शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

`The Number you have entered ' चे मराठीकरण BSNL Complaint Booking Service मधे `आपण प्रवेश केलेला क्रमांक आहे' असे केले आहे ( कानाला अगदी टोचतं ते). हे बरोबर आहे का ?

>>आत्मसन्मानाचा अभाव व असुरक्षिततेच्या भावने मुळे स्वार्थ व असूया या दोन दुर्गुणांची निर्मिती होते>>
हे वाक्य बरोबर आहे का?

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
"दिवाळी" हा शब्द वापरला म्हणून सोप्पंय.
पण
दिपवाळी की दिपावली की दीपावली ???

यातलं नक्की काय बरोबर ?
की यातलं काहीच नाही ?

दीप = दिवा
अवली = रांग, "लाईन"
असा तो दीपावली असा शब्द आहे. दीप ऐवजी दिवा अन अवली चं ळी केलं की झाली दिवाळी.
असो
तुम्हाला बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा.
इडापिडा टळो. बळीचे राज्य येवो!

इब्लिस, आंबा१

यू गॉट इट राँग

दीपावलि

रांग/ओळ यासाठी आवलि असा शब्द आहे.
दीप+आवलि=दीपावलि.
पहिल्यांदा वाचनात आलं तेव्हा मीही चक्रावलो होतो.
असो.

धन्यवाद चिनुक्स. आता मला प्रश्र विचारताना काही शंका येणार नाहीत आणि लिहिताना सुद्धा. Happy

आज काल एक अतिशय खटकणारं रुप म्हणजे संधी. एक संधी आणि अनेक संध्या!!! Uhoh कुठून येतात एक एक जण देव जाणे!! Happy

चिनुक्स,
तज्ज्ञ हा तत्सम शब्द आहे, आणि तज्ञ हा तद्भव.>>
जरा अधिक प्रकाश टाकणार का?

इब्लिस,
तत् किंवा तद् ही दोन्ही रूपे संस्कृतात एकच.

रॉबिनहूड,
तत् + ज्ञ= तज्ज्ञ हे एका संस्कृत संधिनियमानुसार होते. नक्की नियम लक्षात नाही. कॉलेजातल्या वह्या तपासून सांगू शकेन Happy

मागे पान ६ वर शब्दांच्या अशुद्ध- शुद्ध रूपांची एक यादी आहे, ती हेडरमध्ये घेता येईल का?
त्या यादीत सगळ्यात वर, ठळक आणि शक्य तितक्या मोठ्ठ्या (हे मुद्दाम असं लिहिलंय Wink ) अक्षरांत "वैगरे चूक - वगैरे बरोबर," हे हवे.

भरत मयेकर,
'वगैरे' बद्दल दणदणित अनुमोदन.
डोकं सटकतं ते 'वेगरे/ वैग्रे' असं काही लिहिलेलं पाहिलं की.

उदयन-
>>प्रसिद्ध बरोबर.

प्रसिद्ध याची फोड = प+र+स्+इ+ध+द+द
..
आणि

प्रसिध्द याची फोड = प+र्+स्+इ+ध्+द
.
..
काय बरोबर

त्या यादीत सगळ्यात वर, ठळक आणि शक्य तितक्या मोठ्ठ्या (हे मुद्दाम असं लिहिलंय ) अक्षरांत "वैगरे चूक - वगैरे बरोबर," हे हवे.
>>>
भरत, माबोवर वगैरे साठी वै. असा शॉर्टफॉर्म वापरतात, म्हणून म्हणताय का हे? मलाही सुरुवातीला कळले नव्हते की वगैरे साठी वै. का? आणि आता असे झाले आहे की मलाही ती सवयच पडून गेली आहे. Proud

पण 'वगैरे' हा शब्द पूर्ण लिहिताना वैगरे कधीच लिहिले जाणार नाही (टायपो वगळता) हे नक्की! Happy

वैगरे हा संपूर्ण शब्द सर्रास वाचायला , ऐकायला मिळतो. वगैरेचे संक्षिप्त रूप वै कसे काय होते?
इत्यादि हा शब्द आणि त्याचे 'इ.' हे संक्षिप्त रूप वापरता येईल.

तसेच "हे माझे वैयक्तिक मत आहे" असेही दिसते. जेव्हा एखाद्या अधिकारपदावरची व्यक्ती आपले वैयक्तिक मत देत असते आणि ते ती व्यक्ती ज्या संस्थेच्या सेवेत आहे, त्या संस्थेचे मत नाही तर केवळ तिचे स्वतःचे मत आहे हे स्पष्ट करण्यासाठी असे लिहिले जाते. मायबोलीवर असे लिहायची गरज काय आहे?

सगळी पानं वाचली,मजा आली..
काही शंका:
१.आवृत्त-मेहुणा या अर्थी 'आवृत्त' नव्हे तर 'आवुत्त' असा शब्द वाचलेला आठवतोय.. मृच्छकटिकात होता..

२.'मोत्ये' असा प्रयोग व्रतांच्या कहाण्यांमध्ये येतो.तो कोणत्या अर्थी घ्यायचा?

३.'गेलेले','केलेलं' हे मी गोव्याच्या मराठी भाषेत ऐकलं आहे. माझी समजूत अशी होती की तो तिथल्या ब्राह्मणी बोलीचा प्रभाव आहे. त्यात 'गेल्ले,केल्लं' असे प्रयोग वापरतात. जुन्या मराठीबद्दल वाचताना 'दिल्हे,घेतले' असे प्रयोग वाचले होते. त्यात ध्वनिशास्त्रीय बदल होऊन 'दिल्ले' वगैरे, आणि पुन्हा बदल होऊन 'दिलेले,केलेले' इ. असं असू शकेल का?

कृपया डोक्यात प्रकाश पाडावा..

इंग्रजी शब्द जे मराठीत भाषांतर न करता तसेच वापरले जातात, अशा शब्दांसाठी ते कसे लिहावेत यासाठी काय नियम आहेत?
उदा. Screen हा शब्द 'स्क्रीन' असा लिहिल्यास का चुकीचा होतो? 'स्क्रिन' असे लिहिण्यामागे काय नियम आहे?

<इंग्रजी शब्द जे मराठीत भाषांतर न करता तसेच वापरले जातात, अशा शब्दांसाठी ते कसे लिहावेत यासाठी काय नियम आहेत?>

असे शब्द उच्चारांप्रमाणे लिहावेत. screen = स्क्रीन

http://www.maayboli.com/node/12152 इथला नियम क्र. १४.

रावी,
तुष्टता.

http://www.loksatta.com/vishesh-news/guest-nana-patekar-41100/

वरील लिंकमधे 'अथिती संपादक नाना पाटेकर' असे आहे, ते अतिथी असले पाहिजे ना?

अतिथी = तिथी न कळवता आलेला असाच अर्थ होतो ना?
पाहुणा जास्त योग्य शब्द असता का? गेस्टला मराठी शब्द?

पाहुणा पेक्षा निमंत्रित म्हटले तर? इथे संपादनासाठी या असं निमंत्रण देऊन बोलवलेलं असतं ना? शब्दशः भाषांतरं केली की गडबड होते, ती अशी.

Pages