लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोधून १८०० रू वाला व्हिडीयो पाहिला. जरी त्या बाईसाठी वाईट वाटलं तरी त्या मुलांचा वैताग बघून त्यांना मोरंजन लागणार हे जाणवले....

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठविलेल्या आजच्या पत्रातील एकाच वाक्यात तीन चुका आहेत.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-uddhav-thackeray...

आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करीत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.

गांभिर्याने - गांभीर्याने
घेवून – घेऊन
हि - ही

१) पोलीस शब्दापासून पोलिसाने असे रूप होते पण गांभीर्य या शब्दापासून गांभिर्याने असे न होता गांभीर्याने असे रूप होते. स्पेल चेकरमध्ये "गांभिर्याने" असे टाईप करून स्पेस दिल्यावर ऍटोकरेक्टद्वारे ते सुधारले जाऊन "गांभीर्याने" असे बनत आहे.
२) जेवणे पासून जेवून असे रूप होते पण घेणे पासून घेवून असे न होता "घेऊन" असे रूप बनते. धातूच्या शेवटी "व” असेल तरच वून असे शेपूट लावता येते. नाहीतर "ऊन". ह्याला पररूप संधी का कायसे म्हणतात.
३) 'परंतु, यथामति, तथापि' ही तत्सम अव्यये तसेच 'आणि, नि’ ही मराठी अव्यये(च) ऱ्ह्स्वान्त लिहावी. “हि" मात्र दीर्घच हवी.

या व्यतिरिक्त "जीवाची, सदध्या, सुचना, म्हणणार्याचे, तिनही" असे इतर काही शब्द चुकीचे दिसत आहेत.

पत्रातील भावना मात्र अगदी perfect पोहोचल्या आहेत. बाकी तपशिलातील चुका किती "गांभिर्याने” घ्यायच्या ते ज्याचे त्याने ठरवावे!

शंतनू,
योग्य विश्लेषण.
मला अजून एक गोष्ट थोडी खटकली.

"जाईल हि खात्री मी आपल्याला देतो."

>>>> ही वाक्यरचना जरा आडवळणाने आल्यासारखी वाटते का ?

“ हे मी खात्रीने सांगतो”, हे अधिक बरे वाटते का ?

सेक्यूलरिझम, डिव्हाईन प्रीमोनिशन इंग्रजीत का? बाकीचं पत्र जर मराठीत समजत असेल राज्यपालांना/त्यांच्या अनुवादकाला तर निधर्मी, दैवी साक्षात्कार्/अंतर्ज्ञान हे शब्द नाही समजणार का त्या अनुवादकाला????

सेक्यूलरिझम, डिव्हाईन प्रीमोनिशन इंग्रजीत का? बाकीचं पत्र जर मराठीत समजत असेल राज्यपालांना/त्यांच्या अनुवादकाला तर निधर्मी, दैवी साक्षात्कार्/अंतर्ज्ञान हे शब्द नाही समजणार का त्या अनुवादकाला????>> हे त्या महाशयांनी वापरलेत स्वतः:च्या पत्रात म्हणून उत्तरात पण ते शब्द आलेत.

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील स्वाभाविक घटनेचा विनाकारण बागुलबुवा करून अतिरंजित बातम्या दिल्या जातात. त्यांचा सुरेख समाचार घेणारे हे विश्लेषण.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4640

shantanuo, तुम्ही मुख्यमंत्र्यांना libre office वापरायला सांगा, म्हणजे तुमचा स्पेल चेक फळास येईल. चुकाही कमी होतील आणि मराठी स्पेल चेकला प्रसिद्धीही मिळेल.

कुमार१ यांनी एका प्रतिसादात शैलीचा मुद्दा उपस्थित केला आहे. हे तर काहीच नाही अशी शैली रोजच वाचायला मिळते. आजच्या लोकसत्तेतील पहिल्या पानावरील ही जाहिरात पाहू.

https://kagapa.s3.ap-south-1.amazonaws.com/spellcheck/up_ad.jpg

सर्वप्रथम हेडिंग पहाः
या राज्यात अनेक गौरवशाली राष्ट्रीय पातळीवरील संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहेत, जसे दी आयआयटी-कानपूर, आयआयएम-लखनौ इत्यादी

सुचविलेला बदलः
राष्ट्रीय पातळीवरील अनेक गौरवशाली संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या राज्यात आहेत, जसे दी आयआयटी-कानपूर, आयआयएम-लखनौ इत्यादी

संस्कृतमध्ये शब्दाचे रूप एकदा नक्की केले की त्याचे वाक्यातले स्थान गौण ठरते. ते कसेही लिहले तरी चालते. उदा.
कर्ता - कर्म - क्रियापद
कर्म - कर्ता - क्रियापद
क्रियापद- कर्ता - कर्म
पण बाकी कोणत्याच भाषेत तशी सूट नाही. मराठीत तर नाहीच. शुद्धलेखनाच्या दृष्टीने फार काही चुका नसल्या तरी हा जाहिरातवजा लेख अगदी "वाचवत” नाही. त्याचे कारण मागे पुढे झालेले शब्दांचे डबे आणि विशेष वापरात नसलेल्या संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर. जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करणाऱ्यांनाच जर वाचक नको असतील तर मग प्रश्नच मिटला!

अजून काही उदाहरणेः

जागतिक गुंतवणूकदारांना विशेषतः चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी उ. प्रदेश शासनाने औद्योगिक गुंतवणुकीच्या मेगा, मेगाप्लस आणि सुपर-मेगा प्रवर्गासाठी १५ दिवसांची मुदत निश्चित करून जमीन वाटपाच्या प्रमाणकांमध्ये ही सुलभता आणली आहे.
पुनर्रचना सहसंरचनात्मक प्रकल्प यांची लाट व नवीन गुंतवणूक धोरण यामुळे उत्तर प्रदेशात सध्या जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूत नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेश हे 'सिंगल टेबल सिस्टिम’ प्रस्तुत करणाऱ्या आणि अन्य उद्योग-स्नेही धोरणे तसेच नफा व लाभ मिळण्याच्या आश्वासनासह पारदर्शी बोली पद्धतीसाठी पीपीपी प्रकल्पांकरिता स्पष्ट नेमून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे यांसह स्वतःची स्पेशल इकनॉमिक झोन (सेझ) पॉलिसी बनविणाऱ्या पहिल्या राज्यांपैकी सुद्धा एक राज्य आहे.
कोविड – १९ मुळे उद्भवलेल्या विद्यमान आर्थिक अडचणींनी डगमगून न जाता "शासनाचा पाठिंबा व प्रोत्साहन स्वस्थितीस्थापक बाजारपेठा आणि सतत वाढत जाणारी देशी मागणी, प्रगती व वाढीसाठी विपुल संधींची प्रवेशद्वारे उघडून सर्व क्षेत्रांमध्ये चैतन्यमयी आर्थिक कार्याकरिता सातत्याने भरपूर वाव निर्माण करीत आहे.”
राज्यातील एमएसएमईंची पुनर्रचना करावयाच्या उद्देशाने राज्य शासनाने कच्च्या सामग्रीची जकात मुक्त आयात करण्यासाठी, चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना सब्सिडीज देण्यासाठी धोरणात मोठे बदल सुरू केले आहेत आणि यमुना एक्प्रेवेलगत ३०० एकरचे महत्त्वाकांक्षी "प्लग ऍंड प्ले” पार्कमध्ये एमएसएमई येऊन लगेच दुकान सुरू करू शकतात.

इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्यासाठी गुगलचे एखादे सॉफ्टवेअर वापरले असेल तर त्या मानाने ही मराठी ठीक म्हणता येईल. पण एखादा जबाबदार भाषांतरकार जर असे लिहित असेल तर सुधारणेला वाव आहे.

१) शक्य असेल तिथे लहान लहान वाक्ये वापरा. पल्लेदार संवाद ऐतिहासिक नाटकात शोभतात. जाहिरात ही एखाद्या गणिकेसारखी गिऱ्हाइकाला कमीत कमी वेळेत पटविणारी असावी लागते.
२) प्रत्यय शब्दाला जोडून लिहा. व्यापारासाठी हा एकच शब्द आहे. 'व्यापार साठी' किंवा 'व्यापारा साठी' असे लिहू नका. चा ची चे च्या हे विभक्ती प्रत्यय आहेत. ते कधीच सुटे वापरले जात नाहीत. शब्दाचे सामान्यरूप बनवून त्याला हे विभक्ती प्रत्यय चिकटून लिहायचे आहेत. म्हणजे "हळद” शब्दावरून "हळदी” हे सामान्यरूप आणि "हळदीचा" हा झाला फायनल शब्द. असा क्रम "प्रमाण मराठी" भाषेने अधिकृतपणे स्वीकारल्याला बरीच वर्षे झाली आहेत. हिंदी भाषेत "व्यापार के लिये" असे सुटे सुटे लिहतात. हिंदी भाषेतली ही सुलभता मराठीत यावी असे जर कोणाला वाटत असेल तर त्याने तसा रीतसर प्रस्ताव ठेवावा आणि त्यावर चर्चा घडवून आणावी. संख्यावाचनाच्या बाबतीत इंग्रजीसारखी सुलभता मराठीत आणण्याचे जोरदार प्रयत्न झाले आहेत. (पन्नास सहा की छप्पन) शब्द तोडून लिहणे हे हिंदी भाषेचे मराठीवरील अप्रत्यक्ष ("सटल”) आक्रमण आहे. त्याला बळी पडून त्याचा स्वीकार करणे ही मराठी माणसाची दुर्बलता म्हणता येईल.

ह पा, धन्यवाद

शंतनू,
छान विश्लेषण.

पण बाकी कोणत्याच भाषेत तशी सूट नाही. मराठीत तर नाहीच.
>> अगदी अगदी !

सध्या समाजात वावरताना आपण जे ‘शारीरिक अंतर’ पाळत आहोत त्यासाठी एकच मराठी शब्दाचा शोध वृत्तमाध्यमांतून कसा उत्क्रांत होत गेलाय ते पाहणे रोचक आहे.

सामाजिक अंतर >>> शारीरिक अंतर >> अंतरसोवळे (हा अपेक्षेप्रमाणेच वादग्रस्त !) .....

परवा ‘सकाळ’मध्ये ‘अंतरभान’ वाचला आणि तृप्त झालो. सुंदर !

याहून वेगळा वाचला असल्यास लिहा.

ही पहा वोडाफोनची एक जाहिरात. अगदी विनोदी मराठी :

“धन्यवाद आपल्या समजूतीसाठी”
नुकतेच त्यांचे towers बंद होते. त्यामुळे ग्राहकांना गैरसोय सोसावी लागलेली आहे त्यासंदर्भातील जाहिरात.

https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=1

अशुद्धलेखन, भाषा आणि व्याकरण याबद्दलची बेफिकिरी यावर आतापर्यंत आपण बरीच चर्चा केली आहे. मात्र अशाच प्रकारे एका नागरिकाने १९०९मध्ये लिहिलेले एक पत्र रेल्वेच्या इतिहासात क्रांती करून गेले ! पूर्वी रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये शौचालये नसत. त्याचा प्रत्यक्ष त्रास भोगल्यावर अखिल सेन या गृहस्थांनी रेल्वेला लिहिलेले हे पत्र मोठे रंजक आहे .
थेट रेल्वे संग्रहालयातून…….

Indian-Railway-Toilet.001.jpg

धमाल Biggrin
Lota in one hand and dhoti in next Lol
Expose all my shockings Biggrin
तो "त्रास" पोहोचवला व्यवस्थित....
फणसाचे आभार मानायला हवेत , शौचालयातील योगदानासाठी Wink

अस्मिता +७८६
फणस, धोती, लोटा सगळेच लई भारी !
पत्र लिहीले हे किती महत्वाचे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/baba-ramdev-patanjali-coronil-...

चार महिन्यात २४१ कोटींची कमाई; ‘कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल

लोकसत्ते सारख्या वृत्तपत्राकडून ही अपेक्षा नव्हती.

१. कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे असं द प्रिंटने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
२. या औषधाची किंमत ५४५ रुपये ठेवण्यात आली होती.

वरील दोन्ही ओळी बातमीतून जसाच्या तशा उतरवल्या आहेत.

गडबड वाटली म्हणून नीट गुणाकार केला तर उत्तर येतं १२८२९३००००, म्हणजे १२८.२९ कोटी.
बरं गणित येत नसेल म्हणावं तर निदान भाषा तरी. -a-big-hit-sales-total-an-estimated भाषांतर म्हणून कमाई हा शब्द?
कमाई (प्रॉफिट) वेगळी विक्री (सेल्स टर्नओव्हर) वेगळी
काही नाहीच ते.

Pages