शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर आणि नंदिनी यानी 'गेस्ट' साठी निमंत्रित/पाहुणा आदीचे योजन केल्याचे दिसले.

या अनुषंगाने आठवले की विद्यापीठातही "This Sunday Dr.AAA - Professor Emeritus - shall deliver lecture on...." अशी नोटीस काही वेळा झळकायची. बाजूलाच मराठीत अनुवाद ... "येत्या रविवारी डॉ.अअअ, सन्माननीय निमंत्रित प्रोफेसर, विद्यार्थ्याना अमुक एका विषयावर मार्गदर्शन करतील..."

इंग्रजीमधील Emeritus हा दर्जादेखील 'अतिथी....निमंत्रित' यांच्यासारखाच मानला जातो. 'मानद' हेदेखील एक विशेषण आहेच या संदर्भात.

अशोक पाटील

माझ्या मते 'तो' चॉईस. कारण माहित नाही, पण असंच ऐकलं असल्याने कदाचित मला 'तो' चॉईस योग्य वाटतोय.
तसं तर चॉईसचा मराठी अर्थ म्हणजे पर्याय किंवा निवड. आता मराठीत 'तो' पर्याय असतो, पण 'ती' निवड असते.

'कुतूहल' बरोबर आहे.
'कार्यवाही करण्यात येईल' हे बरोबर.

'सुकन्या'चं लग्नं ठरलं - यात मी 'फुकन्या' सारखा सुकन्याचा उच्चार केला. सु-कन्या मधे कोणते अक्षर डबल येते का की जिथे जो उच्चार बरोबर वाटतो तो करावा?

मला याचे उत्तर असे वाटते.
'सुकन्या' हा संस्कृतोद्भव शब्द आहे. संस्कृतमधे अशी सर्वसाधारण प्रवृत्ती दिसते की 'य्' या अर्धस्वराच्या आधी येणारे व्यंजन डबल उच्चारले जाते. (यासाठी काही व्याकरणातील नियम असल्यास माहीत नाही. हे केवळ निरीक्षण आहे) जसे, अभ्यास, शल्य इ.
मराठीमधे हे घडेलच असे नाही. म्हणून 'फुकन्या' मधे डबल उच्चार येत नाही. परंतु 'सुकन्या' मधे येतो.

पु ना गाडगीळ ज्वेलर्स च्या नव्या जाहिरातीत माधुरी दीक्षित 'भाग्याचा' याचा उच्चार चुकीचा करतेय.
ग चा उच्चार डबल हवाय ! 'आपली' माधुरी म्हणून अधिकच खटकतंय......डबिंग सुद्धा असू शकतं
आवाज माधुरीचा आहे की नाही मी ओळखू शकले नाही.

स्रोत हा शब्द स्त्रोत असाच लिहीत आलो की हो इतके दिवस Sad
स्तोत्र तरी बरोबर आहे की नाही ? (सगळा कॉन्फिडन्सच जातो बघा.....)
दोन्हीमधले मूळ धातू कोणते आहेत ?

माधुरी दीक्षित 'भाग्याचा' याचा उच्चार चुकीचा करतेय.लहानपणी ' इंद्रायणीकाठी' ह्या पुस्तकातील
हरी मुखे म्हणा ,हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या ओळीवर थबकले होते.
मला पुण्याची म्हणजे पुणे शहराची असे वाटले होते.

अवनी,
स्रोत (स् ला र) हा शब्द योग्य. ह्यातला धातू चेक करून सांगतो.
स्त्रोत चुकीचा.
स्तोत्र बरोबर Happy ह्याचा धातू 'स्तु' असावा. चेक करून सांगेन.

३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ >>>>

पुर्ण धागा वाचला नाही, पण हे शब्द संस्कृत/ हिंदी भाषेत वेगळ्या पद्धतीने लिहिले किंवा उच्चारल्या जातात का? रामदेव बाबांकडुन विज्ञान चा उच्चार विज्ज्ञान असा काहिसा ऐकला होता.

विग्ग्यान, तग्य, ग्यानेश्वर हे हिन्दीतले उच्चार आहेत. प्रश्न असा आहे की उत्तर भारतीय संस्कृत प.न्डित याचा उचार संकृत वाचताना कसा करतात? ग्य करीत असतील तर ते अशुद्ध उच्चार मानले पाहिजेत संन्स्कृत शब्द म्हणून.

>>शब्द उच्चारल्या जातात - उच्चारले जातात Happy
नागपूरकडे केल्या गेले (केले गेले ) असा एक विपर्यास सर्रास रूढ आहे ..

ग्य करीत असतील तर ते अशुद्ध उच्चार मानले पाहिजेत संन्स्कृत शब्द म्हणून.>> सहमत.

अवनी,
स्रोत- ह्या शब्दाचा धातू 'सृ'
स्तोत्र- ह्या शब्दाचा धातू 'स्तु'

'वाजेपर्यंत' असा शब्दप्रयोग करतात, 'वाजेपासून' असा कधी ऐकला-वाचलेला नाही.

मंगलोर-कर्नाटक सीमेवरचे मराठी शब्दप्रयोग असे ऐकलेले आहेत - जाऊपर्यंत, येऊपर्यंत, करूपर्यंत इत्यादी.

>>वाजेपासून असंही म्हटले जाते का?

मी एक बॅक ट्रान्सलेशन करत आहे ज्यात दुसर्या भाषांतरकाराने अनेक ठिकाणी '६ वाजल्यापासून' असं न लिहिता '६ वाजेपासून' असं लिहिलं आहे. माझ्या मते असं म्हणत नाहीत. तेच इथे कन्फर्म करायचं होतं.

प्रस्तावनेत दिलेल्या शब्दांपैकी 'पोलीस' ह्या शब्दाकडे आत्ता लक्ष गेले. हा शब्द मूळचा इंग्लिश आहे ना ? मग खरंतर उच्चाराप्रमाणे तो 'पोलिस' असा लिहायला हवा की मराठीत आपण तो उच्चार दीर्घ करतो म्हणून पोलीस लिहायचं ?

अगो,
Police या शब्दाचा मूळ उच्चार आहे pəˈliːs. 'i'चा उच्चार दीर्घ आहे, जरी एकच i असला तरी. त्यामुळे मूळ इंग्रजी उच्चाराबरहुकूम 'पोलीस' असं लिहायला हवं.

http://www.oxfordlearnersdictionaries.com/definition/english/police_1

http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Pronunciation_respelling_key

बरोबर आहे. मी आधी थोडं चेक करुन विचारायला हवं होतं. नव्याने एक उच्चार कळला Happy

pə-lēs असा उच्चार दिलाय फ्री-डिक्शनरीवर- तो ē म्हणजे bee मधला दीर्घ उच्चार आहे.

"वाजल्यापासून" आणि "वाजेपर्यंत" ही रूपे योग्य होत. "पासून" या शब्दयोगी अव्ययाचा क्रियादर्शक पदाशी योग होताना क्रियापदाचे भूतकाळवाचक रूप अभिप्रेत असते (केले, वाजले, गेले, म्हटले), त्यामुळे "पासून" हा अव्यय जोडल्यावर "केल्यापासून", "वाजल्यापासून", "गेल्यापासून", "म्हटल्यापासून" ही रूपे बनतात. "पर्यंत" या शब्दयोगी अव्ययाचा क्रियादर्शक पदाशी योग घडताना मात्र क्रियेची भविष्यकाळसूचक छटा (करेल, वाजेल, जाईल, म्हणेल) अभिप्रेत असते, त्यामुळे "पर्यंत" हा शब्दयोगी अव्यय जोडल्यावर "करेपर्यंत", "वाजेपर्यंत", "जाईपर्यंत", "म्हणेपर्यंत" अशी रूपे बनतात.

हल्ली बर्‍याच पुरस्कार सोहळ्यांत एखाद्या व्यक्तीची ओळख करुन देताना "त्यांनी अमूक केले." ऐवजी "आपण अमूक केले. आपल्याला हे सन्मान प्राप्त झाले." अशा प्रकारची भाषा वापरतात. हिंदीत अशी ओळख करुन देताना 'आप' ने सुरुवात करुन बोलताना ऐकले आहे. तर हे हिंदीतून उचलले आहे की मराठी भाषेत अशी रुपे वापरणे योग्य आहे ?
कानांना खटकते एवढे खरे !

Pages