शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लुत्फ म्हणजे मजा,आनंद..

लुत्फ-ए-मय तुम्हे क्या कहूं जाहिद,
हाय कम्बख्त, तूने पी ही नहीं....

लुफ्त हा जर्मन शब्द असून त्याचा अर्थ हवा(air) आहे. लुफ्तहंसा ही जरमन एअरवेज प्रसिद्ध आहे. लुफ्त असा उर्दू हिन्दी ऐकिवात नाही...

इब्लिस माझ्या मते लुत्फ. परंतु तो उर्दु शब्द असल्याने मराठी- इंग्रजी मोल्सवर्थ मध्ये नाही सापडणार. एखादी उर्दु-इंग्रजी दिक्शनरी बघायला हवी. मी जिथे जिथे वाचलेल्य तिथे लुफ्त असेच वाचल्याचे आठवते. बाकी तज्ज्ञ सांगतीलच.

बाळू जोशींनी योग्य लिहिलंय.

लुत्फ(उर्दू) = आनंद, मजा
लुफ्त(जर्मन) = हवा

बाजो,
अहो, माबोशिवाय इतर मसं आहेत. तिथे घ्या लुफ्त अमक्याचा असले धागे असतात.
तुम्ही चुकिचे टाईपलेत म्हटले तर वस्स्कन अंगावर येतात Wink त्यांना कडक उत्तर द्यायचे आहे.
असो. उर्दू डिक्शनरी "बुकमार्कली गेली" आहे.
धन्यवाऽद!

नीधप | 23 September, 2012 - 13:12
ब्रम्ह,ब्राम्हण,<<<
हे दोन्ही चूक. ब्रह्म आणि ब्राह्मण बरोबर.......
तज्ञांनी प्रकाश टाकावा
तञ्ज्ञ.......?????????

तद् जानाति सः तज्ज्ञः
तज्ज्ञ हा शब्द संधीमुळे तयार होतो.

ज्ञानेश्वर, यज्ञ या शब्दांशी त्याचा काही संबंध नाही.

लेखाजोखा आणि ताळेबंद यातील कुठला शब्द अधिक मराठी?
मला तर दोन्ही फार्सी/अरेबिक मूळ असलेले वाटतात.

मागे यु. म. पठाण यांचे एक सदर वर्तमानपत्रात वाचले होते त्यात असेच मूळ फारसीत प्रचलित नसलेले पण त्या शब्दांवरुन मराठीत रूळलेले शब्द येत असत. उदा. फौजफाटा, मुद्देमाल इ.

प्रश्र्न, प्रष्न, प्रश्न, प्रश्ण??? मला माहितीये हे सर्व चुकीचे आहेत. पण खरा कोणता??
इथे माबोवर लिहिताना हा शब्द मला लिहिता येत नाही. त्याचे key strokes काय?

सुद्धा बरोबर . सुधा - म्हणजे मुलीचे नाव, सुधा म्हणजे अमृत, फार तर साधासुधा मधला अर्धा भाग.
प्रश्न हे लेखी रुप. उच्चारी प्रश्ण असे वाटले तरी.

चिनूक्स यांना अनुमोदन.

धनश्री, तो प्रश्र्न चुकीचा लिहिला आहात. श्र मधे खालचा रफार = नम्र मधे जसा र जोडला आहे, तो र, त्या श्र्न मधे नसतो. काही विशिष्ट फॉण्ट्स मधे तसे लिहिता येते, व ते तेंव्हा बरोबर असते. कारण ती शेंडीफोड्या श, न ला जोडून लिहिण्याची एक पद्धत आहे. इथे लिहिलेला/ दिसणारा श हा 'शेंडीफोड्या' नाही, व तसा सहसा आजकाल लिहिलेला दिसतही नाही.. याला शहामृगाचा श म्हणत असू आम्ही.

शेंडिफोड्या आणि शहामृगातला वेगळा श असतो का?
बहुतेक शेंडीफोड्यातला श च हल्ली शहामृगातला लिहावा असा नियम आहे.
जसे की पूर्वीचा ल आणि आत्ताचा उभ्या रेघेसकटचा ल.
मी लिहिताना ल आणि श अजूनही जुनेच लिहिते.

@साती , भारतातल्या अनेक भाषांकरीता देवनागरी लिपीचा वापर होतो. पण पुन्हा भाषेगणिक काही व्यंजनात फरक आहे (होता). मराठी देवनागरीत काही अक्षरे वेगळी होती/आहेत. मुळात मराठी लिहिली जायची ती मोडी लिपीत . नन्तर च्या देवनागरीला 'बाळबोध' लिपी असे रूढ नाव होते. मोडी- मोडी व बाळबोध -- देवनागरी असा शिकण्याच्या क्षेत्रात प्रवास झाला. मराठीत देवनागरीत जुना 'ल'(दोन्ही बाजूला गोलाकार असणारा), जुना 'श'(शेंडी असलेला), जुना 'ख' (र आणि व सुटे जोडलेले.) असे रूढ होते . हिन्दी देवनागरीत सध्या आपण 'ल, ख श'असे लिहितो तसे होते. पुन्हा हिन्दी देवनागरीत 'ण' हे अक्षर उभ्या तीन रेघानी बनलेले असे . मराठी माणसाना ते ''ए' ला आणखी एक रेघ दिल्यासारखे दिसे . तसेच 'अ' अक्शर 'श्र'ला आणखी एक आडवी रेघ काढून जसे दिसेल तसे असे. हे अक्षरे महाराष्ट्रात रेल्वे स्तेशनांवर पहायला मिळत :). स्टेशनांची जी त्रैभाषिक नावे असत त्यात सर्वात मोठे हिन्दी देवनागरीत असे. त्यात पुणे चे एकदम पाहिल्यास 'पुए' दिसत असे. अहमदनगर हे 'श्रहमदनगर'' दिसे !
'सिद्धान्त कौमुदी 'मधील खालील उतार्‍यावरून या जुन्य अक्षरांची कल्पना यावी. एक बिनशेन्डीचा 'श' देखील दिसतो आहे.!

siddhant.png

तसेच काही अंकही हिन्दीत वेगळे असत उदा:५,८,९ .
बहुधा १९६८ -६९ च्या दरम्यान या देवनागरीचे स्टॅन्डर्डायझेशन केन्द्र सरकारने केले आणि मराठीतील ल, ख,श अक्षरे प्रथम पाठ्य पुस्तकात बदलली. आपली अ ,ण, ५,८,९ हिन्दीवाल्यांच्या टाळक्यावर बसली. नन्तर प्रिन्ट मिडिया, पुस्तकांचे प्रकाशक यांनीही ती रूढ केली. आता तर संगणकीय देवनागरी फॉन्ट्स प्रमाणितच असतात.

ख मधील पूर्वीच्या सुट्या 'र'आणि 'व' मुळे काही विनोद निर्मीतीही झाली आहे. संशय कल्लोळ नाटकात नायक अश्वीन शेठ (चुभूदेघे) बायकोची चिठेठी वाचताना '' आण रवी..'असे वाचून आता रवी कशाला आणायची असे पुटपुटतो व नन्तर स्वतःच दुरुस्त करून म्हणत्ओ "हं हं आणखी , आणखी....' व पुढे वाचू लागतो .

महाराष्ट्राचे एक मंत्री बॅ शेषराव वानखेडे (ज्यांच्या नावाचे वानखेडे स्टेडिअम मुम्बईत आहे) याना झोडपताना आचार्य अत्रे यानी मराठा च्या अग्रलेखात त्यांचा उल्लेख 'वानर वेडे' असा केला होता.
बाकी अत्र्यांच्या लेखाची टयटल्स धमाल असत 'विनोबा की वानरोबा' 'मोर्‍याचा बोर्‍या झाला (मोरारजी देसाइ.)
'हत तेरी माका'' (माधव काशिनाथ देशपांडे ह्या पुण्यातल्या प्राध्यापकांना उद्देशून जे माका देशपान्डे, किंवा 'माका'या नावाने प्रसिद्ध होते.)

'ज्ञ'हे अक्शर मराठीत स्वतन्त्र व्यंजन मानतात तर हिन्दीत संधी मानतात. मराठीत त्याचा संधी द्+न्य असा आपण करतो तर हिन्दीत ग्+य केला जातो .
तञ्ज्ञ.......????????? हे चुकीचेच आहे त्याचा उच्चर 'तंज्ञ 'असा करावा लागेल Happy

'तज्ञ' आणि तज्ज्ञ हे दोन्ही शब्द बरोबर असल्याचा वाद मी वाचला आहे.सध्या माझ्याकडे सन्दर्भ नाहीत . त्याच्या अर्थच्छटा किन्चित वेगळ्या आहेत असा सूर होता. तज्ञ म्हणजे ते जाणणारा तज्ज्ञ म्हण्जे 'त्यातील विशेष जाणणारा.
ते मला न पटणारे वाटले.
विशेषज्ञ,= विशेष जाणणारा
शास्त्रज्ञ =शास्त्र जाणणारा
यात तो 'ज' येत नाही.
तज्ज्ञ हा शब्द तत्+ज्ञ = ते जाणणारा ह्या संधीतून निर्माण झालेला आहे हे उघड आहे. शेवटचा 'त्' आणि ज्ञ मधला पहिला द ही दोन्ही व्यंजने असल्याने व अर्धी (हलन्त) असल्याने त्यांचा संधी होत नाही. व मिसळून उच्चार होत नाही त्यामुळे हा अर्धा 'ज' घुसला असावा.

हाच अर्धा ज , गणित+ ज्ञ= गणितज्ञ मध्ये गणितज्ज्ञ असा घुसत नाही कारन (बहुधा ) गणित मधला शेवटचा 'त' हा हलन्त नसून पूर्णोच्चारित आहे व त्या 'त'चा आणि ज्ञ मधल्या 'द चा उच्चार एकमेकात मिसळत नाहीत व संधी होत नाही. व संधी शब्द न बनता तो केवळ सामासिक शब्द बनतो. (असे मला वाटते :))

ख मधील पूर्वीच्या सुट्या 'र'आणि 'व' मुळे काही विनोद निर्मीतीही झाली आहे. >>> माझी एक मैत्रीण कॉलेजमधे आल्यावर "आज रवरवते बसने आले" असं म्हणायची. ही कुठली बस आम्हाला समजायचे नाही. एकदा बसस्टॉपवर बस आल्यावर नाव पाहिले. खरवते गावची बस होती. Happy

Pages