरी त्यातील बहुमूल्य सूचना आपल्याला कुठल्याही भाषेसाठी उपयुक्त आहेत. त्यातील एका प्रकरणातील एक वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. लेखकाने असे म्हटले आहे, “तुम्ही एक कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर पानभर मजकूर स्वतःच्या मनाने लिहा. नंतर शब्दकोश बघून तो मजकूर तपासायला घ्या. जर का त्या संपूर्ण मजकूरात तुम्ही एकही स्पेलिंगची चूक केलेली नसेल, तर तुम्ही स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्यास पात्र आहात !”

( स्पेलचेक वगैरे सेवा नसलेल्या काळातील हे वाक्य आहे. सध्या मजकूर वा तपशीलातच होणाऱ्या चुकांना संगणक तरी काय करणार? लेखकच जबाबदार असतो).

देवा Lol
जमले तर
"मुद्राराक्षसाचा विनोद आणि उपसंपादकांच्या डुलक्या "
या नावाने नवीन धागा काढा आता कुमार सर !!

अमृत मासीक नाशकातल्या गावकरी प्रकाशनचे होते.
डॉक्टर सर, आपण केलेली मेहनत स्तुस्त आहेच.
पण अशा करण्याने आपल्यालाच मनस्ताप होतो.
दैनिके चुका करण्याबाबत निर्ढावलेले असतात.
पाठ्यपुस्तकात तर आताश: भरमसाठ चुका सापडतात. मराठी पुस्तकात हिंदी वाक्ये असलेले पाठ समाविष्ट असतात.
व्याकरणाच्या दृष्टीने चुका असतात.

आपणा सर्वांशी सहमत आहे.
खरंय, अगदी कमाल करत आहेत ही मंडळी !
आपल्याला पेलतील तेवढे सुधारणांचे प्रयत्न करीत राहू.

या चर्चेत भाग घेतलेले आपण सर्व जण निर्दोष लेखनाबाबत जागरूक आहोत. यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नही करतोय.
या संदर्भात समूह पातळीवर काही उपक्रम माझ्या पाहण्यात आले होते. त्याच्या काही आठवणी लिहीतो. तुम्हीही लिहा. शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शक आठवणी देखील लिहीता येतील.
.....

‘अंतर्नाद’ मासिकात कित्येक सलग अंकांमध्ये महाराष्ट्र शासनाची शुद्धलेखनाची मूलभूत नियमावली छापलेली असायची. संपादक सर्व लेखकांना आवाहन करीत, की या मासिकाकडे लेखन पाठवताना त्या नियमावलीनुसार लिहीत चला.

माझ्यासह अनेक लेखकांना त्याचा चांगला उपयोग झाला.

गेल्या पिढीत मनोहर ज. बोर्डेकर हे ख्यातनाम मुद्रितशोधक होते. प्रकाशनविश्वात त्यांचा दबदबा असे.
मौज, मॅजेस्टिक, डिंपल, दिलीपराज या नामवंत प्रकाशकांसाठी त्यांनी मुद्रितशोधनाचे काम केले होते.

वृत्तपत्रांमधले मुद्रितशोधन ही फारच मोठी अपेक्षा झाली ... काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियामध्ये संपादकीय पान एका आठवड्यात दोन वेळा तेच छापलेलं पाहिलं आणि थक्क झाले होते. शब्दकोडं, त्याची उत्तरं, मुद्रितशोधन हे तर दूरच ... संपादकीय सुद्धा छापण्यापूर्वी नजरे़खालून घालायचे कष्ट घेत नाहीत का? फक्त जाहिराती महत्त्वाच्या?

साद व गौरी +11
……..
लेखन सुधारणा संदर्भात माझी ही शालेय आठवण.
‘द्ध’ हे जोडाक्षर खूप लोक चुकीचे ( ध्द ) लिहितात. आमचे मराठीचे शिक्षक डॉ. वि.य. कुलकर्णी यांनी आमच्यावर हा मुद्दा ठसवला होता. त्यांनी हे जोडाक्षर आमच्याकडून घोटून लिहून घेतले होते. ते योग्य लिहायचे दोन प्रकार असतात:

१. द च्या पोटात ध , (द्ध ) किंवा
२. द चा पाय मोडून पुढे ध

माझी अशीच एक शालेय आठवण आहे. सहावीत असताना मराठीच्या उत्तरात किंवा निबंधात 'पहिल्यांदा' असा शब्द वापरला. आमच्या बाईंनी त्याच्यावर लाल पेनाने खूण करून प्रथमच असा शब्द वापरावा असे लिहिले होते.
त्यामुळे अजूनही कधी पहिल्यांदा असा शब्द लिहिताना आपण काही तरी चुकीचे लिहीत आहोत असे वाटते.

पहिल्यांदा का चूक दिला असावा??

प्रथम आणि पहिल्यांदा याच्या छटा वेगळ्या आहेत

'आयुष्यात पहिल्यांदाच ही अनुभव मिळाला'
पहिल्यांदा त्याने काय केले तर पंखा लावला
इथे प्रथम शब्द चपखल बसत नाही
बोली भाषेतला किंवा सहज वाटत नाही

प्रथम आणि पहिल्यांदा >>

? प्रमाण / बोलीभाषा हा फरक . माझा आपला अंदाज. सूक्ष्मभेद आहे खरा.
..................
दुकानांच्या पाट्यांवरील लेखनात बऱ्यापैकी चुका आढळतात. त्या सुधारण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाने एक सुरेख उपक्रम राबवला होता. तो म्हणजे रंगाऱ्यांसाठी कार्यशाळा.

बहुतेक दुकानदार हे त्यांच्या दुकानाच्या पाटीवरील लेखन शुद्धतेबाबत जागरूक नसतात. एका गावातील पाट्या रंगवण्याची कामे करणारे रंगारी साधारण ठरलेले असतात. हा मुद्दा ध्यानात घेऊन सदर कार्यशाळा आयोजली होती.

अशा प्रकारे रंगारी प्रशिक्षित झाले, तर पाट्यांवर लेखनही निर्दोष होईल अशी यामागे धारणा होती.

Pages