लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता इथे यांना 'गैरहजर' म्हणायचंय बहुतेक.
अगदी साजूक तुपातली भाषा अपेक्षित नाही.ऱ्हस्व दीर्घ टायपो करा.पण इथे 'गैरसमज' मुळे पूर्ण वाक्याचा अर्थ बदलून नव्याने बातमी वाचणारा नक्की भंजाळणार.
IMG_20200712_163712.jpg

रंगाऱ्याना मराठी भाषा देवनागरी लिपीत शुद्धरीत्या लिहिण्याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे ह्या वाक्याला जोरदार समर्थन. कित्येक वेळा मराठी लेखनाची लिपी देवनागरी असूनही लिखाण हिंदी वळणाने केले जाते. ण, ळ च्या जागी न, ल लिहिले जातात. ड साठी हमखास द, ट साठी त असेही होते. अर्थात रंगारयांकडे इंग्लिशमधून मजकूर ( रेल्वे स्टेशन्सची नावे, दुकानांच्या पाट्या वगैरे) सोपवल्यामुळे होते. गुजराती कापडदुकानदारांच्या दुकानांच्या पाटयांवर टेक्षटाईल्स अशीच अक्षरे दिसणार. रेल्वे स्टेशनांच्या नावात फारच गडबडगुंडा होतो. ब्रिटिश काळात रंगवलेल्या पाटयांची लेखनपद्धती पुढे कित्येक वर्षे चालू होती आणि ती अगदी बिनचूक असायची.

अनु, हीरा >> +११
..........................
वृत्तपत्रांत अनेक व्यक्तींच्या मृत्यूची छोटी बातमी एकत्रित देणारे सदर असते. बऱ्याच वृत्तपत्रांत त्याला ‘दुःखद निधन’ असे शीर्षक असते.

यासंदर्भात ‘सकाळ’चे वैशिष्ट्य उठून दिसते. त्याचे संस्थापक श्री. परुळेकर यांनी असा असा मुद्दा मांडला होता. निधन हे मुळात दुःखदच असते. त्यामुळे ‘दुःखद निधन’ असे लिहिणे हे ‘पिवळा पितांबर’ ठरते.
त्यास अनुसरून सकाळ मध्ये अशा सदराचे शीर्षक नुसते ‘निधन/ निधन वार्ता’ असे देतात.

Biggrin शाळेत हजर असता तर 'गैरहजर' शब्द आठवला ही असता त्या बातमीदाराला. गैरहजराला "गैरसमज ते गैरवापर" सगळे "गैर" सारखेच...

"गैरों"पे करम अपनोंपे सितम, ए-जाने-वफा ये जुल्म न कर....

मला साजूक तूपातील भाषा अपेक्षित आहे. प्रकाशनक्षेत्राबद्दल खूप माहिती नाही पण एखाद्या नव्या बातमीदाराला/टंकलेखकाला वर्ष-दोन वर्षात प्रशिक्षित करण्यात फार अडचण नसावी. ज्याच्या/ जिच्या बातम्यात खूप चूका असतील त्यांना बढती देवू नये. आपण हल्ली प्रत्येक क्षेत्रात क्वालिटी अश्युरंस्/कंट्रोल इ करतो. मग वर्तमानपत्र अपवाद असू नये. माझ्या पोस्टी बातमीदाराला' उद्देशून असल्या तरी तो त्या व्यक्तीचा दोष नाही ह्याची जाणीव आहे. हे 'सिस्टेमिक फेल्युअर' आहे. वाचक सोसतो म्हणून जास्तच करतात... Happy

नाहीतर काय
"गाडीचे चाक बाईंच्या अंगावरून गेले" ऐवजी "गाडीचे चालक त्यांच्या अंगावरून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला " लिहायचं? किमान थोडी तरी बातमीवर,अर्थावर दया दाखवावी.परिस्थिती काय,, तुम्ही लिहिताय काय.(मागे पिंपरी शाळेसमोर बाईक चालवणाऱ्या दोन स्त्रियांचा अपघात होऊन त्यातली एक गेली होती तेव्हाची 100% सत्य बातमी-चूक आहे ही)

तसेच ‘रेल्वे’खाली चिरडून मृत्यू हेही वाक्य चुकीचे आहे. ते रेल्वेगाडी खाली... असे पाहिजे.
अशा गोष्टी त्यांच्या शिक्षणात असतात पण नंतर सगळे विसरून जातात.

मागे एकदा प्रुफ रिडिंग नीट न केल्यामुळे एक भयंकर प्रकार एका प्रसिद्ध दैनिकाच्या ऑनलाईन एडिशन मधे झाला होता. "श्री ने बालपणीच्या मैत्रीणीच्या बोटात घातली एंगेजमेंट रिंग" ही बातमीची हेडिंग असायला हवी होती परंतु बातमीदाराने 'टा' च्या जागी वेगळाच शब्द वापरला अन होत्याचं नव्हतं झालं. साखरपुड्याची बातमी अशा स्वरुपात सर्वच पब्लिक फोरम वर जोरात व्हायरल झाल्यामुळे 'श्री' ला अत्यंत मनस्ताप झाला अन त्याने त्याबद्दल फेसबुक वर भावनाही व्यक्त केल्या होत्या. नंतर त्या न्युज च्या मागे नक्की कोण होतं ते काही समोर आलं का ते माहित नाही पण तो प्रकार वाचुन डोकं आउट व्हायची वेळ आली होती.

"थांबला नाही" >> !!!! जिल्हाधिकारी ना, मग असा एकेरी उल्लेख नाही करत बातमी देताना. शास्त्र असतं ते!
(जरी अगदी त्यांना बायकोने भाजी आणायच्या कर्तव्यासाठी घरातून हाकलेलं असेल तरी.... )

कालच्या लोकसत्ता (२८/८/२०) छापील आवृतीच्या e-version मध्ये पाहिलेले ---
वाडा तालुक्यातील भातशेतीची बातमी. मथळा होता --- आवणी जोरात, पाऊसाची पाठ.
बातमीतल्या चुका वाचायची हिंमत केली नाही.

अशा घोडचुका पाहिल्यानंतर ज्यांना शक्य असेल त्यांनी संबंधित संपादकांना एखादी ई-मेल पाठवून बघा. आपण सकारात्मक राहायचे. दहापैकी एक-दोन वेळा जरी दखल घेतली गेली, तरी छान म्हणायचे.

दुसरे काय करणार ?

मी मटा मधली हेडिंग ची चूक फेसबुकवर टाकल्यावर मटा मधल्या मित्राचा आमच्या नोकऱ्या घालवतो का भाऊ म्हणून फोन आला आणि काढायला लावली तिथून
पण म्हणलं अरे प्रिंट होऊन आलीये तर सगळे वाचणारच ना
Happy

@सीमंतिनी - प्रकाशनक्षेत्राबद्दल खूप माहिती नाही पण एखाद्या नव्या बातमीदाराला/टंकलेखकाला वर्ष-दोन वर्षात प्रशिक्षित करण्यात फार अडचण नसावी.>>>>
असं बिलकूल नाही होऊ शकत कारण असंख्य पत्रकार हे पत्रकारीतेचा गंध नसलेले असतात. कसलंही प्रशिक्षण नाही. वर्तमानपत्रांना फक्त 'काहीतरी' बातमी पाहिजे असते. खरी असो की खोटी. दै. भास्कर, लोकमत, लोकसत्ता यांसारख्या वर्तमानपत्रांचे अतिसुमार दर्जाचे पत्रकार मी अनुभवले आहेत. पत्रकारांना प्रशिक्षित करण्याची शक्यता मला वाटत नाही.
मागं एकदा काही नावाजलेल्या वर्तमानपत्रांच्या संपादकांशी बोलायची संधी मिळाली होती. तिथं त्यांनी मला सांगितलेली एक गोष्ट मी कधी विसरणार नाही.
'Bad news is good news
Good news is no news
and no news is bad news.
याचा पडताळा मी अनेकदा घेतला.

आता पत्रकारांच्या दर्जाचा विषय निघालाच आहे, तर एक अनुभव सांगतो.

एक केरळी तरुणी आमच्या शेजारी राहायच्या. त्या विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होता होत्या. एकदा सहज गप्पा मारताना मी त्यांच्यापुढे stationary / stationery ही शब्दजोडी ठेवली आणि म्हणालो, “सांगताय का जरा यातला फरक?”

फारसा विचार न करता त्या एकदम म्हणाल्या, “एकच आहे ते, त्यात काय ? एक ब्रिटिश स्पेलिंग आहे तर दुसरे अमेरिकी . अर्थ एकच !”

आता कपाळावर हात मारायची वेळ माझ्यावर आली. पण राहवले नाही. म्हटलं, “ तसं नाहीये . stationary हे विशेषण आहे आणि stationery हे नाम आहे. आणि दोन्हींचे अर्थ वेगळे आहेत. जरा उजळणी करा”
“ बर, बघते बघते “ म्हणून त्या सटकल्या.

Practice आणि practise आठवले. एक नाम आहे आणि एक क्रियापद (अनुक्रमे ).... मला अजूनही गोंधळात टाकतात असे शब्द.
आमच्या एका शिक्षकाने "I were" असे होते तर चुकून छापले असे म्हणून खूप दिवस दिशाभूल केली होती. नंतर कळले की योग्य होते ते कल्पना करताना तसेच लिहितात.

मी_अस्मिता, एक आनंदाची बातमी - अमेरिकन इंग्लिश मध्ये फक्त Practice असतं. Happy नाम व क्रियापद दोन्हीसाठी. फारच गोंधळ उडाला तर मी अमेरिकन इंग्लिश मध्ये लिहीलं म्हणून टाकायचं Biggrin (चोराच्या वाटा...)

बरेच लोक smash आणी mash ह्याचा गोंधळ करतात. अनेक Recipes मध्ये 'बटाटा smash करुन घ्या' असे बिनधास्त (पण चुकिचे) लिहीलेले वाचले आहे. भाचीने (convent educated and double graduate) ही चुक केली तेव्हा मी तिला विचारले: smash आणी mash म ध ला फरक माहीत आहे? चक्क 'नाही' म्हणाली!

>>खरंच कॉन्व्हेंट मध्ये होती कि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले आहे?

कॉन्व्हेंट मध्ये होती! Saint अमुक तमुक, शिक्षिकांची नावे, sister XYZ.

अजून एक चूक आहे.
प्रतिष्ठेचा शब्दाऐवजी प्रतिष्ठचा लिहिलंय. शिवाय ष्ठ आणि चा यांच्या मधे अवग्रह आहे.

Pages