लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात हल्ली बऱ्याच लोकांना मूळ मराठी शब्द,पर्यायी चपलख शब्द माहीत नसतात,इरकल साडी प्रकाराला हिरकल म्हणणारे बरेच लोक हल्लीच भेटले आहेत, त्यामुळे प्रूफ रिडींग वगैरे ची खरच गरज आहे असं त्यांना वाटत नसेल

आदू,बरोबर.

आता मुद्रितशोधन हाच विषय चालला आहे तर एक छोटीशी सूचना :
तुमच्या प्रतिसादातील चपलख हा शब्द संपादित करून टाका बरे !
गंमत हं.....

नाहीतर काय
पूर्ण बातमीत किमान एकदा त्या वाहनाचा प्रकार लिहिला असता तर काही बिघडले असते का?
मी आधी 'हायवा' म्हणजे हायवे ची टायपो समजून वाचत होते
किंवा मराठे चं मराठा तसं हायवे चं हायवा Happy
मग हायव्याची धडक वगैरे वाचल्यावर वाहनाबद्दल बोलतायत अशी ट्यूब पेटली

हायवा ही हायड्रॉलिक सिस्टिमचा ब्रँड आहे. हेवी डंपर जे अधिकांश वाळू रेती साठी वापरले जातात ते टाटा लेलँड किंवा अन्य कंपन्याचे असले तरी ज्या डंपर ला हायवा सिस्टीम असते ते डंपर हायवा म्हणून ओळखले जातात. हा रेती जेथून येते त्या सोलापूर जिल्ह्यातला अगदी प्रचलित शब्द आहे. सगळ्याच बुलडोझर ना कसे जेसीबी म्हणले जाते आणि पट्टेवाल्या बॅक हो लोडरला पोकलेन तसे सगळ्या हेवी डंपर ना हायवा.
तुकडा बोलेरो ( बोलेरो ची duel cabin ट्रक)
छोटा हत्ती ( टाटा एस)
टेंपो ( छोटा ट्रक, बजाज टेंपो आता फोर्स मोटार होऊन ते हे प्रोडक्ट तयार ही करत नाहीत पण चार चाकी बारका ट्रक म्हणजे टेंपो)
कंटेनर वाहून नेणाऱ्या ट्रेलर ट्रक ना कंटेनर असेच संबोधले जाते, भले त्यावर तो डबा नसला तरी.
जीप भारतात फक्त कंपास आणि रँग्लर विकत असली तरी महिंद्रा च्या सगळ्या जीप च.

हायवा>>>

माहितीसाठी धन्यवाद, अभ्या.

वा, उत्तम माहिती. जेसीबी माहित होते पण हा हायवा इतका झेरॉक्स सारखा जनरीक शब्द आहे माहिती नव्हते.
बाकी या सर्व टेक्निकल टर्म वाचून एकदम उच्च वाटले. म्हणजे जो डबा उचलून मागच्या बाजूने ९० डीग्री वर येऊन त्यातली रेती टाकता येईल तो प्रत्येक प्रकार हायवा असे म्हणता येईल मनातल्या मनात.

छान माहिती अभ्या.

जर मी हायवा शब्द कुठे असाच ऐकला असता तर मला ते पक्ष्याचे नाव वाटले असते. "हायव्याने सापाचे पिल्लू उचलून नेले." किंवा " आमच्या घरासमोरच्या झाडावर हायवे घरटी बांधताहेत" वगैरे.

शनाया कपूर च्या बातमीत उल्लेख करताना आलिया ला लग्न होण्या आधीच कपूर घराण्याची सूनबाई केलेले पाहून गंमत वाटली(की गुप्त लग्न झालेय आणि मलाच माहीत नाही? Happy )
https://m.saamana.com/article/photos-of-shanaya-kapoor/355119

जरा चुकीचे आहे.
काल अगदी एका न्युज चॅनलवर खाली कॅप्शन मध्ये जितेंद्र आव्हाड यांचे नाव 'जितेंद्र अव्हाण' लिहीलेले वाचून धन्य झाले.

बिलकूल अयोग्य.

Submitted by कुमार१ on 25 March, 2021 - 17:24

मलाही तेच वाटलं. सनसनाटी मथळा करायचा म्हणून केला असणार.

भाषा व माहिती : दोन्हीत घोळ

"आता अभिनेते आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खासदार परेश रावल यांना करोनाची लागण झाल्याचं समोरं आलं आहे."
https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-paresh-rawal-te...

...... विकीवरुन खात्री केली की ते माजी खासदार आहेत.

(त्यांना नंतर मध्येच कधीतरी राज्यसभेवर घेतले की काय, असा वाचणाऱ्याचा गैरसमज होऊ शकतो.)

छान लेख
https://www.loksatta.com/blogs-news/blog-by-mayuresh-gadre-on-marathi-la...

पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच असंख्य चुका दिसत असताना लेखिकेने पुस्तकविक्रेत्याचा सल्ला मनावर घेऊन सर्व दुरुस्त्या केल्या !

छान लेख आहे कुमार सर! जरा अवांतर होईल, पण..
मयुरेश गद्रे हे नाव मला ओळखीचं वाटलं आणि जरा शोधाशोध केल्यावर खात्री झाली. यांचं डोंबिवलीत स्टेशनरीचं, पुस्तकांचं वगैरे दुकान आहे. ते गेली किती तरी वर्षं पर्यावरणस्नेही आकाशकंदील विकतात. यावर्षी त्यांनी स्वतः आमच्या बंगळूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून आकाशकंदील बनवण्याची ऑनलाइन कार्यशाळा घेतली होती. त्यासाठी लागणारं साहित्य त्यांनी कुरियरने पाठवलं होतं. खूप प्रोफेशनली केलं होतं सगळं. छान आकाशकंदील तयार झाले होते आमचे! Happy

वावे, आभार.
मयुरेश गद्रे यांचे मनपूर्वक अभिनंदन !

डॉक्टर, खूप छान लेख आहे गद्रे यांचा.

प्रिन्स फिलिप यांचं निधन झाल्यावर एका वृत्तवाहिनीवर 'इंग्लंडच्या राणीचे पती दुसरे फिलिप' ह्याऐवजी 'इंग्लंडच्या राणीचे दुसरे पती फिलिप' असं लिहिलेलं पाहिलं.

हे राम..... इंग्लंडच्या राणीच्या नावात दुसरा शब्द आहे, पतीच्या नाही. तिकडे इंग्लंडात नावांचा इतका तुटवडा आहे की आहे तीच दोन चार नावे पुरवून पुरवून वापरावी लागतात. पुरुषात विल्यम, हेन्री, चार्ल्स, एडवर्ड. र्स्त्रियांत विकटोरिया आणि एलिझाबेथ. संपला शब्दकोश. केवळ राजा राणीचा नावामागे पहिला दुसरा लावतात. बाकी जनतेला ही सुविधा नाही.

हो ना
त्या बातमीने खूप गोंधळात टाकलं.एकंदर बातम्या लिहिणे हा हल्ली फ्रेशर लोकांना दिलेला उद्योग आहे असं वाटतं(जा रे, बीबीसी, बॉलीवूड वाल्यांचे इंस्टा, लंडन चा एखादा पेपर चाळ आणि एका तासात 4 बातम्या पब्लिश कर)
इथे कोणी पेपरवाले असतील तर खरं काय ते सांगू शकतील.

फक्त इंग्लंडची राणी लिहीलं तर दुसरी लिहीण्याची गरज नाही. इंग्लंडची राणी एलिझाबेथ असं लिहीलं तर दुसरी लिहीण्याची गरज आहे. बाकी जनता पण लावू शकते. उदा: मार्टीन ल्यूथर किंग ज्युनियर हे प्रसिद्ध नेते - वुई शॅल ओव्हरकम म्हणणारे. त्यांचा मुलगा मार्टीन ल्यूथर किंग तिसरा.... आता राहिला प्रश्न हे केवळ इंग्लंड-अमेरिकेतच होते का? नाही, भारतातही बाजीराव आहेत.

(घरातल्या चांदी/ स्टीलच्या भांड्यांवर घातलेली नावे बदलायला नको म्हणून असे प्रकार करत असावेत असा माझा मध्यमवर्गीय कयास....)

उलट चांदीच्या भांड्यांवरच्या नावांमध्ये स्पष्ट उल्लेख हवा, पहिली की दुसरी तो. कारण वारसाहक्काने कुणाकडे जाणार हे कळायला पाहिजे. Wink
यावरून 'भेट' सिनेमा आठवला.
https://youtu.be/SsKJr9ed2Aw
इथे १.१६.२५ च्या पुढे बघा Happy
सिनेमा तसा गंभीर पण छान आहे, हा एवढा संवाद विनोदी आहे.

मग स्टीलच्या भंड्यावर पूर्ण अड्रेस लिहायचा
"कॅटलीनची व जॉन ची मुलगी, एडवर्ड ची प्रेमळ बहीण,लुडविग ची भाची राणी वज्रचुडेमंडित एलिझाबेथ द्वीतीय हिस डोहाळेजेवणाप्रित्यर्थ सप्रेम भेट" वगैरे Happy

नावात काय आहे म्हणणारा शेक्सपियर म्हणूनच इंग्लंडमध्ये जन्मला! आपल्याकडे एकाचं एक नाव पुरत नाही. पाळण्यात घालतानाच किमान पाच नावे! देवांची तर बातच नको - एकट्या विष्णूची हजार नावं आहेत!

Pages