शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ बदलला तरी अर्थ तोच राहतो.

उदा. मी नदीमध्ये पोहतो.
मी नदीमध्ये पोहायला जातो.(याचाच 'अर्थ' मी नदीमध्ये पोहतो.)

हेच वाक्य मी नदीमध्ये पोहतो आहे त्याचे मी नदीमध्ये पोहायला जातो आहे असा केला तर तो मात्र बदलतो.

तसे 'मी मुंबईला राहतो' याचे 'मी मुंबईला राहायला आहे(सध्या)' असा काळ बदलला तरी अर्थ तोच होतो.म्हणजे थोडक्यात भावना पोहोचल्या(पोहचल्या Happy ) म्हणजे झालं.

तो सर्व व्यवस्था पाहतो.
तो सर्व व्यवस्था पहायला आहे.
काळ थोडा बदलला तरी अर्थ तोच होतो आहे.वर्तमानातला..

निदान मला तरी असे वाटते.यात बदल सुचवा.

हा बाफ वर आला आहे त्या निमित्ताने

बर्याचश्या लोकांच्या तोंडून मी निघाली , मी बोलली अशी भाषा मी ऐकली आहे .मला फार खटकत हे बोलण. खरेतर मी निघाले , मी बोलले अस असायला हवं ना ? का माझ काही चुकत आहे ?

रामाची सीता कोण!!<<< नाही...सीता कुणीच नाही त्याची.

वर दिलीत ती वानगी दाखल दिलेली उदाहरणे आहेत.एकाच वाक्यात समजण्यापेक्षा वेगळं वाक्य घेतलं. पण मी मुंबईला राहायला आहे हे बरोबर होऊ शकतं.:)

मी बोलली अशी भाषा मी ऐकली आहे .मला फार खटकत हे बोलण. खरेतर मी निघाले , मी बोलले अस असायला हवं ना ? का माझ काही चुकत आहे ?
>>>

तुमचे चुकते एवढेच तुम्ही तांबट आळीत सतार वाजवण्याचा प्रयत्न करीत आहात Happy
हे उच्चार बहुधा मुम्बईतून निघालेत आणि अंगाचा तिळपापड करतात. मी गेलेलो, मी मेलेलो , त्याने मला सांगितलेलं, अशी घाणेरडी मराठी आता दुर्दशनच्या माध्यमातूनही माथी मारली जात आहे.

मला यातील बरोबर काय ते सांगा.
तो पेन - ते पेन
तो ढेकर - ती ढेकर
तो लाईट - ती लाईट
अजू्न आठवले की लिहीनच.

जर ठिकाणानुसार बोलीभाषेतले उच्चार बदलतात आणि त्यात काही गैर नाही हे एकदा मान्य केले तर कसली आलीय तांबटाची आळी आणि कसली आलीय सतार? एका सतारवादकास दुसर्‍याची आळी तांबटाचीच वाटणार.

मी गेलेली, मी आलेली असे मुंबईत वापरले जाते असे बर्‍याचदा वाचले. पण मला मुंबईत फारसे ते ऐकायला मिळाले नाही. पण कराडात मात्र जाणवण्याइतके हे ऐकलेय.

बरे मी गेलेलो, मी मेलेलो हे चुकीचे असेल तर तो गेलेला, तो आणलेला, तो बसलेला हेही चुकीचे का?

आताच (मी) ठेवतीये, देतीये, म्हणतीये, (ती) दिसतीये. दिलीये असे प्रयोग वाचले. हा कुठल्या प्रादेशिक भाषेचा नमुना?
'मी ठेवते आहे'चे माझ्या ऐकण्यात आलेले लघुरूप मी ठेवतेय असे आहे. 'दिसते आहे'चे लघुरूप दिसतेय असे ऐकले आहे (ऐकलेय). आता ऐकलेये असे लिहायचे की हा प्रकार फक्त स्त्रीलिंगातच होतो?
गोष्ट ऐकलीये?

हे उच्चार बहुधा मुम्बईतून निघालेत आणि अंगाचा तिळपापड करतात.

>>> मुंबईमध्ये जिथून म्हणुन लोकं येतात ते तेथील भाषेचा बाज आणतात. मराठी, हिंदी आणि इतर भाषिकही. मुंबईची भाषा हे अनेक भाषांची सरमिसळ असल्याने इथून काही नव्याने उत्पन्न झालेले नाही तेंव्हा त्रागा करू नका. Happy

मी काही म्हणत नाही आहे!>>>>

गजानन तुम्ही हे कुठे ऐकले आहे. मी आतापर्यंत "मला काहीही बोलायचे नाही." असेच ऐकले आहे.

फारा वर्षा[पूर्वी पूलगेटच्या पी एम टीच्या स्टॅण्डावर हुबा अस्ताना तिथला स्टार्टर पुन्हा पुन्हा मोठमोठ्याने ओरडून सांगत होता ' ही बस महम्मदवाडीला जात नाही आहे......" ' ही बस महम्मदवाडीला जात नाही आहे......" त्याच्या या घोषणेमुळे माझ्यासकट सगळेच प्यासिन्जर बुचकळ्यात पडले होते

नाही आहे= नाहिए/नाहिये, असा अर्थ घेतात.पुण्याकडच्या सदाशिवपेठेत या शुद्धतेचे मूळ असावे असे वाटते.बाकी थोडा सकारत्मक परीणाम अधिक दिसावा म्हणून 'नाहिए' चं 'नाही आहे' वापरतात. उदा.करुयात नको,मारुयात नको अशी हेतु पुरस्सर उलटपलटी वापरली जाउ शकते.पण लिहीताना बरोबर वाक्य समयोचन,व्याकरण वापरुन लिहावं असं वाटतं.

जात नाही आहे.>
करुयात नको,मारुयात नको>>
बोली भाषा आहे ही.

आता माझ्या शंकांचं निरसन करा कृपया Happy

आम्ही उद्या सहलीला जायचे ठरवले/ ठरविले
सामान हलवले/ हलविले
बाळाला खुर्चीत बसवले/ बसविले.

ही रूपं दोन्ही प्रकारे वाचायला मिळतात. यातले प्रमाण कुठले?

ठरवले/ ठरविले
हलवले/ हलविले
बसवले/ बसविले.

>>>> पहिले क्रियापद बोलीभाषेत म्हणतात.ग्रांथिकभाषेत दुसरे बरोबर आहे.

हे उच्चार बहुधा मुम्बईतून निघालेत आणि अंगाचा तिळपापड करतात. मी गेलेलो, मी मेलेलो , त्याने मला सांगितलेलं, अशी घाणेरडी मराठी आता दुर्दशनच्या माध्यमातूनही माथी मारली जात आहे.

उलट मुंबई( उच्चार मुम्बै)खेरीज इतर ठिकाणची माणसे ;मार्क भेटले,गावला गेलेलो/ गेल्तो,वगैरे बोलतात हे ऐकले आहे.

गेलेला / दाखवलेला / आलेला ही खरं म्हणजे विशेषणांची रूपं आहेत. 'मुंबईकडे गेलेला रस्ता', 'दाखवलेले चित्र', 'आलेला पाहुणा' इत्यादी. त्याचा क्रियापदांसारखा वापर आता सर्वत्र होतो. अगदी मान्यवर वर्तमानपत्रांमधून आणि नियतकालिकांमधूनही. या वापराची सुरुवात कुठूनही झाली असली, तरी असा वापर शक्यतो होऊ न देणं हे महत्त्वाचं आहे.

दाखविले आणि दाखवले हे दोन्ही बरोबर आहे. 'दाखविले' हे ग्रांथिक आणि जुन्या मराठी शैलीत वापरले जाई. 'दाखवले' हा वापर आधुनिक आणि तो चूक नाही.

रॉबिनहूड , मी ही मुंबईकर आहे . सरसकटीकरण नको प्लीज Happy
माझा तिळपापड़ वगैरे होत नाही . फक्त थोड खटकत . ही बोलीभाषा असेल तर मग प्रश्नच मिटला

वरती मयेकर म्हणतात तो ही मुद्दा विचार करण्याजोगा आहे

मालवणीमधे 'खंय गेलेलंस?' वगैरे म्हणतात. त्याचे मराठीकरण होताना (बोलीभाषेत) कुठे गेलेला वगैरे आले असावे का?
आलेला, गेलेला इत्यादी मी पण मुंबईतच ऐकलेय.
मी आली, मी गेली हे पण.

केल्या जाईल, लिहिल्या गेले वगैरे जाम खटकतं. ते बरोबर आहे की केले जाईल, लिहिले गेले हे बरोबर?
मी हे पहिल्यांदा काही ब्लॉग्जवर आणि नेटवरच्या मराठी जनतेकडूनच ऐकलं (वाचलं!). महाराष्ट्राच्या कुठल्या भागातल्या बोली भाषेत आहे का असे?

<केल्या जाईल, लिहिल्या गेले वगैरे जाम खटकतं. ते बरोबर आहे की केले जाईल, लिहिले गेले हे बरोबर?>

हे आमच्या विदर्भातलं. केले जाईल हे बरोबर.

गेलेला / दाखवलेला / आलेला ही खरं म्हणजे विशेषणांची रूपं आहेत. >>> चिनूक्स, म्हणजे संस्कृतात (किंवा मराठीत) क.भू.धा.वि. म्हणतात तीच ना? जर तसे असेल, तर मग ती विशेषणेच नव्हेत का? त्यांचा क्रियापदांसारखा वापर होऊ नये, ह्याबद्दल अनुमोदन.

<केल्या जाईल, लिहिल्या गेले वगैरे >> हे मी ही ऐकलेल तेव्हा आश्चर्य वाटल होत
पण नेटवरच्या एका मित्राने ही भाषा विदर्भ भागात बोलली जाते अस सांगितल
मिसळपाव संस्थळावर ही भाषा जास्त वाचलेली आहे

केल्या जाईल, लिहिल्या गेले वगैरे जाम खटकतं. ते बरोबर आहे की केले जाईल, लिहिले गेले हे बरोबर?
मी हे पहिल्यांदा काही ब्लॉग्जवर आणि नेटवरच्या मराठी जनतेकडूनच ऐकलं (वाचलं!). महाराष्ट्राच्या कुठल्या भागातल्या बोली भाषेत आहे का असे?
>>>
हा प्रकार खानदेश व विदर्भात आहे. अगदी महानोराना देखील हे शब्दप्रयोग करताना ऐकले आहे. लोकमत दैनिकात ही भाषा प्रिंटमध्ये सर्रास वापरली जाते. आपण १० वाजता म्हणतो खनदेश विदर्भात वाजेला म्हणतात आणि लिहितातही. अकोला वगैरे भागात गोंधळ , दंगा याला दांगडो असा शब्द वृत्तपत्रातही वापरतात. ) चिनूक्स अधिक अधिकारवाणीने सांगू शकेल :)). तसेच धक्काबुक्कीसाठी लोटपाट असा शब्द , आणि दगड फेकीसाठी 'गोटमार':शब्द वृत्तपत्रात रूढ आहेत Proud

"नाही आहे" हे इंदूर , नागपूर कडची मंडळी वापरतात. हिंदीच्या प्रभावामुळे असेल.
नागपूर कडची स्त्री पात्रे मी गेली, मी जेवली, अस स्वतःला त्रयस्थ नजरेने पाहून बोलतात. Happy आम्हाला आता सवय झालीय. मी पण आजकाल कधी कधी म्हणतो. मी जेवला मी गेला.:)

Pages